देहोत्सर्ग तीर्थ (गोलोकधाम)

 देहोत्सर्ग तीर्थ (गोलोकधाम)





संध्याकाळची वेळ आणि समुद्र किनाऱ्याला लागून एखादी टेकडी आणि त्याच्या किनाऱ्यावर दुरून दिसणारी नारळाची झाडे. फोटो पाहून किती सुंदर नजारा आहे ना; एखाद्या कोकणातील दृश्य वाटावं असं. पण हे दृश्य कोकणातील नाहीये तर वेरावळ येथील सोमनाथ ज्योतिर्लिंगपासून अवघ्या २ किमीच्या अंतरावर हिरण नदीच्या तीरावर असलेल्या गोलोकधाम तीर्थाचं.  इथूनच जवळ हिरण, कपिल आणि सरस्वती अश्या तीन नद्यांचा संगम देखील आहे. 

पण हि हिरण नदी आहे ना ती खरंच खूप पुण्यवान आहे . का माहिती आहे ? कारण तिने प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना आणि शेषावतार बलरामांना आपल्या निजधामाला जाताना पाहिलंय नव्हे तर आपल्या अवतार संपत्तीच्या काळात श्रीकृष्णाने शेवटच्या क्षणी इथेच आपला देह विसर्जित केला आणि गोलोक धामाला गेले अशी मान्यता आहे. म्हणूनच या स्थळाला गोलोकधाम असे नाव पडले किंवा देहोत्सर्ग तीर्थ असेही म्हणतात. 
सोमनाथचं  दर्शन झालं आणि पुढे निघालो ते आम्ही त्रिवेणी संगम आणि गोलोकधाम तीर्थाकडे. त्याची महती थोडक्यात अशी आहे कि, 

"जरा" नावाच्या व्याधाने हरीण समजून श्रीकृष्णाला बाण मारला. (हि सर्व श्रीकृष्णाचीच अवतारसमाप्तीची लीला.) त्याने श्रीकृष्णाची माफी मागितली आणि त्याला माफ करून वासुदेवाने पूर्वजन्माची आठवण करून दिली. त्याच्या बाणाने जखमी झालेला श्रीकृष्ण "भालका तीर्थाहून" आला तो हिरण नदीच्या किनारी. त्रिवेणी संगमात स्नान करून त्याने देहोतसर्ग येथे आपला देह सोडला आणि तिथूनच वैकुंठाला प्रयाण केले. परंतु त्याच्या पावलांचे ठसे आजही हिरण नदीच्या किनारी आहेत. येथेच गीता मंदिर हे कृष्णाला समर्पित मंदिर असलेले मंदिर देखील बांधले गेले आहे, ज्याच्या अठरा स्तंभांवर भगवद्गीतेचे सर्व उपदेश कोरलेले आहेत. मंदिराच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्णाची बासरी वाजवणारी एक सुंदर मूर्ती देखील आहे.लक्ष्मी नारायणाची सुंदर मूर्ती आणि भिंतीवरती विष्णूंच्या विविध अवतारांची चित्रे लावली आहेत. तसेच मंदिर परिसरात या दोन मंदिरांसमोर, निजधामच्या दिव्य प्रवासासाठी खुल्या जागेत भगवान कृष्णाच्या पावलांचे ठसे कोरलेले आहेत. भगवान कृष्णाचे थोरले बंधू बलराम यांनीही येथूनच नागाच्या रूपात आपली शेवटची यात्रा केली. ‘बलदेवजी की  गुफा’ या नावाची 5000 वर्षे जुनी गुहा जिथे बलरामांनी प्राण सोडले ती आजही येथे आहे. हजारो वर्षे झाली तरी प्रत्येक श्रीकृष्ण भक्त हा इथे येऊन नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.

मंदिर परिसर शांत आणि प्रसन्न आहे. पार्श्वभूमीत आपल्याला हिरण नदी, त्यात पोहणारी हळदी कुंकू किंवा घनवर प्रजातीची बदके आणि नारळाच्या झाडांच्या रांगा असलेले हिरण नदीचे विलोभनीय दृश्य दिसते. त्या मावळत्या सूर्याकडे दोन क्षण पाहत आणि कृष्णलीला आठवत या परमपवित्र स्थळाला नतमस्तक होऊन पुढच्या प्रवासाला निघालो.  
 





त्रिवेणी संगम




राधे .. राधे .. 


© Mayur H. Sanap 2021

No comments: