PMK (पुरंदर, मल्हारगड आणि कानिफनाथ गड)




मल्हारगडचा सूर्यास्त आणि कानिफनाथ गडावरची पहाट

मल्हारगडचा सूर्यास्त 





बरेच दिवस झाले होते ट्रेक ला जाऊन. मन स्वस्थ बसून देत नव्हतं. सारखी ओढ लागली होती सह्याद्रीमध्ये फिरण्याची. नितेश चल रे!! ट्रेक ला जाऊया ..
"चल.  AMK  करूयात."
"नाही रे बाबा!! AMK  नको. त्यापेक्षा आपण PMK करूयात.  "
PMK हे काय आहे ? नितेश बोलला. मी सहज हसलो आणि बोललो.  पुरंदर, मल्हारगड आणि कानिफनाथ गड (PMK ) हे करूयात. एका फेरीत होऊनही जातील.
"हा रे.. "
AMK  च्या वेगळे PMK काहीतरी मी नवीन सांगितल आणि नितेश लगेच तयार झाला.
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे. तो पाहायचाच होता म्हणून त्यासोबत पुरंदर आणि जमलंच तर कानिफनाथांच्या स्पर्शाने पावन झालेला कानिफनाथ गड हि करूयात असं ठरलं.
पुण्याहून गौरव ची बाईक घ्यायचं ठरलं.
"अरे.. मयुर भाई किधर गाडी लेके  जा रहे हो मेरी .. पुरानी  है अभि तो पंक्चर निकालके लाया हूं. साथ नही देगी."
"तू टेंशन  मत ले साथ निभाने वाले भी वैसे हि है कुछ  होगा तो में  देख लुंगा   "
आता काहीही केलं  तरी मी ऐकणार नाही हे पाहून तो द्यायला तयार झाला आणि भल्या पहाटेच्या थंडीतआम्ही दोघे पुण्याहून आमच्या नव्या मोहिमेसाठी निघालो.

गडकिल्ल्याच्या भ्रमंतीला गेल्यानंतर बहुतेक ठिकाणी माझ्या दत्त महाराजांचे मंदिर हे वाटेवर लागतंच  असा माझा तरी आत्तापर्यंतचा अनुभव आहे. पुरंदरच्या वाटेवरही नारायणपूर हे  "एकमुखी दत्त " या मुळे प्रसिद्ध आहे. सकाळीच तेथून दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. 
पुरंदर भारतीय सैन्याच्या ताब्यात असल्याने प्रवेशासाठी आपलं ओळखपत्र दाखवणे गरजेचं आहे. आपली नोंद केल्यानंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो. भारतीय सैन्याने वरपर्यंत जाण्यासाठी कांक्रीट चा रस्ता  बांधला आहे. वरती जात असतानाच प्रथमच आपल्याला "वीर मुरारबाजी देशपांडे" यांच्या स्मारकाचे दर्शन होत. त्याच्या शौर्याची असीम गाथा आठवली कि आपोआपच अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. बाजूलाच एका पाटीवर त्यांच्या पराक्रमाची गाथा संक्षिप्त स्वरूपात लिहिली आहे.





शके १५८७ (१६५६ साली ) जयसिंग दिलेरखानाने ४०ते ५० हजार फौजेनिशी पुरंदरला वेढा दिला होता त्यावेळी मुरारबाजी देशपांडे हे किल्लेदार होते. ते हा  होते फक्त १००० मावळ्यांना सोबत घेऊन. खानाने वज्रगड ताब्यात ठेऊन पुरंदरावर हल्ला केला. मुरारबाजींनी ७०० मावळे घेऊन खानास कडवे प्रत्युत्तर केले. त्यांचे अफलातून शौर्य पाहून खानाने त्यांना आपल्याकडे येण्यास आमंत्रण दिले आणि बोलिला,
"‘अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.’ ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, ‘तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?’ म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला."

खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्धपुरंदरचा तहझाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
पुरंदर, रुद्रमाळ (वज्रगड ) ,कोंढाणा, रोहिडा
लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड,
माहुली, मनरंजन, कोहोज, कर्नाळा
सोनगड, पळसगड, भंडारगड, नरदुर्ग
मार्गगड, वसंतगड, नंगगड, अंकोला
खिरदुर्ग (सागरगड), मानगड



त्यांच्या शौर्याची गाथा स्मरून आम्ही पुढे निघालो,  भारतीय सैन्याच्या ताब्यात असल्याने पूर्णपणे किल्ला पाहता येत नाही त्यांनी मार्गिकेल्या वाटेवरूनच आम्ही पुढे निघालो.  पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. सैन्याच्या बांधकामामुळे जरा गडाचा चेहरामोहरा  बदलला आहे . तसेच फतेहबुरुजाकडे जाणारा मार्गही सैन्याने बंद केला होता. कदाचित सुरक्षेच्या कारणामुळे असावा. प्रचंड धुकं असल्याने अंधूकच समोरून वज्रगडाचे दर्शन होत होते. पुरंदर किल्ला हा मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. हे आजही प्रकर्षाने दिसून येतं. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहेइंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत अशी दंत  कथा विख्यात आहे. पुढे पाण्याची टाकी पाहून आम्ही केदारेश्वर मंदिराकडे निघालो. वर मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या या उत्तमस्थितीत आहेत. केदारेश्वराचे दर्शन घेऊन थोडावेळ आम्ही तिथे विश्रांती घेतली.

फतेह बुरुज 
केदारेश्वर कडे जाण्याचा मार्ग 

केदारेश्वर मंदिरातील नंदी 

Trident 
 




पुरंदरचा इतिहास असा कि, बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदऱ्या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.
.. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १२ मे १६५७ गुरुवार या दिवशी  संभाजी महाराजांसारख्या तेजस्वी सूर्याच्या छाव्याचा जन्मही याच गडावर झाला होता.

गडावर थंड हवा फार वाहत होती, टोपी घालण्यासाठी हात खिशात टाकला आणि खाली उतरताना माझ्या लक्षात आलं कि, अरेच्चा आपली टोपी इथेच कुठेतरी पायरीवर पडली. पाठीमागे पहिली तर तिथे नव्हती. मी नितेश ला जरा नाराजीच्या स्वरात  बोललो, "अरे यार!! माझी ट्रेकिंग ची आवडती टोपी उचलली कोणीतरी. "
"अरे पुरंदरच्या तहात २३ किल्ले गेले. तर हि तुझी टोपी काय चीज आहे. चल गेली तर जाऊ दे आता .. "
हसत हसत आम्ही उर्वरित गडाचा भाग पाहून खाली उतरलो. जात-जात पायथ्याशी असलेल्या पुरंदरेश्वर मंदिरात मी दिवा लावला आणि शेजारी असलेल्या एका हॉटेल मध्ये मस्त झुणका-भाकरीचा आस्वाद घेऊन आम्ही मल्हारगडाच्या दिशेने निघालो.

Purandareshwar Temple
kedareshwar










पुरंदर ते मल्हारगड हडपसर-सासवड मार्गे साधारण २७ किमी. चे अंतर आहे. मध्यंतरी रस्ता  थोडासा खराब असल्याने मंद गतीनेच आम्ही जात होतो. वाटेवरच माझी नजर एका फलकावर गेली, "चांगदेव तपोभूमी -चांगवटेश्वर मंदिर सासवड ". लगेच नितेशला मी गाडी थांबवायला सांगितली.
"काय रे. काय झालं.? "
"अरे हे बघ इथे कसलं प्राचीन मंदिर दिसतंय. चांगदेवांचे नाव आहे. चाल पाहुयात." नितेशने गाडी तिकडे वळवली. रस्त्याला लागूनच असलेले हे छानसं शिवाचं  मंदिर आहे. कऱ्हा  नदीच्या तीरावर वसलेल्या  या मंदिराचा परिसर हि अत्यंत रमणीय आहे. विशेष म्हणजे ते इथली स्वच्छता. इतर मंदिरासारखी इथे गडबड नाही कि, उगाचच केलेल्या कर्म-कांडाचा  मारा नाही. बाजूच्या कुंडात पाय धुऊन आम्ही आत जाऊन दर्शन घेतलं. मानलं एक वेगळाच समाधान मिळालं होत. मंदिराच्या बाजूलाच त्याचा इतिहास लिहिला आहे त्यावरून हे किती प्राचीन आहे हे समजते.
चांगदेवाचा जन्मकाळ श्री. ज्ञानेश्वर महाराजांपूर्वी म्हणजे १४०० वर्षे आधीचा. चांगदेव चातुर्मासातील महिने मौनव्रताने अंधत्वाने सर्व व्यवहार करत असत. त्यांचे नित्य एक पार्थिव लिंग पूजेचे असे. त्यांचा शिष्य चिकण मातीने मळून केलेले लिंग डाव्या हातावर ठेवून त्याचा विधियुक्त पूजा करीत असे. एक दिवशी सततच्या पावसाने कंटाळून शिष्याने एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याश्या मातीचे लंपन तयार करून तेच पार्थिव लिंग म्हणून तयार करून ठेवले. चांगदेव नित्य नियमाने स्नान उरकून पार्थिव लिंगास आव्हानात्मक मंत्रोक्षता वाजून ते उचलून हातावर घेऊ लागले तर ते मुळी हालेनाच त्यांनी डोळे उघडून पहिले ते
उचलून हातावर घेऊ लागले तर ते हालेनाच. ते हलविले जाणारे स्वयंभू लिंगच चांगदेवास दिसून आले. त्याने छोटेसे मंदिर बांधून त्या स्वयंभू लिंगाची उपासना कायम ठेवली यावरून या मंदिरास चांगावटेश्वर  असे नाव पडले.

 
Changavateshwar


भारतीय प्राचीन स्थापत्यशास्त्र आणि अप्रतिम शिल्पकला यांचा उत्कृष्ट नमुना असलेले वटेश्वर मंदिर पुर्वाभिमुखी असून प्रवेशद्वारातून प्रवेश केला की, आतील बाजूस प्रशस्त चौकोनाकृती दगडी प्राकार लागतो, मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम अप्रतिम आहे. तीस चौकोनी अखंड पाषाण स्तंभावर सभामंडप उभा आहे. प्रवेशद्वारावरील स्तंभावर तपस्वी, दधि-मंथन करणारी स्त्री, गरुड, युगुल, लढत असलेले मल्ल, तीन नर्तकी असे शिल्प कोरलेले आहे. त्याच बरोबर कमल पुष्पे, शृंखलांच्या माला, नृत्यांगना यांचे सुबक कोरीव काम केलेले दिसते. सभामंडपाच्या मध्यभागी विशाल देखणी नंदीची मूर्ती असून नंदीच्या कंठस्थानी साजरशृंगार कोरलेला आहे.

Changavateshwar temple

सभामंडप ओलांडून गेल्यावर चौकोनाकृती गाभारा लागतो. शोडष स्तंभावर हा उभारलेला असून त्याच्या प्रत्येक स्थंभावर प्रवेशमंडपाप्रमाणेच विविध कलाकुसरयुक्त चित्राकृती, कमल पुष्पे, शृंखलांची घडण कोरलेली आहे. मंडपास दक्षिणोत्तर प्रवेश द्वारे आहेत. शिवालयाचे गर्भागार नितांतरम्य, उदात्त नि पवित्र आहे. त्यामुळे भक्तांच्या मनास सात्विकतेचा अनुभव येतो. स्वयंभू शिवलिंगाच्या पार्श्वभागी महिरपीच्या कोनाड्यात श्री गणेश देवतेची संगमरवरी रम्य मूर्ती आहे.मंदिराचा घुमट अष्टकोनी गोलाकार आहे. पूर्व प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दोन कृष्णपाषाणी भव्य दीपमाला आहेत. उत्तरेस पावन कर्हा तीरावर सखाराम बापू बोकिलांनी बांधलेला घाट दिसतो. अशा पुण्यपावन पवित्र शिवालयाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. जवळ आलोच आहोत तर संत सोपान काकांची समाधी पाहूनच पुढे जाऊया म्हणून आम्ही विचारत विचारात त्यांच्या समाधी मंदिरात पोहोचलो.


Saint Sopan kaka samadhi temple
Saint Sopan maharaj


संत सोपानदेवांचे मंदिर सासवड गावाच्या एका बाजूसचांबळीनदीच्या तीरावर आहे . मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या समोरील आवारातून आम्ही उत्तरेकडून प्रवेश केला.पायऱ्या चढून महाद्वारात आल्यावर समोरच नागेश्वर मंदिर आहे. हे नागेश्वर मंदिर संत सोपान देवांच्या आधीचे असून या मंदिराच्या मागच्या बाजूस सोपान देवांनी समाधी घेतली असे म्हणतात. समाधी वर्णनाच्या अभंगात या मंदिराचे वर्णन आले आहे. गाभाऱ्यात संत सोपानदेवांची समाधी आहे काळ्या पाषाणातील समाधी हि पायऱ्यांची आहे . सकाळी नित्य पूजेनंतर समाधीवर मुखवटा ठेवला जातो. दुपारी चारच्या सुमारास समाधीस पोशाख होतो. गाभाऱ्याची प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा सभा मंडपात येताना उजव्या हाताला चिंचेच्या झाडाखालील पादुका दिसल्या. सोपानदेवांनी ज्या गुहेत समाधी घेतली त्या गुहेचे हे प्रवेशद्वार होते असे सांगतात. नंतर हा रस्ता बुजवून त्यावर पादुकांची स्थापना करण्यात आली. मंदिर परिसरात एक कुंड असून यालाच भागीरथी असे म्हणतात. याच्या जवळूनच जी नदी वाहते ती चांबळी नदी. या नदीत एक मोठा वाटोळा खडक दिसतो त्याला हत्ती खडक असे म्हणतात . नदीला पाणी असले कि हा खडक नदीत उतरलेल्या हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो म्हणून हे नाव पडले असावे कदाचित. नदीच्या पलीकडे पुंडलिक मंदिर आहे . दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा आता जीर्णोद्धार झाला असून त्यासमोर सिमेंटचा मंडप ओटा बांधला आहे.
नंतर आम्ही निघालो ते पुरंदरे वाडा पाहण्यासाठी येथूनच अगदी काही पावलांच्या अंतरावर तो आहे. कर्हेकाठवरील पुरंदरे घराण्याचे संस्थापक पेशव्यांचे दिवाण अंबाजीपंत पुरंदरे यांनी १७१० मध्ये हा पुरंदरे वाडा बांधला. सध्य स्थितीत त्याची अवस्था फारशी चांगली नाही. वाड्याच्या बाहेरचा परिसरहि  थोडा अस्वच्छ आहे यावरूनच नामशेष होणारी वाडा संस्कृती आणि आपला जपला जाणारा पूर्वजांचा स्वाभिमान किती लयाला गेला आहे याची जाणीव होते.

दुरून दिसणारा मल्हारगड 

नंतर आम्ही कूच केलं ते थेट मल्हार गडाकडे.

महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे गावातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याचे बांधकाम हे .. १७६३ ते १७६५ या काळात झाले. पेशव्याचे तोफखान्याचे प्रमुख भीमावर पानसे कृष्णराव पानसे यांनी गावच्या उत्तरेकडील डोंगरावर याची निर्मिती केली म्हणून याला सोनोरीचा किल्ला असेही म्हणतात.



सासवड पासून कि.मी. वर सोनोरी हे गाव आहे. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. तसेच हडपसर-सासवड -जेजुरी या मुख्य महामार्गापासून सोनोरी गावाकडे जाण्यासाठी काळेवाडी फाटा लागतो. तो आपल्याला थेट मल्हारगडच्या मागच्या बाजूला घेऊन जातो. दक्षिणेकडील पडलेल्या बुरूजा पर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. काळेवाडी गावातून जाणारा हा रस्ता फारसा परिचित नसला तरीही अतिशय सोपा आहे. रस्ता थोडा कच्चा असला तरी देखील सहज किल्ल्याच्या बुरुजापर्यंत आपल्याला सहज घेऊन जातो. याच मार्गे संध्याकाळी च्या सुमारास आम्ही मल्हारगडच्या पायथ्याशी पोहोचलो. येथूनच फक्त मिनिटांच्या चढाईनेच आम्ही किल्ल्यात प्रवेश केला.


Khandoba temple


मल्हारगड प्रशस्त आणि मोकळा ढाकळा आहे. समोरच असलेलं  पाण्याचे टाकं  पाहून आम्ही मोकळ्या असणाऱ्या पठारातून बालेकिल्ल्यात प्रवेश केला.
गडाचा सर्वात प्रेक्षणीय भाग हा बालेकिल्ला आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे.  बालेकिल्ल्यातील वास्तू पडल्या असून आता फक्त अवशेष राहिले आहेत. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. आकाराने मोठे मंदिर रेखीव शिवलिंग असलेले सावळेश्वराचे आहे.  कुठेही गडावर गेलो कि तेथील मंदिरात दिवाबत्ती करायची हा माझा शिरस्ता मी इथेही पार पडला. दुसऱ्या लहान मंदिरात अश्वारूढ मल्हारीची म्हाळसासोबतची मूर्ती आहे. या मंदिरातील मूर्ती पाहून मला जेजुरीच्या खंडोबाची आठवण झाली. यावरूनच किल्ल्याचे नाव मल्हारगड पडले. त्याचा इतिहास असा कि,
किल्ला बांधत असताना एका ठिकाणी कुदळीचा  घाव घातल्यावर रक्त वाहू लागले. सरदार पानसेंनी खंडोबाला साकडे घातले आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला. म्हणून या किल्ल्याला त्यांनी मल्हारगड नाव दिल्याची दंतकथा प्रचलित आहे. इंग्रजांच्या विरुद्ध बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या गडाचा आश्रय घेतला होता असे म्हणतात. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे. ते पाहण्यासारखे आहे. थोडा वेळ थांबून - मिनटे फोटोसेशन करून किल्ल्याच्या तटबंदीने पूर्ण किल्ला पाहून आम्ही पाहून घेतला.  किल्याला असणारी हि तटबंदी साधारण ११०० मीटर लांबी असलेली दुहेरी तटबंदी आहे.  एव्हाना सूर्यास्त होत आलेला. संपूर्ण गडावरून सूर्यास्ताचे अनोखा नजर दिसत होता. पश्चिमेला बुरुजाच्या पलीकडून सूर्यनारायण हळूहळू मावळतीला जात होते. मराठेशाहीच्या या शेवटच्या बांधलेल्या  किल्ल्यावरून दिसणारे हे दृश्य म्हणजे जणू काही मराठेशाहीच्या सूर्यास्ताचीच साक्ष देत होते.
आता आमचा तिसरा मुक्काम होता तो कानिफनाथ गड. आधी रात्रीची वस्ती मल्हारगडावर करायचे ठरवले होतं पण का कुणास ठाऊक कानिफनाथ गडावर जायची एक अनामिक ओढ लागली होती. आजचा मुक्काम कानिफनाथगडावरच करायचा असं ठरवून आम्ही तिकडे प्रस्थान केलं.

Kanifnath gadh

कानिफनाथ गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. पुण्यावरून दिवे घाट मार्गे सासवड हे शहर सुमारे २८ कि.मी. वर आहे   हडपसर पासून सुमारे १७ कि.मी. सासवड शहरापासून पश्चिमेकडे कोंढव्या कडे जाताना कि.मी वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे. - कि.मी चा प्रवास एक छोटा घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरा पर्यंत पोहचता येते. आम्ही मात्र सासवडहून बोपदेव -पुणे  मार्गे कानिफनाथ गडाकडे पोहोचलो.
कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे फार सुंदर मंदिर आहे. मंदिर प्राचिनकालीन आहे.हे मंदिर त्या पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो. मंदिर म्हणजे एक छोटी गुहाच आहे. मंदिरातील गाभारा मोठा आहे. परंतु प्रवेश दरवाजा × फुट असा आहे. मी कुतुहुलाने पाहत होतो. एवढ्याश्या जागेमधून भाविक आत मध्ये कसे जात आहेत. तेथील पुजाऱ्याने एक युक्ती सांगितली आणि दोन हात कानालगत लावून आत सरपटत प्रवेश करायचा असतो आणि येताना सुद्धा तसेच आधी पाय बाहेर ठेऊन सरपटत बाहेर यावे लागतं  नाहीतर मग सगळं कठीणचं
स्त्रियांना आत गाभाऱ्यात जाण्यास मज्जाव आहे. इथे आत गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. मी आत मध्ये प्रवेश केला. आतमध्ये कानिफनाथांची समाधी आहे. थोडा वेळ थांबून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन बाहेर आलो. मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटत होती. रात्रीच्या वेळी इथल्या परिसरातले एक वेगळच भारलेलं वातावरण वाटत होतं. मंदिर परिसरातून लांबवर शहरातील दिसणाऱ्या दिव्याचा झगमगाट दिसत होता.

मंदिराच्या गाभाऱ्याच्या वर एक वाक्य आपले लक्ष वेधून घेतं.
"असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी दिसे हा कानिफा मुरारी "
कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय ना! अरेच्चा हे तर आपल्याला उसाच्या रसवंती गृहाच्या वर दिसतं नेहमी. नितेश बोलला. संपूर्ण महाराष्ट्र कुठेही गेलात तरी प्रत्येक रसवंती गृहावर हे वाक्य लिहिलेलं असतंच. त्याची गोष्ट अशी आहे कि,
आता आमचा तिसरा मुक्काम होता तो कानिफनाथ गड. आधी रात्रीची वस्ती मल्हारगडावर करायचे ठरवले होतं पण का कुणास ठाऊक कानिफनाथ गडावर जायची एक अनामिक ओढ लागली होती. आजचा मुक्काम कानिफनाथगडावरच करायचा असं ठरवून आम्ही तिकडे प्रस्थान केलं.

कानिफनाथ गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. पुण्यावरून दिवे घाट मार्गे सासवड हे शहर सुमारे २८ कि.मी. वर आहे   हडपसर पासून सुमारे १७ कि.मी. सासवड शहरापासून पश्चिमेकडे कोंढव्या कडे जाताना कि.मी वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे. - कि.मी चा प्रवास एक छोटा घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरा पर्यंत पोहचता येते. आम्ही मात्र सासवडहून बोपदेव -पुणे  मार्गे कानिफनाथ गडाकडे पोहोचलो.
कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे फार सुंदर मंदिर आहे. कानिफनाथ येथे तपश्चर्येला बसले होते असे मानतात. मंदिर प्राचिनकालीन आहे.हे मंदिर त्या पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो. मंदिर म्हणजे एक छोटी गुहाच आहे. मंदिरातील गाभारा मोठा आहे. परंतु प्रवेश दरवाजा × फुट असा आहे. मी कुतुहुलाने पाहत होतो. एवढ्याश्या जागेमधून भाविक आत मध्ये कसे जात आहेत. तेथील पुजाऱ्याने एक युक्ती सांगितली आणि दोन हात कानालगत लावून आत सरपटत प्रवेश करायचा असतो आणि येताना सुद्धा तसेच आधी पाय बाहेर ठेऊन सरपटत बाहेर यावे लागतं नाहीतर मग सगळं कठीणचं
स्त्रियांना आत गाभाऱ्यात जाण्यास मज्जाव आहे. इथे आत गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. मी आत मध्ये प्रवेश केला. आतमध्ये कानिफनाथांची समाधी आहे. थोडा वेळ थांबून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन बाहेर आलो. मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटत होती. रात्रीच्या वेळी इथल्या परिसरातले एक वेगळच भारलेलं वातावरण वाटत होतं. मंदिर परिसरातून लांबवर शहरातील दिसणाऱ्या दिव्याचा झगमगाट दिसत होता.

मंदिराच्या गाभाऱ्याच्या वर एक वाक्य आपले लक्ष वेधून घेतं.

"असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी दिसे हा कानिफा मुरारी "

कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय ना! अरेच्चा ! हे तर आपल्याला उसाच्या रसवंती गृहाच्या वर नेहमी दिसतं . नितेश बोलला. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी प्रत्येक रसवंती गृहावर हे वाक्य लिहिलेलं असतंच. बरोबर. त्याची गोष्ट अशी आहे कि,

साधारण ७०-८० च्या दशकात पुरंदर तालुक्यातील बोपगाव गावातील एक तरुण रोजगारासाठी मुंबई ला गेला. त्याला कळलं  कि इथं आपल्या उसाला भरपूर मागणी आहे. मग दारोदारी जाऊन ते विकण्यापेक्षा एका जागी दुकान थाटून रस काढून ते विकावं असं त्याच्या मनात आलं. पुरंदरच्या गोड उसाच्या रसाने मुंबईत जादू केली आणि हळू हळू बोपगाव,सासवड आणि इतर परिसरातील लोक हे त्या उद्योगासाठी महाराष्ट्रभर पसरले. त्यांच्या धंद्यातील खरेपणाने रसवंतीला एक ब्रँड बनवलं. अख्खा पुरंदर तालुका हा नवनाथांचा भक्त आहे. त्यांची कानिफनाथावर खूप श्रद्धा. इथली माणसं जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत. त्यांनी श्रद्धेने आपल्या रसवंती गृहाचं  नावं "कानिफनाथ रसवंती गृह " असं ठेवलं. यांचं यश पाहून इतर रसवंती वाले देखील हेच नाव ठेवू लागले. पूर्वी बैलांनी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढलं जायचं परंतु काळाच्या ओघात ते गेलं आणि आता मशिनी आल्या तरी एकेकाळी या बैलांनी आपल्याला जगवलं याची आठवण शेतकऱ्यांच्या पोरांनी कायम ठेवली ती बैलाच्या गळ्यातले घुंगरू मशीनला बांधून . ते आजही छूम-छूम करत मशीनवर फिरत आहेत. कितीही शीतपेय बाजारात आली तरी उसाच्या रसाची लोकप्रियता काही कमी होणारी नाही.

त्यांची हि अपार श्रध्दा पाहून आम्हीही नतमस्तक होऊन बाहेर आलो आणि इथल्या विश्वस्तांना सांगितल्यावर त्यांनी आम्हाला गडावर रहायची परवानगी दिली. रात्रीची थंडी खूप वाढत होती. माझ्याकडे असलेल्या स्लीपिंग बॅग मुळे माझा तर निभाव लागला पण नितेश मात्र पक्का गारठला होता. पहाटे आरतीच्या होणाऱ्या आवाजाने जाग आली. सूर्यनारायणाने हळू हळू दर्शन द्यायला सुरुवात केली होती.  गडावरून दिसणारा सूर्योदयाचा नजारा फार छान होता. पुन्हा एकदा नाथांचे दर्शन घेऊन आम्ही सकाळच्या गारठणार्या थंडीतुन परतीचा मार्ग पकडला. एक वेगळा अनुभव घेऊन आमचा PMK चा प्रवास पूर्ण झाला होता.




© Mayur H. Sanap

रायगडचा संरक्षक किल्ले मानगड



(अशीही एक दिवाळी..)







किल्ले रायगडवरील दिपोत्सवाचा संकल्प हा गतवर्षीच पूर्ण झाला होता.  तसेही या वर्षी गडावर बरीचशी कामे चालू असल्याने सुरक्षेच्या कारणाने रायगडला जाता त्याचाच सरंक्षक असलेल्या "किल्ले मानगडावर" करायचा असं ठरवलं.  या वेळेला नितेश ला येणं जमलं नाही.  मग मी, माझा भाऊ सतीश आमचा मित्र सचिन आणि आमचा छोटा मावळा संस्कार असे आम्ही चौघे  निघालो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यानंतर, युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली होती. मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची निर्मिती केली आणि काही जुने गड मजबुत केले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रुला राजधानीवर हल्ला करणे कठीण झाले होते. त्याच प्रभावळीतील हा किल्ले मानगड.
माणगांव - निजामपूर करत आम्ही मशिदवाडीत शिरलो.  गडाच्या पायथ्याशी हे गाव आहे. तिथेच आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आणि किल्ले चढाईला सुरुवात केली. दिवाळी पाडव्याचा दिवस असल्याने अजिबात वर्दळ नव्हती. साधारण २०-२५ मिनिटाची चाल असणारी हि वाट हिरव्यागार वनराईतून आपल्याला विंझाई देवीच्या मंदिरात घेऊन जाते. गर्द झाडीमध्ये असलेले विंझाई देवीचे हे मंदिर फार सुंदर आहे . दिवाळीनिमित्त ग्रामस्थांनी मंदिरात केलेली सजावट दिसत होती. मंदिरात जाऊन आम्ही दिपोत्सव साजरा केला. थोडा वेळ विश्रांती घेऊन आणि मंदिर परिसरातील मूर्ती पाहून आम्ही पुढे चढाईला सुरुवात केली. वाटेत वानरांच्या एका कळपाचं आम्हाला दर्शन झालं. मानगडची चढाई जास्तीत जास्त १५-२० मिनिटांची आहे. थोड्या बांधलेल्या पायऱ्या, थोड्या कातळात खोदलेल्या पायऱ्या चालून गोमुख पद्धतीने बांधलेल्या गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात आम्ही पोहोचलो. दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार जरी शाबूत असले तरी दरवाजाची कमान मात्र कोसळलेली आहे. जवळच असणाऱ्या कमानीच्या एका दगडावर कमळ आणि मासा हि शुभ चिन्हे कोरलेली आहेत. या दरवाजातून आत आल्यावर डाव्या हाताला जाणारी एक वाट एका लेण्यासमोर पोहोचते.  कातळात खोदलेले हे लेणे प्राचीन आहे. 






लेण्याचे प्रवेशद्वार जरी छोटे असले तरी आत मध्ये प्रशस्त जागा आहे. त्याकडे पाहून धान्य साठवण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी या दोन्ही साठी याचा वापर केला जात असावा असे वाटत होते. त्या समोरच पाण्याचे एक मोठे टाके आहे. लेणी आणि टाकं  पाहून आम्ही मागे फिरलो आणि मुख्य प्रवेशद्वारातून गडाच्या उजवीकडे असणाऱ्या मारुतीचे दर्शन घेऊन गडमाथ्यावर जाण्यासाठी निघालो. नुकताच पावसाळा संपला असल्याने किल्ल्यावरती झाडी खूप दाट होती. त्यातूनच वाट काढत मुख्य सदर आणि काही घरांच्या जोत्याचे अवशेष पाहून पुढे दिसणाऱ्या ध्वजस्तंभाकडे आम्ही निघालो. कडेवर उभे राजं संपूर्ण आजूबाजूचा परिसर न्याहाळत असताना खरंच  याला रायगडचा सरंक्षक का बनवला असेल याची जाणीव झाली आणि मानगडचा  इतिहास आठवू लागलो. मानगड संदर्भातील महत्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या यादीत याचा उल्लेख आहे. महाराजांच्या काळात मानगड पुनर्बांधणी करून अधिक मजबूत  करण्यात आला. शिवपूर्व काळात देखील कोकण आणि दख्खन यांना जोडणाऱ्या सह्याद्रीतील घाट-वाटा प्रचलित होत्या. या घाट-वाटांना सरंक्षण देणे आणि त्या मोबदल्यात जकात वसूल करणे हि त्या काळातील परंपरा होती आणि हे काम या मार्गांवरील हे किल्ले करीत असत. मार्गांचे रक्षण करण्यासाठी गडावर सैन्य ठेवणे आणि व्यापाऱ्यांकडून मिळालेली जकात आणि परिसराची धारा वसुली सुरक्षितपणे गडावर ठेवणे असे दुहेरी काम या किल्ल्यांवर होत असे. कोकणातील निजामपूर-बोरवाडी-मांजुर्णे - कुंभे-घोळमार्गे घाटावरील पानशेत या व्यापारी मार्गाचे रक्षण मानगड करत होता. ऐतिहासिक कालखंडातील दस्तावेजांमध्ये मानगडचा विशेष उल्लेख नसला तरी पुरंदरच्या तहात मानगडचा उल्लेख आहे. शिवभारतात मानगडचा महानगड असाही उल्लेख आहे. संभाजी महारांच्या काळात १६८४ साली शहाबुद्दीन खान याने येथील प्रमुख लष्करी ठाणे निजामपूर येथे आक्रमण करतानाच आजूबाजूची खेडी उद्धवस्त  केल्याचा उल्लेख आहे. सरते शेवटी १८१८ साली पुण्याहून देवघर मार्गे कुर्डूपेठेत उतरून अवघ्या ४० सैनिकांच्या जोरावर विश्रामगड घेणाऱ्या कर्नल प्रॉथरच्या सेनेचा कप्तान सॉपीट याने मानगड  काबीज केला असा उल्लेख आहे.



गडावरून दिसणारा परिसर देखील उत्तम आहे. पूर्वेस सह्यकड्यांची रांग, उत्तरेस काळ नदीचे खोटे आणि ताम्हिणी घाट, पश्चिमेस निजामपूर माणगाव तळगड घोसाळगड जा परिसर तर दक्षिणेस कावळ्या डोंगर आणि पाचाड हा परिसर फार सुंदर दिसतो.
प्रत्येक किल्ल्याची काही ना काही विशेषता हि असतेच तशी मानगड ची विशेषता  म्हणजे त्याचा “चोर दरवाजा”. पुढे उत्तरेला आम्ही चोर-दरवाजा पाहण्यासाठी निघालो. चोर-दरवाजाला लागूनच खाली खोल दरी आहे. त्यावरून गडाच्या बांधकामाची किती जाणीवपूर्वक विचार केला गेला होता हे जाणवते. गडाच्या घेऱ्यात एकूण १२ पाण्याची टाकी आहेत. त्यापैकी ७ हि ज्ञात होती. तर पाच अज्ञात टाकी "दुर्गवीर" च्या शिलेदारांनी शोधून गाळ उपसून खुली करून जगासमोर आणली. मानगडच्या संवर्धनाची जबाबदारी दुर्गवीर परिवाराने आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि त्यांच्याच अथक परिश्रमाने आज मानगड ताठ मानेने उभा आहे.
मानगड उतरल्यावर आम्ही कारखानीस यांच्या घराकडे निघालो ते त्यांच्याकडील असलेली शिवकालीन तलवार पाहण्यासाठी. ती त्यांनी आजही जपून ठेवली आहे. आला-गेलेल्यांना ते आवडीने आपल्याकडची तलवार दाखवतात आणि त्यांना ज्ञात असलेली माहितीही सांगतात. त्यावेळी गडाच्या सरंक्षणासाठी रेड्यांचा बळी द्यायचा हि पद्धत होती अशी दंतकथाही त्यांनी सांगितली.
किल्ला म्हणजे अख्खा कारखानाच. त्यासाठी देखरेख, संरक्षण, पुरवठा, हिशोब, वसुली हि सर्वच खाती ओघाने येत आणि या प्रत्येक खाण्यासाठी माणसे नेमली जात होती. मानगडच्या व्यवस्थेसाठी सुद्धा  सरनोबत, हवालदार, कारखानीस, सबनीस नेमण्यात आले होते. विशेष म्हणजे यांचे वंशज आजही मानगडच्या पंचक्रोशीत आहेत तर कारखानीस-प्रभू यांची घरे मशिदवाडीत आहेत. यांच्या पूर्वजांनी महाराजांच्या काळात घेतलेल्या अपार कष्टांमुळे स्वराज्य उभे राहिले याचा सार्थ अभिमान या वंशजांना आजही आहे. मानगडला ला दिपोत्सव साजरा करून माझी दिवाळी हि सार्थकी लागली होती. इतरत्र पर्यटन करत असताना मानगड ला एखादी भेट द्यायला हरकत नाही बघा आजही तो रायगडची रखवाली करत उभा आहे.


कास पठार आणि वजराई धबधबा


वजराई धबधब्याच्या दिशेने..




पावसाळा सुरू झाला, की सह्याद्री मध्ये रानफुलांचा उत्सव सुरु होतो. हा उत्सव पाहण्याकरिता डोंगरभटक्यांची पावले मग आपोआपच सह्याद्रीकडे वळू लागतात. श्रावण महिन्याच्या अखेरीस तर हा उत्सव अधिकच पाहण्यासारखा असतो. कासच्या रूपाने महाराष्ट्राला हि एक फुलांचे पठार लाभले आहे. जांभा खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा, सीतेची आसवे अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! "मयुर २१ तारीख कुठे जाऊ नकोस. आपल्याला कास ला जायचंय". असा अमित चा मेसेज आला आणि मागचा-पुढचा विचार न करता "डन " असा रिप्लाय देऊन टाकला. मला तर कास भेटीपेक्षा वजराई धबधब्याचीच जास्त आस होती. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेल्या या कास पठाराची हि निसर्ग नवलाई पाहण्याचा योग हा या वर्षी आलाच. या वर्षी पाऊस जरा जास्तच झाल्याने किती प्रकारची फुले पाहायला मिळतील हि जरा शंकाच होती. पण शेवटी हे तर सर्व निसर्गाच्याच हातात; त्यामुळे रंगीबेरंगी फुलांची उधळण पाहायला मिळणे हा तर एक नशिबाचाच भाग असं समजून शनिवारी पहाटेच मी,अमित, स्वयम आणि पूनम निघालो. सकाळ-सकाळ खूप भूक लागली होती त्यामुळे वाटेतच एका छानश्या हॉटेलमध्ये "थालीपीठावर" यथेच्छ ताव मारून आम्ही पुढे निघालो. सातारा शहरातून जाणाऱ्या कासच्या रस्त्यावर आम्ही पोहोचलो. आदल्या दिवशीच पाऊस पडून गेला होता आणि आज वातावरण थोडं ढगाळ होतं. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सोनकीच्या फुलांनी आधीच आपली सलामी दिली होती जशी काय तुमचं कास वर स्वागत करण्यासाठी ती आधीच उत्सुक असावीत. शेवटी आम्ही कास ला थोड्याच वेळात पोहोचलोच. गाडी पार्क करून कासच्या पठारावर आम्ही फुलांचा हा सोहळा अनुभवण्यासाठी निघालो. कास व्यवस्थापन समितीने येथून पठारावर जाण्यासाठी प्रति व्यक्ती दहा रुपये शुल्क आकारून बसची व्यवस्था केली आहे.






 महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे. कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे.  पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. याच पठारावरील कास तलाव हा सातारा शहराला पाणीपुरवठा करतो.कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे.  हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्कोने  जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत त्याचा समावेश केला. कास हे नाव कासा या झाडाच्या इथल्या अस्तित्वामुळे पडले असल्याची दंतकथा सांगितली जाते. कास या वृक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे याची पाने पिकल्यानंतर रक्तवर्णी दिसतात. याच गावालगत समुद्रसपाटीपासून १२१३ मीटर उंचीवरील कास पठाराचे एक हजार ९७२ हेक्टर राखीव वनक्षेत्र म्हणून वनखात्याने जाहीर केले आहे. हे पठार सातारा वन विभागातील मेढा व सातारा वनक्षेत्राच्या हद्दीत येते. कास गावात ग्रामदैवत असलेल्या कासाई देवीचे मंदिर सुद्धा आहे.
वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे कासवरील फुलांचे अस्तित्व धोक्यात येउ लागले होते. त्यामुळे वनविभागाने पठारावर दुतर्फा जाळी लावून त्यांना सरंक्षित केले आहे रानफुले पाहण्यासाठी येणाऱ्या शेकडो पर्यटकांच्या सोयीसाठी कास पठारावर आता पर्यटकांसाठी जांभ्या दगडात पायवाटा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याला एक वेगळचं रूप प्राप्त झालं आहे.  या वर्षी सात ते आठच प्रकारची फुले आली आहेत अशी तेथील वनविभागाच्या एका कार्यकर्त्याने माहिती दिली. निळ्या ,गुलाबी,जांभळ्या,पांढऱ्या ,पिवळ्या अशा वेगवेगळ्या रंगाची फुलांची उधळण पाहण्यात एक वेगळीच मजा येत होती. काही  विरळ तर काही ठिकाणी गर्द असे  गुलाबी फुलांचे गालिचे पहावयास मिळत होते. ढगाळ वातावरणातून मधूनच येणारी एखादी पावसाची सर आल्हाददायक वाटत होती. फोटोग्राफर्स साठी मनसोक्त फोटो काढायचे हक्काचं ठिकाण तर कासच.  त्यात आजकाल प्री -वेडिंग चे फॅड असल्याने निसर्गप्रेमींपेक्षा जास्त गर्दी त्यांचीच दिसत होती. कास पठारावर काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंतच म्हणावा लागेल.





कास पठारावरील फुलांचा आनंद घेतल्यानंतर दुसऱ्या गेट ने आम्ही बाहेर पडलो आणि कास तलावाकडे कूच केली. कास तलावाकडे जाताना गाडी पाठीमागेच ठेवून आम्ही मस्त चालत -चालत, थोडं फोटोसेशन करत आणि निसर्गाच्या  आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत कास तलावाजवळ पोहोचलो. थोडा वेळ कास तलावात पाण्यात पाय टाकून बसलो आणि माझी पवना तलावाच्या कॅम्पिंगची आठवण जागी झाली.

आता कुठे जायचं ? असा प्रश्न अमितने विचारल्यावर मी सांगितलं आता आपण  वजराई धबधबा पाहायला जाऊया.  वाटेत तिथल्याच एका ग्रामस्थाला विचारलं असता त्याने सांगितलं कि, तुम्ही जर सरळ गेलात तर धबधबा दिसेल पण एका बाजूनेच दिसेल. हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये कोसळतो हीच त्याची खासियत आहे आणि तो जर पाहायचा असेल तर इथून एक जंगलातून रस्ता जातो तिकडे पाहायला मिळेल. पण आता त्याचा रस्ता  नवख्या माणसाला कसा सापडणार बराच सल्लामसलत केल्यावर एक ठराविक मानधन ठरवल्यावर तो आम्हाला दाखवायला तयार झाला.
"अरे !! पण तो पाहून आपण परत येऊया का? तीन वाजले आहेत आता. " -- अमित
"येऊ. रे! परत काय वेळ येणार नाही अशी. चल तू . " असं बोलून मी अमित ला तयार केला. पण आमचा ड्राइवर मात्र कच्च्या रस्त्यावर गाडी घालायला तयार नव्हता. आपल्याला फक्त थोड्या अंतरापर्यंतच गाडी घेऊन जायचंय आणि मग आम्ही तिथून पायी जाऊ असं सांगितल्यावर थोडं  नाखुशीनेच तो तयार झाला.
गाडी बाजूला लावून निसर्गाच्या एका अनामिक ओढीने आम्ही धबधब्याकडे कूच केली. अमित थोडा साशंकच होता कि यावर विश्वास कसा ठेवायचा. पण मी मात्र बिनधास्त होतो. नाव-गाव विचारत, चालत-चालत त्यांच्याबरोबर मी बोलायला सुरुवात केली.
"तुमचं नाव काय हो?"
"माझं नाव धोंडिबा काळे. म्या हिथलाच हाय पलीकडच्या गावातला. दर शनिवार-रविवार लोक येत्यात इकडं . कोणतरी येतंय आणि मग धबधबा दावायच्या निमित्ताने आम्हाला जरा मिळतंय काय बाय उत्पन्न."
पुन्हा एकदा आडवाटेवरच्या गावातील लोकांचा रोजच्या जगण्यातील संघर्ष समोर येत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही जंगलातून चालत होतो. पूनम चालेल कि नाही असं वाटत असताना ती मात्र एकदम बिनधास्त अवघड वाटेवरून पण चालत होती.
"अरे!! मयुर  मैने और स्वयम ने ट्रेकिंग किया है पहले.. तुम टेंशन मत लो .. चलो आगे".


भांबवलीच्या जंगलात बरेच वन्यजीव आहेत, मुख्यत्वे करून रानगवे, रानडुक्कर, भेकरे, ससे, वानर, इ. आणि क्वचित वाघ, अस्वलेदेखील दिसतात असे बोलतात. अनेक प्रकारचे पक्षी, मुख्यत्वे करून मोर-लांडोर यांचे दर्शन होते. फुलपाखरांच्या असंख्य जाती दृष्टीस पडतात. या जंगलात विविध प्रकारची औषधी झाडे असून प्रामुख्याने हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकेकाई, पिसा, मरुडशेंग, अश्वगंध, बेडकीचा वेल (डायबिटीससाठी) आणि इतर वनौषधी झाडेझुडपे आढळतात.
जंगलातून चालत असताना पावसाच्या हलक्या सरी चालूच होत्या. त्या दाट जंगलातून वाट काढत एका निमुळत्या उतारावर आम्ही जाऊन पोहोचलो आणि समोर जे काही दृश्य पहिले ते खरंच अवर्णनीय होतं.केलेल्या पायपिटीचं सार्थक झालं होतं. एवढा मोठा तीन टप्प्यांमध्ये  कोसळणारा धबधबा मी प्रथमच पाहत होतो. असं वाटतं  होतं  कि, पांढऱ्याशुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याने हिरवी शाल पांघरली आहे आणि वरती त्याने ढगांचा मुकुट चढवला आहे. आम्ही जिथे उभे होतो तिथून खाली फक्त खोल दरी होती. जरा जरी पुढे गेलो आणि तोल गेला कि डायरेक्ट स्वर्गच. वजराई धबधब्याची उंची हि तब्बल ५६० मी. (१८४० फूट) इतकी आहे. तो तीन टप्प्यांत कोसळतो आणि हा मेघालयातील नोहाकालीकाई नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात उंचीवरून कोसळणारा धबधबा मानला जातो.
धबधबा पाहून तिथून आम्ही परतीला निघालो. परतताना माझ्या पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला, ओझरती नजर टाकली तर काही दिसलं नाही म्हणून दुर्लक्ष केलं तर परत पायाला चुरचुरल्याचा जाणवलं. नीट  पाहिलं तर दिसलं  कि पायाला काळपट काहीतरी चिकटलंय म्हणून मी हात लावला तर ते हालचाल करायला लागलं. "अरे!! हा तर जळू.." असं मी जोरात बोललो.
"थांबा..  थांबा..  मी काढतो. काही घाबरू नका त्याचं  काही नसतं  एवढं." असं  बोलून धोंडिबानी त्याला आपल्या हाताने काढलं  आणि टाकळ्याचा  पाला लावला. पण त्याचा काही फारसा फायदा झाला नाही. पुढे चालत आलो तर पुन्हा त्याच ठिकाणी ४-५ चिकटले होते. आता मात्र ते माझी पाठ सोडायला तयारच नव्हते. कोयनेच्या जंगलात जळू त्रास देतात असं ऐकलं  होतं . पण आज ते प्रत्यक्षात मी अनुभवत होतो. नंतर पाहतो तर अमित चप्पल ठोकायला लागला होता.   त्यांचा पाय पूर्ण रक्ताने लाल झाला होता. थोडं SAVLON लावून आम्ही जास्त वेळ न काढता गाडीत बसलो. पायातल्या सॅंडल आम्ही घरात परत जाई पर्यंत घालायच्याच नाही असं ठरवलं न जाणो त्यात एखादा चिकटून बसला असेल आणि परत त्रास देईल. अमित चं रक्त थांबतच नव्हतं . मग त्याला  मी कॉटन लावून धरून ठेवायला सांगितलं आणि थोड्यावेळाने ते आपोआप थांबेल. घाबरू नको. असा सल्ला दिला. तो पण मनातल्या मनात म्हणत असेल, "आयला उगाच लागलो मयूरच्या नादी. कुठे पण नेतो हा .. ".
नंतर घरी पोहोचल्यावर लक्षात आला कि पूनम चा पाय देखील रक्ताने लाल झाला होता. जळूने स्वयम सोडुं सगळ्यांना शिकार बनवलं होतं . मग माझ्या डॉक्टर मित्राचा अभिजित वायचळ चा फोनवरून सल्ला घेतला आणि precaution म्हणून तिघांनी एक TT  चे इंजेकशन घेतलं. परंतु भांबवलीच्या धबधब्याचे जे सुख अनुभवलं होतं त्याच्यापुढे झालेला त्रास हा अगदीच नगण्य होता.
भांबवली वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. कास पुष्पपठारापासून अवघ्या पाच किमी अंतरावर निसर्गाचा हा चमत्कार आहे. या धबधब्यापर्यंत गाडीने जाता येत नाही. त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य अबाधित राहिले आहे.नीरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, वीणेच्या झंकारासारखा वाऱ्याच्या झुळकेने केलेला आवाज, पाण्याचा खळखळाट असं हे सुंदर, मनमोहक ठिकाण.भांबवली वजराई धबधबा बघितला कि स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखे वाटते. लांबच लांब पसरलेले हिरवेगार ओथंबून खाली आलेले काळे ढग, खळाळणारे निर्झर आणि मधूनच डोकावणारे छोटे धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

भांबवली वजराई धबधबा पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर आवर्जून भेट द्यायला हवी. भांबवली वजराई धबधबा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो हे मात्र नक्की. 








मी काही वनस्पती अभ्यासक नाही परंतु छंद म्हणून कासपठारावर आढळलेल्या काही फुलांची जुजबी माहिती खाली देत आहे.

11. Common name:- Marsh DewFlower
मराठी नाव:- अबोलीमा
Botonical Name:- Murdannia lanuginose
प्रजाती:- डे फ्लॉवर फॅमिली
हंगाम:- ऑक्टोबर ते नोव्हेंबर
आढळण्याची ठिकाणं :-  भारत द्विलकल्प (Peninsular India)




22. Common name:- Hairy Smithia or Micky mouse
मराठी नाव:- कावला
Botonical Name:- Smithia hirsuta
प्रजाती:-  Pea family
हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर





 3.Common name:- Large Dewflower
मराठी नाव:- नीलिमा
Botonical Name:- Murdannia simplex
प्रजाती:-  डे फ्लॉवर फॅमिली
हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर






 4. Common name:- Rock Dipcadi
मराठी नाव:- दिपकाडी
Botonical Name:- Dipcadi saxorum
प्रजाती:-  Asparagus family
हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर
आढळण्याची ठिकाणं :-  बोरिवली मधील कान्हेरी च्या परिसरात मुख्यत्वे आढळतात






 5. Common name:- Grass leaved
मराठी नाव:- खुरपापणी किंवा सीतेची आसवे
Botonical Name:- Utricularia graminifolia
प्रजाती:-  Bladderwort family
हंगाम:- सप्टेंबर ते नोव्हेंबर

आढळण्याची ठिकाणं :-  सह्याद्री- पश्चिम घाट