सुरगड ची सुरस्य भ्रमंती

सुरगड ची सुरस्य  भ्रमंती



रायगड जिल्हा म्हणजे किल्ल्यांचे आगार. नाशिक नंतर सगळ्यात जास्त किल्ले असणारा आणि रायगड जिल्हा म्हणजे किल्ल्यांचे आगार. नाशिक नंतर सगळ्यात जास्त किल्ले असणारा आणि स्वराज्याच्या राजधानीवरून नामकरण झालेला हा जिल्हा. तब्बल ५० किल्ल्यांचे वरदान लाभलं आहे या जिल्ह्याला. या पैकीच एक सुरगड|रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील एक अप्रचलित किल्ला.


सुरगड चा उभा कातळकडा 
मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड ला जाताना खांब गावाच्या पाठीमागे नेहमी एक उभा डोंगराचा कातळकडा दिसायचा. लहानपणी त्याचे खूप आकर्षण वाटायचे पण त्याच्याच डोंगररांगेत एक किल्ला वसला असेल असं तेव्हा कधी वाटलं नव्हतं. नंतर गड-किल्ले फिरायला लागल्यानंतर कळलं कि आपल्या गावा जवळच एक सुंदर किल्ला आहे. ज्याची फारशी कोणाला माहिती नाही.  या वर्षीच्या पावसाळ्यातील गड-भ्रमंतीची सुरुवात त्यानेच करायची अस ठरवलं.
मुंबई-गोवा महामार्गाच्या अगदी जवळचा आणि आपल्या कातळकडयामुळे लांबूनही लक्ष वेधणारा आणि खास पावसाळयात भेट देण्याजोगा असा हा किल्ला.
प्राचीन काळापासून कुंडलिका नदीतून व्यापार चालायचा. घाटमार्गावर जाणाऱ्या बाजारपेठेतील व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. नदितून तीच्या खोर्‍यातून जाणार्‍या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तळा, घोसाळ सुरगड इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली गेली. खांब गावाजवळील घेरासुरगडवाडी जवळ असलेला सुरगड हा महत्वपूर्ण गड याच साखळीत आहे. शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये केलेल्या कोकणच्या मोहिमेत सुधागड, सरसगड, तळगड,घोसाळगड आणि सुरगड देखील होता. त्यांनी जे १११ किल्ले वसविले होते त्यात सुरगड देखील होता.
एकदाची सुरगडची मोहीम ठरली आणि नेहमीप्रमाणे मी नितेश आणि आमच्यासोबत  आणखी 3 सवंगडी गोपाल, शुभम आणि गुरु तयार झाले. मी डोंबिवली वरून येई पर्यंत सगळेजण नागोठणे या गावाजवळ थांबणार होते आणि तिथून मग एकत्र पुढे जायचं असं ठरलं. रविवारी सकाळी पहाटेच निघालो. स्टेशनला आल्यावर कळलं सेंट्रल रेल्वे ची बोंबाबोंबआहे. त्यामुळे मला दिव्यावरून जाणारी सावंतवाडी पॅसेंजर भेटणार नव्हती. सकाळ सकाळ डोक्याला शॉट लागला होता. माझ्यासाठी सगळे जण थांबणार असल्याने उशीर करून चालणार नव्हतं. शेवटी “वाट पाहीन पण एस.टीनेच जाईन.” या ब्रीदवाक्या प्रमाणे आपली एस.टी चं वेळेला कामी आली. साधारण ९.१५ ला मी नागोठणेला पोहोचलो. तिथून आम्ही सगळे एकत्र निघालो. आज नेमकी पावसाने सुरुवात केली होती. बाईकवरून पावसाच्या धारा या सुईप्रमाणे टोचत होत्या. थोड्याच वेळात आम्ही खांब गावाजवळ आलो. ट्रेकला गेल्यावर वडा-पाव नाही खाल्ला तर मग काय नवलचं! गावच्या टपरीवरच्या वडा-पावची चव तर स्टार हॉटेल मधल्या बर्गर ला सुद्धा येणार नाही. महामार्गालगतच असलेल्या एका हातगाडीवर सगळयांनी वडा-पाव वर यथेच्छ ताव मारला आणि मग तिथून आम्ही घेरा-सुरगड ला जाण्यासाठी खांब गावातून प्रवेश केला.
खांबच्या पूर्वेला १.५ -२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वैजनाथ गावाच्या पाठीमागे असणाऱ्या डोंगर रांगेवर घेरा-सुरगड आहे. पायथ्याशीच असणाऱ्या घेरा-सुरगड वाडीपर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे. इथेच बहुसंख्येने पार्टे कुटुंबियांची घरे असणारी वाडी आहे. तिथेच अंगणवाडी जवळ आम्ही आमच्या दुचाकी गाड्या लावल्या आणि तिथून दोन घरांच्या मधून एका गल्लीतून किल्ल्याकडे जाणारी वाट होती, तिथूनच आम्ही खाली उतरलो. आमचा म्होरक्या म्हणून नितेश ला पुढे केला आणि एका मागोमाग एक आम्ही गडाची वाट चालू लागलो. घेरा सुरगड ते गडाचा पायथा ही साधारण अर्धापाउण तासाची चाल आहे. वाटेत एक फार मोठी विहीर लागली तिथूनच आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. शेतीचा भाग जाऊन आता जंगलाचा रस्ता सुरु झाला होता. सुरगडच्या या गर्द झाडीतून चालत असताना समोरच आम्हाला डोंगरची काळी मैना (करवंद) दिसली मग काय! मी आणि गोपाल ने तिच्यावर चांगलाच ताव मारला. “ ये देखो ये जो हम खा रहे है | इससे हमे बहोत प्रोटीन मिलता है” असा Bayer Grill चा मिश्कील डायलॉग मारत आम्ही पुढे निघालो. 






एका टप्प्यावर आल्यावर एक मार्ग अनसाई देवी कडे आणि दुसरा घळीतून वर गडाकडे जाणाऱ्या वाटेकडे जात होता. हा मार्ग सगळ्यात जवळचा असला तरी थोडा अवघड आहे. आमच्या अगोदर मुंबईहून आलेली काही हौशे-नवशे रोप लावून तो कातळकडा चढायचा प्रयत्न करत होते.पण त्यांची काही हिम्मत होत नव्हती. बराचवेळ तिथेच रेंगाळत बसलेले वाटत होते. त्या कातळात खोदलेल्या जेमतेम २-३ इंचाच्या पायऱ्या .. धरायला नीट खोबण्याहि नव्हत्या अश्याचा आधार घेऊन वर जावे लागणार होते. तसे पाहायला गेलात तर फक्त ५ मिनिटांचं अंतर ;पण सतत पडणाऱ्या पावसामुळे घसरण्याची भीती वाटत होती आणि ते पार करणं म्हणजे एक थ्रिलच होतं . नितेश ने धीर दिला आणि मग मी आणि शुभम ने तो अवघड टप्पा बिना दोराच्या साहाय्याने पार केला.  नितेश तर आता पक्का ट्रेकर झाला होता. त्याने ते अंतर लीलया पार केलं. आम्हाला पाहून मुंबईहून आलेल्या मंडळींनाही थोडा धीर आला. “See yaar! this guys are going without any rope; come you can do it” असं म्हणून त्यांच्यातला एक आपल्या सहचारिणीला धीर देत होता.


सुरगड चा अवघड  टप्पा 


वर पोहोचल्यावर लगेचच उजव्या हाताला मारुतीरायाची सुंदर मूर्ती दिसली. पिळदार मिशा, कमरेला खंजीर आणि रामदासांनी वर्णन केल्याप्रमाणे "पुच्छ ते मुरडिले माथा" असलेली ही आगळ्या वेगळ्या रूपातील मूर्ती कायम लक्षात राहण्यासारखी आहे. गडावर कुठेही गेलो कि तिथल्या गड्देवतेला दिवा-बत्ती करायची हा माझा शिरस्ता तोआम्ही इथेही पार पडला. मारुतीरायासमोर दिवा-बत्ती करून आम्ही पुढे निघालो. उजवीकडच्या वाटेने गेलो, कि घेरा सुरगड गावाकडे तोंड करून उभा असलेला एक बुरुज आहे. तो पाहून आम्ही पुढे निघालो. सुरगड हा  आला दक्षिणोत्तर पसरला आहे. वरून दक्षिण दिशेला नजर टाकली कि कुंडलिका नदीचे अर्धचंद्राकृती दिसते. अगदी पंढरपूर मधल्या चंद्रभागेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 


कुंडलिका नदी चे विहंगम दृश्य 
तिथेच थोडा वेळ विश्रांती घेतलीवरून दिसणाऱ्या कुंडलिकेचे आणि सभोवतालच्या हिरव्यागार निसर्गमय दृश्याने आम्ही सगळे मोहून गेलो होतोअवचितगडघोसाळगड हे किल्ले आणि पायथ्याचं टुमदार घेरा सुरगड गाव वरून छान दिसतं होतं . तिकडेच  पश्चिमेला कड्याला लागूनच पाण्याच्या काही  टाक्या आहेत. त्या पाहून आम्ही पुढे निघालो. वाटेत आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी सिंहासन सुद्धा पाहायला मिळते. 


दगडी सिंहासन


Water Tank
Water Tank2


गडमाथ्यावर गेल्यावर  किल्ल्यावरील कोठार, भग्नावस्थेतील हेमाडपंती मंदिर, पाण्याची टाकी, सदर आदी वास्तू आपल्याला दिसतात. या गडावर एक अवाढव्य बांधणीचा बुरूजही आहे तो हि आपल्याला दिसतो. हे सगळं पाहत असतानाच गडाच्या माचीवर  एक  शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. हा शिलालेख आवर्जून पाहण्यासारखा आहे. अरबी देवनागरीत कोरलेल्या या शिलालेखानुसार सिद्दीसाहेब नावाच्या माणसाच्या हुकमावरून सूर्याजी याने हा किल्ला बांधला. या वेळी तुकोजी हैबतराव गडाचे सुभेदार होते. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिवयांनी सिद्दीकडून जिंकून घेतला नंतर इसवीसन १७३३ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्दीकडून जिंकून घेतला. त्याकाळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्यान्बद्दल नोंद आढळते. कर्नल प्रॉथरने १८१८ साली किल्ल्याचा ताबा घेतल्याची इतिहासात नोंद आहे. सुरगड किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजांच्या काळात बांधला असावा असा अंदाज आहे.

शिलालेख 

पुढे असलेला  ढालकाठी नावाचा एक बुरुज आहे आणि त्याच्याच खाली एक पाण्याच्या टाकं आहे. तिथून समोरच्या डोंगरावर एक समाधी सारखा छोटा ठिपका मला दिसला. "अरे ! ते बघ तिकडे एक समाधी दिसते कोणाची तरी ..परंतु मध्ये हि दरी आहे.."
"चला मग जाऊया.. येऊ आपण बघून " गुरु म्हणाला.



सतीची समाधी



परंतु समोरचा डोंगर एका छोट्याश्या दरीने अलग झाला होता. गुरूने मात्र हट्ट धरला कि आपण जाऊच ती पहायला; मिळेल कुठेतरी रस्ता!  क्षणभर आम्ही सगळ्यांनी विचार केला कारण सतत पडणारा जोरदार पाऊस आणि वाट नाही मिळाली तर परत हरवण्याची भीती म्हणून हो नाही करत असताना गुरु ने पुढे जाऊन रस्ता शोधलासुद्धा आणि आम्ही मग सगळे त्याच्या पाठोपाठ त्या दरीतून पार करत समोरच्या डोंगरावर चढलो आणि ती समाधी पाहली. ती एका सतीची समाधी आहे हे नंतर आम्हाला एका गावकऱ्यांकडून कळलं.  पुढे तसाच पठारावरून आम्ही पुढे चालत गेलो आणि एका मोकळ्या कातळावर मस्त पैकी एक जागा बघून सोबत आणलेल्या शिदोरीवर सगळ्यांनी मस्त पैकी ताव मारला.  आता परतीच्या प्रवासासाठी परत एवढ्या मागे जाण्यापेक्षा एकडूनच एखादी वाट शोधुया म्हणून आम्ही तसेच पुढे चालत राहिलो काही ठिकाणी दगडावर असलेले दिशादर्शक बाण मधेच गायब झाले आता मात्र कुठे तरी भलतीकडेच आपण जाऊ त्यापेक्षा आलो त्याच वाटेने आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. मग पुन्हा हा डोंगर उतरून त्या दरीतून अंतर पार करत आम्ही सुरगडच्या मुख्य डोंगर पठारावर आलो. धुवाधार पाऊस , सतत वाहणारा वारा, असणारे धुके आणि त्या दरीतून चाललेली ढगांची पकडापकडी  असे त्या दोन डोंगरांमधील असणाऱ्या दरीतून दिसणारे दृश्य म्हणजे स्वर्गसुखच होत. सह्याद्रीची हीच तर खरी विशेषतः आहे.
पुन्हा आम्ही  त्या घळीच्या अवघड टप्प्यावर आलो आता आली का पुन्हा उतरायची पंचाईत!! .. एकवेळ आपल्याला चढताना काही वाटत नाही पण अश्या अवघड टप्प्यावर आल्यावर उतरताना मात्र लागते. गुरु २ मिनिटात उतरून गेला खाली. तशी गुरुची आणि माझी या ट्रेक साठी प्रथमच भेट झाली होती. तो तर अनवाणी पायानेच ट्रेक करत होता. अगदी पक्का ट्रेकर, शांत पण तितकाच धाडसी स्वभावाचा. तो तर बॅग मध्ये रोपच घेऊन आला होता कुठे  गरज लागली तर ; मग नितेश च्या सहाय्याने मी आणि शुभम ने तो अवघड टप्पा पुन्हा सहज पार केला नि उतरून पुढे निघालो.
खाली उतरल्यावर अनसाई देवीच्या मंदिराजवळ आलो सोबत आणलेले दिवा-बत्तीचे सामान आता पूर्णपणे भिजून गेलं होतं त्यामुळे इथे काही दिवा लावता आला नाही. फक्त दर्शनाचा लाभ घेतला. तिथेच बाजूला एक तोफ ठेवलेली आहे. ती पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. 


अनसाई देवीचे मंदिर 



थोडे पुढे गेल्यावर आम्हाला जाणवले कि आपण परत दुसरीच वाट पकडली हि वाट घनदाट जंगलातून जात होती. काही केल्या रस्ता संपतच नव्हता. "अरे चकवा तर नाही लागला ना ??" मी बोललो.
"अरे प्रत्येक जंगलात चकवा हा असतोच.. घाबरायचं नाही आपण मग काही होत नाही चाल पुढे.. "गुरूने पाठीमागून मला सांगितले.
मग आम्ही मात्र तसेच पुढे पुढे चालत राहिलो. या वाटेवर आम्हाला एका भल्या मोठ्या वानरांच्या जोडीने दर्शन दिले. अधून मधून मोरांचा कानावर आवाज पडत होता. गावाला वटपौर्णिमेला पानात आवर्जून ठेवले जाणारे "अळूचं" फळ हे कितीवेळा खाल्लं होतं. पण त्याचं झाड मात्र इथे पहिल्यांदाच पाहायला मिळालं होतं मला. यावरूनच सुरगडची वनसंपदा हि किती विपुल प्रमाणात आहे हे इथे आल्यावर जाणवत होतं. थोडे पुढे गेल्यावर एक काका आम्हाला लाकडाची एक मोळी घेऊन जाताना दिसले मग त्यांनीच सांगितले असेच पुढे खाली डाव्या बाजूने जा. मग तुम्ही उतराल खाली. त्याने सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात आम्ही खाली पोहोचलो. आणि सगळ्यांना हायसे झाले.

किल्ल्याचा पसारा तसा लहान असल्याने तासाभरात किल्ला बघून पूर्ण होतो. परंतु नवीन वाट शोधण्याच्या नादात आमचा मात्र चांगलाच २० कि. मी. चा जंगल ट्रेक झाला होता. ते काहीही असलं  तरी, वर्षांऋुतुचा खरा आनंद हा सुरगडासारख्याच आडवाटेवरच्या पण देखण्या किल्ल्यांमध्ये सामावला आहे. आजही तुम्ही गेलात तर सुरगडाचे ते देखणं पावसाळी रूप तुमच्यावर जादू करेल आणि शरीरानं तुम्ही तिथे नसलात तरी मन तिथेच ठेवून जायला भाग पाडेल.







पाण्याच्या टाक्यांचा किल्ला सांकशी

पाण्याच्या टाक्यांचा किल्ला सांकशी


सांकशी किल्ल्यावरून दिसणारी दरी 
रायगड जिल्हा म्हणजे किल्ल्यांचे आगार. याच किल्ल्यांच्या आगारात थोडासा अडगळीत आणि दुर्लक्षित असलेला किल्ला म्हणजे पेण चा सांकशी किल्ला. पेण म्हणजे गणेश मूर्तिकारांचे माहेरघर. पण याच तालुक्यात सांकशी सारखा एक वैशिट्यपूर्ण किल्ला आहे हे अगदी स्थानिक लोकांना सुद्धा फार कमी माहित असेल. कधीकाळी इतिहासात वैभवाच्या शिखरावर असणारा हा किल्ला आज मात्र दुर्लक्षित आहे. पूर्वी पेण चा उल्लेख तालुका सांकसे, सजा अवचितगड प्रांत कल्याण असाच ऐतिहासिक कागद पत्रांतून आढळतो. ब्रिटिश काळापर्यंत उपविभागातील गावांचे मुख्यालय सांकशी इथे होते आणि त्यानंतर ते पेण ला स्थलांतरित झाले. काळाच्या ओघात पेणचा विकास झाला आणि सांकशी मात्र मागे राहिले ते कायमचे. पेण शहराच्या ईशान्येस पनवेल पासून साधारण १८ कि.मी. अंतरावर मुंबई -गोवा महामार्गापासून बळवली गावातून निढवली गावाच्या हद्दीत हा किल्ला आहे. सोपा मार्ग म्हणजे महामार्गावरून तरणखोप ला उतरायचं आणि गावाच्या पाठीमागून सरळ रस्ता आपल्याला घेऊन जातो तो थेट किल्ल्याच्या पायथ्याशी बद्रुद्दीन दर्ग्याजवळ. असे म्हणतात कि याच्या पायथ्याशी पूर्वी काळ्या पाषाणाचे एक मंदिर होते परंतु परकीय आक्रमणात ते लोप पावले आणि आता मात्र त्याचे काही अवशेष हे पायथ्याशी असलेल्या मशिदीच्या जोत्याला वापरलेले दिसून येतात. सांकशी खालावला पण दर्गा मात्र दिमाखात उभा आहे. परकीय आक्रमणाचे हे एक उत्तम उदाहरण.
विशेष म्हणजे पेण मध्ये बालपण जाऊनसुद्धा सांकशी पाहायचा योग्य कधी आला नव्हता. पण तो या वेळेला आला तो माझ्या परम मित्र नितेश मुळे. "मयुर; चल!! तुला सांकशी चा किल्ला दाखवतो" किल्ला छोटा आहे पण थोडासा एका टप्प्यावर कठीण आहे तुला थ्रिल येईल.". असे बोलल्यावर मी तर लगेच एका पायावर तयार झालो. मग  मी , गोपाळ आणि नितेश आम्ही तिघेच रविवारी सकाळी निघालो. बद्रुद्दीन दर्ग्याजवळ बाईक ठेवून आम्ही चढायला सुरुवात केली.
सांकशीचा इतिहास असा कि, सांक राजाने हा किल्ला बांधला आणि त्याच्या नावावरून याचे नाव सांकशी असे पडले. त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजे आजचे हमरापूर.  हमरापूर गावात काही प्राचीन अवशेष आढळल्याचे स्थानिक सांगतात. सांक आणि कर्नाळा किल्ल्याचा राजा यांच्यात युद्ध झाले त्यात सांक  राजा मारला गेला आणि म्हणून त्याच्या मुलीने वज्राईने गडावरून उडी मारून आत्महत्या केली तिची आठवण म्हणून गडावर एका टाक्याच्या बाजूला तिचे शिल्प कोरले आहे.. हीच वज्राई-जगमाता म्हणूनहि  ओळखली जाते१६ व्या शतकात सांकशी , कर्नाळा , आणि उत्तर कोकण यावर गुजरातचा सुलतानाचा अंमल होता. निजामाने नंतर हा  किल्ला जिंकून घेतला. परंतु तदनंतर पोर्तुगीजांच्या मदतीने गुजरातच्या सुलतानाने पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा निजाम आक्रमण करेल या भीतीने त्याने हे दोन्ही किल्ले वसईचा पोर्तुगीज कॅप्टन डी मेंझेस याला दिलेयाने पुन्हा आक्रमण करणाऱ्या निजामास निकराची झुंज देऊन पराभूत केले या लढाईत पोर्तुग्रीज सैनिक ट्रान्सकोझी याने केलेल्या पराक्रमाची इतिहासात नोंद आहे. परंतु निजमाकडून पुढे काही त्रास होऊ नये यासाठी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे म्हणून त्याला खंडणी देऊन कर्नाळा आणि सांकशी विकत घेतले. पुढे सांकशी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. नंतर इंग्रजांच्या काळात सांकशी हे प्रमुख चे  ठाणे झाले परंतु कारभाराची व्यवस्थित घडी बसल्यावर सांकशीचे ठाणे पेण ला हलवले आणि सांकशीला उतरती कळा लागली.
गडावरील पाण्याच्या टाक्यांमधून पाईपलाईन खाली दर्ग्याजवळ आणली  आहे तिला लागूनच वाट गडावर जाते. ओबडधोबड वाटेवरून चालायला  सुरुवात केल्यावर वरती  पहिले पाण्याचे टाके दिसले. पायऱ्यांच्या उजवीकडे कातळात खोदलेले एक दोन खांबी टाके दिसत होते. तिकडे जायला रस्ताचच नव्हता. तिथे जायचे तर कातळात  खोदलेल्या खोबण्यांना धरून सावकाश एकेक पावलाचा अंदाज घेऊन जावे लागणार होते. सुरुवातीला माझा  धीरच झाला नाही. नितेश मात्र पक्का ट्रेकर झाला होता. पटापट पार करून गेला मग त्याने धीर देत सांगितलं "अरे त्या खोबण्यांमध्ये हात टाक बरोबर आणि पावलाचा अंदाज घे.. त्यासाठीच बनवलया आहेत त्या ..मग येशील बरोबर " सुरुवातीला घाबरत सुरुवात केल्यावर मग धीर चेपला आणि मग सहज पार करून मी पाण्याच्या टाकी जवळ पोहोचलो. हा चढाईचा कस लागल्यावर आता मला  कळलं होतं कि, ""मयुर.. तुला थ्रिल येईल " असं नितेश मला का बोलला होता. 



पायऱ्या चालून आल्यावर आपल्याला ३ टाक्या लागतात आणि डाव्या बाजूला साधारण १० फूट खोलीचे जगमाता नावाचे चौथे टाके आहे. नंतर वर जाण्यासाठी एका छोट्याशा खिंडीपाशी येऊन पोहोचलो तेथून जाण्यासाठी पायऱ्या नष्ट  झाल्या होता. त्यामुळे सांभाळून वर जावे लागणार होते. हा कातळटप्पा चालून वर गेल्यावर  समोरच्या बाजूने एक तर दुसरी वळसा घालून वर जाणारी अश्या २ वाटा आम्हाला दिसल्या. उजवीकडे गाजिश नामक पाचवे टाके असून याच पातळीवर उत्तरेकडे आणखी २ मोठी खांब टाकी आहेत.  इथल्याच एका बाजूच्या टाक्यात शिरण्यासाठी साधारण ३ x ३ फूट आकाराचा दरवाजा दिसत होता. त्याच्या खांबांवर तर पण-फुलांची नक्षी कोरलेली आहे. लेण्यांवर असलेल्या कीर्तिमुखा सारखे त्या कोरल्या होत्या. 


प्रवेशद्वारावर शिल्प कोरलेलं  टाकं 

वर जाण्यासाठी असलेल्या प्रवेश द्वाराजवळच मारुतीची मूर्ती आणि शरभाचे शिल्पं ठेवलेल दिसून आलं. या छोट्याश्या किल्ल्यावर देखील शरभाचं शिल्प आढळून आलं हे विशेष.
वरती गडावरील आल्यावर राजवाड्याचे अवशेष , बालेकिल्ला आणि त्याला लागूनच पुन्हा काही पाण्याची टाकी आणि धान्यकोठार हे सर्व पाहून नंतर आम्ही पठारावर पोहोचलो. वरती पठारावर असलेल्या फार मोठ्या कातळावर त्याचा योग्य वापर करून म्हणा किंवा नैसर्गिकरित्या अनेक छोटे-छोटे रांजणखळगे तयार झाले आहेत. आणि त्याला लागून पाण्याच्या टाक्या हि खोदलेल्या आहेत. कदाचित त्यावेळेला टेहळणीसाठी जो कोणी इथे असेल त्याला पाणी पिण्यासाठी फार लांब जायला लागू नये  म्हणून असेल किंवा त्याचा वापर करून तात्पुरते एखादे छत देखील उभारता येत असेल असा विचार त्यावेळेला कदाचित केला असेल. तिथेच बाजूला एका कातळामध्ये कोरलेली बाणासारखी कसली तरी मार्गदर्शक आकृतीही आम्हाला पाहायला मिळाली. त्यावेळचा कसला तरी गूढ संकेत असावा बहुतेक!


पठारावरील रांजणखळगे (Potholes)
कातळामध्ये कोरलेला गूढ सांकेतिक संदेश
थोडा वेळ विश्रांती घेऊन तिथून आम्ही निघालो. त्याच्याच उजव्या बाजूला दिसणाऱ्या डोंगराचा बाहेर आलेला भाग दिसत होता. तिथे एक नैसर्गिक गुहा दिसत होती. तिथे जाण्यासाठी मात्र एखादा कसलेला गिर्यारोहक एखाद्या साधन सामुग्रीनेच जाऊ शकतो. पण तिथे फक्त एक दोर टाकून मी आणि गुरु आम्ही टाकी साफ करायला खाली उतरलो होतो असा अगदी लीलया हा माझा मित्र नितेश मला सांगत होता. त्याच्या हिमतीला एक सलाम ठोकून बालेकिल्ल्याच्या खाली असणाऱ्या टाक्याजवळ आम्ही आलो. इथल्या टाक्याची  रचना पाहून मी थक्क झालो. त्याच्या रचनेवरून त्याला पूर्वी एक दरवाजा असावा अशी व्यवस्था दिसत होती. शिवाय कातळामधून एक असा चर खोदलेला होता कि पावसाचे पाणी वाहत बरोबर त्या टाकीमध्ये उतरेल जणू काही एखाद्या पाईपने सोडावे असं. आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील पाणी हे चक्क पिवळं आहे. एक तर या टाक्यात उत्तरायला एकदम निमुळती दगडांचा आधार, जरा पाऊल चुकलं  तर खाली दरी स्वागतासाठी तयार .. परंतु दुर्गसंवर्धनचे काम हाती घेतल्याने गडावरील लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी नितेश खाली उतरला आणि आम्ही त्याला मदत म्हणून साखळी करून पाणी काढायला मदत केली.
पिवळं पाणी असणारे पाण्याचं टाकं 
सांकशीचे वैशिट्यच मुळात हेच कि ठिकठिकाणी कातळात पाण्याच्या भरपूर टाक्या खोदल्या आहेत. या किल्ल्यावर इतकी पाण्याची टाकी आहेत कि हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा. किल्ला जरी लहान असला तरी यावरून मिऱ्या डोंगर, कर्नाळा, माणिकगड नागफणीचा कडा व इतर ठिकाणे दिसतात. पश्चिमीकडे उगमापासून समुद्रापर्यंत नागमोडी वळणाने जाणारी नदीही फार छान दिसते. पावसाळ्यात तर येथील सौंदर्य नक्कीच खुलून येत असणार. सर्व न्याहाळून झाल्यावर गड उतरायला सुरुवात केली सूर्य माथ्यावर येई पर्यंत आम्ही गडाखाली पोहोचलो होतो. निघता निघता बाजूला असणाऱ्या दर्ग्याकडे पाहून मनात विचार आला कि, मूर्तिकला आणि शिल्पकले साठी  प्रसिद्ध असणाऱ्या पेण मध्ये असणारा हा सांकशी मात्र दुर्लक्षित राहिला त्याला गरज आहे ती संवर्धनाची आणि ती जबाबदारी उचलली आहे माझा मित्र नितेश याने. राजा शिवछत्रपती या परिवाराच्या माध्यमातून या गडावर साफसफाई केलेली आहे आणि मार्गदर्शक फलकहि लावले आहेत तदनंतर आत्तापर्यंत तिथलाच स्थानिक असल्याने आपल्या कामातून वेळ काढून जमेल तसा वेळ काढून तो गडावर संवर्धनाचे काम करतो. त्यामुळे आत्ता  किल्ला आणि पाण्याच्या टाक्या थोड्या सुस्थितीत आहेत.
गरज आहे ती असाच एक नितेश प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी निर्माण होण्याची म्हणजे महाराष्ट्राचे वैभव असलेले गड -किल्ले कधी आचके तोडणार नाहीत आणि दुर्लक्षितही  राहणार नाही.





आईच्या हातचा खाऊ

"आईच्या हातचा खाऊ"

नुकतीच दुरदर्शन वर एका सूपची जाहिरात बघितली. एक छोटी मुलगी आपल्या मम्मीला विचारते,
"आज मेन्यु मे क्या है?" एकदम छान आणि प्रेमळ हसणारी मम्मी Apron बांधुन मुलांना सुप देत
म्हणते, "छोटी छोटी भुक बाय !!बाय!!"
आणि मग पोटावरून हात फिरवत "अं सो यमीss" असं म्हणणाऱ्या त्या मुलीला
आपली मम्मी एकदम मास्टर शेफच"!!! वाटत असणार.

पण मनात विचार आला की आपली आई काही अशी अगदी नीटनेटकी आणि साडीला एकही साधी चुणी
नसणारी नव्हती. ती तर बिचारी सतत कष्ट करत असल्यामुळे दमलेली दिसायची.
आणि मग आठवला तो लहानपणीचा माझा खाद्यप्रवास......
मला आठवतं;लहानपणी भुक लागली की सांगायचो "आई! काहीतरी नवीन खायला बनवं ना! आणि तो
शिरा नको हो! काहितरी मस्त चटकदार बनवं.." आई बिचारी हो म्हणायची.
मग ते खमंग आणि ताज्या भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी आई लगेच वनगेच्या गिरणीवरून दळण
घेउन यायची का तर तिथे चांगलं मिळतं म्हणुन किंवा मला पाठवायची with special instructions
देऊन की, "त्यांना सांग भाजणीचं दळण आहे चांगलं काढुन दे."
छान भरपुर कोथिंबीर आणि कांदा घातलेल्या थालीपिठावर एक घरगुती साजुक तुपाची धार आणि सोबत
ओल्या नारळाची चटणी. अहाहा!! केवळ स्वर्गसुख.
मे महिन्याच्या आधी आईची लगबग असायची ती सगळे साठवणीचे पदार्थ बनवायची. १०/१० च्या
चाळीत राहुन सुद्धा त्यातुनच आई सगळं बरोबर मॅनेज करायची. खरी मॅनेजमेंट गुरू.
मग त्यात उडीद/तांदळाचे पापड, मिरगुंड, कुरड्या, फेण्या, भरलेली मिरची, मुरांबा, कोकमाचे सरबत असे
बरेच काही बनवायची. स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या काचेच्या बरणीमधील सुंदर लाल रंगाचे कोकम
साखर मीठ घालुन उन्हात ठेवले जायचं. मग हळुहळु त्यांचा रंग खुलत जाई. तापलेल्या तेलाच्या कढईत
२ इंचाचे मिरगुंड जेव्हा फुलून एका मोठ्या चपाती एवढा आकार घेत असे तेव्हा ते पाहताना मजा
यायची. अशी सगळी पारंपारिक पदार्थांची रेलचेल..तोंडाला चटकं लावणारी.

मग रोज रात्री पंगतीत जेवणाबरोबर यी पदार्थांची मेजवानी. कधी वालाची डाळ, कढी आणि ओली मिरची
तर कधी भाकरी आणि माठाची भाजी. पावसाळ्याचा मौसम असेल तर मिळणारी शेवळाची भाजी वगैरे
वगैरे. प्रत्येक भाजी खाल्लीच पाहिजे असा आईचा आग्रह असायचा का तर प्रत्येकातुन मिळणारी
जीवनसत्वं हि महत्वाची.
आत्ता सारखे नूडल, सुप्स असे कुठे खायला मिळायचे तेव्हा? पण रोज नव्या पदार्थाचा हट्ट. मग कधी
मायाळुच्या पानांची भजी (किती जणांना माहित असेल जरा शंकाच आहे); मुगाच्या पीठाचा पोळा;
कोथिंबिरीच्या किंवा कोबीच्या वड्या तर कधी कुरमुऱ्यांचा लाडू असे काही ना काही खायला मिळायचं.
आई खुप सारे मसाले चटण्या घरी करायची. खलबत्यात कुटून कुटून ते करायची. खलबत्त्याचा होणार
आवाज ऐकून मोठी गम्मत वाटायची. ती आईच्या हातची लसणीची तिखट आणि भरपूर तेल घातलेली
चटणी आणि गोल शुभ्र भाकरी आठवली की अगदी आत्ताही जागच्या जागी भूक लागते आणि तोंडाला
पाणी सुटते.
आता आईचे वय झाले. आधीसारखे खुप कष्ट तिला जमत नाहीत. पण तरी ही त्यातूनच आमच्यासाठी
कसकसली पीठ, भूक लाडू- तहान लाडू, वडे बनवणे चालूच असते तिचे. का तर! नोकरी निमित्त बाहेर
गेलेली पोरं आठवडा-महिनाकाठी घरी येणारं म्हणुन.
त्यादिवशी तिने साध्या केलेल्या खिचडी भातावर एक साजुक तुपाची धार टाकुन किती जेवलो याचा
अंदाजच आला नाही.
अचानक आठवले, आपली खाद्ययात्रा एवढी समुद्ध करणा-या आईला आपण कधीच म्हणालो नाही की
"मम्मी तुम तो वर्ल्ड की बेस्ट मम्मी हो। i love you मम्मी।". असं आत्ताच्या मुलांसारखं express
करायला कधी जमलचं नाही. तेच काम आताच्या आई 5 रुपयाच्या मॅगी देऊन करतात बहुतेक.
खरचं आपण ८०-९० दशकाच्या मुलांनी जे पाहिलं अनुभवलं ती आत्ताची शहरातील मुले उपभोगतील का
यात थोडी शंकाच आहे. आपण पाहिलेली हि आपली समृद्ध खाद्य परंपरा जर जोपासली नाही तर
पुढच्या पिढीला त्याला मुकणार आहे हे नक्की.

Note:-  This article has been published in 29th june 2018 lokprabha. link as below.

http://epaper.lokprabha.com/m5/1705832/Lokprabha/29-06-2018#issue/56/1