टॉप गन : मॅव्हरिक (Top Gun: Maverick)

 

टॉप गन : मॅव्हरिक (Top Gun: Maverick)







सिनेमा हा अंतर्मनातील एक असा कप्पा असतो कि जो आपल्या कितीतरी न पुर्ण झालेल्या इच्छांचं एक प्रतिबिंब दर्शवतो. कित्येक आपल्या इच्छा  क्षण आपण सिनेमाच्या रूपात पुर्ण करत असतो आणि सिनेमा पाहताना तो क्षण जगत असतो. आणि त्यात जर सिनेमा आपल्या आवडत्या कलाकाराचा असेल तर मग "क्या कहने !".

लहान असताना  प्रत्येकाची काहि ना काही स्वप्नं असतात. माझं हि एक होतं. माझी पायलट व्हायची खूप इच्छा होती. आपणही एअर फोर्स मध्ये जाऊन विमानं उडवावी आणि देश सेवा करावी असं खूप वाटायचं. पण ते स्वप्नं  कागदी विमानं उडवण्यापुरताचं राहिलं. आणि ते स्वप्नं नंतर जगू लागलो ते सिनेमाच्या माध्यमातून.

 हॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता टॉम क्रुज. मलाही तो खूप आवडतो. (आवडायचं एक वेगळं कारण म्हणजे नकळत माझी हेअर स्टाईल एकदा त्याच्या सारखी झाली होती आणि ऑफिसमध्ये एकाने मला "अरे! ये टॉम क्रूज जैसा हेअर स्टाईल क्यू रखा है ?" अशी कॉम्प्लिमेंट देऊन टाकली होती. आता मी त्याच्यासारखा दूर-दूरवर कुठे दिसत नाही हा भाग निराळा.)  त्याच्या मिशन इम्पॉसिबलचा  तर इतरांप्रमाणे मीही फॅन आहे. त्याचा टॉप गन मॅव्हरिक या सिनेमाचा ट्रेलर जेव्हा पाहिला तेव्हा हा चित्रपट विमान युद्ध नौका वर संबंधित आहे हे लगेच कळून आलं होतं. नंतर सर्च केल्यावर समजलं कि हा सिनेमा १९८६ साली प्रदर्शित झालेल्या टॉप गनचा पुढील भाग आहे. त्यामुळे आधी मी हा चित्रपट पाहिला. हॉलिवूड चित्रपटांची एक आवडणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक भागात त्याच्या मागच्या - पुढच्या भागाचा रेफेरेंस दिलेला असतो. उत्तम पद्धतीने गोष्टी एकमेकांत गुंफलेल्या असतात. त्यामुळे ते पाहताना एक वेगळीच मजा आणि उत्सुकता असते. हा चित्रपट पाहताना देखील ते आपल्याला जाणवतं. जुनी टॉप गनची ट्यून सतत मागे ऐकू येत राहते. टॉम क्रूज प्रेमींसाठी तो नॉस्टॅल्जिया ठरतो.

'टॉप गन मॅव्हरिक' सिनेमात टॉम क्रूझ प्रमुख  भूमिकेत आहे. तर जेनिफर कॉनेली, जॉन हॅम, ग्लेन पॉवेल, लुईस पुलमन, डॅनी रामिरेझ, मोनिका बार्बरो, एड हॅरिस आणि व्हॅल किल्मर हे कलाकार या सिनेमात आहेत. सिनेमाचं मुख्य कथानक असं आहे कि,

पिट मिशेल हा एक निष्णात एका वैमानिक आहे. अमेरिकेतील नेव्ही पायलटना हवाई हल्ल्यासाठी ट्रेनिंग देण्यात निष्णात असलेली "टॉप गन"  हि एक संस्था आणि तिथे लेफ्टनंट पिट मॅव्हरीक मिशेल जवळपास तीस वर्षे कॅप्टन पदावर कार्यरत असतो.पूर्वायुष्यात मॅव्हरीकने गुज नावाच्या ज्या पायलट मित्राबरोबर उड्डाण केलं होतं तो एका विमान अपघातात त्याला गमावतो (पहिल्या भागातील हा सिन दुसऱ्या भागात त्याला आठवताना चांगला रेफेरेंस घेतला आहे ). अप्रत्यक्षणपणे आपणचं त्याला कुठेतरी जबाबदार आहोत हि भावना त्याच्या मनात सतत घर करून राहते. आणि एक वेळ अशी येते कि त्याच मित्राचा मुलगा हा टॉप गन मध्ये येतो आणि त्याला ट्रेनींग द्यायची जबाबदारी याच्यावर येते ते सुद्धा एका अवघड मिशनवर पाठवण्यासाठी.

हे मिशन खूप अवघड आहे. पर्वतांच्या मध्ये असणाऱ्या युरेनियमच्या सेंटरला नष्ट करून परत यायचं असतं. खूप सारे वळणं आणि वेळ फक्त्त २.५ मिनिट. त्यात देखील विमानविरोधी क्षेपणास्त्रे चुकवून जायचं. आणि हे सर्व शक्य आहे हे तो स्वतः करून दाखवतो. यात ऍक्शन सीन्स तर जबरदस्तच आहेत. पण मानवी भाव-भावनांमुळे निर्णय घेताना होणारा गोंधळ देखील उत्तम चित्रीत झाला आहे. " डोन्ट थिंक जस्ट डू इट " हा डायलॉग आणि त्यानंतर येणार ऍक्शन सीन्स तर मला सॉलिडच वाटला. मिशन साठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी मॅव्हरिक आपल्या टीमला तयार करतो पण ऐनवेळी त्याला लीड करावं लागतं. ते सुद्धा त्याच्या मित्राच्या मुलाबरोबर. 

F16 सारख्या विमानाच्या हवेतील कसरती ज्या पद्धतीने दृश्य केल्या आहेत त्यासाठी तरी हा सिनेमा आवर्जून पहावा. यात उगाच ऍक्शन सीन्सचा भडीमार नाही. सर्व काही कथेला अनुसरूनचं . या सिनेमातील संगीत सुद्धा मस्तच आहे. "I ain't worried" या गाण्यातील सुरुवातीला वाजणारी शिटी तर एकदम कॅची आहे. त्यामुळे या गाण्याने समुद्रकिनाऱ्यावरील सिनला आयकॉनिक बनवलं आहे. टॉम क्रूज हा वयाच्या साठाव्या वर्षी देखील काय दिसतो यार ! कमाल आहे ! आता त्याला डीएजिंग केलाय कि तो रियल मध्ये तसाच आहे हे त्यांनाच माहित. पण त्याच्या चाहत्यांसाठी त्याचा प्रत्येक  सिनेमा पर्वणीच आहे आणि आता वेध लागेलत  पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या "मिशन इम्पॉसिबल ७" चे.

जाता - जाता एवढंच सांगतो, "Best movie! I have seen in a few years." सिनेमाच्या प्रमोशन मध्ये जे म्हटलं होतं, "Restores your faith in the magic of movies" ते मी तंतोतंत हा सिनेमा पाहताना अनुभवलं.

असंही टॉप गन मॅव्हरिक एकदा पाहून मन नाही भरत.

 

                                                                                                                --- © मयुर सानप 2022

 


No comments: