आईच्या हातचा खाऊ

"आईच्या हातचा खाऊ"

नुकतीच दुरदर्शन वर एका सूपची जाहिरात बघितली. एक छोटी मुलगी आपल्या मम्मीला विचारते,
"आज मेन्यु मे क्या है?" एकदम छान आणि प्रेमळ हसणारी मम्मी Apron बांधुन मुलांना सुप देत
म्हणते, "छोटी छोटी भुक बाय !!बाय!!"
आणि मग पोटावरून हात फिरवत "अं सो यमीss" असं म्हणणाऱ्या त्या मुलीला
आपली मम्मी एकदम मास्टर शेफच"!!! वाटत असणार.

पण मनात विचार आला की आपली आई काही अशी अगदी नीटनेटकी आणि साडीला एकही साधी चुणी
नसणारी नव्हती. ती तर बिचारी सतत कष्ट करत असल्यामुळे दमलेली दिसायची.
आणि मग आठवला तो लहानपणीचा माझा खाद्यप्रवास......
मला आठवतं;लहानपणी भुक लागली की सांगायचो "आई! काहीतरी नवीन खायला बनवं ना! आणि तो
शिरा नको हो! काहितरी मस्त चटकदार बनवं.." आई बिचारी हो म्हणायची.
मग ते खमंग आणि ताज्या भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी आई लगेच वनगेच्या गिरणीवरून दळण
घेउन यायची का तर तिथे चांगलं मिळतं म्हणुन किंवा मला पाठवायची with special instructions
देऊन की, "त्यांना सांग भाजणीचं दळण आहे चांगलं काढुन दे."
छान भरपुर कोथिंबीर आणि कांदा घातलेल्या थालीपिठावर एक घरगुती साजुक तुपाची धार आणि सोबत
ओल्या नारळाची चटणी. अहाहा!! केवळ स्वर्गसुख.
मे महिन्याच्या आधी आईची लगबग असायची ती सगळे साठवणीचे पदार्थ बनवायची. १०/१० च्या
चाळीत राहुन सुद्धा त्यातुनच आई सगळं बरोबर मॅनेज करायची. खरी मॅनेजमेंट गुरू.
मग त्यात उडीद/तांदळाचे पापड, मिरगुंड, कुरड्या, फेण्या, भरलेली मिरची, मुरांबा, कोकमाचे सरबत असे
बरेच काही बनवायची. स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या काचेच्या बरणीमधील सुंदर लाल रंगाचे कोकम
साखर मीठ घालुन उन्हात ठेवले जायचं. मग हळुहळु त्यांचा रंग खुलत जाई. तापलेल्या तेलाच्या कढईत
२ इंचाचे मिरगुंड जेव्हा फुलून एका मोठ्या चपाती एवढा आकार घेत असे तेव्हा ते पाहताना मजा
यायची. अशी सगळी पारंपारिक पदार्थांची रेलचेल..तोंडाला चटकं लावणारी.

मग रोज रात्री पंगतीत जेवणाबरोबर यी पदार्थांची मेजवानी. कधी वालाची डाळ, कढी आणि ओली मिरची
तर कधी भाकरी आणि माठाची भाजी. पावसाळ्याचा मौसम असेल तर मिळणारी शेवळाची भाजी वगैरे
वगैरे. प्रत्येक भाजी खाल्लीच पाहिजे असा आईचा आग्रह असायचा का तर प्रत्येकातुन मिळणारी
जीवनसत्वं हि महत्वाची.
आत्ता सारखे नूडल, सुप्स असे कुठे खायला मिळायचे तेव्हा? पण रोज नव्या पदार्थाचा हट्ट. मग कधी
मायाळुच्या पानांची भजी (किती जणांना माहित असेल जरा शंकाच आहे); मुगाच्या पीठाचा पोळा;
कोथिंबिरीच्या किंवा कोबीच्या वड्या तर कधी कुरमुऱ्यांचा लाडू असे काही ना काही खायला मिळायचं.
आई खुप सारे मसाले चटण्या घरी करायची. खलबत्यात कुटून कुटून ते करायची. खलबत्त्याचा होणार
आवाज ऐकून मोठी गम्मत वाटायची. ती आईच्या हातची लसणीची तिखट आणि भरपूर तेल घातलेली
चटणी आणि गोल शुभ्र भाकरी आठवली की अगदी आत्ताही जागच्या जागी भूक लागते आणि तोंडाला
पाणी सुटते.
आता आईचे वय झाले. आधीसारखे खुप कष्ट तिला जमत नाहीत. पण तरी ही त्यातूनच आमच्यासाठी
कसकसली पीठ, भूक लाडू- तहान लाडू, वडे बनवणे चालूच असते तिचे. का तर! नोकरी निमित्त बाहेर
गेलेली पोरं आठवडा-महिनाकाठी घरी येणारं म्हणुन.
त्यादिवशी तिने साध्या केलेल्या खिचडी भातावर एक साजुक तुपाची धार टाकुन किती जेवलो याचा
अंदाजच आला नाही.
अचानक आठवले, आपली खाद्ययात्रा एवढी समुद्ध करणा-या आईला आपण कधीच म्हणालो नाही की
"मम्मी तुम तो वर्ल्ड की बेस्ट मम्मी हो। i love you मम्मी।". असं आत्ताच्या मुलांसारखं express
करायला कधी जमलचं नाही. तेच काम आताच्या आई 5 रुपयाच्या मॅगी देऊन करतात बहुतेक.
खरचं आपण ८०-९० दशकाच्या मुलांनी जे पाहिलं अनुभवलं ती आत्ताची शहरातील मुले उपभोगतील का
यात थोडी शंकाच आहे. आपण पाहिलेली हि आपली समृद्ध खाद्य परंपरा जर जोपासली नाही तर
पुढच्या पिढीला त्याला मुकणार आहे हे नक्की.

Note:-  This article has been published in 29th june 2018 lokprabha. link as below.

http://epaper.lokprabha.com/m5/1705832/Lokprabha/29-06-2018#issue/56/1

No comments: