गिरनार एक अनुभूती
सोरठ देश सुहवनो, सुंदर गढ गिरनार ।
वीर, शेर, पर्वत, गुंफा, योगी तपे निहार ।।
पहिलंच मंदिर लागतं ते मारुतीचं. मारुती हे शक्तीचं प्रतीक. अनेक भाविक गिरनार चढण्यास सोपा व्हावा म्हणून मारुतीला नारळ चढवताना दिसतात. आम्ही भक्ती भावाने नमस्कार करून पुढे निघालो. पौर्णिमेच्या रात्रीचा शीतल शशी पाहत -पाहत गिरनार चढणं हाही एक निराळा आनंदच असतो. गिरनारवर बहुतेक ठिकाणी विजेची सोय आहे आणि आताशा अंबाजी मंदिरापर्यंत रोपवेदेखील झाला आहे. पूर्वी डोलीवाले भरपूर दिसायचे. रोपवे झाल्यापासून आता मोजकेच दिसतात. श्रध्दस्त मंडळी मात्र गिरनार पायी चढणेच पसंद करतात.पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये ‘जुनागढ’या शहरापासून गिरनार तळ पाच किमी अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजना म्हणजेच १६ गावांपर्यंत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी ने व्याप्त आहे. गिरनारचं माहात्म्य देखील तितकंच थोर आहे. गिरनार यांचे नाव गीर नारायण होते. ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत. श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने देखील उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. भौगोलिक दृष्टय़ा असंख्य छोटय़ा-मोठय़ा पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी जगताने संपन्न, विविध औषधी-वनस्पतीने युक्त आहे. तसेच ही भूमी योगीसिद्ध-महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेकजण गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात.
रात्रीच्या वेळी २५०० पायऱ्यांवरून दिसणारे तळेटी- जुनागढ चे दृश्य
फक्त गिरनार पर्वत नाही तर त्याच्या पायथ्याच्या आजूबाजूला देखील वाघेश्वरी मंदिर, गायत्री मंदिर, सम्राट अशोकाचा शिलालेख, दामोदर कुंड, रेवती कुंड, मुचकुंद महादेव गुहा, श्री भवनाथ महादेव, लंबे हनुमानजी, काश्मीरी बापूंचा आश्रम इत्यादी धार्मिक स्थळे, मंदिरे स्थळे भेट द्यायला हवीत अशी आहेत. त्यासाठी एक विशेष वेळ काढूनच जाणे उत्तम. गिरनार हे पवित्र तीर्थस्थान आहे. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे. साधारण २०० पायऱ्यावर डावीकडे श्रीभैरवाच्या मुर्तीचे दर्शन होते. असे म्हणतात कि पुर्वी एक सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात होते. सर्व साधू संतांमध्ये त्याचा मान खूप मोठा होता. २,००० पायऱ्यावर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो, हे ही एक सिद्धस्थान आहे असे सांगतात. पुढे २,२५० पायऱ्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुहा आहे. येथेच त्यांनी तपश्चर्या केली होती. पायातील शूज काढून मी आत जाऊन दर्शन घेतले. आतमध्ये त्यांच्या दोन सुबक मूर्ती विराजमान आहेत. या गुहेतच आणखी एक छोटी गुहा जिथे मूर्ती ठेवल्या आहेत त्याच्या उजव्या बाजूने वरच्या दिशेला आहे. बऱ्याच जणांना ती माहित नाही. मलाही ती माहित नव्हती. दिघेंनी मला माहिती करून दिल्यावर मी वरती जाऊन आतील मूर्तीचे दर्शन घेऊन आलो. तिथून आम्ही पुढे निघालो. आता आमचा ग्रुप मागे पुढे झाला होता. मी दिघे आणि आमचे आयोजक राजू सावंत आणि त्यांची पत्नी असे आम्ही ३-४ जण सोबत चालू लागलो. वहिनी तर अनवाणीच गिरनार चढत होत्या. एवढ्या पायऱ्या अनवाणी चढणे म्हणजे एक दिव्यचं!
पौर्णिमेच्या रात्री दिसणारे गुरुशिखर |
२३०० पायऱ्या चढून गेल्यावर मला परब विश्राम घाट लागला. तेथे श्रीरामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे. येथे साधू संतांना भोजन दिले जाते. या जागी १२४४ वर्षांपूर्वी एक लेख आहे. या लेखामध्ये हे कुंड श्री प्रभानंद सूरी यांच्या सांगण्यावरून बांधले असा उल्लेख आहे. २,६०० पायऱ्यावर राणक देवीमातेची शिळा आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. इथून पुढे गेल्यावर अंदाजे ३४५० पायऱ्यांवर प्रसूती बाईच्या पादुका आहेत. गर्भवती स्त्रिया येथे आपल्या रक्षणासाठी नारळ चढवतात तसेच संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. ३८०० पायऱ्या चढून गेल्यावर गिरनार कोटाच्या दरवाजाच्या दर्शनाने आपल्या यात्रेचा आनंद द्विगुणित होतो. तिथे माठातील थंडगार पाणी यात्रेकरूंसाठी ठेवले होते.. तिथेच थोडावेळ थांबून आम्ही विश्रांती घेतली. या गिरनार कोटात दिगंबर जैनांची धर्मशाळा असून तिच्यासमोरच श्वेतांबर जैनांची धर्मशाळा आहे. याला पहिले शिखर (पहली टूंक ) म्हणतात. गिरनार कोट मध्ये जैन बांधवांचे खास पाहण्यासारखे आणि दर्शन घेण्यासारखे हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन देव मंदिर आहे. त्यात मुख्य मंदिर भगवान श्री नेमिनाथजी यांचे आहे. पहिल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा दिवस होता आणि येथील मंदिरातील सेवेकऱ्याच्या परवानगीने मी आतील सर्व मूर्ती पहिल्या होत्या. त्यावेळचं दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळले. श्री नेमीनाथजींची मूर्ती खूप सुंदर आणि आकर्षक आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे अशी मान्यता आहे. या ठिकाणी प्रत्यके वर्षी त्यांची पूजा करण्यासाठी हजारो जैन येतात. इथेच प्रदक्षिणा करताना जमिनीमध्ये एक गुहा आहे तिथे अमिझरा पार्श्वनाथजी विराजमान झालेले आहेत. असे म्हणतात कि कधी कधी भगवानच्या चेहऱ्यावर हनुवटीवर अमीचा अर्थात अमृताचा एक थेंब दिसतो म्हणून तिला अमिझरा पार्श्वनाथ म्हणतात. या मंदिरात काही पायऱ्या उतरल्यावर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर श्री आदिनाथजी ऋषभदेव यांची भव्य मूर्ती आहे.
पुढे गेल्यावर जंगल मार्गाने सातपुडा कुंड लागते येथे सात दगडांमधून बाराही महिने पाणी पडते म्हणून याला सातपुडा म्हणतात आणि तिथूनच खाली जंगल रस्तात जांबुवंतीची प्राचीन गुहा आहे. रात्रीची वेळ असल्याने तिकडे न जाता आम्ही पुढे निघालो. ४१०० पायऱ्यांवर जटाशंकर धर्मशाळा आणि दुसऱ्या शिखराचा चौक (दुसरी टूंक ) आहे. इथून दोन रस्ते फुटतात. उजव्या बाजूचा अंबाजी टूंक आणि डाव्या बाजूचा गौ-मुखी गंगा याचा. येथे गाईच्या मुखातून गंगेचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौ-मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थ, भाविक, साधू बैरागी या मार्गांने येत अथवा जात नाहीत, या मार्गांवर कुठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही. येथून साधारण ३१०० पायऱ्या उतरलो कि पायथ्याला तळेटीला पोहोचता येते. आता या गौमुखी गंगेची कथा अशी आहे कि,
सत्ययुगात सत्यधम नावाचा एक ब्राम्हण देव प्रसन्न व्हावा म्हणून तप करत होता. त्याने हजारो वर्ष तप केले. परंतु देव प्रसन्न झाला नाही. तेव्हा तो आत्मसमर्पण करण्यास तयार झाला. त्याचवेळेला आकाशवाणी झाली कि, "हे ब्राम्हणा, या जन्मी तुला ईश्वराचे दर्शन होणार नाही कारण लहानपणी एका गाईने पाणी पिण्यासाठी जेव्हा तोंड पाण्यात बुडविले त्याचवेळी तू काठीने मारून त्या गाईला पळवून लावलेस. तिला तू पाणी पिऊन दिले नाहीस. म्हणून जो पर्यंत तू या पापाचे क्षालन करत नाहीस तोपर्यंत तुला ईश्वर दर्शन होणार नाही." असे ऐकताच तो रडू लागला. त्यावेळी पुन्हा आकाशवाणी झाली "हे ब्राम्हण तू गिरनार पर्वतावर जाऊन तपश्चर्या कर. त्यामुळे गाईच्या मुखातून गंगा वाहू लागेल आणि तिच्या पाण्यात तू स्नान केलेस कि तू पापमुक्त होशील आणि तुला मोक्षप्राप्ती होईल." ब्राह्मणाने तसेच केले आणि एक हजार वर्षे तप केल्यावर गाईच्या मुखातून गंगा प्रकट होऊन वाहू लागली. म्हणून या तीर्थाचे नाव गौमुखी गंगा असे पडले.
पुढे ४५०० पायऱ्यांवर साचाकाका नावाचे ठिकाण लागते. असे म्हणतात कि येथे काही वर्षांपूर्वी शंकरगिरी नावाचे महात्मा राहत होते. त्यांची येथे महाकाली मंदिर आणि घर बांधून हे स्थळ सुशोभित केले. गौ-मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर ४,८०० पायऱ्यावर अंबाजी टुंक येते. ५१ शक्तिपीठांपैकी हेही एक शक्तिपीठ आहे. याची आख्यायिका अशी कि, हिमालयाने शंकर पार्वती यांचे लग्न लावून दिले. तेव्हा पार्वतीचा मोठा भाऊ गिरनार याने वरातीत देवतांचा चांगला आदर-सत्कार केला. त्यावर विष्णू प्रसन्न झाले आणि तुझी पूजा केली जाईल व तुला सिद्धी प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. तिथपासून गिरनार हे गिरिनारायण झाले. ज्यावेळेला पर्वतांना पंख होते आणि ते छाटण्यासाठी ब्रह्मदेवाने जेव्हा इंद्राला आज्ञा दिली तेव्हा गिरनार घाबरून समुद्रात लपले. ज्यावेळी देवी पार्वतीला हे कळले तेव्हा तिने इंद्रासह देवांना शाप दिला. तेव्हा सर्व देवांनी मिळून समुद्राची स्तुती केली आणि त्यांना पाच योजन दूर जाण्यास सांगितले. समुद्र पाच योजन दूर गेला आणि त्याने गिरनारला आपल्या पासून वेगळा केला. तेव्हापासून भावाच्या रक्षणासाठी देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला. म्हणुन हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. दरवाजाच्या एका बाजूने पाण्याचा झरा आहे. तो मातेचा खप्पर या नावाने प्रसिद्ध आहे. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. मातेची सुंदर मूर्ती खूप सुंदर आहे. मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो याचा प्रत्यय प्रत्येकाला येतोच येतो. इकडेच डाव्या बाजूच्या मोकळ्या जागेवर आता रोपवे झाला आहे. रोपवेने इथून खाली उतरता येते. आपण रोपवेने जरी आलो तरी इथून पुढे दत्त पादुकांपर्यंतचा प्रवास हा पायीच करावा लागतो.
आम्ही पुढे निघालो. पुढे गोरक्षनाथ शिखराकडे जाताना एक दगडी पुल टाकून रस्ता केलेला आहे. त्यावरून चालत असताना अचानक महेश थांबला. त्याने जवळच्या टॉर्चने पाहिलं तर एक भलं मोठ्ठ रानडुक्कर चरत होतं. टॉर्चच्या उजेडात त्याचे डोळे आणि सुळे चमकत होते. सर्वांनी त्याला बघायला एकच गल्ला केला. एवढ्या गोंधळात सुद्धा त्याने आम्हाला काही इजा केली नाही. त्याच्या धुंदीत चरत चरत तो तिथून बाजूला झाला. महाराजांचीच कृपा म्हणायची.
डावीकडे गुरुशिखर. उजवीकडे दिसणारे सर्वात उंच गोरक्षनाथ शिखर |
पुढे ५,५०० पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान आले. गिरनार पर्वतवरील सर्वांत उंच शिखरावर हे स्थान असून त्याची उंची .समुद्र सपाटीपासून ३,६६६ फुट आहे. आतमध्ये प्रवेश करून आम्ही गोरक्षनाथांच्या अखंड धुनीला मनोभावे नमस्कार केला. प्रसाद म्हणून आम्हाला सर्वांना विभूती मिळाली. येथे गोरक्षनाथांनी हजारो वर्षे तपस्या केलेली असून ते सध्या गुप्तरुपात वावरतात अशी मान्यता आहे. येथे बसून गोरक्षनाथ इतर नवनाथ, चौऱ्याशी साधक आणि गोपीचंद भरथरी याना उपदेश करीत असत. धुनीच्या खाली धर्मबारी आहे. तिला 'चौराशी का फेरा ' म्हणतात. धर्मबरीच्या बाहेर त्यांच्या चरण पादुका आहेत. मी त्यांचे दर्शन घेतले. यात्रा सुफळ झाल्याचा आनंद वाटला.बाजूला पहिले तर एका दगडामध्ये एक छोटा बोगदा होता. त्यातून बरेच जण आत जात होते. विचाराअंती समजले कि, त्याला पाप पुण्याची खिडकी (बारी) म्हणतात. म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. यातून बाहेर पडणाऱ्यास मोक्षाचा मार्ग मिळतो असा समज आहे. मी सहजगत्या आतमध्ये जाऊन दुसऱ्या बाजूने बाहेर पडलो. चला आता मोक्षाचा मार्ग सुलभ ! उगाचच मनाने कौल दिला. थोडा वेळ तिथेच विश्रांती घेतली. इथून सकाळचा सूर्योदय फार छान दिसतो. सहज विचार केला हे स्थान गिरनारवरील उंच स्थान आहे आणि गुरु दत्तात्रेयांचे मात्र याच्या पेक्षा कमी उंचीचे असं का बरं असेल? साधारणपणे गुरूचे स्थान उंचीवर असते. माहिती मिळाली कि गोरक्षनाथांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना प्रत्यक्ष दत्तमहाराजांनी दर्शन दिले तेव्हा गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की "आपले चरण दर्शन मला सतत व्हावे" दत्तमहाराजांनी हे मान्य केले. यामुळे गोरक्षशिखर उंचावर आहे. या स्थानावर गेली अनेक वर्षे मंदिराची व्यवस्था मंहत श्रीसोमनाथ हे पाहतात त्यांचा दत्त संप्रदायातील "सेवा" या शब्दावर नितांत विश्वास आहे. गुरु गोरक्षनाथ हे सनातन धर्माचे योग गुरु असून सर्व भारत वर्षात प्रसिद्ध आहेत. त्यांचे मुख्य वसतिस्थान नेपाळमधील 'मृगस्थळी येथे आहे. नेपाळची स्थापना गुरु गोरक्षनाथांनीच केली आहे. त्याची सुद्धा एक वेगळीच कहाणी आहे.
पुढे श्री गिरनारी बापूंची गुंफा लागते. येथे श्री भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात. त्यांना श्री गिरनारी बापू "प्रसाद" म्हणून ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार रूद्राक्ष देतात. सहा वर्षांपूर्वी जेव्हा प्रथम आलेलो तेव्हा त्यांचे दर्शन मला झाले होते या वेळेला मात्र ते दिसले नाहीत. थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागल्या. एक उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे ३०० पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. आणि डाव्या बाजूच्या कामानितून गेल्यावर आपण दत्त पादुकांकडे पोहोचतो. आधी दत्त महाराजांचे दर्शन घेऊन मग कमंडलू तीर्थाकडे जाऊया असं ठरलं.
जुनागढ राज्याचे दिवाण रायबहादूर हरिदास देसाई यांच्या प्रमुख पदाखाली स्थापन झालेल्या कमिटीने गिरनार लॉटरी काढली होती आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नातुन तळेटी (स्थानिक भाषेत तलहाटी ) पासून गुरुदत्त शिखरापर्यंतचा पायऱ्यांचा मार्ग बनविला गेला. याला सोपान मार्ग असे देखील म्हणतात. खरंच! त्या कामगारांना सुद्धा एक सलाम ठोकला पाहिजे. त्यांच्यामुळे अनेक दत्त भक्त आज महाराजांच्या पादुकांचे दर्शन सोयीस्कर रित्या घेऊ शकतात.
श्रीदत्तगुरुंच्या चरणपादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना प्रत्येक ऋतूतील थंडी, वारा, पाऊस यांचाअनुभव वेगळाच असतो. हळूहळू आम्ही वरती पोहोचलो आणि ९९९९ पायऱ्या ओलांडून दर्शन झाले ते त्या अवधूताच्या पादुकांचे.
"याजसाठी केला होता अट्टहास!
" मनाला आंतरिक समाधान लाभले. पादुका दर्शन हा दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे. याच स्थानावर बसून भगवान श्रीदत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केली होती म्हणूनच त्यांचे हे अक्षय स्थान आहे. हे आहे गिरनारवरील पाचवे शिखर अथवा पाचवी टूंक. याला 'अवलोकन शिखर' असे देखील म्हणतात. १० X १२ चौ.फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती एक पुजारी बसू शकेल एवढी जागा आहे. बाजूलाच प्राचीन गणेश अन् हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते. चरणकमलाच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. ती घंटा ३ वेळा आपल्या पूर्वजांची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. गर्दी असल्यास ती वाजवायला मिळत नाही. पौर्णिमेला दर्शन घेणे भाग्याचे मानले जाते आणि ते भाग्य मला लाभले होते. प्रसाद घेतला आणि आम्ही परतीच्या वाटेला लागलो.
रोपवेच्या इथून पहाटे दिसणारे गुरुशिखर आणि गोरक्षनाथ शिखर |
सूर्योदयाची वेळ जवळ येत चालली होती. गिरिनारायणाच्या दर्शनाला सूर्यनारायण हळूहळू येत होते. परतीच्या मार्गाने आम्ही पुन्हा गोरक्षनाथ शिखराजवळ पोहोचलो. खरं तर इथून गुरुशिखराजवळ सूर्योदय होताना पाहणं हा एक अवर्णनीय आनंदच! परंतु वातावरण थोडंसं ढगाळ होतं. थोडासा भ्रमनिरास झाला. पुन्हा आंबा मातेच्या ठिकाणी आलो. नवीन लावलेल्या गिरनार रोपवेचा एक अनुभव घ्यावा म्हणून आम्ही तिथून रोपवेने जाण्याचा निर्णय घेतला. रोपवेसाठी रांग
लागली होती. गिरनार रोपवे हा आशियातील सगळ्यात लांब मंदिराला जोडणारा रोपवे समजला जातो. याची लांबी
2,126.40 मीटर इतकी आहे. या रोपवेळा सुरुवातीला २४ ट्रॉली लावण्यात आल्या आहेत. ज्यात एका ट्रॉली मध्ये आठ जण बसू शकतात म्हणजे एका फेरीत साधारण १९२ यात्री जाऊ शकतात. यात एकूण ९ टॉवर आहेत आणि यातील १००० पायरीजवळ असलेला सहा नंबरचा टॉवर हा सर्वात उंच आहे जो ६७ मीटरचा आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प २०२० साली पूर्ण झाला आणि २४ ऑक्टोबर २०२० मध्ये भारताचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करून सुरु करण्यात आला. या प्रकल्पाला साधारण १३० करोड इतका खर्च आला आहे. रांगेत उभे राहून तिकीट काढल्यावर आम्ही रोपवे मध्ये बसलो. तिकिटारुन लक्षात आले कि हे सर्व ऑस्ट्रेलियन कंपनी ऊषा ब्रीको चालविते आणि सांभाळते. आम्हाला एक वेळचे एका व्यक्तीचे ४०० रुपये मोजावे लागले.
रोपवेची प्रतिकृती |
रोपवे मधून गिरनार पर्वताची भव्यता किती आहे हे जाणवत होती. त्याच्या बाजूला पसरलेला घनदाट जंगल आपलं अस्तित्व दाखवत होता. रोपवेने जाणं हा एक सुखद अनुभव ठरला. खाली उतरलो. पुन्हा एकदा गिरनार पर्वत डोळे भरून पहिला. गिरनारचा फोटो काढला आणि तो आडवा धरला तर एखादा वयोवृद्ध तपस्वी वर्षानुवर्षे डोळे मिटून तप करीत आहे असाच भास होतो. कदाचित गिरिनारायण खरंच या रूपात असतील आणि जो मनोभावे दर्शन करेल त्यालाच त्यांचं दर्शन होत असेल.
गिरनारवरील दत्त पादुकांच्या या अनुपम दर्शनाचा लाभ प्रत्येक दत्त भक्ताला एकदा तरी लाभावा हीच मनोमन इच्छा आणि शिखरावर बसलेले दत्त महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव आहेत हि भावना ठेवून मी तिथून त्यांच्या आज्ञेने निघालो.
।। हे गिरनारी , हे ध्वजधारी शिखर पर बैठके खबर ले हमारी ।।
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
संदर्भ : गिरनार महात्म्य आणि आंतरजालावरून साभार
© Mayur H. Sanap 2021
No comments:
Post a Comment