करडा धोबी (Grey wagtail)

 करडा धोबी (Grey wagtail)



टाळेबंदीतली सकाळ. रोज खिडकीवरच्या टकटक आवाजाने जाग यायची. कोण आहे म्हणून एकदा कुतूहलाने खिडकी उघडली आणि एक पक्षी भुरकन उडून गेला. मागे नवीन वर्षाच्या सुरुवातीला अलिबाग ला असताना सुतार पक्षीने असाच अनुभव दिला होता. पण आवाजावरून तरी तो असेल असं वाटलं नव्हतं. कुतूहल चाळवलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा खिडकीवर टकटक झाली. हळूच खिडकी उघडली आणि त्याला चाहूल लागताच समोरच्या दोरीवर जाऊन बसला. करड्या आणि पिवळसर रंगाचा हा पक्षी मी पहिल्यांदाच पाहत होतो. मस्त आपली शेपटी वर खाली उडवत होता आणि थोड्याच वेळात दोरीवून खाली सुर मारून उडाला. हा आता त्याला रोजच पाहण्याचा छंद जडला आणि कसरत सुरू झाली त्याला कॅमेरात टिपण्याची. १४ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी एक छान फोटो मिळालाच. सतत शेपटी वर खाली करणारा हा होता (Grey wagtail)करडा धोबी. हे पक्षी सतत शेपूट वर- खाली हलवीत असल्यामुळे या प्रजातीला मोटॅसिल्ला हे नाव पडले आहे. पण हा त्या खिडकीवर रोज सकाळी का टकटक करायचा याचं कोड तेव्हा उलगडलं जेव्हा तो आपली निशाणी सोडून गेला..😀

पॅसेरीफॉर्मिस गणाच्या मोटॅसिल्लिडी कुलातील मोटॅसिल्ला प्रजातीमधील पक्ष्यांना सामान्यपणे धोबी म्हणतात. भारतात या पक्ष्याच्या ३-४ जाती आढळतात. भारतात आढळणाऱ्या जातींपैकी एक–शबल (चित्रविचित्र रंगाचा) धोबी–येथील कायमची रहिवासी असून बाकीच्या हिवाळी पाहुणे म्हणून इकडे येतात. शबल धोब्याचे शास्त्रीय नाव मोटॅसिल्ला मदरासपटेन्सिस असे आहे. हिमालयाच्या ६१० मी. उंचीपासून खाली सगळीकडे तो आढळतो पण आसाममध्ये तो सापडत नाही. हिवाळ्यात भारतात येणाऱ्या मोटॅसिल्ला प्रजातींमध्ये करडा धोबी (मो. सिनेरिया), पांढरा धोबी (मो. अल्बा) आणि पिवळा धोबी (मो. फ्लावा) या मुख्य जाती आहेत. (१) करडा धोबी पक्ष्याची वरची बाजू करडी व खालची पिवळी. (२) पांढरा धोबी पक्ष्याची वरची बाजू करडी; चेहरा, हनुवटी व गळा पांढरा; छातीवर काळा पट्टा; पंख काळे पांढरे. (३) पिवळा धोबी पक्ष्याचे कपाळ पिवळे, भुवया पिवळ्या. उन्हाळ्याच्या आरंभी नराचे सगळे डोके पिवळे होते. 
हा पक्षी सतत आपली शेपूट वर-खाली हलवत असतो. एखादा धोपटणे आपटावे तसे, त्यावरूनच याला धोबी हे नाव पडले. मला सध्या तरी फक्त करड्या रंगाचा धोबी पाहायला मिळाला. त्यामुळे त्याचीच माहिती फक्त या पोस्ट मध्ये टाकतो आहे. 
आता पाहूया त्याची माहिती.





नाव:             करड्या डोक्याचा धोबी किंवा भाटुकली  

इंग्लिश:        Dark-headed Wagtail or Grey-headed Wagtail; 

हिंदी:            नील-सिर पीलाकिया). 

शास्त्रीय नाव: (Motacilla cinerea)

Kingdom:    Animalia

Phylum:       Chordata

Class:           Aves

Order:         Passeriformes

Family:       Motacillidae

Genus:        Motacilla

Species:       M. cinerea 


ग्रे वॅगटेल हे द्विपद नाव दिले ते मार्मडुके टन्सटॉल या ब्रिटिश पक्षीशास्त्रज्ञाने. त्याने हे १७७१ मध्ये ऑर्निथोलॉजीया ब्रिटानिका या पुस्तकात मध्ये सादर केले. किंबहुना द्विपद नामकरणा वर काम करणारा तो पहिलाच ब्रिटिश पक्षीशास्त्रज्ञ होता. मोटासिला हे वॅगटेलचे लॅटिन नाव आहे.

करडा धोबी हि पिवळ्या धोब्याची एक उपप्रजात आहे. वरचा पाठीकडचा भाग हा करड्या रंगाचा तर खालचा भाग हा पिवळसर असतो. तर शेपटीची किनार पांढरी असते. डोक्याचा रंग करडा व भुवईचा रंग पांढरा असतो. पिवळा धोबी पाकिस्तान आणि भारतात गंगेचे मैदान ते दक्षिणेकडे कच्छ्, कन्याकुमारी, श्रीलंका आणि पूर्वेकडे बांगला देश ते ब्रम्हदेश व अंदमान आणि निकोबार बेटे या भागात आढळून येतो.नद्या, ओढे, तलाव वगैरेंच्या काठी हा नेहमी असतो.

करडा धोबीचा विणीचा हंगाम अर्थात प्रजोत्पादनाचा काळ हा एप्रील ते जुलै या महिन्यांमधे असतो. प्रजजन काळात नर हा हवेत लहान उड्डाणे करून प्रदर्शन करत असतो आणि एका विशिष्ट् आवाजासह तो हळू हळू खाली उतरतो. याचे घरटे नदीच्या काठावर खडक आणि झाडांची मुळे यामधे असते. मादी साधारण ३-४ अंडी घालते. ती पांढरी असून त्यात करड्या, तपकिरी किंवा हिरव्या रंगाची छटा असते. त्यांवर तपकिरी ठिपके किंवा रेषा असतात.. लहान किडे हा या धोब्याचा मुख्य आहार असतो. या किड्यांच्या शोधात हा धोबी आपली शेपटी मस्त वर खाली करत नाचवत असतो.

या टाळेबंदीत खूप पक्षी दिसू लागलेत आणि आपसूकच त्यांची माहिती घेण्याची जिज्ञासाही जागी झाली आहे. आता पाहूया पुढचा कोणता पक्षी दर्शन देतो ते.


माहिती सौजन्य:- विकिपीडिया आणि आंतरजालावरून साभार.



No comments: