सरसेनापती हंबीरराव मोहिते -- प्रविण तरडे

 सरसेनापती हंबीरराव मोहिते




एक काळ असा होता कि मल्टिटॅलेन्टेड असणं म्हणजे काय ते दादा कोंडके आणि सचिन पिळगांवकर यांनी दाखवलं होतं. "कथा -पटकथा - दिग्दर्शक " असं चित्रपटाच्या सुरुवातीला दिसायचं. त्यानंतर तेच बहु कला व्यक्तिमत्व आता प्रविण तरडे यांच्या रूपात दिसत आहे. 

'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट' हा चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा पहिला होता तेव्हाच याची पाहण्याची उत्सुकता होती. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचे  दुरदर्शनवर चित्रपट पाहत मोठी झालेली आमची पिढी.  बराच काळ लोटला पण तसे ऐतिहासिक चित्रपट पुन्हा झाले नाही. आपला गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर कधी बघता येईल कि नाही असं नेहमी वाटायचं. दिगपाल लांजेकरांच्या रूपाने थोड्या फार प्रमाणात त्या अपेक्षा बऱ्याच कालावधीनंतर पुर्ण झाल्या.  संभाजी महाराजांची सिरीयल टीव्हीवर सुरु झाली आणि इतिहास न वाचणाऱ्या जनसामान्यांना "सर सेनापती हंबीरराव मोहिते" यांची ओळख झाली.  त्यांचं स्वराज्यातील असणारं महत्व आणि त्यांच्या शौर्याची गाथा अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रवीण तरडेंनी अगदी जीव ओतून बनवलाय हे पाहिल्यावर लक्षात येतं.

महाराजांच्या खरमरीत पत्रानंतर प्रतापराव गुजर यांनी आवेशात येऊन बेहलोल खानास नेसरीच्या खिंडीत गाठले तिथे संघर्ष झाला आणि त्यात प्रतापराव गुजर यांना वीरमरण आले.  सरसेनापती  म्हणून नियुक्त करताना ती व्यक्ती तशीच पदाला साजेशी असावी असा महाराजांचा विचार होता. महाराजांच्या सैन्यात शे-दीडशे सैनिकांची तुकडी असलेल्या अधिकारी हंसाजी मोहिते यांचा विचार त्यांच्या मनी होता. कऱ्हाडजवळील तळबीड येथील मोहिते घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. सभासदाच्या बखरीत हंबीररावांचे वर्णन असे केले आहे, 'सरनौबतीस माणूस पाहाता हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्ये जुमला होता. बरा शहाणा, मर्दाना, सबुरीचा, चौकस शिपाई मोठा धारकरी पाहूस त्यास हंबीरराव नाव किताबती देऊन सरनौबती सांगितली.' सभासद बखरीनुसार असं म्हटले आहे की त्यांना हंबीरराव ही पदवी देण्यात आली होती, तर जेधे शकावलीत हंबीरराव असा उल्लेख आहे. राज्याभिषेकानंतर त्यांच्याकडे सरनौबत पदाचे अधिकार देण्यात आले आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ते स्वराज्याची निष्ठा राखुन राहिले. केवळ ते शंभू राजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणूनच संभाजी महाराज हे चारही बाजूच्या आघाड्या उत्तम सांभाळू शकले. संभाजी महाराजांचं चरित्र ज्या वेळेला वाचलं होतं तेव्हाच त्यांचं स्वराज्यात किती महत्व होतं हे समजलं होतं.  त्यांच्याबद्दल लिहिणे म्हणजे पाने पुरणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्या नेतृत्वात सरसेनापतीपदाचा बहुमान मिळालेले ते एकमेव सेनापती. महाराजांच्या युद्धनीतीची आणि प्रशासनाची पूर्ण ओळख असलेला, गनिमी काव्यात निष्णात आणि प्रामाणिक असा योद्धा असे गुण त्यांच्यात होते. अश्या  या  शूर सरसेनापतींना मोठ्या पडद्यावर पाहणं म्हणजे माझ्यासाठी एक अवर्णनीय आनंदच होता आणि या आनंदाला कुठेही विरजण लागलं नाही.

ऐतिहासिक चित्रपट काढणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यापेक्षा ते कमी नाही. चित्रपट माध्यमात ते साकारताना कुठेतरी काही छोट्या चुका होऊ शकतात आणि प्रेक्षक तेच नेमकं लक्षात ठेवतात. किंबहुना काडीचा इतिहास माहित नसलेली माणसे हि चित्रपटात जे समोर दाखवले जाते तेच खरा इतिहास आहे असे समजून बसतात. त्यामुळे कुठेही इतिहासाचा चोळामोळा न करता योग्य त्या गोष्टी दाखवणं हे फार मोठं आव्हान असतं. या चित्रपटात मोजक्याच गोष्टी अगदी छान मांडल्या आहेत. VFX वगैरे सुरेख वापरलं आहे. संवाद लेखन सुद्धा उत्तम रित्या झाले आहे.  मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं ते गश्मीर महाजनी यांच्याकडून शिकावं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका ज्या पद्धतीने त्यांनी उत्तम रित्या केली आहे त्याचं खरंच कौतुक. हे खरं तर अनपेक्षितच होतं. सिनेमातला माध्यान्ह हा डोळ्यातून पाणी आणणारा आहे. आपल्या शौर्याचा वारसा पुढे त्यांचीच मुलगी ताराराणी चालवतानाचा सिनेमाचा शेवटही उत्तमरीत्या झाला आहे.

राहून राहून फक्त एकच खंत वाटते ती म्हणजे महाराजांना भरजरी वस्त्र आणखी उत्तम रित्या दाखवली असती तर आणखीन छान वाटलं असतं. छत्रपती असून सुद्धा पेहराव तेवढा उठावशीर मला वाटला नाही आणि फोंड्याची लढाई म्हणून शूटिंग विजयदुर्गचं आहे पण तसं जाणकाराशिवाय इतरांना कळणार नाही.  बाकी काही कमीपणा असला तरी मी काढणार नाही.  कारण मुळातच ऐतिहासिक चित्रपट काढणे हि खायची गोष्ट नाही. मराठी चित्रपटाचं बजेट नेहमी कमी अशीच आरडाओरड असते.  तसं नसतं  तरआपले सिनेमे हे साऊथ पेक्षा भव्यदिव्य बनले असते. त्यामुळे आपला गौरवशाली इतिहास हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत असेल आणि जर केलेला प्रयत्न हा खरंच प्रामाणिक आणि जीव ओतून केला असेल तर त्याचं नुसतं कौतुकच नाही तर त्याला चित्रपट गृहात पाहून साथ दिली पाहिजे. आपल्या माणसाचं कौतुक आपण करणार नाही तर कोण करणार ?

शेवटचं एकच! तो म्हणजे या चित्रपटातला अंगावर काटा आणणारा मला सर्वात जास्त आवडलेला संवाद आणि तो ज्या पद्धतीने दाखवलंय ते ऑसमच !

"परकीय आक्रमणांच्या काळरात्री या येतंच राहतील आणि अशा या काळरात्रींना मधोमध चिरायलाच आपण केशरी रंग बनून जन्माला यायचं.."

जय भवानी ! जय शिवाजी !


--- ©मयुर सानप 

No comments: