ठिपकेवाली मनोली (मुनिया) (Scaly-breasted munia)

 

ठिपकेवाली मनोली (मुनिया) (Scaly-breasted munia)



टाळेबंदी आणि पक्षी निरीक्षण हे आता चांगलंच समीकरण जुळून आलं आहे. खंड्या, धोबी, शिंपी हे पक्षी पाहिल्यावर आणखीन एक नवीन प्रजाती मला दिसली. अर्थात ! माझ्यासाठी नवीन. खरं तर ! आपल्या धावत्या युगात आपल्यालाच कुठे वेळ होता आपल्या आजूबाजूला पहायला. कोरोनाकाळात याची चांगलीच जाणीव आपल्या सर्वांना झाली . धावत्या आयुष्याला ब्रेक लागला आणि थोडा निवांत वेळ सुद्धा मिळाला. असंच एकदा काम करत असताना "चीक ss चीक ss "  असा बारीकसा आवाज झाला. सकाळची वेळ तशी शांतच होती. मी खिडकीकडे पाहिलं तर एक चॉकलेटी रंगाचा चिमणीएवढा पक्षी खिडकीच्या बाहेर असलेल्या दोरीवर बसला होता. “हाच ओरडत होता का ? “ मी मनातल्या मनात बोललो. हालचाल केली तर उडून जाईल म्हणून थोडा वेळ तसाच खुर्चीत बसून निरीक्षण करत राहिलो. पुन्हा आवाज आला. चोच हलताना दिसली आणि शिक्का मोर्तब झालं. हा याचाच आवाज आहे. किती बारीक आवाज आहे. कोलाहलात तर ऐकूही येणार नाही. मग माझं कुतूहल जागं झालं आणि लगबग झाली ती त्याला कॅमेऱ्यात पकडायची. मी खुर्चीतुन उठतो नाही तर लगेच तो उडून सुद्धा गेला. अरेरे ! आता हा पुन्हा दिसेल का आपल्याला?  मी थोडा खट्टू झालो. दिवसभरात परत काही तो फिरकला नाही. कुठला असेल हा पक्षी ? माझं तोकडं ज्ञान मलाच विचारत होतं. एखाद फोटो मिळाला कि आपल्याला शोधता येईल असा विचार करून मी तो परत येण्याची वाट पाहत होतो.

माझ्या अपेक्षेप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आला. त्याच जागेवर बसून तो निरीक्षण करत होता. मीही थोडावेळ स्तब्ध होऊन तो काय करतोय ते पाहत होतो. पाठीवर पूर्ण तपकिरी रंग आणि खाली पोटावर पांढरे ठिपके हे आकर्षक दिसत होते. बारीकशी काळसर चोच आणि छोटेशे परंतु भेदक डोळे हे त्याचं सौंदर्य खुलवणारे होते. थोडा वेळ थांबून तो पुन्हा निघून गेला. तो यायचा. थोडा वेळ दोरीवर बसायचा आणि निघून जायचा. सलग २-४ दिवस हाच नित्यक्रम चालू होता. आता मी कॅमेरा घेऊन सज्ज झालो होतो.

"चीक ss चीक ss " आवाज झाला. मी ओळखलं होतं कि तो आला आहे. मी हळूच खिडकीजवळ जाऊन पाहिलं. अरेच्चा ! हे काय पाहतोय मी. या वेळेला तो चोचीत एक बांबूचे पाते घेऊन आला होता आणि त्याच्या सोबतीला त्याची जोडीदार सुद्धा आली होती. मी कॅमेऱ्यात त्यांचा जमेल तसा पटकन फोटो काढला. ते दोघेही भुर्रकन उडाले आणि पलीकडच्या खिडकीजवळ जाऊन बसले. फोटो मिळाल्यावर मी त्याची माहिती मिळवली. माझ्या ज्ञानात आणखीन भर पडली. हा सुंदर दिसणारा पक्षी होता. "ठिपकेवाली मनोली" इंग्रजी मध्ये याला स्केली ब्रेस्टेड मुनिया तर हिंदी मध्ये मुनिया असे म्हणतात. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पक्षीकोश मध्ये यांच्यासाठी मराठी शब्द मनोली आहे.चिमणी या पक्ष्याच्या जातीत मोडणारा मुनिया हा पक्षी कुणाही पक्षीप्रेमीला भुरळ पाडेल असाच आहे. आत्ता मला समजलं होतं कि काही दिवसांपूर्वी असाच काळा  पांढरा  चिमणीएवढा पक्षी मी पहिला होता. ती सुद्धा मनोलीचीच एक प्रजाती होती.

मुनिया पक्ष्यांच्या आकर्षक रूपामुळे जगभरात हे पक्षी मोठय़ा प्रमाणात पाळले जातात. त्यांना जर पाळायचे असेल तर बाजरी खायला घालावी लागते. एका आठवड्याला ते ४-५ किलो बाजरी आरामात फस्त करू शकतात. वेगवेगळ्या रंगात हे पक्षी आढळत असल्याने प्रत्येक ठिकाणी या पक्ष्यांचे वेगळे रूप पाहायला मिळते. आता पाहूया त्याची काही मला मिळालेली माहिती.

 

नाव: ठिपकेवाली मनोली  (इंग्लिश:Scaly-breasted munia; हिंदी:मुनिया).

शास्त्रीय नाव: (Lonchura punctulata)

Kingdom:             Animalia

Phylum:               Chordata

Class:                     Aves

Order:                   Passeriformes

Family:                  Estrildidae

Genus:                 Lonchura

Species:                L. punctulata

Weight:                14 g

Nesting Season: July - October


 

कार्ल लिनिअस यांनी १७५८ मध्ये लोंचुरा वंशाच्या प्रजाती आणि तिचे औपचारिक वर्णन यांचं द्विपाद नाव दिलं. कार्ल लिनिअस हे एक स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ, वर्गीकरणशास्त्रज्ञ होते . ज्यांनी द्विपदी जीवांचे नामकरण करण्याची आधुनिक प्रणाली शोधली . त्यांना "आधुनिक वर्गीकरणाचे जनक" म्हणून ओळखले जाते. मनोलीच्या प्रजातींमध्ये त्याच्या श्रेणीमध्ये ११ उपप्रजाती आहेत, ज्या आकार आणि रंगात किंचित भिन्न आहेत. हा साधारण १० से.मी. आकाराचा पक्षी आहे. ठिपकेदार मुनियाची मादी आणि वीणीच्या हंगामात नसणारा नर दिसायला सारखेच दिसतात. फक्त विणीच्या हंगामी काळात वयस्क नर गडद तपकिरी रंगाचा होतो. यावर असलेले काळे-पांढरे ठिपके हिच याची महत्त्वाची ओळख आहे. जुलै ते ऑक्टोबर हा ठिपकेदार मनोलीच्या विणीचा काळ असून त्यासाठी तो गवतात किंवा झुडपात आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी शुभ्र पांढऱ्या रंगाची ४ ते ८ अंडी देते. नर-मादी मिळून अंडी उबविणे, पिलांची देखभाल करणे, पिलांना खाऊ घालणे, घरट्याची साफसफाई करणे आदी सर्व कामे करतात. शेतातील दाणे, धान्य, छोटे किडे यावर हे आपली उपजीविका करतात.

मनोलीचे (मुनियाचे ) घुमटाकार घरटे


हे पक्षी कळपांमध्ये सुद्धा राहतात. मऊ कॉल आणि शिट्ट्यांसह संवाद साधतात. ही प्रजाती अत्यंत सामाजिक आहे आणि काहीवेळा मुनियाच्या इतर प्रजातींसोबत वास करू शकते. ही प्रजाती मुख्यत्वे आशिया मध्ये , उष्णकटिबंधीय मैदाने आणि गवताळ प्रदेशात आढळते. प्रजनन जोड्या गवत किंवा बांबूच्या पानांचा वापर करून घुमटाच्या आकाराचे घरटे बांधतात. कमी जास्त प्रमाणात शिटीचा आवाज काढून ते एकमेकांशी संवाद साधतात. तसेच त्यांच्या शेपटीची हालचाल  काही संकेत देणारी असते. अभ्यासाअंती असे लक्षात आले आहे कि, नराचे गाणे अतिशय हळुवार पण गुंतागुंतीचे आहे, ते फक्त जवळून ऐकू येते आणि जिंगल मधील तीव्र नोट असणाऱ्या स्वरासारखे भासते. आणि हे मला बऱ्याच दिवसांच्या निरीक्षणानंतर कळून आले जेव्हा तो सतत चोचीमध्ये एकेक बांबूची पाने किंवा गवताची पाती आणायचा. थोडावेळ दोरीवर बसायचा आणि काहीतरी बारीक आवाजात गात राहायचा. (त्याच्या शिटी मारणाऱ्या विशिष्ट आवाजावरून ) मग पुन्हा खिडकीत जाऊन गोळा केलेलं ठेवायचा नि भुर्रकन उडून जायचा. मी नंतर खिडकीजवळ जाऊन पाहिलं. माझ्या लक्षात आलं कि पठ्ठया !आपलं घरटं बांधण्याच्या कामी लागला होता. मादी तिथे बसली होती आणि त्याने आणलेल्या एकेक गवताच्या, काड्यांचा वापर करून घरटं बांधत होती. आत्ता माझ्या लक्षात आलं कि सुरुवातीचे काही दिवस हा खिडकीबाहेर दोरीवर बसून काय पाहायचा. बहुतेक घरटं बांधण्यासाठी तो जागेची रेकी करत असावा. माझं आता रोजचं निरीक्षण चालू होतं . ४-५ दिवसातच त्यांचं जवळपास घरटं पूर्ण झालं होतं. पण बहुतेक पुढचा त्या दोघांचा सहवास माझ्या नशिबी नव्हता. त्याला कारणच असं झालं कि, मनोलीने घरटं बांधायला सुरुवात केल्यावर कावळा टपून बसलेला असायचा आणि त्याच्या भीतीने ते दूर उडून जायचे. पुन्हा घरटं बांधायला सुरुवात करायचे. निसर्गाने त्यांना कसं उपजतच ज्ञान दिलं आहे स्वतःच्या सुरक्षेचं. ते समजले आणि चालू असलेल्या घरट्याचं काम अर्धवट टाकून निघून गेले. महिने दोन महिने होऊन गेले ते परत आलेच नाहीत. नक्कीच त्यांना दुसरीकडे चांगली सुरक्षित जागा मिळाली असणार.  पुन्हा कधी ते खिडकीजवळ फिरकलेच नाहीत. त्यांच्या घरटं बांधण्याच्या वेळेला त्याची ती चोचीत गवताचं पातं घेऊन यायची लगबग, दोरीवर बसून त्याचं बारीक आवाजातील गाणं, मादीचं खिडकीत बसून घरट्याला आकार देणं हे सगळं मी पाहत होतो, अनुभवत होतो. त्याचा आनंद घेत होतो  आणि नकळत गाणं सुद्धा गुणगुणत होतो. "चलत मुसाफिर मोह लिया रे, पिंजरे वाली मुनिया."


घरटे बांधत असलेली मादी 


माहिती सौजन्य:- पुस्तके आणि आंतरजालावरून साभार.


No comments: