शिवतीर्थ शिवनेरी






स्वराज्याची पहाट शिवनेरी, एका युगपुरुषाचा उदय म्हणजे शिवनेरी, एक सूर्याचा जन्म झाला ते ठिकाण म्हणजे शिवनेरी.
   अशा या पवित्र ठिकाणी भेट द्यायला मात्र २१  वर्षाची प्रतीक्षा करावी लागली. थी ला असताना इतिहासाच्या पुस्तकात राजांचा जन्म शिवनेरीवर झाला हे वाचले होतं आणि तिथं पासून ते आजगायत तिथे भेट द्यायची हि आस मनात बाळगून होतो.
महाराष्ट्रात साडेचारशे दुर्ग! पण पहाट पाहण्याचे भाग्य मात्र फक्त शिवनेरीच्याच भाळी आले.
शिवाय महाराजांच्या हयातीत त्यांना हा किल्ला जिंकता नव्हता त्यामुळे तो कसा  आहे हे ही पाहण्याचीही उत्सुकता होतीच. परंतु दर वेळेला काही ना काही अडचण असे करता करता कधी एवढी वर्ष जातील याची कल्पनाच केली नव्हती. या वेळेला मात्र चंग बांधला; कोणी येवो किंवा येवो आपण मात्र जायचेच. मग  हेमंत ला विचारलं; येतो का ?  हेमंत  तर पक्का ट्रेकर त्याच्यासाठी हे सगळं नेहमीचंच. तशी आमची ओळख काही वर्षाचीच  पण दोघांची विचारसरणी जुळल्याने तोही लगेच तयार झाला. हो नाही करताना कल्याण वरून सकाळची  . ३० ची S.T.  पकडायचे ठरलं.  मी वेळेचा पक्का असल्याने आधीच कल्याण स्थानकात हजर पण हेमंत थोडा उशिरा आला आणि ची नगरला जाणारी गाडी पकडून वाहकाच्या सांगण्यानुसार "बनकर " फाट्याचे तिकिट काढलं आणि आमचा प्रवास सुरू झाला.
   कल्याण, मुरबाड पार करत गाडी वेग धरत होती. मोरशी गावाच्या अलीकडेच "सातवाहन कालीन (. . पूर्व. २५०) नाणेघाट व्यापारी मार्ग " या नावाच्या दगडी फलकाने माझे लक्ष वेधून घेतले. जसे काही तो मला त्याच्याकडे येण्यासाठी खुणावत होता.  म्हणावं तसं पावसाला काही जोर नव्हता; अधून-मधून त्याची रिमझिम चालूच होती पण तेवढ्याने ही सभोवतालचा निसर्ग हा मनाला प्रफुल्लित करत होता.





पहिल्यांदाच या मार्गाने प्रवास करत होतो त्यामुळे मलाही त्याचा आनंद वाटत होता.  जसंजसा  माळशेज घाट जवळ येऊ लागला तसंतसा हवेतला गारवा वाढत होता. माळशेज घाटातील अप्रतिम सौंदर्य मनाला फार मोहवून टाकत होतं. पावसाळ्यातील सह्याद्रीच्या घाटातील हे रूप फारच अप्रतिम; अगदी मनाला मोहवणारं. मग तो माळशेज असो, पसरणीचा असो किवां ताम्हाणी घाट असो. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं.  निसर्ग तर इथे मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळणंच करत असतो असे म्हणणे वावगं ठरणार नाही. हेमंत फोटो काढण्यात मग्न होता, मी मात्र हे सगळं नजरेत साठवण्याचा प्रयत्न करत होतो. माळशेज घाट पार करत असताना वाटेत बोगद्याच्या आधी "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड" अशी दुसरी दगडी पाटी दिसली. तशी शिवनेरी दर्शनाची ओढ आणखीन वाढली. ह्याला पाहिल्यावर आपल्याला प्रतापगडला जात असताना अशीच एक पाटी लागते तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
   माळशेज पार केल्यावर पावसाचा बाहेर ओसरला होता, फक्त कुठेतरी बॉडी स्प्रे मारावा तसा वरूणराजा वरून शिडकावा करत होता.  बनकर फाट्यावर उतरल्यावर लगेच ओतूर वरून जुन्नरला जाणारी दुसरी बस पकडली. तिथल्या महिला वाहकाने आम्ही शिवनेरीला चाललोय हे ऐकताच आपुलकीने चौकशी केली आणि आजूबाजूची सर्व माहिती सांगितली. अशी अनोळखी माणसे जेव्हा आपल्याशी आपुलकीने बोलतात तेव्हा किती बरं वाटतं नाही का?  जुन्नर ला उतरून फार वेळ गेला नसेल तोच  शिवनेरीला जाणारी आणखी एक बस पकडली आणि पायथ्याशी उतरलो. समोरच दत्त महाराजांचे सुंदर मंदिर आहे अर्थात दर्शन घेता पुढे जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. पावसात भिजावे लागणार म्हणून आमचा हेमंत तसाच आलेला पण पाऊस नसल्याने बिचाऱ्याचा हिरमोड झाला होता म्हणून तो काही आत आला नाही.  मंदिरासमोरूनच एक डांबरी रस्ता वर शिवनेरी कडे जातो. तिथून आम्ही चालायला सुरुवात केली. पाऊस नसला तरी मळभ असल्याने गार हवा छान लागत होती. 
पायथ्याशी आल्यावर गडावर चढत असताना प्रथम पायरीला नमस्कार करायचा हा शिरस्ता इथेही पाळून आम्ही चढायची सुरुवात केली. समोरच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडून  केलेल्या कामाची पावती म्हणून पूर्वीचा आणि आत्ताचा शिवनेरी असा फलक लावला आहे. त्यावरून आपल्याला गडावर बऱ्यापैकी चांगले काम झाले असावे याचा अंदाज येतो आणि हे तेथील असणाऱ्या पायऱ्यांवरून जाणवतंही होतं.








गडावर जात असताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक आणि सातवा कुलाबकर दरवाजा.  या प्रत्येक ठिकाणी त्याच्या नावाचे फलक लावलेले आहेत. सगळ्यांना काही माहीत असते असे नाही त्या दृष्टीने हे सोयीस्कर ठरते. कुठे ही जाण्याआधी एकाद्या स्थानाविषयी पूर्ण माहिती घ्यायची त्याचा इतिहास काय आहे हे माहीत करून घ्यायचा म्हणजे तिथे गेल्याचा आपल्याला आनंद जास्त मिळतो अशी  माझी सवय असल्याने मी इथे येण्याआधी जुजबी माहिती घेतली होती.  त्यानुसार नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग, या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मीती करण्यात आली होती. आरंभी यादव मग बहामनी राजवट आणि नंतर निजामशाही राजवटी खाली हा किल्ला आलयावर साधारण १५९५ ला मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला होता.

  महाराष्ट्रातील किल्ल्यावर सर्वात मोठय़ा प्रमाणावर आढळणारं द्वारशिल्प म्हणजे शरभ. तो आपल्याला शिवनेरी किल्ल्यावरच्या परवानगी दरवाजावरही दिसतो. त्या दरवाजावरील द्वारशिल्पात शरभाने आपल्या पुढच्या पायात गंडभेरुंड पकडलेला आहे असे दिसते तर, मागच्या दोन्ही पायांत दोन हत्ती पकडलेले आहेत असे दाखवलेले आहेत. पाचवा शिपाई दरवाजा पार केल्यावर उजव्या बाजूने शिवाई मंदिर लागते. जिच्या आशीर्वादाने जिजाऊमातेला पुत्ररत्नाचा लाभ झाला होता आणि त्यावरूनच राजांचे "शिवाजी" असे नामकरण झाले होते तिचे दर्शन तर प्रथम हवंच म्हणून उजव्या बाजूला वळलो. वाटेत जात असतानाच डागडुजीसाठी दगड इतस्ततः पसरलेले दिसत होते. मंदिराच्या डागडुजीचे ही काम चालू होते.  मी पहिल्यांदाच असा किल्ला पहिला की जो एवढा स्वछ आणि डागडुजी करून नीटनेटका ठेवला होता. पुरातत्वविभाग आणि वनविभागाने केलेली कामगिरी खरंच उल्लेखनीय होती. तिथल्याच एका स्थानिक कामगाराला विचारला असता असं कळलं की, २००४ साली सुशीलकुमार शिंदे यांनी काही कोटी या किल्ल्याच्या संवर्धनासाठी मंजूर करून घेतले होते, म्हणून हे एवढे तरी कामं झालेले आहे.  २००४  सालापासून ते आत्तापर्यंत १२ वर्षांत कोट्यवधी रुपये मिळून एवढंसं काम ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असो! निदान जे केलेल आहे तेही थोडके नसे. असेच जर प्रत्येक स्थानिक आमदार-खासदारांनी तिथल्या किल्ल्यासाठी प्रयत्न केले तर प्रत्येकाचं संवर्धन होऊ शकतं ही त्याच्या बोलण्यातली सल मला जाणवली. दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.
   शेवटच्या दरवाजातून पुढे गेल्यावर "अंबारखाना" लागतो. अंबारखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा. एखाद्या किल्ल्याला जेव्हा - महिने वेढा घातला जायचा तेव्हा किल्ल्यावरील लोकांना एवढे महिने पुरेल इतकी रसद कशी साठवली जात असेल हे त्याच्याकडे पाहून आपल्याला अंदाज येतो. आजमितीस त्याची खूप पडझड झाली आहे, कधी ढासळेल सांगता येत नाही.





त्यासमोरील एक वाट आपल्याला शिवकुंजाकडे तर दुसरी एक छोट्या टेकडी कडे जाते. आधी शिवजन्म स्थळाचे दर्शन घेऊया मग शिवकुंज असे ठरवून आम्ही समोर दिसणाऱ्या दुमजली इमारती कडे निघालो जिथे राजांचा जन्म झाला होता. तिथे पोहोचलो.
खाली एका छोट्याश्या खोलीत एक पाळणा ठेवला होता. बहुधा हा तोच शिवजन्माचा पाळणा असावा. काय त्याच भाग्यं!  जणू काही महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखातून अंगाई गायली असेल त्याला झोका देत असताना.  असा विचार माझ्या मनात आला आणि शिवकल्याण राजा मधील ओळी आठवल्या.

                                          "गुणिबाळ असा जागसि का रे वाया निज रे निज शिवराया "

त्या पवित्र स्थळाचे दर्शन झाल्यावर मनास अपार शांतता लाभली होती. २१ वर्षाची इच्छा आज पूर्ण झाली होती. गडावरचा शांत वारा मधून-मधून मनाला सुखावून जात होता. जणू काही तो त्या इतिहासाची साक्षचं देत होता.  थोडावेळ तिथे थांबून मग इमारतीच्या समोरच बदामी टाके आहे तिथे आलो. तिथून जाणारा सरळ रस्ता कडेलोटाकडे घेऊन जातो.  बाजूलाच वनविभागाने सुंदर फुलझाडे लावलेली आहेत, तिथे क्षणभर विश्रांती घेऊन मग आम्ही शिवकुंजाकडे आलो.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती या गडाच्या साक्षीनेच झाली. तेव्हा या घटनेचे स्मारक म्हणून त्या वेळी २७ एप्रिल १९६० रोजी शिवजयंतीचा मुहूर्त साधून गडावर बाल शिवबा आणि राजमाता जिजाबाई यांचे हे एक आगळेवगळे स्मारक उभारण्यात आले. हातात छोटी तलवार घेतलेला बालशिवाजी आणि जिजाऊ माता या मायलेकरांचा  सुंदर पुतळा शिवकुंजामध्ये बसविला आहे.  जणू काही जिजामाता बालशिवाजीला स्वराज्याचे धडे शिकवीत आहेत असा भास मनास झाला आणि  नकळतचं माझ्या ओठाततून एका कीर्तनात ऐकलेल्या पोवाड्याच्या ओळी बाहेर पडल्या.

| निर्धारची जाईन केला अन शिकविला बाळ शिवबाला
| क्षत्रियाचा बाणा शिकविला एक विचार दोघांनी केला जी ss जी ss  जी ss 





थोडा वेळ थांबून तिथून पुढे निघालो, समोरच काही टवाळ मुले शिवजन्म स्थळाच्या बाहेर असणाऱ्या कुंडात पाय टाकून गदागदा पाणी ढवळत नको ती चेष्टा मस्करी करत होती. जिथे एवढी स्वच्छता ठेवलीय तिथे असे करताना काहीच कसे वाटले नाही. आधी शासन काही करत नाही म्हणून नावे ठेवायची आणि केलं की आपणच ते विद्रुप करायचं ही अशी आपली मानसिकता. थोडे वाईट वाटलं . त्यातल्या काहींनी तर अगदी .. ३०० रुपये.. पाय बुडवून बस. बोटिंग करा.. २५० रुपयात घ्या... असा उच्छाद मांडला होता. शेवटी राहवून त्यांना सौम्य भाषेत सांगितलं की, मित्रानो हे काही मजा करायचे ठिकाण नाहीये. मजा करायला भरपूर ठिकाण आहेत. हा आपला मान आहे, स्वाभिमान आहे. त्याचा पावित्र्य आपणच राखले पाहिजे. आपणच जर असे वागलो तर बाहेरून येणाऱ्या लोकांना बोलण्यात काहीच अर्थ नाही. बहुधा त्यांना हे पटलं असावं  कारण त्यातल्या एक जण जाता-जाता थँक यु म्हणून गेला. चला निदान एकाला तरी जाणीव झाली हे ही कमी नाही. मुळात हे कोणाला सांगण्याची गरजच वाटली नाही पाहिजे. मजा-मस्ती करायच्या नादात आपण कुठेतरी आपले भान विसरतो. खरे तर कुठेच नाही पण निदान शिवनेरी आणि रायगडावर तर नकोच नको. असं मला वाटतं. शेवटी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न; स्वतःलाच समजले पाहिजे.
   संपूर्ण गड पाहून झाल्यावर आम्ही उतरायला लागलो. गडावरची स्वच्छता फार भावत होई. त्याबद्धल मी शासनाला पैकीच्या पैकी मार्क्स देऊन मोकळा झालो.  पुन्हा दत्त मंदिराजवळ येऊन बस ची वाट पाहत होतो. पण ती काही लवकर येण्याची चिन्ह दिसत नव्हती. म्हणून तिथल्याच एक बाईक वरून जाणाऱ्या मुलाजवळ चौकशी केली. आम्ही गडावर आलेलो हे कळताच त्याने वाटेतूनच जाणाऱ्या त्याच्या एक मित्राला थांबवले आणि आम्हाला ट्रिपल सीट स्टॅण्डवर सोडायला सांगितले. सुरवातीला थोडा आढे-वेढे घेत होता.  " आरं ये की सोडून. . आपलाच भाव हायं"  असे बोलल्यावर मग तो तयार झाला. या त्याच्या बोलण्याने मात्र त्याने माझं मन जिंकले होतं.  ज्या शिवाजी या एक नावाने लाखो माणसे स्वराज्यासाठी जोडली गेली होती त्याचा हा एक पुरेपूर प्रत्यय. नाही तर कोण रस्त्यात मेला तरी कोण बघतो आजकाल कुणाकडे ? असो.
जाता-जाता शिवनेरी किल्ल्यावर शेवटची नजर टाकली आणि अत्यंत समाधानाने परतीच्या वाटेला लागलो.

कसे जाल:- मुंबईहून कल्याण ला यावे. कल्याण वरून जुन्नरला जाणारी बस पकडावी किंवा बनकर फाट्यावर उतरून मग जुन्नर गाठावे आणि तिथून शिवनेरीला जाणारी दुसरी बस पकडून दत्त मंदिर येथे उतरावे.
पाहण्याची ठिकाणे:- सात दरवाजे, शिवाई मंदिर, पाण्याच्या टाक्या, अंबारखाना, शिवकुंजा, शिवजन्मस्थळ, कडेलोट, काळी चौथरा, ईदगाह.

।। या भूमंडळाचे ठायी धर्म रक्षी ऐसा नाही । महाराष्ट्र धर्म राहिला काहि तुम्हाकारणे  ।।

छायाचित्र सौजन्य: हेमंत कोरगांवकर