पृथ्वीवर माणूस उपराच

माणसाला सर्वात मोठी लाभलेली देणगी म्हणजे बुद्धी. जी त्याला पृथ्वीवरील इतर पाणीमात्रांपासून वेगळं बनवते. याच बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने सृष्टीतील अनेक गुपिते, रहस्य शोधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. परंतु आजही काही गुपितं हि उलगडली नाहीत. त्यातीलच एक म्हणजे मानवाच्या उत्पत्तीचं. निसर्गाच्या गुपितांच्या शोधांबरोबरच मानवाला स्वत:च्या उत्पत्ती बाबतही अनेक प्रश्न पडलेले आहेत.

' एरिक व्होन डॅनिकेन' यांचे परग्रहवासी संकल्पनेवर आधारित एक सुप्रसिद्ध पुस्तक आहे 'Chariots of Gods'. यातील काही भाग घेऊन त्याचे मराठी रूपांतर 'पृथ्वीवर माणूस उपराच' या नावाने 'श्री. सुरेशचंद्र नाडकर्णी' यांनी केले आहे. अतिशय उत्तम आणि जरा नेहमीपेक्षा वेगळ्या विषयाला हात घालणारे विज्ञानवादी पुस्तक आहे. पुस्तक तसे जुनेच आहे परंतु रोमांचकारी माहिती देणारे व अनेक प्रश्न आपल्या समोर उभे करणारे एका वेगळ्या संशोधनाची माहिती देणारे असे हे उत्कंठावर्धक पुस्तक आहे.  आज आपण ज्यांना देव मानतो ते प्रत्यक्षात अतिप्राचीन काळी एखाद्या प्रगत परग्रहावरून पृथ्वीवर आलेले एलियन्सच होते. त्यांनी पृथ्वीवरील आदिमानवाला विज्ञान आणि गणित विषयांवरील ज्ञान दिले आणि आजचा प्रगत मानव हळूहळू निर्माण झाला.  फक्त एवढंच वाक्य वाचून कोणालाही हे जरा पचायला जडंच जाईल. त्यासाठी या पुस्तकातील एरिक व्होन डॅनिकेन यांनी आपलं आयुष्य ज्या संशोधनावर घालवलं त्याचा उत्तम भाग आणि उपस्थित झालेले प्रश्न यात आपल्याला वाचायला मिळतात. त्यासाठी लेखकाने संपूर्ण जगाच्या विविध धर्म व मान्यता मधील ग्रंथ गुहा चित्रे, प्राचीन वास्तू (उदा. पिरॅमिड्स, माचू पिचू, नाझका लाईन्स इ.) चे संदर्भ दिले आहेत. तसेच सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या असल्याचे ते दाखले देतात. ( उदा. मनू राजा आणि प्रलय व बायबल मधील Noha's arch ही कथा अगदी सारखे आहेत.) 

यातील खालील गोष्टी या खरंच आपल्याला विचार करायला भाग पडतात. 

१.  पुस्तकाच्या सुरुवातीलाच दिले आहे कि, मानवाचा भूतकाळ जर दहा लक्ष वर्षांचा मानला, तर त्यापैकी जेमतेम सात हजार वर्षांचा इतिहास अन तो देखील अत्यंत विस्कळीत स्वरूपात उपब्ध आहे. ९९% पेक्षा जास्त कालावधी हा पूर्णपणे अज्ञात आहे. कारण पौराणिक कथा या विश्वसनीय नाहीत. 

२. विकास सिद्धांताप्रमाणे ( Organic Evolution ) dryopithecus या सस्तन प्राण्याच्या तीन उपजाती निर्माण झाल्या. त्यात ड्रायोपिथेकस पंजाबाय 

 पासून गोरिला, ड्रायोपिथेकस जर्मनाय पासून चिंपाझी आणि ड्रायोपिथेकस डार्विनाय पासून मानव निर्माण झाला.  आता प्रश्न असा कि दोन-अडीच फुटी ड्रायोपिथेकस पासून साडेपाच फुटी मानव एकदम निर्माण कसा झाला ?

३. मांसाहारी प्राणी निर्माण होताना मांजर,रानमांजर,वाघ ( तॄणाहारी मधे झेब्रा,घोडा,गाढव )ई. एकमेकांसदृश अनेक प्राणी निर्माण झाले. परंतू मानव निर्माण होताना मानवाला समांतर प्राणी नाही झाला.आहाराच्या बाबतीत मांसाहारी,शाकाहारी,तॄणाहारी,कीटकाहारी ई. वैशिष्ट्ये आहेत. मानवाला नाहीत.

४. सर्व प्राण्यांची प्रसूती अत्यंत सुलभ होते आणि मादीला त्यापासून धोका संभवत नाही. परंतु स्त्रीला अपरंपार कष्ट होतात अगदी जीवावर सुद्धा बेतते. याला कारण अर्भकाचे अमर्याद वाढलेले डोके. असे कसे ?

५. मानव हा पृथ्वीवरचाच आहे याला सबळ पुरावा नाही. कारण मानवाची उत्पत्ती जरा बाजुला ठेवली तरी काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. ज्या काळात मानवाला चाकाचा शोधही लागला नव्हता त्या काळात सापडलेले बांधकाम किंवा चित्रे, शिल्पे पाहिल्यावर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येते.उदाहरणार्थ  ईजिप्तमधले पिरॅमिडस, त्यांची शास्त्रीय रचना,पायाची बांधणी. पिरॅमिडमधुन किरणोत्सर्ग बाहेर पडणे. 

६.  ऍडमिरल पिरी रीस याने तयार केलेला जगाचा नकाशा. अमेरिकेचा आणि अंटार्क्टीका चा आकार अगदी तंतोतंत कसा जुळतो. 

७. अँडीज पर्वतावरील पिस्को या डोंगरावर कोरलेला प्रचंड मोठा त्रिशुळ. 

८. ईस्टर आयलंड वरील ज्वालामुखीच्या  लाव्हा रसानी बनलेल्या बेटावर पाषाणात काढलेली शिल्पे, ज्यातील चेहरे-पट्टी ही पृथ्वीतलावरील कुठल्याही वंशाशी जुळत नाही. हि तर खरंच कमालीची गोष्ट आहे. याचा युट्युब वर असलेला विडिओ पाहिल्यावर खरंच माझी मती गुंग झाली. 

मला तर वाटायला लागलं एवढंसं वाचाल्यावर हि तऱ्हा मग एरिक यांची काय गोष्ट करावी. पुस्तकाच्या मलपृष्ठावरच दिलं आहे. 

एरिक व्हॉन डेनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने पंचवीस वर्ष प्रयत्न केला आणि लाख मैलांपेक्षा अधिक भ्रमंती करून त्यांच्या वास्तव्याचा मागोवा घेतला. या प्रयत्नात कोट्याधीश व्हॉन डेनिकेन कफल्लक झाला. पण त्याने आपल्या संशोधनावर ग्रंथ प्रसिद्ध केले अन तो पुन्हा कोट्याधीश बनला. परंतु या खटाटोपात मानवाच्या निर्मितीचं रहस्य मात्र उलगडलं नाही. अनेक अज्ञात  प्रश्न या पुस्तकात उपस्थित केले आहेत.हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला त्यावर नक्कीच विचार करायला भाग पाडते. प्रत्येकाने एकदा तरी वाचायला हवं असं हे छोटेखानी पुस्तक आहे. 


पृथ्वीवर माणूस उपराच: डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी : मेहता प्रकाशन :मूल्य ११० रुपये 

No comments: