शिंपी (Common Tailorbird )
टाळेबंदीत ना कुठे बाहेर, ना कुठे फिरायला जायचे वांदे झाले होते. खिडकीत बसल्या-बसल्या आपली कामं करताना पक्ष्यांचे सुंदर आवाज ऐकायला यायचे आणि टाळेबंदीत जर जास्तच निरनिराळे दिसायचे. मग आपसूकच त्यांना निहाळण्यात वेळ जायला लागला आणि एक नवा छंद जोपासला गेला.
जगातला अनेक कठीण टास्क पैकी एक कुठला असेल तर तो म्हणजे पक्ष्यांचे फोटो मिळवणं आणि त्यात without लेन्स वाला कॅमेरा असेल तर आणखीच कठीण. त्यांची तासंतास वाट पाहणं. एक जागी तिष्ठत बसणं आणि कधी पटकन आलाच, तर एक सेकंदात भुर्रकन उडून जाणार. तेवढ्यातच वेळ साधावी लागते. म्हणूनच मला बर्ड फोटोग्राफर्सचं नेहमीच कौतुक वाटतं. फोटो काढायची आवड जशी सर्वांना तशीच मलाही; म्हटलं प्रयत्न करून पाहूया आणि ३-४ जणांचे मिळवण्यात यश आलंच आणि मागच्या जून मध्ये पहिला फोटो मिळाला तो शिंपी पक्ष्याचा वरती लाईटच्या तारेवर बसून झोका घेतानाचा.
चुहिट ss चुहिट ss असा आपल्या आवाजाने आजुबाजूचा परिसर दणाणून सोडला होता. पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहत टुणटुण झाडावरून इकडे तिकडे उड्या मारत होता. तिथूनच सुरुवात झाली माझी पक्षी निरीक्षणाची. चिमणीपेक्षाहि लहान आकाराचा पक्षी. पण त्याचा आवाज केवढा! छोटा पॅकेट बडा धमाका हे याच्या कडे पाहिल्यावर लक्षात येतं. आता पाहूया त्याची माहिती.
नाव:- शिंपी
हिंदी :- दर्जी
इंग्रजी:- काॅमन टेलरबर्ड (Common Tailorbird )
Kingdom: Animalia
Phylum: Chordata
Class: Aves
Order: Passeriformes
Family: Cisticolidae
Genus: Orthotomus
Species: O. sutorius
शिंपी पक्षी हा छोटा पक्षी सिल्व्हिइडी पक्षिकुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑर्थोटोमस स्युटोरियस आहे. हिंदीत त्याला दर्जी म्हणतात. हा पक्षी साधारण १३ सें. मी. आकाराचा आणि उत्तम घरटे विणणारा पक्षी म्हणून ओळखला जातो.
शिंपी पक्षी हिमालयाच्या १५०० मी. उंचीपर्यंतच्या परिसरापर्यंत आणि दक्षिणेकडील डोंगराळ प्रदेशात १,२२० मी. उंचीपर्यंत तो आढळतो. तसेच तो पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार या ठिकाणीही आढळतो. आकार आणि रंगाच्या थोड्या फरकाने याच्या किमान पाच उपजाती या भागात आहेत. झुडपांच्या जंगलात, कुंपणांच्या झुडपांत, घराभोवतालच्या बागेत त्याचा वावर असतो. दाट जंगले व रखरखीत प्रदेश येथे मात्र तो आढळत नाही.
शिंपी पक्षी अतिशय सक्रिय आहे.याचा विणीचा हंगाम अर्थात प्रजोत्पादनाचा काळ हा एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत असतो. प्रजोत्पादनाच्या काळात नराच्या शेपटीतील मधली पिसे जास्त लांब होतात (सु. ५ सेंमी.इतकी ) त्याचे घरटे झुडपांमध्ये किंवा वेलींवर जमिनीपासून ९० ते १२० सेंमी. उंचीवर असते. पाने शिवण्यासाठी ताे चाेचीचा सुईप्रमाणे आणि काेळ्याच्या जाळ्यांचा किंवा वनस्पतीच्या तंतूचा दाेऱ्याप्रमाणे उपयाेग करताे. एक किंवा दाेन पाने शिवून ताे त्याची आधी पुंगळी बनविताे. ती खालच्या बाजूने शिवून बंद करताे. या पिशवीत कापूस किंवा इतर मऊ पदार्थ घालून ताे घरटे तयार करताे. वड, पिंपळ यांच्या पानांपासून ताे घरटे तयार करताे. अगदी कुशल कारागीरासारखी. अंड्याचे व त्यावर बसणाऱ्या पक्ष्याचे वजन सहन करण्याइतके त्याचे घरटे मजबूत असते. म्हणूनच त्याला पक्ष्यांमधील अतिशय कुशल वास्तुकार म्हणतात. नर व मादी दोघे मिळून घरटे तयार करतात. तांबूस अथवा निळसर पांढऱ्या रंगाची ३-४ अंडी मादी घालते. त्यांच्यावर तांबूस तपकिरी ठिपके असतात. नर मादी बहुतांश दिसायला सारखेच असतात फक्त नराची शेपटी लांब असते. आता मी हा जो फोटो काढलाय, वर्णनावरून तरी तो नरच वाटतोय.
लहान कीटक, त्यांची अंडी आणि अळ्या तसेच विविध फुलातील मध आणि किटक हे शिंपी पक्ष्याचे मुख्य अन्न आहे. आंब्याच्या झाडासाठी हा अनुकूल आहे. आंब्याला मोहोर आल्यावर त्यावर जे कीटक लागतात ते हा टिपून खातो आणि एकप्रकारे आंब्याला लागलेला मोहोर हा सुरक्षित राहतो असे दिसून आले आहे.
या पक्ष्याला त्याच्या घर बांधिणीवरून त्याला "शिंपी" हे नाव दिले गेले हे तर कळले असेलच परंतु ते खऱ्या अर्थाने अजरामर केले ते जोसेफ रुडयार्ड किपलिंग या इंग्रजी लेखक, कवी आणि कादंबरीकाराने. त्यांचा जन्म हा भारतात झाला होता. रुडयार्ड किपलिंगच्या जंगल बुक कथांपैकी एक "रिक्की-टिक्की-तवी" मध्ये दोन दर्जेदार पात्र म्हणून दर्जी (शिंपी पक्षी ") आणि त्याची पत्नी यांचा समावेश आहे. यातून शिंपी पक्षी हा अजरामर झाला. जंगल बुक हि तीच कादंबरी आहे ज्यातील मोगली बघता -बघता मी, आपण सर्वजण मोठे झालो.
माहिती सौजन्य:- विकिपीडिया आणि आंतरजालावरून साभार.
No comments:
Post a Comment