गोवा-टण (सप्तकोटेश्वर मंदिर ते सान्तइंस्तेव्हामचा किल्ला)



गोवा-टण  (सप्तकोटेश्वर मंदिर ते सान्तइंस्तेव्हामचा किल्ला)






गोवा म्हणजे निसर्गाने मानवाला बहाल केलेला सुंदर दागिनाच. वर्षभर पर्यटकांची प्रचंड गर्दी खेचणाऱ्या गोव्याने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. तेथील निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात. गोवा म्हणजे फक्त नयनरम्य समुद्रकिनारे एवढेच नसून येथील ठिकाणांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे.
अशा ठिकाणांपैकी एक आहे सान्तइंस्तेव्हामचा किल्ला जिथे संभाजीराजांनी मांडवी नदीमध्ये घोडे घातले होते आणि पोर्तुगीजांना सळो कि पळो करून सोडले होते आणि दुसरे म्हणजे गोव्यातील नार्वे गावामधील सप्तकोटेश्वर मंदिर. रमणीय आणि शांत परिसर, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शंकराचे  जुने मंदिर. एवढीच याची विशेषतः नाहीतर आपल्या शिवाजीराजांनी बांधलेले हे मंदिर हि त्याची खरी ओळख आहे.
खास यासाठीच गोव्याचा प्लॅन बनवला. फक्त ३ दिवसात गोवा!! काय जाऊन मजा करणार तुम्ही? एक दिवस तर जायला-यायलाच जाणार. ज्यांना माहित झालं होतं त्यांनी खोचक शब्दात मला सुनावलं. गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे, विदेशीपर्यटक, मद्य आणि मजा हे एवढचं समीकरण असतं बहुतेकांच असा सर्वसाधारण समज. पण मुळात माझा जाण्याचा हेतू इतिहासाची आवड म्हणून या दोन स्थळांना  भेट देण्याचा होता.
नवीनच रेल्वे मध्ये दाखल झालेलया तेजस एक्सप्रेसच बुकिंग करून आम्ही सकाळी निघालो. तेजस एक्सप्रेसचा प्रवास म्हणजे एकदम आरामदायी, वातानुकूलित; थोडक्यात फॉरेनमधल्या ट्रेनचा फील.  रेल्वे मधेच आम्हाला rodrigues नावाचा स्वीडनहुन आलेला एक विदेशी पर्यटक भेटला. उंचगोरा, धिप्पाड ४० च्या आसपास असलेला. तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत भारतदर्शनला आला होता. उत्तरेत कुतुबमिनार वगैरे पाहून झाल्यावर आता गोव्याला आरामासाठी निघाला होता. सहज बोलता-बोलता त्याचं भारताविषयी असलेलं प्रेम कळून आलं. इथली लोक, त्याचं राहणीमान, खाद्य संस्कृती याचं त्याला विशेष कौतुक होतं. २० वर्षाचा असताना जेव्हा भारतात आलो होतो तिथपासून आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी बदलेल्या पाहायला मिळाल्या आणि इथे हि इकॉनॉमी वाढलेली असल्याने फिरणं थोडं खर्चिक झालाय असं तो सांगत होता. त्याची बॅग कुठेतरी प्रवासात हरवली तेव्हा ४ दिवस एकाच अंतर्वस्त्रांसह कसा फिरलो तिथं पासून ते सगळ्या छोट्या- छोट्या गोष्टींपर्यंत सर्व अगदी मनमोकळेपणाने सांगत होता. मी हि कुतुहुलाने त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकत होतो. ४० व्या वर्षात हि गर्लफ्रेंडसोबत फिरताना आमच्याकडे लग्न हि गोष्ट बंधनकारक नाहीये. "तुम्ही कसं काय बुवा! आयुष्यभर बंधनात राहता" मला कौतुक वाटतं त्याचं "असं तो सांगत होता. – हीच तर आमची विशेषतः आहे. मी ही त्याला अगदी पुरब और पश्चिम मधल्या मनोजकुमारसारखं छातीठोक पणे भारताचं आणि महाराष्ट्रातल्या खाद्य संस्कृतीचं कौतुक सांगत होतो.
त्याला खरं तर साध्या एक्सप्रेसने प्रवास करायचा होता. ज्यामध्ये उघड्या असणाऱ्या दरवाजे- खिडक्या,त्यातून डोकं बाहेर काढून डोकावणं, मधूनच ओरडत येणारा चहावाला याचा त्याला आनंद घ्यायचा होता. पण तेजस एक्सप्रेसने त्याचा साफ भ्रमनिरास केला कारण जेव्हा बुक केलेली तेव्हा त्याला हे माहित नव्हतं कि भारतात अशी अद्ययावत रेल्वे असेल म्हणून. भारत हळूहळू कसा प्रगत होतोय याचं त्याला कौतुक होतं पण प्रगत झाल्यावर या जुन्या सुद्धा गोष्टी जपून ठेवल्या पाहिजेत हे हि तो सांगत होता. बऱ्याच गप्पा-टप्पा झाल्यावर निघता-निघता त्याची एक आठवण म्हणून त्याच्या सोबत एक झकास सेल्फी घेऊन त्याला निरोप दिला.
स्वच्छ, सुंदर , निळ्याशार पाण्याचे समुद्रकिनारे हि तर गोव्याची विशेषतः मग ते पाहिल्या शिवाय गोव्याचं पर्यटन सार्थकी कसं लागणार. म्हणून एक दिवस पूर्णपणे उत्तर गोव्यामधले कांदोळीपासून ते हरमल (Arambol ) पर्यंतचे सर्व समुद्रकिनारे आम्ही पहिले. त्यात विशेष वाटला तो vagator चा किनारा . छोटाश्या टेकडीवरून खाली उतरून जाणारा रस्ता आणि वरूनच दिसणारी नारळाची झाडे. मोठाले खडक आणि थोडासा चंद्रकोरी सारखा किनाऱ्याचा आकार अगदी फोटोसेशनसाठी उत्तम लोकेशन.



दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही सप्तकोटेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. मुख्य शहराकडून आम्ही नार्वे गावाकडे जाणारा रस्ता पकडला. मुख्य रस्ता सोडल्यावर रस्त्यावरची वाहनांची वर्दळ कमी होत गेली आणि शांत गावामधील रस्ता सुरु झाला.  दुतर्फा असणारी झाडांची गर्दी , मधूनच एखादी नारळी-पोफळीची बाग आणि त्यातून डोकावणारी टुमदार घरे हे लक्षवेधक तर होतंच पण प्रवासाचा आनंदही वाढवत होतं. गोव्यामधील हा सर्व निसर्ग पाहताना नकळत बा.. बोरकरांच्या  "माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्याकपारीमधोनी घाट फुटती दुधाचे " या कवितेच्या ४ ओळी ओठात पुटपुटल्या.



थोड्याच वेळात आम्ही सप्तकोटेश्वर मंदिराजवळ पोहोचलो . त्याच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं आणि प्रवासाचा क्षीण क्षणार्धात दूर झाला.  कोंकण प्रांतातील ६ मोठ्या मंदिरांपैकी हे एक आहे.
काही साधूंनी दिवार बेटावर तपस्या करायला सुरुवात केली होती.  सप्तकोट म्हणजे ७ करोड वर्षानंतर भगवान शिवानी त्यांना दर्शन दिले आणि त्यांनी महादेवाजवळ याच गावात बसण्याचा वर मागितला आणि म्हणून याला नाव पडले सप्तकोटेश्वर अशी याची पुराणकथा आहे.




गोमंतक अर्थात गोवा हे एकेकाळी संपन्न अश्या कदंब राजवटीचा एक भाग होताश्रीसप्तकोटेश्वरलब्धवरप्रसाद" अशी बिरुदावली दिमाखात मिरवणाऱ्या १२ व्या शतकातील कदंबांचे हे तीर्थक्षेत्र.  १२व्या शतकात कदंब राजाने आपली पत्नी कमलादेवी साठी हे मंदिर बांधले अशी नोंद आहे१३५२ मध्ये बहामनी राजवट येऊन कदंबाचे हे राज्य जिंकल्यावर अनेक मंदिरांसोबत हे देखील उद्ध्वस्त झाले होते. १३६७ ला विजयनगरच्या राजाने हे राज्य जिंकल्यावर याचे पुनर्निर्माण केले. १५६० मध्ये पोर्तुगिजानी हल्ला करून उद्धवस्त केले आणि त्या जागी आपले चॅपल बनवले. हिंदू लोकांनी कसे तरी करून शिवलिंग वाचवले आणि त्यानंतर १६६८ मध्ये शिवाजीमहाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला ते आजतागायत व्यवस्थित उभे आहे. याचा इतिहास असा कि ,

गोव्याचा विजरई कोंदी द सांव्हिसेंन्त मृत्यू पावल्यावर राजांनी दुसऱ्यांदा गोव्यावर हल्ला करून पुन्हा गोवा घेण्याचा बेत केला होता त्या वेळेला राजांचा मुक्काम नार्वे गावी होता. त्या वेळेला राजे मोहिमेच्या गडबडीत आपले शिंवलिंग विसरले होते. मोरोपंतांनी चौकशी केल्यावर जवळच एक भग्न अवस्थेत शिवालय आहे असे कळले.  तेथील शिवलिंग पाहून त्यांना फार आनंद झाला पण देवालयावर छप्पर नव्हते. तेथील पुजार्याला विचारल्यावर मुसलमानी आणि पोर्तुगीज आक्रमणात हे कसे उध्वस्त झाले याची कथा राजांना कळली आणि त्यांचे मन विषण्ण झाले" माझा देव इथे भिजतो आहे आणि आम्ही हे पाहतो आहे"  . असे म्हणून त्यांनी मोरोपंतांना मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा सोडली.
मंदिराच्या डाव्या बाजूला हे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधले अशी एका दगडी पाटीवर नोंद केलेली आपल्याला पाहायला मिळते.



थोडावेळ तिथे विश्रांती घेऊन तिथे सध्या पौरोहित्य करणाऱ्या खांडेकर गुरुजी यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आम्ही जुवे बेटावर जाण्यासाठी मार्गस्थ झालो.
तिथून निघाल्यावरती आमचं नेटवर्क गेलं आणि GPS बंद झाला. आता आली पंचाईत! आजूबाजूला विचारावं तर कोणाला त्या किल्ल्याच नाव सांगितल्यावर नक्की सांगता येईना बरं इतिहासाबद्दल सांगावं तर ती ही फारशी कोणाला माहित नाही. शेवटी थोडं पुढे गेल्यावर एक मुलगा बाईकवर बसलेला दिसला . त्याच्याजवळ चौकशी केली. 
"इकडे २ किल्ले आहेत तुम्हाला नक्की कुठला पाहायचा आहे? संभाजी महाराजांनी मांडवी नदीमध्ये घोडे घातलेला तो पाहायचा का?" माझे डोळे एकदम चमकले. बस्स!!. नेमका मुद्दा पकडला त्याने. 
हा तोच !..तोच पाहायचा आहे.
"बरं मग एक काम करा इकडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूने हमरस्ता पकडा आणि सारमानस फेरी लागेल तिने नदी ओलांडून पलीकडे जा."
आम्ही पुढे निघालो परंतु एका रस्त्याला पुन्हा फाटे फुटत होते त्यामुळे नेमका अंदाज येत नव्हता. थोडे पुढे गेल्यावर नेटवर्क मिळालं आणि उरलेलं अंतर फक्त १५ कि.मी. आहे हे कळल्यावर आम्ही सुसाट निघालो आणि थांबलो ते थेट सारमानसची फेरी आली तेव्हा.  


सारमानस फेरीतून दिसणारे मांडवी नदीचे विशाल पात्र
Add caption

समोरच मांडवी नदीचं विशाल पात्र होतं आणि तिथून पलीकडे जाण्यासाठी दर पंधरा मिनिटांनी फेरीची सोय होती. हि सर्व सेवा सरकार विनामूल्य देतं हे तिथल्याच एका माणसाकडे चौकशी केली तेव्हा कळलं.  त्यानेच आम्हाला तिकडून परत न येता तिथूनच पुढे जुन्या गोव्यामधून तुम्ही बाहेर पडा जेणेंकरून तुमचा वेळ खूप वाचेल असा मौलिक सल्ला दिला. ज्यामुळेच आम्हाला वेळेत पोहोचणं शक्य झालं होत.




सान्तइंस्तेव्हाम (St.estevam) हा किल्ला पणजीपासून साधारण २३ कि.मी अंतरावर आहे. यालाच जुवे बेट असे सुद्धा ओळखले जाते. juva, Tolto & vantso हे तीन बेट एका कालव्याने जोडले गेले आणि ते St.estevam बेट म्हणून ओळखले जाते. संत. फ्रॅंसिस झेव्हिअर यांच्या नावावरून या किल्ल्याला हे नाव दिले गेले किंवा याला जुव्याचा किल्ला असेही ओळखतात. इथून नार्वे, दिवार आणि डिचोली (बिचोलिम ) येथील जवळच्या परिसरावर तसेच मांडवी नदीवरच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यास सोपे जाते असल्याने त्या युगात या किल्ल्याला विशेष महत्व होते.
याच्याशी संबंधित एक विशेष घटना ऐकिवात आहे कि, गोव्यावर नितांत प्रेम असणारा एक नावाडी जहाजावर जाण्याच्या आधी नियमितपणे इथे प्रार्थना करीत असे आणि त्याला या किल्ल्यावरून गोव्याचा परिसर पाहायला फार आवडत असे.

सान्तइंस्तेव्हाम किल्ल्यावरून  दिसणारा परिसर 
Add caption


१६ व्या शतकाच्या शेवटला या बेटावर धर्मांतर झाले. संभाजी महाराजांनी हल्ल्या केल्यानंतर या किल्ल्यावर जाळपोळ झाली होती त्यात मूळ चर्च उद्दवस्त झाले होते आताचे सध्याचे दिसणारे चर्च हे १७५९ साला पुन्हा: बांधलेले आहे.
किल्ला तसा छोटा आहे किल्ल्याची असणारी तटबंदी आणि चर्च सोडून फारसे काही पाहण्यासारखे नाही. वरून मांडवी नदी आणि आसपासचा परिसर मात्र फार छान दिसतो. पावसाळ्यात तर नक्कीच याचे सौंदर्य हे खुलून येत असणार. वरून चारही बाजूनी वाहणारी मांडवी नदी पाहून मला इतिहासाची आठवण झाली. शंभूराजांचा पराक्रम डोळ्यासमोर तरळू लागला.
व्हॉईसरॉय कौट दि आल्व्होरच्या ३००० पायदळाचा राजांनी अक्षरशः चुरा केला होता. भरलेली मांडवी नदी हि त्याची साक्ष होती.
२५ नोव्हेंबर १६८३ ला पोर्तुंजगीजानी गोवा जिंकला होता. त्याचा महोत्सव चालू होता. गोव्याच्या ईशान्येला फक्त २ मैलांच्या अंतरावर जुन्या गोव्याच्या उत्तरेस मांडवी नदीला २ फाटे फुटत होते. त्याच्या एका प्रवाहाच्या काठावर जुवे बेटावर पोर्तुगिजांचा सांत इंस्तेव्हाम किल्ला उभा होता. किल्ल्याची तटबंदी उंच आणि त्याचे बांधकामही मजबूत होते. आदल्या रात्रीपासूनच राजांची फौज आजूबाजूच्या झाडीत दबा धरून बसली होती.

रात्री दहा वाजता ओहोटी सुरु झाली मांडवीचे पात्र उघडे पडू लागले आणि शंभूराजांच्या सुसाट वेगाने घोडा फेकत पुढे धावले. पाठोपाठ मराठे नदी पार झाले. ऐन रात्री किल्ल्याला गराडा घातला आणि तटबंदीला शिड्या लावून मावळे वर गेले. खंडो बल्लाळांनी पराक्रमाची शर्थ केली आणि अर्ध्या तासातच किल्ला ताब्यात घेतला.
शंभू राजांच्या नेतृत्वाखालील मराठे 'हरहरमहादेव' च्या रण गर्जना करीत मागून येऊन फिरंग्यावर आदळले. त्याचा आवेश इतका जबरदस्त होता कि, त्याची सरळ अंगावर धावून येणारी घोडी पाहून फिरंग्यांनी धूम ठोकली आणि मांडवीच्या पात्रात पटापट उड्या घेऊ लागले. व्हॉईसरॉयचा पाठलाग करताना मांडवी नदीची भरती सुरु झाली होती.  आपल्या वस्त्रांची पर्वा न करता फिरंगी नदी ओलांडायचा आणि जीव वाचवायचा प्रयत्न करत होते.

व्हॉईसरॉयचे नशीब थोर म्हणून त्याला बसायला एक मचवा मिळाला आणि तो पात्र ओलांडून पुढे गेला. शत्रू हातातून निसटून चला आहे हे पाहून शंभूराजे चवताळले, वीरश्रीच्या भावनेने त्यांनी आपला घोडा भरल्या नदीत सोडला. पण पाण्याच्या लोंढ्याने घोड्याच्या नाकपुड्यात पाणी गेले आणि घोडा एका बाजूला कलंडला आणि राजेही खाली घसरले; पाण्यात बुडाले दुर्दैवाने त्यांचा एक पाय घोड्याच्या रिकिबी मध्ये अडकला .गर्दीतून खंडोबल्लाळने दृश्य पहिले. ते पाहताच खंडोजीच्या धमन्यांतून वाहणारे स्वामीभक्तांचे रक्त उसळले "राजे..राजे" असे किंचाळत त्याने पाखऱ्या नावाचा आपला घोडा ही पाण्यात फेकला. खंडोजीने पाण्यात उडी घेतली .राजे पट्टीचे पोहणारे होते पण पाय रिकिबीत अडकल्याने साराच नाईलाज होता. शंभूराजांनी सांगताच खंडोने रिकीब तोडली आणि पुढे झेप घेऊन दमछाक झालेल्या राजांना आपल्या बगलेचाच आधार देऊन वाचवले आणि राजांना जीवदान मिळाले तीच हि ऐतिहासिक जागा.
गोव्यावरच्या या जोरदार हल्ल्याने व्हॉईसरॉयने इतकी दहशत खाल्ली होती कि त्याने आपली राजधानी पणजीहुन मार्मा गोव्याला (आताचे मुरगाव) हलवायचा निर्णय घेतला होता.
अशी हि ऐतिहासिक जागा पाहण्याची इच्छा आज पूर्ण झाली होती. समाधानाने खाली उतरलो.
परतीच्या प्रवासासाठी आम्ही जुन्या गोव्याचा रस्ता पकडला आणि थोड्याच वेळात जुन्या गोव्यात दाखल झालो ते "बॉमगेसू चर्च" पाहण्यासाठी. "बॉमगेसूचर्च" (Basilica of Bom Jesus) हा जुन्या गोव्यातील सेंट फ्रान्सिसझेविअर यांचा असलेला प्रसिद्ध आणि ऐतिहासिक चर्च; ज्याला पाहण्यासाठी अनेक देश विदेशातील पर्यटक गोव्याला आल्यावर हमखास भेट देतात.हा तोच चर्च जिथे "व्हॉईसरॉय कौंट दि आल्व्होर गोव्यावर आलेले संभाजीराजांचे संकट दूर व्हावे म्हणून घाबरून सतत २२ दिवस सेंटझेविअरची करुणा भाकत होता.










चर्च आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहून आम्ही तिथून निघालो. 
मी आणि सचिन आम्ही दोघांनीही फक्त एका लिंबू पाण्यावर राहून दिवसभराचा हा साधारण १२० कि.मी. चा प्रवास पूर्ण केला होता. झपाटल्यासारखे या स्थळाला भेट देण्यासाठी आसुसले होतो. 
झपाटल्यासारखे या स्थळाला भेट देण्यासाठी आसुसले होतो. त्याचं सार्थक झालं होतं. याजसाठी केला होता अट्टहास !
रात्री निघताना तिथल्या गोवन करीचा आस्वाद घेऊन आम्ही गोव्याचा निरोप घेतला आणि एका सुंदर प्रवासाचा शेवट झाला.


इतिहास संदर्भ: "संभाजी " -- विश्वास पाटील



सान्तइंस्तेव्हाम किल्ल्याचे अवशेष:










Note:-  This article has been published in 6th july 2018 lokprabha magazine.
http://epaper.lokprabha.com/1714836/Lokprabha/06-07-2018#page/64