गिरनार एक अनुभूती


गिरनार एक अनुभूती

 



सोरठ देश  सुहवनो, सुंदर गढ गिरनार

वीर, शेर, पर्वत, गुंफा, योगी तपे निहार ।।

 दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान असलेलं गिरनार. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. गिरनार हे असे अजब रसायन आहे की ते खरोखरच प्रत्येकाला भुरळ घालते. सर्व दत्तभक्त त्याच्या प्रेमातच पडतात. दहा हजार पायऱ्या चढून जाणे हे श्रमाचे जरी वाटत असलं तरी महाराजांच्या कृपेने ते सहज साध्य होतं. फक्त मनी श्रद्धा हवी. या वर्षी आधी परिक्रमा करून मग दत्त पादुकांचे गिरनारवर जाऊन दर्शन घ्यायचे असं ठरलं होतं . महाराजांच्या कृपेने ३८ किलोमीटरची परिक्रमा सुलभ झाली. नव्हे तर त्यांनीच ती आमच्याकडून करवून घेतली होती. आता आम्ही गिरनारवर जाण्यासाठी निघालो. रात्रीच्या वेळी गिरनार चढलो कि तो सुलभ होतो आणि सकाळीच दत्त महाराजांचे दर्शन सुद्धा होतात हा दुहेरी फायदा. अनायासे पोर्णिमाही होती. आमचा चोवीस जणांचा पेणचा स्वामी परिवार गिरनारवर जाण्यासाठी सज्ज झाला. रात्री नऊच्या सुमारास आम्ही कालवा चौकातून तळेटीला पोहोचलो. चढायला सोपे व्हावे म्हणून तिथूनच सर्वांनी काठ्या विकत घेतल्या. प्रवेशद्वाराजवळच आम्ही एक ग्रुप फोटो काढला. पहिल्या पायरीला नमस्कार घालून "महाराज मला घेऊन चला " असं म्हणतच गिरनारची पहिली पायरी चढलो. 

स्वामी परिवार पेण


पहिलंच मंदिर लागतं ते मारुतीचं. मारुती हे शक्तीचं प्रतीक. अनेक भाविक गिरनार चढण्यास सोपा व्हावा म्हणून मारुतीला नारळ चढवताना दिसतात. आम्ही भक्ती भावाने नमस्कार करून पुढे निघालोपौर्णिमेच्या रात्रीचा  शीतल शशी पाहत -पाहत गिरनार चढणं हाही एक निराळा आनंदच असतो. गिरनारवर बहुतेक ठिकाणी विजेची सोय आहे आणि आताशा अंबाजी मंदिरापर्यंत रोपवेदेखील झाला आहेपूर्वी डोलीवाले भरपूर दिसायचे. रोपवे झाल्यापासून आता मोजकेच दिसतात. श्रध्दस्त मंडळी मात्र गिरनार पायी चढणेच पसंद करतात.पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्येजुनागढया शहरापासून गिरनार तळ पाच किमी अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजना म्हणजेच १६ गावांपर्यंत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी ने व्याप्त आहे. गिरनारचं माहात्म्य देखील तितकंच थोर आहे. गिरनार यांचे नाव गीर नारायण होते. ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत. श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने देखील उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. भौगोलिक दृष्टय़ा असंख्य छोटय़ा-मोठय़ा पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी जगताने संपन्न, विविध औषधी-वनस्पतीने युक्त आहे. तसेच ही भूमी योगीसिद्ध-महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेकजण  गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात.



                             रात्रीच्या वेळी २५०० पायऱ्यांवरून दिसणारे तळेटी- जुनागढ चे दृश्य

फक्त गिरनार पर्वत नाही तर त्याच्या  पायथ्याच्या आजूबाजूला देखील वाघेश्वरी मंदिर, गायत्री मंदिर, सम्राट अशोकाचा शिलालेख, दामोदर कुंड, रेवती कुंड, मुचकुंद महादेव गुहा, श्री भवनाथ महादेव, लंबे हनुमानजी, काश्मीरी बापूंचा आश्रम इत्यादी धार्मिक स्थळे, मंदिरे स्थळे भेट द्यायला हवीत अशी आहेत. त्यासाठी एक विशेष वेळ काढूनच जाणे उत्तम. गिरनार हे पवित्र तीर्थस्थान आहे. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे. साधारण  २०० पायऱ्यावर डावीकडे श्रीभैरवाच्या मुर्तीचे दर्शन होते. असे म्हणतात कि पुर्वी एक सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात होते. सर्व साधू संतांमध्ये त्याचा मान खूप मोठा होता. ,००० पायऱ्यावर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो, हे ही एक सिद्धस्थान आहे असे सांगतात. पुढे  ,२५० पायऱ्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुहा आहे. येथेच त्यांनी तपश्चर्या केली होती.  पायातील शूज काढून मी आत जाऊन दर्शन घेतले. आतमध्ये त्यांच्या दोन सुबक मूर्ती विराजमान आहेत. या गुहेतच आणखी एक छोटी गुहा जिथे मूर्ती ठेवल्या आहेत त्याच्या उजव्या बाजूने वरच्या दिशेला आहे. बऱ्याच जणांना ती माहित नाही. मलाही ती माहित नव्हती. दिघेंनी मला माहिती करून दिल्यावर मी वरती जाऊन आतील मूर्तीचे दर्शन घेऊन आलो. तिथून आम्ही पुढे निघालो. आता आमचा ग्रुप मागे पुढे झाला होता. मी दिघे आणि आमचे आयोजक राजू सावंत आणि त्यांची पत्नी  असे आम्ही - जण सोबत चालू लागलो. वहिनी तर अनवाणीच गिरनार चढत होत्या. एवढ्या पायऱ्या अनवाणी चढणे म्हणजे एक दिव्यचं! 

पौर्णिमेच्या रात्री दिसणारे गुरुशिखर



२३०० पायऱ्या चढून गेल्यावर मला परब विश्राम घाट लागला. तेथे श्रीरामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे. येथे साधू संतांना भोजन दिले जाते. या जागी १२४४ वर्षांपूर्वी एक लेख आहे. या लेखामध्ये हे कुंड श्री प्रभानंद सूरी यांच्या सांगण्यावरून बांधले असा उल्लेख आहे. ,६०० पायऱ्यावर राणक देवीमातेची शिळा आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. इथून पुढे गेल्यावर अंदाजे ३४५० पायऱ्यांवर प्रसूती बाईच्या पादुका आहेत. गर्भवती स्त्रिया येथे आपल्या रक्षणासाठी नारळ चढवतात तसेच संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.  येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. ३८०० पायऱ्या चढून  गेल्यावर गिरनार कोटाच्या दरवाजाच्या दर्शनाने आपल्या यात्रेचा आनंद द्विगुणित होतो. तिथे माठातील थंडगार पाणी यात्रेकरूंसाठी ठेवले होते.. तिथेच थोडावेळ थांबून आम्ही विश्रांती घेतली. या गिरनार कोटात दिगंबर जैनांची धर्मशाळा असून तिच्यासमोरच श्वेतांबर जैनांची धर्मशाळा आहे. याला पहिले शिखर (पहली टूंक ) म्हणतात. गिरनार कोट मध्ये जैन बांधवांचे खास पाहण्यासारखे आणि दर्शन घेण्यासारखे हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन देव मंदिर आहे. त्यात मुख्य मंदिर भगवान श्री नेमिनाथजी यांचे आहे. पहिल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा दिवस होता आणि येथील मंदिरातील सेवेकऱ्याच्या परवानगीने मी आतील सर्व मूर्ती पहिल्या होत्या. त्यावेळचं दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळले. श्री नेमीनाथजींची मूर्ती खूप सुंदर आणि आकर्षक आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे अशी मान्यता आहे.  या ठिकाणी प्रत्यके वर्षी त्यांची पूजा करण्यासाठी हजारो जैन येतात. इथेच प्रदक्षिणा करताना जमिनीमध्ये एक गुहा आहे तिथे अमिझरा पार्श्वनाथजी विराजमान झालेले आहेत. असे म्हणतात कि कधी कधी भगवानच्या चेहऱ्यावर हनुवटीवर अमीचा अर्थात अमृताचा एक थेंब दिसतो म्हणून तिला अमिझरा पार्श्वनाथ म्हणतात. या मंदिरात काही पायऱ्या उतरल्यावर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर श्री आदिनाथजी ऋषभदेव यांची भव्य मूर्ती आहे.



पुढे गेल्यावर जंगल मार्गाने सातपुडा कुंड लागते येथे सात दगडांमधून बाराही महिने पाणी पडते म्हणून याला सातपुडा म्हणतात आणि तिथूनच खाली जंगल रस्तात जांबुवंतीची प्राचीन गुहा आहे. रात्रीची वेळ असल्याने तिकडे जाता आम्ही पुढे निघालो.  ४१०० पायऱ्यांवर जटाशंकर धर्मशाळा आणि दुसऱ्या शिखराचा चौक (दुसरी टूंक ) आहे. इथून दोन रस्ते फुटतात. उजव्या बाजूचा अंबाजी टूंक आणि डाव्या बाजूचा गौ-मुखी गंगा याचा. येथे गाईच्या मुखातून गंगेचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौ-मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थ, भाविक, साधू बैरागी या मार्गांने येत अथवा जात नाहीत, या मार्गांवर कुठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही. येथून साधारण ३१०० पायऱ्या उतरलो कि पायथ्याला तळेटीला पोहोचता येते. आता या गौमुखी गंगेची कथा अशी आहे कि,

सत्ययुगात सत्यधम नावाचा एक ब्राम्हण देव प्रसन्न व्हावा म्हणून तप करत होता. त्याने हजारो वर्ष तप केले. परंतु देव प्रसन्न झाला नाही. तेव्हा तो आत्मसमर्पण करण्यास तयार झाला. त्याचवेळेला आकाशवाणी झाली कि, "हे ब्राम्हणा, या जन्मी तुला ईश्वराचे दर्शन होणार नाही कारण लहानपणी एका गाईने पाणी पिण्यासाठी जेव्हा तोंड पाण्यात बुडविले त्याचवेळी तू काठीने मारून त्या गाईला पळवून लावलेस. तिला तू पाणी पिऊन दिले नाहीस. म्हणून जो पर्यंत तू या पापाचे क्षालन करत नाहीस तोपर्यंत तुला ईश्वर दर्शन होणार नाही." असे ऐकताच तो रडू लागला. त्यावेळी पुन्हा आकाशवाणी झाली  "हे ब्राम्हण तू गिरनार पर्वतावर जाऊन तपश्चर्या कर. त्यामुळे गाईच्या मुखातून गंगा वाहू लागेल आणि तिच्या पाण्यात तू स्नान केलेस कि तू पापमुक्त होशील आणि तुला मोक्षप्राप्ती होईल." ब्राह्मणाने तसेच केले आणि एक हजार वर्षे तप केल्यावर गाईच्या मुखातून गंगा प्रकट होऊन वाहू लागली.  म्हणून या तीर्थाचे नाव गौमुखी गंगा असे पडले. 

पुढे ४५०० पायऱ्यांवर साचाकाका नावाचे ठिकाण लागते. असे म्हणतात कि येथे काही वर्षांपूर्वी शंकरगिरी नावाचे महात्मा राहत होते. त्यांची येथे महाकाली मंदिर आणि घर बांधून हे स्थळ सुशोभित केले. गौ-मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर ,८०० पायऱ्यावर अंबाजी टुंक येते. ५१ शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे. याची आख्यायिका अशी कि, हिमालयाने शंकर पार्वती यांचे लग्न लावून दिले. तेव्हा पार्वतीचा मोठा भाऊ गिरनार याने वरातीत देवतांचा चांगला आदर-सत्कार केला. त्यावर विष्णू प्रसन्न झाले आणि तुझी पूजा केली जाईल तुला सिद्धी प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. तिथपासून गिरनार हे गिरिनारायण झाले. ज्यावेळेला पर्वतांना पंख होते आणि ते छाटण्यासाठी ब्रह्मदेवाने जेव्हा इंद्राला आज्ञा दिली तेव्हा गिरनार घाबरून समुद्रात लपले. ज्यावेळी देवी पार्वतीला हे कळले तेव्हा तिने इंद्रासह देवांना शाप दिला. तेव्हा सर्व देवांनी मिळून समुद्राची स्तुती केली आणि त्यांना पाच योजन दूर जाण्यास सांगितले. समुद्र पाच योजन दूर गेला आणि त्याने गिरनारला आपल्या पासून वेगळा केला. तेव्हापासून भावाच्या रक्षणासाठी देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला. म्हणुन हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. दरवाजाच्या एका बाजूने पाण्याचा झरा आहे. तो मातेचा खप्पर या नावाने प्रसिद्ध आहे. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. मातेची सुंदर मूर्ती खूप सुंदर आहे. मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो याचा प्रत्यय प्रत्येकाला येतोच येतो. इकडेच डाव्या बाजूच्या मोकळ्या जागेवर आता रोपवे झाला आहे. रोपवेने इथून खाली उतरता येते. आपण रोपवेने जरी आलो तरी इथून पुढे दत्त पादुकांपर्यंतचा प्रवास हा पायीच करावा लागतो.




आम्ही पुढे निघालो. पुढे गोरक्षनाथ शिखराकडे जाताना एक दगडी पुल टाकून रस्ता केलेला आहे. त्यावरून चालत असताना अचानक महेश थांबला. त्याने जवळच्या टॉर्चने पाहिलं तर एक भलं मोठ्ठ रानडुक्कर चरत होतं. टॉर्चच्या उजेडात त्याचे डोळे आणि सुळे चमकत होते. सर्वांनी त्याला बघायला एकच गल्ला केला. एवढ्या गोंधळात सुद्धा त्याने आम्हाला काही इजा केली नाही. त्याच्या धुंदीत चरत चरत तो तिथून बाजूला झाला. महाराजांचीच कृपा म्हणायची.

डावीकडे गुरुशिखर. उजवीकडे दिसणारे सर्वात उंच गोरक्षनाथ शिखर 

 


पुढे ,५०० पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान आले. गिरनार पर्वतवरील सर्वांत उंच शिखरावर हे स्थान असून त्याची उंची .समुद्र सपाटीपासून ,६६६ फुट आहे. आतमध्ये प्रवेश करून आम्ही गोरक्षनाथांच्या अखंड धुनीला मनोभावे नमस्कार केला. प्रसाद म्हणून आम्हाला सर्वांना विभूती मिळाली. येथे गोरक्षनाथांनी हजारो वर्षे तपस्या केलेली असून ते सध्या गुप्तरुपात वावरतात अशी मान्यता आहे. येथे बसून गोरक्षनाथ इतर नवनाथ, चौऱ्याशी साधक आणि गोपीचंद भरथरी याना उपदेश करीत असत. धुनीच्या खाली धर्मबारी आहे. तिला 'चौराशी का फेरा ' म्हणतात. धर्मबरीच्या बाहेर त्यांच्या चरण पादुका आहेत. मी त्यांचे दर्शन घेतले. यात्रा सुफळ झाल्याचा आनंद वाटला.बाजूला पहिले तर एका दगडामध्ये एक छोटा बोगदा होता. त्यातून बरेच जण आत जात होते. विचाराअंती समजले कि, त्याला पाप पुण्याची खिडकी (बारी) म्हणतात. म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. यातून बाहेर पडणाऱ्यास मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे. मी सहजगत्या आतमध्ये जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर पडलो. चला आता मोक्षाचा मार्ग सुलभ ! उगाचच मनाने कौल दिला. थोडा वेळ तिथेच विश्रांती घेतली. इथून सकाळचा सूर्योदय फार छान दिसतो. सहज विचार केला हे स्थान गिरनारवरील उंच स्थान आहे आणि गुरु दत्तात्रेयांचे मात्र याच्या पेक्षा कमी उंचीचे असं का बरं असेल? साधारणपणे गुरूचे स्थान उंचीवर असते. माहिती मिळाली कि गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी दर्शन दिले तेव्हा गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की "आपले चरण दर्शन मला सतत व्हावे" दत्तमहाराजांनी हे मान्य केले. यामुळे गोरक्षशिखर उंचावर आहे. या स्थानावर गेली अनेक वर्षे मंदिराची व्यवस्था मंहत श्रीसोमनाथ हे पाहतात त्यांचा दत्त संप्रदायातील "सेवा" या शब्दावर नितांत विश्वास आहे. गुरु गोरक्षनाथ हे सनातन धर्माचे योग गुरु असून सर्व भारत वर्षात प्रसिद्ध आहेत. त्यांचे मुख्य वसतिस्थान नेपाळमधील  'मृगस्थळी  येथे आहे. नेपाळची स्थापना गुरु गोरक्षनाथांनीच केली आहे. त्याची सुद्धा एक वेगळीच कहाणी आहे.

पुढे श्री गिरनारी बापूंची गुंफा लागते. येथे श्री भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात. त्यांना श्री गिरनारी बापू "प्रसाद" म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रूद्राक्ष देतात. सहा वर्षांपूर्वी जेव्हा प्रथम आलेलो तेव्हा त्यांचे दर्शन मला झाले होते या वेळेला मात्र ते दिसले नाहीत. थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागल्या. एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. आणि डाव्या बाजूच्या कामानितून गेल्यावर आपण दत्त पादुकांकडे पोहोचतो. आधी दत्त महाराजांचे दर्शन घेऊन मग कमंडलू तीर्थाकडे जाऊया असं ठरलं.



 जसजसं जवळ येऊ लागलो तशी महाराजांच्या दर्शनाची ओढ अधिकच तीव्र होऊ लागली. पुढे उभाच्या उभा सुळकाच आहे. नकळत आपल्या मनात तो धडकीच भरवतो. "महाराज कुठे येऊन राहिलात?" असा विचार देखील मनात येऊन गेला.  आता इथे दर्शनासाठी रांग चालू झाली होती. भल्या पहाटे दत्त पादुकांचे दर्शन घेण्यास भक्त मंडळी रांगेत पायऱ्या चढत होती. एवढा निमुळता रस्ता इथे या सर्व पायऱ्या कश्या बांधल्या असतील?

जुनागढ राज्याचे दिवाण रायबहादूर हरिदास देसाई यांच्या प्रमुख पदाखाली स्थापन झालेल्या कमिटीने गिरनार लॉटरी काढली होती आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नातुन तळेटी (स्थानिक भाषेत तलहाटी ) पासून गुरुदत्त शिखरापर्यंतचा पायऱ्यांचा मार्ग बनविला गेला. याला सोपान मार्ग असे देखील म्हणतात. खरंच! त्या कामगारांना सुद्धा एक सलाम ठोकला पाहिजे. त्यांच्यामुळे अनेक दत्त भक्त आज महाराजांच्या पादुकांचे दर्शन सोयीस्कर रित्या घेऊ शकतात.



श्रीदत्तगुरुंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना प्रत्येक ऋतूतील  थंडी, वारा, पाऊस  यांचाअनुभव वेगळाच असतो. हळूहळू आम्ही वरती पोहोचलो आणि ९९९९ पायऱ्या ओलांडून दर्शन झाले ते त्या अवधूताच्या पादुकांचे. "याजसाठी केला होता अट्टहास! " मनाला आंतरिक समाधान लाभले. पादुका दर्शन हा दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे. याच स्थानावर बसून भगवान श्रीदत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली होती म्हणूनच त्यांचे हे अक्षय स्थान आहे. हे आहे गिरनारवरील पाचवे शिखर अथवा पाचवी टूंक. याला 'अवलोकन शिखर' असे देखील म्हणतात. १० X १२ चौ.फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे. बाजूलाच प्राचीन गणेश अन् हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. ती घंटा वेळा आपल्या पूर्वजांची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. गर्दी असल्यास ती वाजवायला मिळत नाही. पौर्णिमेला दर्शन घेणे भाग्याचे मानले जाते आणि ते भाग्य मला लाभले होते. प्रसाद घेतला आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो.

 पुन्हा खाली उतरून कमंडलू स्थानापाशी आलो. इथे ,००० वर्षांपासून असलेली अखंड धुनी आहे. त्यामुळे यालादत्तधुनीदेखील म्हणतात. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे ते च्या दरम्यान तासाभरासाठी प्रकट होते. अगदी आजही हा चमत्कार पाहण्यासाठी भक्त आदल्या रात्री तिथे येऊन झोपतात. कमंडलुकुंड स्थानी असलेले साधू सुमारे - मण काष्ठं पिंपळाची लाकडे समर्पित करतात (आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्नीकुंडात रचून ठेवतात.) सर्व सामुग्री रचल्यावर एका विशिष्ट क्षणी आपोआप अग्नी प्रज्वलित होतो. तिथल्या महाराजांना विचारल्यावर समजले कि इथे खाली स्वयंभू अग्नी आहे. त्या अग्नीरुपानं साक्षात् श्रीदत्तप्रभूच तिथे प्रकटतात. स्वयंभू अग्नीनारायणाची एक उंचच उंच ज्वाला प्रकटते. श्रध्दावान भक्तांस त्यामध्ये साक्षात् दत्तप्रभूंचे दर्शनदेखील होते अशी मान्यता आहे. या ठिकाणी भक्तांसाठी २४ तास विनामूल्य प्रसादाची व्यवस्था आहे. मूगडाळ खिचडी, छोले गोड शिरा यापैकी मोजकेच काही असते. पण त्यांची चव हि तृप्त करणारी. मी देखील त्याचा लाभ घेतला. तिथेच ‘कमंडलू तीर्थ’ नावाचे एक कुंड आहे. त्याची अख्यायिका अशी आहे कि, भगवान दत्तात्रेय ध्यानात हजारो वर्षे दत्तटुंकवर बसले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. प्रजेची दया येऊन देवी अनुसूया मातेने ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना हाक मारली. तेव्हा भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एक ठिकाणी अग्नी (जिथे धुनी आहे) प्रकटला तर दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरुन जलकुंड निर्माण झाले तेच हे कमंडलू स्थान आहे. त्या कुंडातील पाणी अत्यंत मधुर निर्मळ अगदी पीतच राहावं असं वाटत होतं. बरेच यात्रेकरू खास येथील पाणी एक बाटली भरून सोबत घेऊन जातात.  या पाण्याने तर आमचा सगळा थकवाच  शोषून घेतला असं वाटत होतं. या कमंडलू तीर्थाकडून एक रस्ता पांडव गुहेकडे जातो. रस्ता खूप बिकट आहे. असे म्हणतात कि पांडव वनवासात असताना त्यांनी इथे काही दिवस मुक्काम केला होता. हि वाट घनदाट आहे आणि ओबडधोबड दगडांची आहे. गुहे मध्ये मातेची उग्र मुखवटा असेलेली मूर्ती आहे. बाजूलाच असणाऱ्या दोन डोंगरावर रेणुकामाता अन् अनुसूयामाता विराजमान आहेत. गिरनारच्या बाजूला नजर टाकली. भव्य दातार पर्वत दिसत होता. तिथे सुद्धा एकदा जाण्याची इच्छा आहे. पाहूया कधी योग्य येतो ते. दातार पर्वताच्या समोरच असलेला डोंगर हा जोगीणीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगरावर जाण्यास आजही कोणी धजावत नाही. असे म्हणतात कि डोंगरावरील एका गुंफेमध्ये शिवलिंग असून, ही अरूंद गुंफा आत प्रशस्त होत गेली आहे.एक वृद्ध बापू तेथे सेवा करतात. याच डोंगरावर चौसष्ट योगिनींचा वावर आहे.

रोपवेच्या इथून पहाटे दिसणारे गुरुशिखर आणि गोरक्षनाथ शिखर
 

सूर्योदयाची वेळ जवळ येत चालली होती. गिरिनारायणाच्या दर्शनाला सूर्यनारायण हळूहळू येत होते. परतीच्या मार्गाने आम्ही पुन्हा गोरक्षनाथ शिखराजवळ पोहोचलो. खरं तर इथून गुरुशिखराजवळ सूर्योदय होताना पाहणं हा एक अवर्णनीय आनंदच! परंतु वातावरण थोडंसं ढगाळ होतं. थोडासा भ्रमनिरास झाला. पुन्हा आंबा मातेच्या ठिकाणी आलो. नवीन लावलेल्या गिरनार रोपवेचा एक अनुभव घ्यावा म्हणून आम्ही तिथून रोपवेने जाण्याचा निर्णय घेतला. रोपवेसाठी रांग लागली होती. गिरनार रोपवे हा आशियातील सगळ्यात लांब मंदिराला जोडणारा रोपवे समजला जातो. याची लांबी 2,126.40 मीटर इतकी आहे. या रोपवेळा सुरुवातीला २४ ट्रॉली लावण्यात आल्या आहेत. ज्यात एका ट्रॉली मध्ये आठ जण बसू शकतात म्हणजे एका फेरीत साधारण १९२ यात्री जाऊ शकतात. यात एकूण टॉवर आहेत आणि यातील १००० पायरीजवळ असलेला सहा नंबरचा टॉवर हा सर्वात उंच आहे जो ६७ मीटरचा आहेसप्टेंबर २०१८ मध्ये सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प २०२० साली पूर्ण झाला आणि २४ ऑक्टोबर २०२० मध्ये भारताचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करून सुरु करण्यात आला. या प्रकल्पाला साधारण १३० करोड इतका खर्च आला आहे. रांगेत उभे राहून तिकीट काढल्यावर आम्ही रोपवे मध्ये बसलो. तिकिटारुन लक्षात आले कि हे सर्व ऑस्ट्रेलियन  कंपनी ऊषा ब्रीको चालविते आणि सांभाळते. आम्हाला एक वेळचे एका व्यक्तीचे ४०० रुपये मोजावे लागले.

रोपवेची प्रतिकृती


रोपवे मधून गिरनार पर्वताची भव्यता किती आहे हे जाणवत होती. त्याच्या बाजूला पसरलेला घनदाट जंगल आपलं अस्तित्व दाखवत होता. रोपवेने जाणं हा एक सुखद अनुभव ठरला. खाली उतरलो. पुन्हा एकदा गिरनार पर्वत डोळे भरून पहिला. गिरनारचा फोटो काढला आणि तो आडवा धरला तर एखादा वयोवृद्ध तपस्वी वर्षानुवर्षे डोळे मिटून तप करीत आहे असाच भास होतो. कदाचित गिरिनारायण खरंच या रूपात असतील आणि जो मनोभावे दर्शन करेल त्यालाच त्यांचं दर्शन होत असेल.

गिरनारवरील दत्त पादुकांच्या या अनुपम दर्शनाचा लाभ प्रत्येक दत्त भक्ताला एकदा तरी लाभावा हीच मनोमन इच्छा आणि शिखरावर बसलेले दत्त महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव आहेत हि भावना ठेवून मी तिथून त्यांच्या आज्ञेने निघालो. 

।। हे गिरनारी , हे ध्वजधारी शिखर पर बैठके खबर ले हमारी  ।।

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।



संदर्भ : गिरनार महात्म्य आणि आंतरजालावरून साभार 


 © Mayur H. Sanap 2021


गिरनार परिक्रमा एक पुण्यसंचय

  

गिरनार परिक्रमा एक पुण्यसंचय



परिक्रमेच्या सुरुवातीला उजव्या बाजूला दिसणारे गिरनार पर्वतावरील गुरुशिखर 


परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा मानवी मनाच्या भक्तिभावाचा एक पैलू आहे. परमेश्वरावर  नितांत श्रद्धा असणारा व्यक्ती हा कुठेही देवळात गेल्यावर त्या दैवताभोवती चहुबाजुंनी प्रदक्षिणा केल्याशिवाय राहत नाही. प्रदक्षिणेची परंपरा अगदी पूर्वापार चालत आली आहे. ती अगदी ग्रामदैवतेच्या पालखी पासून ते डोंगर-पर्वतरांगांपर्यंत. ते उपासनेचे आणि भक्तीचे एक अंग आहे असे मानले जाते.  ज्या तीर्थक्षेत्रांचं, स्थानांचं अध्यात्मिक महत्व जास्त आहे अश्या ठिकाणी केलेल्या प्रदक्षिणेला परिक्रमा असे म्हणतात. थोडक्यात प्रदक्षिणा हि लघुस्वरूपात घातली जाते तर व्याप्ती जास्त असलेलीला परिक्रमा म्हटली जाते. नर्मदा परिक्रमा, ब्रम्हगिरी परिक्रमा तशीच गिरनार परिक्रमा.

गिरनार म्हणजे समस्त दत्त भक्तांचे माहेरघर. प्रत्यक्ष दत्त महाराजांनी ज्या ठिकाणी बारा हजार वर्ष तपश्चर्या केली ते परम पावन ठिकाण. "गिरनारला तोच येतो ज्याला महाराज बोलावतात" असं गिरनारचं महात्म्य आहे. तितकंच परिक्रमेचंही. पाच वर्षांपूर्वी मला गिरनार वरील दत्त पादुकांचे दर्शन घेण्याचा लाभ झाला होता. ती म्हणजे माझ्यासाठी एक अनुभूतीच होती. तेव्हाच समजले होते कि गिरनार पर्वताची परिक्रमा सुद्धा करतात. ती सुद्धा फक्त वर्षाने एकदा होते. ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या ५ दिवसातच करतात. इतरवेळेला तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्हाला गिरनारच्या जंगलात प्रवेश नाही. ३८ किलोमीटरची परिक्रमा करणे म्हणजे ‘येरा गबाळ्याचे काम नव्हे!’ परंतु महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही एखाद्या गोष्टीचा निश्चय केलात तर तो तडीस जातोच हि मनोमन धारणा. त्यामुळे या वेळेला खास परिक्रमेसाठीच जायचं ठरवलं. दरवर्षीचा आमचा पेणचा स्वामी परिवार गिरनारला जाण्यासाठी निघाला आणि मला सुद्धा बोलावणं आलं. कोरोना काळात परिक्रमा होईल का नाही याची शाश्वती नव्हती. परंतु जरी परिक्रमा झाली नाही तरी दत्त पादुकांचे दर्शन घेऊन परत येऊया या निर्धारानेच मी निघालो. आमचे परम मित्र राजू सावंत यांनी जाण्या-येण्यापासून ते राहण्याखाण्यापर्यंत सर्व नियोजन केलेले होते. त्यामुळे मी फक्त बॅग उचलली आणि "जय गिरनारी " म्हणत निघालो गिरनारला.


बांद्रा -वेरावळ एक्सप्रेसने आमचा  प्रवास सुरु झाला. जवळपास वर्षभराने मी सर्वांना भेटत होतो. या वेळी नितेश मात्र सोबत नव्हता. ट्रेनमध्ये आम्हाला पाच महिलांचा एक ग्रुप भेटला. त्यांना पाहिल्यावर मला "झिम्मा" चित्रपटाची उगाच आठवण आली.  थोडी ओळख झाल्यावर समजले त्या सुद्धा गिरनार परिक्रमेसाठी आल्या आहेत. पण आम्हाला आता या वयात परिक्रमा झेपेल का या बाबत थोड्या साशंक होत्या. या ट्रेनमधले जवळपास निम्म्यापेक्षा जास्त प्रवासी हे गिरनारला जाणारेच असतात. महाराजांवर श्रद्धा ठेवा तेच तुमच्याकडून परिक्रमा करून घेतील या शब्दात त्यांना इतरांनी सांगितल्यावर थोडा धीर वाटला. गप्पा-टप्पा, भजन गात जुनागढ पर्यंतचा  आमचा ट्रेनचा प्रवास सुखकर झाला.

हॉटेलवर सर्व सामान ठेवून आम्ही हॉटेल मालकाकडे प्रथम परिक्रमेची चौकशी केली त्यानुसार आम्हाला पुढचे नियोजन करायचे होते. परंतु त्याला त्यातली काहीच माहित नव्हती. ‘कोण म्हणत होते कि अद्याप परवानगी नाही, तर कोणी सांगत होते कि फक्त रात्रीच सोडत आहेत.’  खात्रीशीर उत्तर मिळाले नव्हते. शेवटी इच्छा तिथे मार्ग म्हणतात तसेच झाले. आमच्या समोरच्याच रूममधील पुण्याहून आलेले काहीजण कालच  परिक्रमा करून आले होते. त्यांनीच सांगितले कि 'परिक्रमेला परवानगी दिली आहे. तुम्ही उशीर करू नका शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. तेव्हा आज विश्रांती घेऊन उद्या सकाळीच सुरुवात करा.' आम्हाला महाराजांनी मार्ग दाखवला होता.

आमचे आयोजक राजू सावंत यांनी सर्वांच्या पाठीमागे लागून सर्वांना सकाळी तयार केले. आठ वाजता परिक्रमेचा गेट बंद करणार त्याच्या आत आम्हाला पोहोचायचे होते. यावर्षी आयत्या वेळेला परिक्रमेसाठी परवानगी मिळाल्याने भंडारा वगैरे काही नाही असं आमच्या कानावर आल्याने पाण्याच्या बाटल्या आणि सकाळी जे मिळेल ते खाण्याचं सामान प्रत्येकाने आपापल्या बागेत कोंबलं आणि घाई-घाईत कालवा चौकातून आम्ही रिक्षा पकडून गिरनारकडे निघालो. आठ वाजतच आले होते. आम्ही पटापट रिक्षातून उतरलो. "चलो ss  चलो ss  " असं म्हणत हात दाखवत गार्ड गेटसमोर उभा राहून शिट्या मारतच होता. त्यावेळेलाही आम्ही त्यांना  गेटसमोरच आमचा ग्रुप फोटो पटकन काढण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यसुद्धा केलीत्यांचे आभार मनात आम्ही परिक्रमेसाठी गेट मधून प्रवेश केला. दिघेंनी चौकातूनच येताना पोहे पार्सल घेतले होते. त्यावर मी ताव मारला. राजू सावंत यांनी सर्वांना सोबत आणलेल्या गोळ्या वाटल्या. पेटपूजा झाली होती. चला! आता काही चिंता नाही या अविर्भावाने आम्ही गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून परिक्रमेला सुरुवात केली.

परिक्रमेची सुरुवात

गिरनारचं जंगल हे घनदाट दिसत होतं. गुरुशिखर उजव्या बाजूला वरती दिसत होतं. माझ्या कॅमेराचा पहिला क्लिक तिथेच झाला. तिथूनच आम्ही मनपूर्वक नमस्कार केला आणि परिक्रमा सुफळ होऊ दे! म्हणून महाराजांकडे आशीर्वाद मागितला. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून हि परिक्रमा चालू आहेगिरनार पर्वताच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीतच  पाच दिवस सर्वांसाठी प्रवेश खुला असतो. या जंगलात मुंगी, विंचू पासून ते सिंहा पर्यंत भरपूर वन्य प्राणी आहेत. पण आश्चर्य पहा कि या दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही सर्व दत्तगुरूंचीच कृपा आहे आणि याचा अनुभव लगेचच काही अंतरावर गेल्यारवर आला सुद्धा. आम्हाला एक मोठा सांबर दिसला. अगदी हाताच्या अंतरावर येऊन सुद्धा तो अगदी शांत होताआमच्या फोटोशूटलाहि तो उत्तम प्रतिसाद देत होता. तो त्याच्या धुंदीत खाण्यात मग्न होता. नाहीतर अचानक एवढी माणसे जंगलातील प्राणी जेव्हा पाहतात तेव्हा एक तर पळून जातात किंवा सुरक्षेच्या कारणास्तव हिंसक होतात. हीच तर खरी परिक्रमेची जादू आहे. या परिक्रमेचं माहात्म्य खूप आहे. असं म्हणतात कि, देव आणि त्यांचे गण हे सुध्दा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. आपल्या सारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत सुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वाद मिळाल्यास दुधात साखरच!


परिक्रमेत जंगलात दिसलेले सांबर 

गिरनार परिक्रमा दुधेश्वर मंदिरापासून सुरु होऊन भवनाथ तळेटी पर्यंत जाते. नंतर गर्द -घनदाट जंगलातून पूर्ण परिक्रमेचा मार्ग जातो.तीन डोंगर चढणे आणि उतरणे. त्यात तीव्र चढ आणि अतीतीव्र उतार असे स्वरूपभौगोलिक दृष्टय़ा असंख्य छोटय़ा-मोठय़ा पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे.  काही मोजकेच ठिकाणी सोडता वाटेत कुठेही धर्मशाळा नाही की कुठे झोपी जाण्यासाठी काही व्यवस्था. पाणी पिण्यासाठी नळ नाही की खाण्यासाठी हॉटेल. चारी बाजूने घनदाट जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष या मधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात. परिक्रमा मार्गावर कसल्याही सुविधा नसताना श्रद्धस्त भक्त मंडळी मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात.

थकल्या -भागल्या जीवाला बोअरवेलच्या पाण्याचा आधार

सुरुवातीला साधारण साडेचार किलोमीटर चालल्यानंतर एक हातपंप दिसला. बोअरचं पाणी चेहऱ्यावर मारलं. थोडी तरतरी आली. हातपंपच्याच बाजूला वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार केलेले दिसत होते. तिथून एक बाटली भरून घेतली आणि पुढे निघालो. थोडे पुढे, थोडे मागे असा आमचा २६ जणांचा ग्रुप नंतर छोट्या -छोट्या चमूत विभागला गेला. मी, दिघे, राजू सावंत आणि आमच्या सोबत बोरिवलीहून आलेल्या बागायतदार काकी असे आम्ही सोबत चालत होतो. या वेळेला कोविड काळामुळे परिक्रमेची शाश्वती नसल्याने जास्त गर्दी नव्हती नाहीतर विविध ठिकाणाहून लाखो लोक या परिक्रमेत सामील होतात. घनदाट जंगलातून निसर्गाच्या सान्निध्यात राहून परिक्रमा करणे म्हणजे खरंच एक निराळाच आनंद आहे. 'वन्यप्राण्यांना त्रास देऊ नका, त्यांना आधी त्यांच्या मार्गाने जाऊ द्या' असे गुजराती भाषेतील बोर्ड ठिकठिकाणी आमचे लक्ष वेधून घेत होते. साधारण १० किलोमीटर नंतर आम्हाला एक पोलीस चौकी लागली. तिथे क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. साधारण सव्वा अकराच्या सुमारास बारा किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही "जिनाबाबा कि मढी " या ठिकाणी  पोहोचलो

जिनाबाबा कि मढी आणि तेथून समोर दिसणारे गिरनार पर्वत

तिथे आजूबाजूला बऱ्याच नागा साधूंनी आम्हाला अडवले. त्यांना काही दान-दक्षिण देऊन आम्ही आत गेलो. इथे दत्त महाराज आणि शिव शंकराचे छोटेसे मंदिर आहे. तसेच तिथे एका काचेच्या पेटित एक मोठी चिलीम ठेवलेली आम्हाला दिसली. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांचीच चिलीम इथे ठेवली आहे. आहे अद्याप येथे, त्या चिलमीतून ते आत-बाहेर करत होते असे म्हणतात. यांची समाधी धुनी येथे आहे. आम्ही त्यांचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो. सूर्य हळूहळू माथ्यावर येत होता. थोडा मोकळा भाग लागला आणि उन्हाचा एक चटका जाणवला. समोर पाहिलं तर परिक्रमावासी एका ठिकाणी थांबलेले दिसले. वाटेवरच एक छोटी नदी लागली होती. 'सरनो' नावाची. ती पार करण्यासाठी जेमतेम त्यावर सिमेंटने मार्ग बनवला होता. त्यावरूनच पाणी जात होते. आम्ही शूज काढून पाण्यात पाय उतरवून थोडा वेळ तसाच उभे राहिलो. 'नॅच्युरल स्पा '  अहाहा ! थंडगार पाण्याने पायाचा थकवा कुठच्या कुठे क्षणार्धात पळून गेला. - जण त्यात उतरून स्नान करत होते. चेहरयावर थंडगार पाणी मारले. थोडं ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. 



सरनो नदी येथील क्षणभर विश्रांती

बरेचजण तिथेच विश्रांती घेत होते. तिकडेच आम्हाला दादरच्या स्वामींच्या मठातील सेवेकऱ्यांचा एक ग्रुप भेटला. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि एक सेल्फी घेऊन आम्ही पुढे निघालो. पुन्हा गर्द झाडी. वाटेत मोठमोठाले दगड होते. त्यातून मार्ग काढावा लागत होता. पण आता मात्र पुढे चढ चालू झाला होता. हि दमछाक करणारी चढण होती. घनदाट अरण्यातून ऊन जाणवतच नव्हतं. दुपारचे दोन वाजता देखील सहा वाजल्याचा भास होत होता. हि चढण संपत संपतच नव्हती. बहुतेकांची तीच हालत. थोड्या-थोड्या टप्प्यावर पाण्याचा एक घोट घेत,दम खात सारखे थांबावे लागत होते. "नालपनि घोड़ी की खड़ी ऊंचाई सबका दम निकालती है " असं एक सोबतचा यात्रेकरू बोलला. खरंच होतं ते ! या 'नालपनि घोड़ी ' ने माझा चांगलाच दम काढला. पुढे उतार चालू झाला. काही अंतरापर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत. इथे थोडा वेळ थांबायचं निर्णय घेतला. तिथेच आम्हाला ट्रेन मध्ये भेटलेल्या "घाडगे  काकी " भेटल्या त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची पूर्ण दमछाक झालेली दिसत होती. त्यांच्या काही मैत्रिणी पुढे गेल्या होत्या. मला पाहून त्या हसल्या. " अजून किती आहे रे ".  " निम्मी  झालीय आपली; हा टप्पा उतरलो कि येईलच." मला तरी खरं कुठे माहित होतं किती राहिलंय.  मी हि पहिल्यांदाच परिक्रमा करत होतो. परंतु माझ्या बोलण्याने त्यांना समाधान वाटलं  हे दिसत होतं . "तो पर्यंत हे घ्या व्हिटॅमिन सी ची गोळी " त्यांना सोबत असलेली गोळी दिली. त्यावर खरोखर 'व्हिटॅमिन सी' लिहिलंय हे पाहून त्या हसल्यामीही सोबत आणलेल्या एका बाटलीत लिंबू पिळलं आणि आम्ही एकेक घोट घेत थोडा वेळ तिथेच स्थिरावलो.


दगड-धोंड्यातून आणि घनदाट जंगलातून जाणारा परिक्रमेचा मार्ग.  

सोबतच्या परिक्रमावासीयांकडे पाहून मी दोन क्षण विचारात पडलो. 'गिरनारच्या दत्त महाराजांवर लोकांची किती अपार श्रद्धा आहे. वयोमानानुसार शरीर थकलेलं असलं तरी त्याला आपल्या मनाच्या अफाट शक्तीने खेचत श्रद्धावंत हि परिक्रमा पूर्ण करतात. "पाय दुखले, दुखू देत!" आयोडेक्स चोळ, तर कुठे मुव्ह ची क्रीम लाव. पुन्हा चालायला लाग. चक्कर आली तर येऊ दे! लिंबू पाणी घे. थोडा वेळ विश्रांती घे. "जय गिरनारी" म्हण आणि चाल पुढे. महाराज यातून तुला तरुन नेतील. - वर्षांची मुले, तर कुठे तान्ह मुलं घेऊन; एक तर ८०-९० च्या घरातील आजी जिला नीट चालताही येत नाही. तिच्या दोन्ही हातांना धरून तिची मुले तिला हि परिक्रमा करताना मी पाहिलीत. धन्य आहेत हि सर्व मंडळी आणि तो देवसुद्धा कि ज्याच्यासाठी लोक एवढे कष्ट घेतात. ज्याच्या एका नामाने एवढी अफाट सर्व निभावण्याची शक्ती येते. मग का नाही तो आपल्या भक्तांसाठी धावणार. म्हणूनच दत्त महाराजांना "स्मर्तृगामी" म्हटले आहे.

गिरनार  परिक्रमा हि श्रेष्ठ पुण्यसंचयाचा भाग आहे. याची कथा अशी आहे कि, गिरनार यांचे नाव गीर नारायण होते. ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र होते. प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते. त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत असल्याने, ते ज्या ठिकाणी थांबत त्या ठिकाणांवर वस्ती असल्यास पर्वता खाली बसत. हि समस्या पाहून सर्व देव चिंतीत झाले. ते महादेवांकडे गेले. सर्व हकीकत ऐकल्यावर त्रिदेव यांनी निर्णय घेतला की, सर्व पर्वतांचे पंख छाटावे. हि बातमी गीर नारायण यांना समजली. अशी मान्यता आहे कि त्यावेळेस गिरनार पासून ते सोमनाथ पर्यंत संपूर्ण समुद्र होता. आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून तेथे एक ब्रम्ह तळ होते. त्या तळामध्ये गीर नारायण यांनी आपले शरीर लपवले आणि फक्त चेहरा वर ठेवला. तो भाग म्हणजे आपण जे गुरु शिखरावर पादुका दर्शन घेतो ते यांचे कपाळावरील स्थान आहे. पण ज्यावेळेस, पार्वती देवी यांचा विवाह महादेवांशी होणार होता, तेव्हा आपले मोठे बंधू गीर नारायण विवाहात उपस्थित व्हावे. म्हणून पार्वती देवींनी विनंती केली कि आपण विवाहास यावे. त्या विनंतीला मान देऊन गीर नारायण तेथे आले. त्यांचे पंख छाटू नये म्हणून त्यांनी महादेवांजवळ वरदान मागितले कि, हिमालयावर जे ३३ कोटी देव, तपस्वी, साधू सर्व वास करतात. तसे माझ्याकडे पण वास करावा. तसा वर महादेवांनी त्यांना दिला. म्हणून गिरनार येथे, सिद्ध पुरुष, साधू, महंत वास करतात. ३३ कोटी देवांचाही येथे वास असतो. त्यामुळे गिरनार परिक्रमा हि ३३ कोटी देव आणि गुरु दत्तात्रय यांना प्रदक्षिणा करण्यासारखीच आहे. त्यामुळे ही परिक्रमा अत्यंत पुण्यदायी आहे आणि प्रत्येक दत्तभक्तांची ती आयुष्यात एकदा तरी करण्याची इच्छा असतेच.

साधारण पावणेचारच्या सुमारास आम्ही सपाट मार्गावर चालू लागलो. समोर गर्दी कसली आहे पाहूया असं म्हणत आम्ही जवळ पोहोचलो तर कोणी एका भक्ताने सर्वांसाठी पिण्याचे पाणी, गाठीया आणि ताजी बुंदी  याची सोय केली होती. भुकेल्या सर्व जिवांनी त्यावर ताव मारला. तिथेच डॉकटरची सोयसुद्धा केली होती. परिक्रमावासीयांना काही शारीरिक त्रास होत असेल तर आवश्यकतेनुसार गोळ्या वाटप होत होतेपोटात भर पडल्यावर शरीर थोडं तरारून आलं. पाऊले पुन्हा चालायला लागली.  काही अंतर गेल्यावर फॉरेस्टच्या लोकांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला एक भलं मोठं मचाण उभारलेलं दिसत होतं. एवढे मोठं मचाण ते सुद्धा जमिनीवरचं मी प्रथमच पाहत होतो. त्याचे दोन-चार फोटो काढले आणि पुढे निघालो. पुढे मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे भोरदेवीचे स्थान आहे. मारवेला ते भोरदेवी हे साधारण ५-६ किलोमीटरचे अंतर आहे. पुढे गेल्यावर एक छोटीशी वनखात्याची चौकी लागते. तिथून दोन मार्ग जातात. तिथून डाव्या बाजूने एक किलोमीटर अंतरावर भोरदेवी (बोरदेवी ) आणि उजव्या बाजूने बाहेर तळेटीला जाण्याचा मार्ग लागतो. भोरदेवीचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा चौकीच्या इथे आलो आणि तिथुन मग तळेटीला जाण्यासाठी मार्गस्थ झालो. 







भोरदेवी माता मंदिर 

हा परिक्रमेचा अंतिम टप्पा आहे. हे अतिशय रमणीय असे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे. इथून भवनाथ तळेटी १० किलोमीटर लांब आहे हे तिथल्या फलकावरून आमच्या लक्षात आलं. तळेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. चला ! म्हणजे आलो जवळ आम्हाला हायसं वाटलंहा शेवटचा टप्पा अतिशय सरळ आहे. परंतु तो संपण्याचा नावच घेत नव्हतं. आता सूर्य मावळून अंधार पडला होता. आम्ही अजून चालतच होतो. नक्की हे अंतर १० किलोमीटरचं आहे ना ! आम्हाला ते खरेच वाटेना. आत्तापर्यंत काही वाटलं नव्हतं परंतु जसा अंतिम क्षण जवळ येऊ लागतो तसं आपल्या मनातून ते कधी येतोय ! कधी संपतोय असं सारखं वाटत राहतं आणि त्यातून शरीर तसा प्रतिसाद द्यायला लागतं. माझंही आता तसंच झालं. आता मात्र पायात त्राणच उरले नव्हते. पायांत थोड्या वेदना जाणवत होत्या. असं वाटत होतं कि इथून आता पुढे कोणीतरी आपल्याला उचलून न्यावं.  अजून का येत नाही तळेटी. हे १० किलोमीटर पेक्षा जास्तच अंतर आहे असंच आम्हाला सर्वांना आता वाटायला लागलं होतं. पण एकमेकांशी गप्पा मारण्याच्या नादात तेही अंतर आमचं पार पडलं आणि आम्ही जिथून गिरनार चढायला सुरुवात होते बरोबर तिथेच उजव्या बाजूलाच बाहेर पडलो आणि गिरनारच्या प्रवेशद्वारावर येताच सर्वांनी मनोभावे नमस्कार करून एकाच स्वरात "जय गिरनारी" म्हणत महाराजांना धन्यवाद दिले. बरोबर पावणे आठ वाजले होते. आम्हाला परिक्रमा पूर्ण करायला म्हणजे जवळपास १२ तासच लागले म्हणायला हरकत नाही.

नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात असले आणि सर्व कर्ता करविता, तो आहे ह्यावर दृढ विश्वास असला कि हि परिक्रमा सुफळ होतेश्री गिरनार परिक्रमा हि ३८ किलोमीटरची पायी परिक्रमा पूर्णकरून आम्ही नंतर गिरनार पर्वतावर जाऊन दत्त पादुकांचे दर्शन सुद्धा घेतले यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता सर्व दत्त महाराजांची कृपा. बोला "जय गिरनारी!"






गिरनार परिक्रमेतील काही छायाचित्रे:


आमचे आयोजक राजू सावंत यांच्या सोबत गिरनार परिक्रमा सुरु होतानाचा एक क्षण सेल्फी मध्ये कैद. 











जिना बाबा कि मढी येथील मंदिरे 



वनखात्याने बांधलेले सुंदर आणि भव्य मचाण




काही ठिकाणी तीव्र उतरावर पायऱ्या बांधलेल्या आहेत 



गिरनार पर्वताचा घनदाट अरण्याचा परिसर


।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

।। जय गिरनारी ।।


                                                                                                                                                 © Mayur H. Sanap 2021