रायगडचा संरक्षक किल्ले मानगड



(अशीही एक दिवाळी..)







किल्ले रायगडवरील दिपोत्सवाचा संकल्प हा गतवर्षीच पूर्ण झाला होता.  तसेही या वर्षी गडावर बरीचशी कामे चालू असल्याने सुरक्षेच्या कारणाने रायगडला जाता त्याचाच सरंक्षक असलेल्या "किल्ले मानगडावर" करायचा असं ठरवलं.  या वेळेला नितेश ला येणं जमलं नाही.  मग मी, माझा भाऊ सतीश आमचा मित्र सचिन आणि आमचा छोटा मावळा संस्कार असे आम्ही चौघे  निघालो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यानंतर, युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली होती. मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची निर्मिती केली आणि काही जुने गड मजबुत केले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रुला राजधानीवर हल्ला करणे कठीण झाले होते. त्याच प्रभावळीतील हा किल्ले मानगड.
माणगांव - निजामपूर करत आम्ही मशिदवाडीत शिरलो.  गडाच्या पायथ्याशी हे गाव आहे. तिथेच आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आणि किल्ले चढाईला सुरुवात केली. दिवाळी पाडव्याचा दिवस असल्याने अजिबात वर्दळ नव्हती. साधारण २०-२५ मिनिटाची चाल असणारी हि वाट हिरव्यागार वनराईतून आपल्याला विंझाई देवीच्या मंदिरात घेऊन जाते. गर्द झाडीमध्ये असलेले विंझाई देवीचे हे मंदिर फार सुंदर आहे . दिवाळीनिमित्त ग्रामस्थांनी मंदिरात केलेली सजावट दिसत होती. मंदिरात जाऊन आम्ही दिपोत्सव साजरा केला. थोडा वेळ विश्रांती घेऊन आणि मंदिर परिसरातील मूर्ती पाहून आम्ही पुढे चढाईला सुरुवात केली. वाटेत वानरांच्या एका कळपाचं आम्हाला दर्शन झालं. मानगडची चढाई जास्तीत जास्त १५-२० मिनिटांची आहे. थोड्या बांधलेल्या पायऱ्या, थोड्या कातळात खोदलेल्या पायऱ्या चालून गोमुख पद्धतीने बांधलेल्या गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात आम्ही पोहोचलो. दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार जरी शाबूत असले तरी दरवाजाची कमान मात्र कोसळलेली आहे. जवळच असणाऱ्या कमानीच्या एका दगडावर कमळ आणि मासा हि शुभ चिन्हे कोरलेली आहेत. या दरवाजातून आत आल्यावर डाव्या हाताला जाणारी एक वाट एका लेण्यासमोर पोहोचते.  कातळात खोदलेले हे लेणे प्राचीन आहे. 






लेण्याचे प्रवेशद्वार जरी छोटे असले तरी आत मध्ये प्रशस्त जागा आहे. त्याकडे पाहून धान्य साठवण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी या दोन्ही साठी याचा वापर केला जात असावा असे वाटत होते. त्या समोरच पाण्याचे एक मोठे टाके आहे. लेणी आणि टाकं  पाहून आम्ही मागे फिरलो आणि मुख्य प्रवेशद्वारातून गडाच्या उजवीकडे असणाऱ्या मारुतीचे दर्शन घेऊन गडमाथ्यावर जाण्यासाठी निघालो. नुकताच पावसाळा संपला असल्याने किल्ल्यावरती झाडी खूप दाट होती. त्यातूनच वाट काढत मुख्य सदर आणि काही घरांच्या जोत्याचे अवशेष पाहून पुढे दिसणाऱ्या ध्वजस्तंभाकडे आम्ही निघालो. कडेवर उभे राजं संपूर्ण आजूबाजूचा परिसर न्याहाळत असताना खरंच  याला रायगडचा सरंक्षक का बनवला असेल याची जाणीव झाली आणि मानगडचा  इतिहास आठवू लागलो. मानगड संदर्भातील महत्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या यादीत याचा उल्लेख आहे. महाराजांच्या काळात मानगड पुनर्बांधणी करून अधिक मजबूत  करण्यात आला. शिवपूर्व काळात देखील कोकण आणि दख्खन यांना जोडणाऱ्या सह्याद्रीतील घाट-वाटा प्रचलित होत्या. या घाट-वाटांना सरंक्षण देणे आणि त्या मोबदल्यात जकात वसूल करणे हि त्या काळातील परंपरा होती आणि हे काम या मार्गांवरील हे किल्ले करीत असत. मार्गांचे रक्षण करण्यासाठी गडावर सैन्य ठेवणे आणि व्यापाऱ्यांकडून मिळालेली जकात आणि परिसराची धारा वसुली सुरक्षितपणे गडावर ठेवणे असे दुहेरी काम या किल्ल्यांवर होत असे. कोकणातील निजामपूर-बोरवाडी-मांजुर्णे - कुंभे-घोळमार्गे घाटावरील पानशेत या व्यापारी मार्गाचे रक्षण मानगड करत होता. ऐतिहासिक कालखंडातील दस्तावेजांमध्ये मानगडचा विशेष उल्लेख नसला तरी पुरंदरच्या तहात मानगडचा उल्लेख आहे. शिवभारतात मानगडचा महानगड असाही उल्लेख आहे. संभाजी महारांच्या काळात १६८४ साली शहाबुद्दीन खान याने येथील प्रमुख लष्करी ठाणे निजामपूर येथे आक्रमण करतानाच आजूबाजूची खेडी उद्धवस्त  केल्याचा उल्लेख आहे. सरते शेवटी १८१८ साली पुण्याहून देवघर मार्गे कुर्डूपेठेत उतरून अवघ्या ४० सैनिकांच्या जोरावर विश्रामगड घेणाऱ्या कर्नल प्रॉथरच्या सेनेचा कप्तान सॉपीट याने मानगड  काबीज केला असा उल्लेख आहे.



गडावरून दिसणारा परिसर देखील उत्तम आहे. पूर्वेस सह्यकड्यांची रांग, उत्तरेस काळ नदीचे खोटे आणि ताम्हिणी घाट, पश्चिमेस निजामपूर माणगाव तळगड घोसाळगड जा परिसर तर दक्षिणेस कावळ्या डोंगर आणि पाचाड हा परिसर फार सुंदर दिसतो.
प्रत्येक किल्ल्याची काही ना काही विशेषता हि असतेच तशी मानगड ची विशेषता  म्हणजे त्याचा “चोर दरवाजा”. पुढे उत्तरेला आम्ही चोर-दरवाजा पाहण्यासाठी निघालो. चोर-दरवाजाला लागूनच खाली खोल दरी आहे. त्यावरून गडाच्या बांधकामाची किती जाणीवपूर्वक विचार केला गेला होता हे जाणवते. गडाच्या घेऱ्यात एकूण १२ पाण्याची टाकी आहेत. त्यापैकी ७ हि ज्ञात होती. तर पाच अज्ञात टाकी "दुर्गवीर" च्या शिलेदारांनी शोधून गाळ उपसून खुली करून जगासमोर आणली. मानगडच्या संवर्धनाची जबाबदारी दुर्गवीर परिवाराने आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि त्यांच्याच अथक परिश्रमाने आज मानगड ताठ मानेने उभा आहे.
मानगड उतरल्यावर आम्ही कारखानीस यांच्या घराकडे निघालो ते त्यांच्याकडील असलेली शिवकालीन तलवार पाहण्यासाठी. ती त्यांनी आजही जपून ठेवली आहे. आला-गेलेल्यांना ते आवडीने आपल्याकडची तलवार दाखवतात आणि त्यांना ज्ञात असलेली माहितीही सांगतात. त्यावेळी गडाच्या सरंक्षणासाठी रेड्यांचा बळी द्यायचा हि पद्धत होती अशी दंतकथाही त्यांनी सांगितली.
किल्ला म्हणजे अख्खा कारखानाच. त्यासाठी देखरेख, संरक्षण, पुरवठा, हिशोब, वसुली हि सर्वच खाती ओघाने येत आणि या प्रत्येक खाण्यासाठी माणसे नेमली जात होती. मानगडच्या व्यवस्थेसाठी सुद्धा  सरनोबत, हवालदार, कारखानीस, सबनीस नेमण्यात आले होते. विशेष म्हणजे यांचे वंशज आजही मानगडच्या पंचक्रोशीत आहेत तर कारखानीस-प्रभू यांची घरे मशिदवाडीत आहेत. यांच्या पूर्वजांनी महाराजांच्या काळात घेतलेल्या अपार कष्टांमुळे स्वराज्य उभे राहिले याचा सार्थ अभिमान या वंशजांना आजही आहे. मानगडला ला दिपोत्सव साजरा करून माझी दिवाळी हि सार्थकी लागली होती. इतरत्र पर्यटन करत असताना मानगड ला एखादी भेट द्यायला हरकत नाही बघा आजही तो रायगडची रखवाली करत उभा आहे.


No comments: