हचि अ डॉग टेल (Hachi: A Dog's Tale)


हचि  अ  डॉग टेल (Hachi: A Dog's Tale)




हचि  अ  डॉग टेल (Hachi: A Dog's Tale) हा चित्रपट सर्वप्रथम प्रदर्शित झाला होता टोकियो मध्ये ८ जुलै २००९ रोजी. लासे हॅलोस्ट्रम  दिग्दर्शित केलेला आणि रिचर्ड गेरे ने सुंदर अभिनय केलेल्या या चित्रपटाला आज  १२ वर्षे होऊन गेली. हचिको बद्दल खूप ऐकलं होतं म्हणून त्याचा चित्रपट देखील आवर्जून पहिला होता. आज पुन्हा एकदा पाहिला. हा चित्रपट बेतला आहे तो जपानी श्वानाच्या एका सत्य घटनेवर आधारित . तुम्ही म्हणाल यात वेगळं काय आहे. असे कितीतरी चित्रपट आहेत. पण हचिको वेगळा आहे कारण त्यातील नायक हा खरा खुरा आहे आणि त्याचा मास्टर (मालक) गेल्यावर देखील त्याचं असणारं प्रेम, त्यातील भावनांची गुंफण यात दाखवली गेली आहे . आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर ९ वर्षे ९ महिने आणि १५ दिवस रेल्वे स्टेशनवरती एकाच ठिकाणी वाट पाहणाऱ्या श्वानाची आपल्या मालकाप्रती असणारी निष्ठा आणि त्या दोघांमधील सुंदर नाते यात दाखवलं गेले आहे. IMDB ने सुद्धा या चित्रपटाला ८. /१० रेटिंग दिली आहे. चित्रपटाचा शेवटदेखील एकदम भावूक आहे. ज्याच्या घरी श्वान आहे किंवा ज्यांचं त्यावर अपरंपार प्रेम आहे अश्या बहुतेकांना "हचिको " हा नक्की माहित असेल. 

आता पाहूया हचिकोची खरी कथा, 




श्वान आणि त्याचं आपल्या मालकाप्रती असणारे प्रेम हे काही वेगळं सांगायला नको. असे अनेक किस्से आपण ऐकलेत. हचिकोची गोष्ट सुद्धा तशीच आहे. जपानी भाषेत हचि (hachi )म्हणजे आठ. आठ हा शुभ संकेत म्हणून ओळखला जातो आणि "को" म्हणजे म्हणजे एकेकाळी प्राचीन चीनी ड्यूक्ससाठी वापरला जाणारा प्रत्यय. 
हाचिको हा एक जपान मधील अकीता जातीचा श्वान होता. अकिता ही जपानच्या कुत्र्यांची एक जात आहे. तेथील डोंगराळ प्रदेशात मुख्यत्वे ही कुत्र्यांची जात आढळून येते.हाचिको या कुत्र्याचा जन्म जपान मधील ओडेट मध्ये १० नोव्हेंबर १९२३ साली एका शेतामध्ये झाला होता. पुढे टोकियो विद्यापीठातील कृषी विभागात काम करणाऱ्या प्राध्यापकांनी १९२४ साली त्याला दत्तक घेतले होते. त्या प्राध्यापकांचे नाव होते हिडेसाबुरो युएनो. 
यूएनो दररोज विद्यापीठात ट्रेनने जायचे. रेल्वे स्टेशन घराजवळच असल्याने ते रोज पायी पायी स्टेशनपर्यंत जायचे. जेव्हापासून हचिको त्यांच्या घरी आला होता तेव्हांपासून हचिको रोज सकाळी त्यांच्या सोबत स्टेशन पर्यंत जायचा आणि संध्याकाळी साधारण पाच वाजता त्यांच्या परतण्याच्या वेळी स्टेशनजवळ जाऊन बसायचा. मग ते दोघे सोबत घरी यायचे. असा त्यांचा दिनक्रम झाला होता.  स्टेशन जवळील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आणि तिकीट कलेक्टरला ही देखील रोजची सवय झाली होती.  पण बहुतेक नियतीला त्यांची मैत्री पाहवली गेली नाही आणि एके दिवशी अचानक  २१ मे, १९२५ साली मुलांना शिकवत असतानाच यूएनो ह्यांचा cerebral haemorrhage मुळे अचानक मृत्यू झाला. हाचिको ज्या स्टेशनवर त्यांची वाट पाहत असायचा तिथे त्या दिवशी यूएनो आलेच नाहीत. तो बिचारा रात्र होई पर्यंत वाट पाहत बसला. 
यूएनो च्या मृत्यनंतरही हाचिको रोज संध्याकाळी ट्रेन ज्या वेळी स्टेशनवर यायची बरोबर त्याच वेळेला जायचा. त्यांच्या परतण्याची  तो रोज वाट पाहू लागला. पण यूएनो काही दिसले नाहीत. एखाद्या माणसाची वाट तरी किती पाहावी एक-दोन दिवस ? पण हचिको पुढचे नऊ वर्षे, नऊ महिने आणि 15 दिवस आपल्या आवडत्या मालकाची वाट पाहत होता. तो रोज तिथे जायचा, आपल्या मालकाच्या परतण्याच्या आशेने रात्रभर तिथे थांबायचा पण त्याचे लाडके प्राध्यापक काही येणार नव्हते आणि हचिकोही त्यांची वाट पाहायचं थांबवणार नव्हता. यूएनो ह्यांच्या एका विद्यार्थ्यांने अकितो ह्या कुत्र्याच्या जातीवर बरेच संशोधन केले होते. हचिकोलाही त्याने बऱ्याच वेळा शिबुया स्टेशनवर पाहिले होते. एक दिवशी त्याने हाचिकोचा पाठलाग केला. तेव्हा त्याला कळले की हाचिको आता यूएनोच्या घरी बागकाम करणाऱ्यांकडे राहत असे.
एव्हाना रोज येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या हे लक्षात देखील आले होते कि हा इथे आपल्या मालकाची वाट पाहत बसलेला असतो. ४ ऑक्टोबर १९३२ साली "असाही शिंबून " मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखामुळे हचिकोचे कथा सर्वांना कळली. त्यानंतर बरेच लोक फक्त हाचिकोला पाहण्यासाठी आणि त्याला खायला काहीतरी द्यावे म्हणून तिथे येऊ लागले. जेव्हा त्यांना वस्तुस्थिती कळाली तेव्हा त्यांनीही हचिकोला रोज काहीना काही खाण्यासाठी देण्यास सुरुवात केली. पुढे हाचिको आणि त्याच्या निष्ठेबद्दल लोकांमध्ये बराच मोठा आदर निर्माण झाला होता. बघता बघता हचिको जगप्रसिध्द झाला. यूएनोच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने शहर सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण हाचिको मात्र त्याच शहरात शेवटपर्यंत शिबुया स्टेशनवर वाट पाहत राहिला. हचिको चित्रपटात एक सुंदर वाक्य आहे. त्याचा मित्र हा हाचिकोला समजावून सांगत असतो कि "प्रोफेसर आता येणार नाही पण हचिकोला जर वाट पाहायचीच असेल तर त्याने ती पहायला हवी. "
शेवटी आज येईल उद्या येईल या एका आशेवर आपल्या प्रिय मालकाची वाट पाहता -पाहता 8 मार्च, १९३५ रोजी हचिकोने आपला श्वास शिबूयाच्या रस्त्यावर सोडला. त्याचा मृतदेह शिबुया येथील रस्त्यावर आढळून आला. त्यावेळी तो ११ वर्षाचा होता. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे कारण Terminal Cancer & Filaria Infection असे सांगितले. 
त्याच्या मृत्यूनंतर हाचिकोच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याची राख टोकियोतील मिनाटो येथील ओयामा स्मशानभूमीत पुरण्यात आली. येथेच त्याचे प्रिय मालक प्रोफेसर युएनो यांच्यावर देखील अंत्यसंस्कार केले होते. जपान ने त्याच्या आठवणीत 
शिबुया स्टेशन, टोकियो युनिव्हर्सिटी, द नॅशनल म्युझियम ऑफ नेचर & सायन्स (यूनो), ओयामा स्मशानभूमी तसेच हचिकोचा जन्म जिथे झाला त्या ओडेट शहरात असे एकूण पाच पुतळे बांधले. मानव आणि प्राणी यांच्यातील कथा या नेहमीच भावूक करतात परंतु  आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर सलग ९ वर्षे ९ महिने आणि १५ दिवस न चुकता वाट पाहणारा हचिको हा एकच आहे. जपान ला कधी जाणं झालंच तर नक्कीच शिबुया स्टेशन ला भेट द्या.  
हचिको आणि प्राध्यापक यांच्यातील अजरामर प्रेम आणि  मैत्री ची गोष्ट "हचि  अ  डॉग टेल" (Hachi: A Dog's Tale) या चित्रपटात उत्तम रित्या मांडली आहे आणि ती नक्कीच पाहणाऱ्याला भावूक करते यात शंकाच नाही. 


हचिकोचा पुतळा



८ मार्च, १९३६, हचिको मृत्यूची एक वर्षाची जयंती



फोटो आणि माहिती सौजन्य : विकिपीडिया आंतरजालावरून  साभार

खंड्या (धीवर) – (White throated Kingfisher)

 

खंड्या (धीवर) – (White throated Kingfisher)




टाळेबंदीत गावाला राहणं झालं आणि विविध पक्ष्यांच्या निरीक्षणाचा छंद आपसूकच लागला.
दररोज सकाळी उठल्यापासून ते दिवस मावळेपर्यंत पक्ष्यांचे विविध आवाज कानावर पडायचे. मग त्यातून निर्माण झालं ते कुतूहल त्यांना ओळखण्याचं. त्यातील आपल्या रंगाने लक्षवेधी असणारा पक्षी म्हणजे खंड्या किंवा बोली भाषेत त्याला बंड्या असेही म्हणतात.  मागील एक वर्षांपासून त्याचा फोटो माझ्या पॉवर शूट कॅमेऱ्याने काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण DSLR नसल्याने एवढ्या दूरवरून फोटो निघाले तरी पुसट यायचे. त्यामुळे थोडा मोक्याच्या ठिकाणी जवळपास कुठेतरी तो बसेल आणि ४८ X पर्यंत झुम करून  शूट करेन या संधीत होतो. पण ती काही भेटली नव्हती. पक्ष्यांचे फोटो काढणे हा फोटो ग्राफीतील एक कठीण टास्क. मुळात पक्षी हे एका ठिकाणी स्थिर राहत नाही. मनुष्यवस्तीत तर नाहीच नाही. जेमतेम १०-२० सेकंद एवढाच अवधी आणि त्यापेक्षा जास्त कुठे बसलेला दिसला तोही फोटो काढे पर्यंत तर तो नशिबाचा भाग. शेवटी एका वर्षानंतर मला संधी मिळाली. ऑफिसचं काम चालूच होतं आणि तेवढ्यात कि ss कि ss या आवाजाने लक्ष वेधलं. घराच्या भोवती जोरजोरात आवाज येत होता. मला समजलं होतं कि हा खंड्याच आहे. लगेच कॅमेरा घेऊन धावलो. समोरच्या आंब्याच्या झाडावर बसला होता. त्याचा निळसर रंग, पांढरा कंठ आणि लाल चोच किती मस्त दिसत होता तो. असं वाटत होतं कि निळ्या रंगाची शाल पांघरून आणि गळ्यात पांढरा मफलर घालून बसला आहे.  इकडे तिकडे पाहत तो जोरजोरात ओरडत होता. जुलै पर्यंत विणीचा हंगाम त्यांचा असतो त्यामुळेच तो एवढा ओरडत होता. असा मी अंदाज बांधला.  मी सावधतेने त्याला न दिसेल अश्या जागी जाऊन बसलो आणि फायनली मला ३०-४० सेकंदाच्या अवधीत २-३ फोटो मिळाले. बहुधा त्याला माझी चाहूल लागली असावी म्हणून लगेचच तो तिथून उडून गेला. तो नर होता कि मादी आहे हे मात्र ओळखणं कठीणच गेलं. तसेही बाह्य स्वरूपावरून नर व मादी वेगळे ओळखता येत नाहीत.

अ‍ॅल्सिडीनिडी या पक्षीकुलातील प्रामुख्याने मासे खाणाऱ्यांपैकी हा एक पक्षी आहे. या पक्ष्याच्या जगभर सुमारे ९० जाती असून त्या बहुतांशी उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत आढळतात.त्यांच्या आकारांत तसेच रंगांत विविधता असते. याच्या इतर जातभाईंची नावे लहान खंड्या, कवडा खंड्या, काळ्या डोक्याचा खंड्या, तिबोटी खंड्या, घोंगी खंड्या , मलबारी खंड्याअशी आहेत. तिबोटी खंड्या तर फारच आकर्षक असतो. तो फक्त एकदाच दिसला होता पण त्याचा फोटो काही मिळाला नाही. बऱ्याचदा हा खंड्या हा मनुष्य वस्तीजवळ घरांच्या आसपास असलेल्या झाडांवर तसेच विजेच्या तारांवर बसलेला दिसतो. हि भारतातील पाच-सहा जातींपैकी एक सामान्य जाती असून ती सगळीकडे आढळते.

पक्ष्यांची प्रमाण नावे शोधताना महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्याध्‍यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी या पक्ष्याला धीवर हे नाव दिले. धीवर म्हणजे मासे पकडणारा. कोळी लोकांनाही धीवर म्हणतात. त्यामुळे २०१५ पासून आता खंड्या नाही; तर मराठीत धीवर या नावाने किंगफिशर ओळखला जात आहे. परंतु याला सर्वप्रथम शास्त्रीय दृष्ट्या नाव दिले ते कार्ल लीनियस या स्वीडिश शास्त्रज्ञाने. सन १७५८ मध्ये त्याच्या सिस्टामा नॅच्युरेच्या दहाव्या आवृत्तीत त्याने याचे औपचारिकपणे वर्णन केले होते. अल्सिदो स्मीर्नेन्सिस (Alcedo smyrnensis) हे द्विपद नाव ठेवले. सजीवांना नाव देण्याची एक पद्धती त्याने विकसित केली. या पद्धतीमध्ये सजीवाचं नाव लिहिताना नेहमी दोन शब्दांचा वापर केला जात असल्याने या पद्धतीला ‘बायनॉमिअल नॉमेनक्लेचर’ किंवा ‘द्विनाम पद्धती’ म्हणतात. ‘स्पीशिज फ्लँटेरम’या आपल्या पुस्तकामध्ये त्याने या पद्धतीची माहिती दिलेली आहे. त्याच्या मृत्यूनंतर सुमारे १८० वर्षांनी, म्हणजे १९५६ साली आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेत शास्त्रज्ञांनी सजीवांना शास्त्रीय नाव देण्याची लिनियस याने विकसित केलेली पद्धती एकमताने स्वीकारली गेली. या द्विनाम पद्धतीतल्या दोन शब्दांपैकी पहिला शब्द हा त्या सजीवाची जात (genus) तर दुसरा शब्द त्या सजीवाची प्रजाती दर्शवतो. नावातला पहिला शब्द म्हणजे त्या सजीवाचं नाव असतं तर दुसरा शब्द हे विशेषण असतं. हा दुसरा शब्द त्या सजीवाच्या प्रजातीचं वर्णन करणारा किंवा तो सजीव जिथे आढळतो, तिथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती देणारा असतो. त्याच प्रमाणे स्मीर्नेन्सिस (smyrnensis) हे तुर्की मधील इझमीर शहरासाठी वापरण्यात आलेले विशेषण आहे जे किंगफिशर साठी वापरले गेले. नामकरण करण्याच्या या विशिष्ट पद्धतीमुळे जागतिक स्तरावर सजीवांची ओळख आणि त्यांचा अभ्यास यांच्यात सुसूत्रता आली. सजीवांच्या वर्गीकरणाच्या त्याच्या कामामुळे त्याला १७६१ मध्ये स्वीडनमधील महान नागरिकाचा दर्जा देण्यात आला.

आता पाहू खंड्याविषयी काही माहिती.

खंड्या, धीवर किंवा किलकिल्या (इंग्लिश: व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर) हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. काही आकाराने चिमणीहून लहान तर काही कबुतराहून मोठे असतात. तसेच रंगाने काही काळे-पांढरे, काही आकर्षक निळे-विटकरी, तर काही तेजस्वी जांभळे आसतात.  भारतात आढळणाऱ्या जातींपैकी असणारे त्याच्या शरीराची लांबी सु. १८ सेंमी. असते. तर इतर भागात मोठा किंगफिशर  हा २७-२८ से.मी. पर्यंत आढळतो. डोक्याच्या वरचा भाग निळा व त्यावर आडव्या काळ्या रेषा असतात. पाठ तकतकीत निळी व पंख हिरवट निळे असतात. डोक्याच्या दोन्ही बाजूंवर विटकरी, निळा आणि पांढरा रंग असतो. हनुवटी व गळा पांढरा आणि पोटाकडील भाग विटकरी असतो. चोच लांब, जाड, काळी व टोकदार असते. पाय आखूड व लाल रंगाचे असतात. शेपूट आखूड असते. जलाशयाच्या काठी तसेच पाणथळ भागात हा पक्षी घरटे बांधतो. याचे घरटे नदीकाठी बिळात असते. हे बीळ ०.३-१.२ मी. लांब व आडवे खणलेले बीळ असते. अंड्यांसाठी बिळाच्या आतील टोकाचा भाग मुद्दाम रुंद केलेला असतो. यांचा विणीचा हंगाम हा  मार्चपासून जून-जुलै पर्यंत असतो. मादी एका वेळेला ५-७ अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम नर व मादी दोघेही करतात.साधारणतः १९ ते २० दिवसांनी अंड्यातून पिल्लू बाहेर येते. ही पिल्ले २४ ते २५ दिवस बिळात राहतात. हि पिलले एका वेळेला १०० मासे सुद्धा फस्त करू शकतात. पिल्ले साधारण पालकाबरोबर ३ ते ४ महिने राहतात. हा पक्षी अंदमान आणि निकोबारसह भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात सर्वत्र आढळतो. तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून फिलिपिन्सपर्यंत आढळतो.

लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. मासे हे खंड्याचे आवडते भक्ष्य आहे. त्यामुळे नदी, ओढे, तळी यांच्या काठी तो हमखास दिसतो. मासे पकडण्याची त्याची पद्धत विलक्षण असते. झाडाच्या एखाद्या फांदीवर किंवा झुडपावर बसून तो भक्ष्य टेहळीत असतो. मधूनमधून आपले डोके हलवीत ‘क्लिक्, ‘क्लिक्’ किंवा ‘किल्, ‘किल्’असा आवाज काढतो.

पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. खाली पाण्यात मासा दिसला की, पंख मिटून एखादा दगड जसा वरून पाण्यात पडावा त्याप्रमाणे तो धाड्कन पाण्यात सूर मारतो व मासा चोचीत धरून बाहेर येतो. कित्येक वाईल्ड फोटोग्राफर तर त्याच्या हा पाण्यातला सूर आपल्या फोटो मध्ये खेचण्यासाठी वर्षानुवर्षे आतुर असतात. ऍलन मॅक फेडेन (Alan McFadyen) या स्कॉटिश वाईल्ड फोटोग्राफर ने तर परफेक्ट शॉट मिळण्यासाठी आपली चक्क सहा वर्षे या खंड्याच्या पाठी घालवली.  तब्ब्ल ४२०० तास आणि  ७,२०,००० फोटो काढल्यानंतर त्याला परफेक्ट शॉट मिळण्यात यश आलं. त्या बद्दल त्याचं सर्वत्र कौतुक देखील झालं. ऍलन या नावाने तुम्ही इंटरनेट वर सर्च केल्यास तुम्हाला तो फोटो पाहायला मिळेल. अश्या या वेड लावणाऱ्या खंड्याला पश्चिम बंगालचा राज्य पक्षी म्हणून मान मिळाला आहे.  मात्र महाराष्ट्रातील काही अतिदुर्गम आदिवासी भागात यांची ललकारी अशुभ मानली गेल्याने शिकार देखील होतो आहे. हे मात्र खेद जनक आहे.



  





श्रीधर शनवारे यांनी आपल्या कवितेत खंड्याचे अर्थात धीवर पक्ष्याचे सुंदर वर्णन केले आहे.
          तळ्याकाठी गाती लाटा,
          लाटांमध्ये उभे झाड;
          झाडावर धीवराची,
          हाले चोच लाल, जाड.
शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफा यावा फ़ुली;
पंख —जणू थंडीमध्ये,
बंडी घाली आमसुली.
          जांभळाचे तुझे डोळे,
          तुझी बोटे जास्वंदीची,
          आणि छोटी अखेरची
          पिसे जवस-फुलांची.
गड्या, पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा ?
पाण्यावर उडताना,
नको मारू मात्र मासा !
              — श्रीधर कृष्ण शनवारे



माहिती सौजन्य:- मराठी विश्वकोश आणि आंतरजालावरून साभार.

 

 

 ऍलन मॅक फेडेन ने काढलेला फोटो







टिप :- या लेखाचा काही भाग लोकप्रभाच्या अंकात प्रकाशित झाला आहे.  लिंक खालीलप्रमाणे 

 http://epaper.lokprabha.com/3209290/Lokprabha/03-09-2021#page/42/2