गिरनार परिक्रमा एक पुण्यसंचय

  

गिरनार परिक्रमा एक पुण्यसंचय



परिक्रमेच्या सुरुवातीला उजव्या बाजूला दिसणारे गिरनार पर्वतावरील गुरुशिखर 


परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा मानवी मनाच्या भक्तिभावाचा एक पैलू आहे. परमेश्वरावर  नितांत श्रद्धा असणारा व्यक्ती हा कुठेही देवळात गेल्यावर त्या दैवताभोवती चहुबाजुंनी प्रदक्षिणा केल्याशिवाय राहत नाही. प्रदक्षिणेची परंपरा अगदी पूर्वापार चालत आली आहे. ती अगदी ग्रामदैवतेच्या पालखी पासून ते डोंगर-पर्वतरांगांपर्यंत. ते उपासनेचे आणि भक्तीचे एक अंग आहे असे मानले जाते.  ज्या तीर्थक्षेत्रांचं, स्थानांचं अध्यात्मिक महत्व जास्त आहे अश्या ठिकाणी केलेल्या प्रदक्षिणेला परिक्रमा असे म्हणतात. थोडक्यात प्रदक्षिणा हि लघुस्वरूपात घातली जाते तर व्याप्ती जास्त असलेलीला परिक्रमा म्हटली जाते. नर्मदा परिक्रमा, ब्रम्हगिरी परिक्रमा तशीच गिरनार परिक्रमा.

गिरनार म्हणजे समस्त दत्त भक्तांचे माहेरघर. प्रत्यक्ष दत्त महाराजांनी ज्या ठिकाणी बारा हजार वर्ष तपश्चर्या केली ते परम पावन ठिकाण. "गिरनारला तोच येतो ज्याला महाराज बोलावतात" असं गिरनारचं महात्म्य आहे. तितकंच परिक्रमेचंही. पाच वर्षांपूर्वी मला गिरनार वरील दत्त पादुकांचे दर्शन घेण्याचा लाभ झाला होता. ती म्हणजे माझ्यासाठी एक अनुभूतीच होती. तेव्हाच समजले होते कि गिरनार पर्वताची परिक्रमा सुद्धा करतात. ती सुद्धा फक्त वर्षाने एकदा होते. ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या ५ दिवसातच करतात. इतरवेळेला तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्हाला गिरनारच्या जंगलात प्रवेश नाही. ३८ किलोमीटरची परिक्रमा करणे म्हणजे ‘येरा गबाळ्याचे काम नव्हे!’ परंतु महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही एखाद्या गोष्टीचा निश्चय केलात तर तो तडीस जातोच हि मनोमन धारणा. त्यामुळे या वेळेला खास परिक्रमेसाठीच जायचं ठरवलं. दरवर्षीचा आमचा पेणचा स्वामी परिवार गिरनारला जाण्यासाठी निघाला आणि मला सुद्धा बोलावणं आलं. कोरोना काळात परिक्रमा होईल का नाही याची शाश्वती नव्हती. परंतु जरी परिक्रमा झाली नाही तरी दत्त पादुकांचे दर्शन घेऊन परत येऊया या निर्धारानेच मी निघालो. आमचे परम मित्र राजू सावंत यांनी जाण्या-येण्यापासून ते राहण्याखाण्यापर्यंत सर्व नियोजन केलेले होते. त्यामुळे मी फक्त बॅग उचलली आणि "जय गिरनारी " म्हणत निघालो गिरनारला.


बांद्रा -वेरावळ एक्सप्रेसने आमचा  प्रवास सुरु झाला. जवळपास वर्षभराने मी सर्वांना भेटत होतो. या वेळी नितेश मात्र सोबत नव्हता. ट्रेनमध्ये आम्हाला पाच महिलांचा एक ग्रुप भेटला. त्यांना पाहिल्यावर मला "झिम्मा" चित्रपटाची उगाच आठवण आली.  थोडी ओळख झाल्यावर समजले त्या सुद्धा गिरनार परिक्रमेसाठी आल्या आहेत. पण आम्हाला आता या वयात परिक्रमा झेपेल का या बाबत थोड्या साशंक होत्या. या ट्रेनमधले जवळपास निम्म्यापेक्षा जास्त प्रवासी हे गिरनारला जाणारेच असतात. महाराजांवर श्रद्धा ठेवा तेच तुमच्याकडून परिक्रमा करून घेतील या शब्दात त्यांना इतरांनी सांगितल्यावर थोडा धीर वाटला. गप्पा-टप्पा, भजन गात जुनागढ पर्यंतचा  आमचा ट्रेनचा प्रवास सुखकर झाला.

हॉटेलवर सर्व सामान ठेवून आम्ही हॉटेल मालकाकडे प्रथम परिक्रमेची चौकशी केली त्यानुसार आम्हाला पुढचे नियोजन करायचे होते. परंतु त्याला त्यातली काहीच माहित नव्हती. ‘कोण म्हणत होते कि अद्याप परवानगी नाही, तर कोणी सांगत होते कि फक्त रात्रीच सोडत आहेत.’  खात्रीशीर उत्तर मिळाले नव्हते. शेवटी इच्छा तिथे मार्ग म्हणतात तसेच झाले. आमच्या समोरच्याच रूममधील पुण्याहून आलेले काहीजण कालच  परिक्रमा करून आले होते. त्यांनीच सांगितले कि 'परिक्रमेला परवानगी दिली आहे. तुम्ही उशीर करू नका शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. तेव्हा आज विश्रांती घेऊन उद्या सकाळीच सुरुवात करा.' आम्हाला महाराजांनी मार्ग दाखवला होता.

आमचे आयोजक राजू सावंत यांनी सर्वांच्या पाठीमागे लागून सर्वांना सकाळी तयार केले. आठ वाजता परिक्रमेचा गेट बंद करणार त्याच्या आत आम्हाला पोहोचायचे होते. यावर्षी आयत्या वेळेला परिक्रमेसाठी परवानगी मिळाल्याने भंडारा वगैरे काही नाही असं आमच्या कानावर आल्याने पाण्याच्या बाटल्या आणि सकाळी जे मिळेल ते खाण्याचं सामान प्रत्येकाने आपापल्या बागेत कोंबलं आणि घाई-घाईत कालवा चौकातून आम्ही रिक्षा पकडून गिरनारकडे निघालो. आठ वाजतच आले होते. आम्ही पटापट रिक्षातून उतरलो. "चलो ss  चलो ss  " असं म्हणत हात दाखवत गार्ड गेटसमोर उभा राहून शिट्या मारतच होता. त्यावेळेलाही आम्ही त्यांना  गेटसमोरच आमचा ग्रुप फोटो पटकन काढण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यसुद्धा केलीत्यांचे आभार मनात आम्ही परिक्रमेसाठी गेट मधून प्रवेश केला. दिघेंनी चौकातूनच येताना पोहे पार्सल घेतले होते. त्यावर मी ताव मारला. राजू सावंत यांनी सर्वांना सोबत आणलेल्या गोळ्या वाटल्या. पेटपूजा झाली होती. चला! आता काही चिंता नाही या अविर्भावाने आम्ही गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून परिक्रमेला सुरुवात केली.

परिक्रमेची सुरुवात

गिरनारचं जंगल हे घनदाट दिसत होतं. गुरुशिखर उजव्या बाजूला वरती दिसत होतं. माझ्या कॅमेराचा पहिला क्लिक तिथेच झाला. तिथूनच आम्ही मनपूर्वक नमस्कार केला आणि परिक्रमा सुफळ होऊ दे! म्हणून महाराजांकडे आशीर्वाद मागितला. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून हि परिक्रमा चालू आहेगिरनार पर्वताच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीतच  पाच दिवस सर्वांसाठी प्रवेश खुला असतो. या जंगलात मुंगी, विंचू पासून ते सिंहा पर्यंत भरपूर वन्य प्राणी आहेत. पण आश्चर्य पहा कि या दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही सर्व दत्तगुरूंचीच कृपा आहे आणि याचा अनुभव लगेचच काही अंतरावर गेल्यारवर आला सुद्धा. आम्हाला एक मोठा सांबर दिसला. अगदी हाताच्या अंतरावर येऊन सुद्धा तो अगदी शांत होताआमच्या फोटोशूटलाहि तो उत्तम प्रतिसाद देत होता. तो त्याच्या धुंदीत खाण्यात मग्न होता. नाहीतर अचानक एवढी माणसे जंगलातील प्राणी जेव्हा पाहतात तेव्हा एक तर पळून जातात किंवा सुरक्षेच्या कारणास्तव हिंसक होतात. हीच तर खरी परिक्रमेची जादू आहे. या परिक्रमेचं माहात्म्य खूप आहे. असं म्हणतात कि, देव आणि त्यांचे गण हे सुध्दा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. आपल्या सारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत सुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वाद मिळाल्यास दुधात साखरच!


परिक्रमेत जंगलात दिसलेले सांबर 

गिरनार परिक्रमा दुधेश्वर मंदिरापासून सुरु होऊन भवनाथ तळेटी पर्यंत जाते. नंतर गर्द -घनदाट जंगलातून पूर्ण परिक्रमेचा मार्ग जातो.तीन डोंगर चढणे आणि उतरणे. त्यात तीव्र चढ आणि अतीतीव्र उतार असे स्वरूपभौगोलिक दृष्टय़ा असंख्य छोटय़ा-मोठय़ा पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे.  काही मोजकेच ठिकाणी सोडता वाटेत कुठेही धर्मशाळा नाही की कुठे झोपी जाण्यासाठी काही व्यवस्था. पाणी पिण्यासाठी नळ नाही की खाण्यासाठी हॉटेल. चारी बाजूने घनदाट जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष या मधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात. परिक्रमा मार्गावर कसल्याही सुविधा नसताना श्रद्धस्त भक्त मंडळी मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात.

थकल्या -भागल्या जीवाला बोअरवेलच्या पाण्याचा आधार

सुरुवातीला साधारण साडेचार किलोमीटर चालल्यानंतर एक हातपंप दिसला. बोअरचं पाणी चेहऱ्यावर मारलं. थोडी तरतरी आली. हातपंपच्याच बाजूला वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार केलेले दिसत होते. तिथून एक बाटली भरून घेतली आणि पुढे निघालो. थोडे पुढे, थोडे मागे असा आमचा २६ जणांचा ग्रुप नंतर छोट्या -छोट्या चमूत विभागला गेला. मी, दिघे, राजू सावंत आणि आमच्या सोबत बोरिवलीहून आलेल्या बागायतदार काकी असे आम्ही सोबत चालत होतो. या वेळेला कोविड काळामुळे परिक्रमेची शाश्वती नसल्याने जास्त गर्दी नव्हती नाहीतर विविध ठिकाणाहून लाखो लोक या परिक्रमेत सामील होतात. घनदाट जंगलातून निसर्गाच्या सान्निध्यात राहून परिक्रमा करणे म्हणजे खरंच एक निराळाच आनंद आहे. 'वन्यप्राण्यांना त्रास देऊ नका, त्यांना आधी त्यांच्या मार्गाने जाऊ द्या' असे गुजराती भाषेतील बोर्ड ठिकठिकाणी आमचे लक्ष वेधून घेत होते. साधारण १० किलोमीटर नंतर आम्हाला एक पोलीस चौकी लागली. तिथे क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. साधारण सव्वा अकराच्या सुमारास बारा किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही "जिनाबाबा कि मढी " या ठिकाणी  पोहोचलो

जिनाबाबा कि मढी आणि तेथून समोर दिसणारे गिरनार पर्वत

तिथे आजूबाजूला बऱ्याच नागा साधूंनी आम्हाला अडवले. त्यांना काही दान-दक्षिण देऊन आम्ही आत गेलो. इथे दत्त महाराज आणि शिव शंकराचे छोटेसे मंदिर आहे. तसेच तिथे एका काचेच्या पेटित एक मोठी चिलीम ठेवलेली आम्हाला दिसली. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांचीच चिलीम इथे ठेवली आहे. आहे अद्याप येथे, त्या चिलमीतून ते आत-बाहेर करत होते असे म्हणतात. यांची समाधी धुनी येथे आहे. आम्ही त्यांचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो. सूर्य हळूहळू माथ्यावर येत होता. थोडा मोकळा भाग लागला आणि उन्हाचा एक चटका जाणवला. समोर पाहिलं तर परिक्रमावासी एका ठिकाणी थांबलेले दिसले. वाटेवरच एक छोटी नदी लागली होती. 'सरनो' नावाची. ती पार करण्यासाठी जेमतेम त्यावर सिमेंटने मार्ग बनवला होता. त्यावरूनच पाणी जात होते. आम्ही शूज काढून पाण्यात पाय उतरवून थोडा वेळ तसाच उभे राहिलो. 'नॅच्युरल स्पा '  अहाहा ! थंडगार पाण्याने पायाचा थकवा कुठच्या कुठे क्षणार्धात पळून गेला. - जण त्यात उतरून स्नान करत होते. चेहरयावर थंडगार पाणी मारले. थोडं ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. 



सरनो नदी येथील क्षणभर विश्रांती

बरेचजण तिथेच विश्रांती घेत होते. तिकडेच आम्हाला दादरच्या स्वामींच्या मठातील सेवेकऱ्यांचा एक ग्रुप भेटला. त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि एक सेल्फी घेऊन आम्ही पुढे निघालो. पुन्हा गर्द झाडी. वाटेत मोठमोठाले दगड होते. त्यातून मार्ग काढावा लागत होता. पण आता मात्र पुढे चढ चालू झाला होता. हि दमछाक करणारी चढण होती. घनदाट अरण्यातून ऊन जाणवतच नव्हतं. दुपारचे दोन वाजता देखील सहा वाजल्याचा भास होत होता. हि चढण संपत संपतच नव्हती. बहुतेकांची तीच हालत. थोड्या-थोड्या टप्प्यावर पाण्याचा एक घोट घेत,दम खात सारखे थांबावे लागत होते. "नालपनि घोड़ी की खड़ी ऊंचाई सबका दम निकालती है " असं एक सोबतचा यात्रेकरू बोलला. खरंच होतं ते ! या 'नालपनि घोड़ी ' ने माझा चांगलाच दम काढला. पुढे उतार चालू झाला. काही अंतरापर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत. इथे थोडा वेळ थांबायचं निर्णय घेतला. तिथेच आम्हाला ट्रेन मध्ये भेटलेल्या "घाडगे  काकी " भेटल्या त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची पूर्ण दमछाक झालेली दिसत होती. त्यांच्या काही मैत्रिणी पुढे गेल्या होत्या. मला पाहून त्या हसल्या. " अजून किती आहे रे ".  " निम्मी  झालीय आपली; हा टप्पा उतरलो कि येईलच." मला तरी खरं कुठे माहित होतं किती राहिलंय.  मी हि पहिल्यांदाच परिक्रमा करत होतो. परंतु माझ्या बोलण्याने त्यांना समाधान वाटलं  हे दिसत होतं . "तो पर्यंत हे घ्या व्हिटॅमिन सी ची गोळी " त्यांना सोबत असलेली गोळी दिली. त्यावर खरोखर 'व्हिटॅमिन सी' लिहिलंय हे पाहून त्या हसल्यामीही सोबत आणलेल्या एका बाटलीत लिंबू पिळलं आणि आम्ही एकेक घोट घेत थोडा वेळ तिथेच स्थिरावलो.


दगड-धोंड्यातून आणि घनदाट जंगलातून जाणारा परिक्रमेचा मार्ग.  

सोबतच्या परिक्रमावासीयांकडे पाहून मी दोन क्षण विचारात पडलो. 'गिरनारच्या दत्त महाराजांवर लोकांची किती अपार श्रद्धा आहे. वयोमानानुसार शरीर थकलेलं असलं तरी त्याला आपल्या मनाच्या अफाट शक्तीने खेचत श्रद्धावंत हि परिक्रमा पूर्ण करतात. "पाय दुखले, दुखू देत!" आयोडेक्स चोळ, तर कुठे मुव्ह ची क्रीम लाव. पुन्हा चालायला लाग. चक्कर आली तर येऊ दे! लिंबू पाणी घे. थोडा वेळ विश्रांती घे. "जय गिरनारी" म्हण आणि चाल पुढे. महाराज यातून तुला तरुन नेतील. - वर्षांची मुले, तर कुठे तान्ह मुलं घेऊन; एक तर ८०-९० च्या घरातील आजी जिला नीट चालताही येत नाही. तिच्या दोन्ही हातांना धरून तिची मुले तिला हि परिक्रमा करताना मी पाहिलीत. धन्य आहेत हि सर्व मंडळी आणि तो देवसुद्धा कि ज्याच्यासाठी लोक एवढे कष्ट घेतात. ज्याच्या एका नामाने एवढी अफाट सर्व निभावण्याची शक्ती येते. मग का नाही तो आपल्या भक्तांसाठी धावणार. म्हणूनच दत्त महाराजांना "स्मर्तृगामी" म्हटले आहे.

गिरनार  परिक्रमा हि श्रेष्ठ पुण्यसंचयाचा भाग आहे. याची कथा अशी आहे कि, गिरनार यांचे नाव गीर नारायण होते. ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र होते. प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते. त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत असल्याने, ते ज्या ठिकाणी थांबत त्या ठिकाणांवर वस्ती असल्यास पर्वता खाली बसत. हि समस्या पाहून सर्व देव चिंतीत झाले. ते महादेवांकडे गेले. सर्व हकीकत ऐकल्यावर त्रिदेव यांनी निर्णय घेतला की, सर्व पर्वतांचे पंख छाटावे. हि बातमी गीर नारायण यांना समजली. अशी मान्यता आहे कि त्यावेळेस गिरनार पासून ते सोमनाथ पर्यंत संपूर्ण समुद्र होता. आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून तेथे एक ब्रम्ह तळ होते. त्या तळामध्ये गीर नारायण यांनी आपले शरीर लपवले आणि फक्त चेहरा वर ठेवला. तो भाग म्हणजे आपण जे गुरु शिखरावर पादुका दर्शन घेतो ते यांचे कपाळावरील स्थान आहे. पण ज्यावेळेस, पार्वती देवी यांचा विवाह महादेवांशी होणार होता, तेव्हा आपले मोठे बंधू गीर नारायण विवाहात उपस्थित व्हावे. म्हणून पार्वती देवींनी विनंती केली कि आपण विवाहास यावे. त्या विनंतीला मान देऊन गीर नारायण तेथे आले. त्यांचे पंख छाटू नये म्हणून त्यांनी महादेवांजवळ वरदान मागितले कि, हिमालयावर जे ३३ कोटी देव, तपस्वी, साधू सर्व वास करतात. तसे माझ्याकडे पण वास करावा. तसा वर महादेवांनी त्यांना दिला. म्हणून गिरनार येथे, सिद्ध पुरुष, साधू, महंत वास करतात. ३३ कोटी देवांचाही येथे वास असतो. त्यामुळे गिरनार परिक्रमा हि ३३ कोटी देव आणि गुरु दत्तात्रय यांना प्रदक्षिणा करण्यासारखीच आहे. त्यामुळे ही परिक्रमा अत्यंत पुण्यदायी आहे आणि प्रत्येक दत्तभक्तांची ती आयुष्यात एकदा तरी करण्याची इच्छा असतेच.

साधारण पावणेचारच्या सुमारास आम्ही सपाट मार्गावर चालू लागलो. समोर गर्दी कसली आहे पाहूया असं म्हणत आम्ही जवळ पोहोचलो तर कोणी एका भक्ताने सर्वांसाठी पिण्याचे पाणी, गाठीया आणि ताजी बुंदी  याची सोय केली होती. भुकेल्या सर्व जिवांनी त्यावर ताव मारला. तिथेच डॉकटरची सोयसुद्धा केली होती. परिक्रमावासीयांना काही शारीरिक त्रास होत असेल तर आवश्यकतेनुसार गोळ्या वाटप होत होतेपोटात भर पडल्यावर शरीर थोडं तरारून आलं. पाऊले पुन्हा चालायला लागली.  काही अंतर गेल्यावर फॉरेस्टच्या लोकांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला एक भलं मोठं मचाण उभारलेलं दिसत होतं. एवढे मोठं मचाण ते सुद्धा जमिनीवरचं मी प्रथमच पाहत होतो. त्याचे दोन-चार फोटो काढले आणि पुढे निघालो. पुढे मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे भोरदेवीचे स्थान आहे. मारवेला ते भोरदेवी हे साधारण ५-६ किलोमीटरचे अंतर आहे. पुढे गेल्यावर एक छोटीशी वनखात्याची चौकी लागते. तिथून दोन मार्ग जातात. तिथून डाव्या बाजूने एक किलोमीटर अंतरावर भोरदेवी (बोरदेवी ) आणि उजव्या बाजूने बाहेर तळेटीला जाण्याचा मार्ग लागतो. भोरदेवीचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा चौकीच्या इथे आलो आणि तिथुन मग तळेटीला जाण्यासाठी मार्गस्थ झालो. 







भोरदेवी माता मंदिर 

हा परिक्रमेचा अंतिम टप्पा आहे. हे अतिशय रमणीय असे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे. इथून भवनाथ तळेटी १० किलोमीटर लांब आहे हे तिथल्या फलकावरून आमच्या लक्षात आलं. तळेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. चला ! म्हणजे आलो जवळ आम्हाला हायसं वाटलंहा शेवटचा टप्पा अतिशय सरळ आहे. परंतु तो संपण्याचा नावच घेत नव्हतं. आता सूर्य मावळून अंधार पडला होता. आम्ही अजून चालतच होतो. नक्की हे अंतर १० किलोमीटरचं आहे ना ! आम्हाला ते खरेच वाटेना. आत्तापर्यंत काही वाटलं नव्हतं परंतु जसा अंतिम क्षण जवळ येऊ लागतो तसं आपल्या मनातून ते कधी येतोय ! कधी संपतोय असं सारखं वाटत राहतं आणि त्यातून शरीर तसा प्रतिसाद द्यायला लागतं. माझंही आता तसंच झालं. आता मात्र पायात त्राणच उरले नव्हते. पायांत थोड्या वेदना जाणवत होत्या. असं वाटत होतं कि इथून आता पुढे कोणीतरी आपल्याला उचलून न्यावं.  अजून का येत नाही तळेटी. हे १० किलोमीटर पेक्षा जास्तच अंतर आहे असंच आम्हाला सर्वांना आता वाटायला लागलं होतं. पण एकमेकांशी गप्पा मारण्याच्या नादात तेही अंतर आमचं पार पडलं आणि आम्ही जिथून गिरनार चढायला सुरुवात होते बरोबर तिथेच उजव्या बाजूलाच बाहेर पडलो आणि गिरनारच्या प्रवेशद्वारावर येताच सर्वांनी मनोभावे नमस्कार करून एकाच स्वरात "जय गिरनारी" म्हणत महाराजांना धन्यवाद दिले. बरोबर पावणे आठ वाजले होते. आम्हाला परिक्रमा पूर्ण करायला म्हणजे जवळपास १२ तासच लागले म्हणायला हरकत नाही.

नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात असले आणि सर्व कर्ता करविता, तो आहे ह्यावर दृढ विश्वास असला कि हि परिक्रमा सुफळ होतेश्री गिरनार परिक्रमा हि ३८ किलोमीटरची पायी परिक्रमा पूर्णकरून आम्ही नंतर गिरनार पर्वतावर जाऊन दत्त पादुकांचे दर्शन सुद्धा घेतले यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता सर्व दत्त महाराजांची कृपा. बोला "जय गिरनारी!"






गिरनार परिक्रमेतील काही छायाचित्रे:


आमचे आयोजक राजू सावंत यांच्या सोबत गिरनार परिक्रमा सुरु होतानाचा एक क्षण सेल्फी मध्ये कैद. 











जिना बाबा कि मढी येथील मंदिरे 



वनखात्याने बांधलेले सुंदर आणि भव्य मचाण




काही ठिकाणी तीव्र उतरावर पायऱ्या बांधलेल्या आहेत 



गिरनार पर्वताचा घनदाट अरण्याचा परिसर


।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

।। जय गिरनारी ।।


                                                                                                                                                 © Mayur H. Sanap 2021

2 comments:

niteshpatil@Adiyogi said...

यावेळेस माझं राहून गेले... उत्तम लिखाण झाले.
वाचताना प्रत्येक क्षण डोळ्यांसमोर येत होते.
सुंदर .... 👏 श्री गुरुदेव दत्त👏

Unknown said...

फारच सुंदर लीखाण वाचताना आपण प्रत्यक्ष परिक्रमा परत करत आहोत आसे वाटते.मयुर असाच गिरनारचा पण ब्लाॕग तयार कर.