Chinchwad Morya Gosavi Samadhi Mandir

चिंचवडचे मोरया गोसावी

संजीवन समाधी मंदिर



"गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

असे का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते, याची फार कमी लोकांना कदाचित माहिती असेल. चला आज गणेशोत्सवानिमित्त मी तुम्हाला याची गोष्ट सांगतो. गणपती बाप्पासोबत "मोरया" हा शब्द जुळून आला यामागे ६०० वर्ष जुनी कथा आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जातेपुण्यातील चिंचवड येथील मोरया गोसावी हे प्रसिद्ध देवस्थान आहे. हे देवस्थान नेमके कधी अस्तित्वात आले हे स्पष्ट करतील अशी कागदपत्रे उपलब्ध नाहीत. परंतु या पीठाचे मूळ पुरुष हे मोरया गोसावी होते. त्यांनी मार्गशीर्ष वद्य षष्टी शके १४८३ (इ. स. १५६१)ला संजीवन  समाधी घेतली. त्याच समाधीच्या ठिकाणी आजचे प्रसिद्ध मोरया गोसावी गणपती देवस्थान उभे आहे.
सन १३७५ मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे परम भक्त होते. असे म्हणतात कि, मोरया गोसावी हे मूळचे मोरगाव येथे वास्तव्यास होते. त्यांनी थेऊर येथे चिंतामणीची घोर तपश्चर्या केली होती. तेव्हा त्यांना चिंतामणी प्रसन्न झाल्याने अष्ट सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. थेऊरहुन ते पुन्हा मोरगाव येथे आले. त्यांनी गोरगरीबांच्या संकट निवारणाचे कार्य हाती घेतले. पण जनसेवेमुळे ध्यानधारणेला वेळ मिळेनासा झाला म्हणून ते चिंचवडनजीकच्या किवजाई जंगलात आले. ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून साधारण ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात नियमित दर्शनासाठी जात होते. चतुर्थीला मोरयाची पूजा करून पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत असत असा त्यांचा नित्यक्रम चालू होता.
वयाच्या ११७  वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. साधारण शके १४११ (इ. स. १४८९) ची गोष्ट,  नेहमीप्रमाणे ते मोरगावला वारीसाठी गेले असता मयूरेश्वराने मोरयांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला कि, ‘‘मोरया आता तू वृद्ध झालास. वारीला येतानाचे तुझे हाल पाहवत नाही रे. पुढे तू वारीला येऊ नकोस. मी चिंचवडला येतो. उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन.’’
दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले असताना त्यांच्या ओंजळीत शेंदरी रंगाचा तांदळा आला. त्यांनी ती मूर्ती देऊळवाडय़ात आणून प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर यांची समाधीही येथे बांधण्यात आली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते.
मोरया गोसावी हे देवस्थान पवना नदीकाठी आहे. चिंतामणी महाराजांनी श्रीमोरया गोसावींच्या समाधीच्या डोक्यावर येईल अशी जागा पाहून गुहेच्या वर सिद्धीबुद्धीसह गणपतीची मूर्ती स्थापन केली. हेच आजचे मोरया गोसावी गणपती देवस्थान होय. हे मंदिर २७ ऑक्टोबर १६५८ ते १३ जून १६५९ या काळात पूर्ण झाले. या मंदिराचे बांधकाम हे दगडी आहे. मोरया गोसावी यांच्या समाधीच्या समोरच श्रीचिंतामणी महाराजांची समाधी खोल गुंफेत आहे. त्या जागेवरही  एक द्विभुज गणेश मूर्ती आहे. चिंतामणी महाराज म्हणजे मोरया गोसावीचे  सुपुत्र.  मोरया गोसावींनी थेऊर येथे ४२ दिवस अनुष्ठान केले होते.  प्रसन्न होऊन चिंतामणीने त्यांना मुलगा होण्याचे वचन  दिले. जन्मतःच  छातीवर शेंदरी रंगाचा पंजा आणि खेचरी मुद्रा होती. तेच हे चिंतामणी महाराज. 
चिंतामणी महाराजांचीही महती हि देखील फार मोठी. एकदा अतिथी म्हणून तुकाराम महाराज आणि समर्थ समर्थ रामदास स्वामी आले. भोजनासाठी पाचारण केले असताना दोघांनीही आपल्या इष्ट देवतेला आवाहन केले आणि चिंतामणी महाराजांना सांगितले कि, "चिंतामणी देवा मोरयासी आणा".चिंतामणी महाराजांनी देवघरात जाऊन मंगलमूर्तीची आराधना केली. "मोरया माझी लज्जा रक्षी , दास रामाचा वाट पाहे सदना " असे सांगितले.  चमत्कार असा झाला कि, चिंतामणी महाराजांच्या जागी शुंडादंड विराजित मंगलमूर्ती दिसू लागले. ते अद्वैत अवस्थेला पोहोचलेले पाहताच दोघेही नतमस्तक झाले. तुकाराम महाराज म्हणाले, "तुम्ही तर प्रत्यक्ष देवच आहात. " तेव्हापासून  महाराजांचे शाळीग्राम आडनाव मागे पडून त्यांना "देव " हि उपाधी मिळाली आणि पुढील पिढ्यांमध्ये हे आडनाव रूढ झाले.
चिंतामणी महाराजांच्या देवळातून बघितले तर मोरया गोसावींच्या समाधीवरील गणपतीचे दर्शन व्हावे अशी उत्तम रचना केलेली आहे. देवस्थानाशेजारील पवना नदीवर सुबक घाटही आता बांधला आहे. मोरया गोसावी देवस्थानाला छत्रपती महाराजांच्या काळापासून पेशवेकाळापर्यंत अनेक सनदा प्राप्त झाल्या होत्या. मोरया गोसावी यांच्या सात पिढय़ांतील सत्पुरुषांच्या सात समाध्या याच मंदिर परिसरात आपल्याला पाहायला मिळतात. याच परिसरात श्रीकोठेश्वर नावाची जुनी उत्तराभिमुख मूर्ती देखील  आहे. तसेच शेजारी शमीचे झाड व प्रशस्त सभा मंडप बांधला आहे. उत्सवातील सर्व कार्यक्रम देऊळवाडय़ात होतात. देऊळवाडय़ातील मूर्ती वर्षांतून एकदा मोरगावला नेण्याची प्रथा आहे.
गाणपत्य संप्रदायाचा प्रसार मोरया गोसावींनी केला. ते मोरेश्वराचे अवतार  मानले जातात. मोरया गोसावींनी गणेश संप्रदायचा प्रसार केला आणि अखेर चिंचवड या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. गणपतीसोबत मोरया गोसावी यांचे नाव अशाप्रकारे जोडले गेले की,  लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात. अशा या महान गणेश भक्ताच्या चरणी वंदन - जय मोरेश्वर जय गजानन.

॥माझ्या मोरयाचा धर्म जागो।  
याचे चरणी लक्ष लागो।
याची सेवा मज घडो।  
याचे ध्यान हृदयी राहो |
माझ्या मोरोबाचा (मोरयाचा) धर्म जागो॥
-श्री गणेशभक्त योगी मोरया गोसावी