धर्मवीर गड (पेडगावचा भुईकोट /बहादूरगड) - बलिदानाची आठवण

 

धर्मवीर गड (पेडगावचा  भुईकोट /बहादूरगड) - बलिदानाची आठवण






एक वर्ष  झालं होतं. टाळेबंदीच्या काळात कुठेच बाहेर पडणं  झालं नव्हतं. नवीन वर्षाची चांगली सुरुवात म्हणून शिर्डीला बाबांच्या दर्शनाला जाऊन करूयात असं ठरलं. गाडीची कुठे सोय  होते का ते त्यालाच पहायला सांगितलं. बाहेर पडल्यावर आणि स्वतःची गाडी हातात असल्यावर मग कुठल्यातरी एखाद्या गडावर भेट नक्कीच करणार हे ठरलेलंच. नितेश ने सांगितल्यावर त्याचा चुलतभाऊ शुभम आणि भाग्यश्री हे तयार झाले आणि फेब्रुवारी मध्ये जायचं ठरलं. अनायासे आता फेब्रुवारी मध्ये जातोच आहोत तर माझ्या मनात बहादूरगडाला भेट द्यायची तीव्र इच्छा झाली. कारण याच महिन्यात या गडावर रक्तरंजित इतिहास लिहिला गेला होता. पण शंभू राजांचा हा इतिहास जिथे घडला ती जागा पाहायला मिळेल का ? कारण आता नवखा शुभम एकटा ड्राईव्ह करणार तर कितपत यशस्वी होईल यावर अवलंबून होतं. पण म्हणतात ना मनात तीव्र इच्छा असेल तर ती पूर्णत्वास जातेच. तसंच काहीसं; बाबांनी मार्ग आपोआपच सुकर करून दिला आणि आदल्या रात्री आमचा स्टार "गुरु" चा फोन आला आणि तो यायला तयार आला. मग आम्ही एकदम निर्धास्त झालो. कारण गुरु म्हणजे नावाप्रमाणेच होता सर्व बाबतीत एकदम एक्सपर्ट.

शनिवारी सकाळीच आम्ही काकांची एर्टिगा घेऊन निघालो आणि एक्सप्रेस हायवे ला लागलो. पनवेल वरून सुरुवातीलाच CNG ची फुल्ल टाकी भरून घेतली होती. चला निदान शिर्डीच्या अर्ध्या वाटेत तरी आरामात जाऊ आणि झालंही तसेच. नंतर कुठेच परतीला लागे पर्यंत CNG ची सोय झाली नाही. पेट्रोल वरच गाडी चालवावी लागली. गाडी गुरूच चालवत होता. आम्ही तिघेही गड-किल्ले फिरणारे सह्यप्रेमी  त्यामुळे आमच्या त्याच गप्पा  चालू होत्या. अधून-मधून वेगवेगळ्या प्रकारची संगीताची मेजवानी चालूच होती. वाटेत जाताना पहिलं दर्शन दिलं  ते इंदोरीच्या किल्ल्याने. गतवर्षीच मी जाऊन आलो होतो. तिथे जास्त पाहण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे तिकडे वेळ घालवता आम्ही पुढे निघालो. वाटेत तुकाराम महाराजांच्या चरणाने पवित्र झालेल्या "भंडारा " डोंगराचे दुरून दर्शन झालं. मनातल्या मनात गाडीतून नमस्कार करून आम्ही पुढे निघालो.

"अरे जाता -जाता कुठला किल्ला करायचा? एकतरी होईल आपला" नितेश ने विचारलं.

"अरे! एक काय - करूनच जाऊ." गुरु तर एकदम  फुल्ल एक्साईटमेन्ट मध्ये होऊन बोलत  होता आणि खरोखर त्याने केले सुद्धा असते. पण आपण पेडगावचा बहादूरगड पाहूया. थोडा लांब आहे. शंभू राजांना कैद करून ठेवलेलं ती हीच जागा हे लक्षात येताच सर्वांनी एकदम त्याला होकार दर्शवला आणि त्यालाच भेट द्यायची यावर शिक्कामोर्तब झालं.

दुपारचं जेवण मस्त एका ओपन हॉटेल मध्ये आणलेल्या न्याहारी सोबत केलं आणि त्यानंतर शुभम ने गाडी हातात घेतली. नितेश ने त्याला दोनदा बजावून सांगितलं. आपल्याला NFS नाही खेळायचंय . गाडी पण नवीन आहे. नीट चालव. शुभम ने मान हलवून होकार दिला. त्यात घरून पण फोन आला कि नक्की ह्याने गाडी हातात तर घेतली नाही ना!

"अरे माझ्यावर विश्वासच नाही कोणाचा" शुभम बोलल्यावर सगळे जण हसत होते. त्याने गाडी शेवटपर्यंत व्यवस्थितच चालवली हे जर घरच्यांना सांगितलं असतं  तर कदाचित विश्वासच नसता बसला.

संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही शिर्डीत पोहोचलो आणि आठ वाजता बाबांचे दर्शन घेऊन आम्ही शिर्डीतच मुक्काम केला. दर्शन छान झालं होतं. आता वेध लागले होते उद्याचे. सकाळीच आम्ही शिर्डी सोडली आणि अहमदनगर शहरात प्रवेश केला . लगेच लक्षात आलं कि इथे जवळच नगरचा किल्ला आहे. शुभम ने पटकन मॅप लावला आणि फक्त किलोमीटर अंतरावर आहे हे लक्षात येताच आम्ही जाता- जाता नगरच्या किल्ल्याला भेट द्यायची असं ठरवलं. पण तो आर्मीच्या ताब्यात आहे त्यामुळे किती पाहता येईल हि शंका शेवटी खरीच ठरली. तिथे पोहोचल्यावर कोविड मुळे बंद ठेवला होता अजून पर्यटनाची परवानगी दिली नाही असं तिथल्या सैनिकाने सांगितलं. आम्ही लांबून आलोय असं सांगितल्यावर हो - नाही करता - करता त्याने फक्त समोरील तटबंदी आणि प्रवेशद्वार पाहायची परवानगी दिली.

  

 



स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या किल्ल्यात अनेक राष्ट्रीय नेत्यांना स्थानबध्द केले होते. त्यावेळी या किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरुंनी `डिस्कव्हरी ऑफ इंडिया ` हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला होता.१९४२ च्या "चले जाव" आंदोलनातील पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित गोविंद वल्लभ पंत, पंडीत हरेकृष्ण मेहताब, आचार्य जे.बी. कृपलानी, डॉ. सय्यद महसूद, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, बॅ. असफअली, डॉ. पी. सी. घोष, शंकरराव देव, आचार्य नरेंद्र देव अशा १२ राष्ट्रीय नेत्यांना १० ऑगस्ट १९४२ पासून २८ एप्रिल १९४५ या काळात ब्रिटीशांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबध्द केले होते. पंडित जवाहरलाल नेहरुंनी याच किल्ल्यात फक्त `महिन्यात` `डिस्कव्हरी ऑफ इंडिया ` हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यात याचे ऐतिहासिक महत्व आहे.

आम्ही वरती चढलो आणि सभोवताल पहिला. किल्ल्याच्या भोवती अंदाजे ५० मीटर रुंदीचा खंदक आहे. एवढा मोठा खंदक मी तर प्रथमच पाहत होतो. खंदकाच्या एका बाजूला किल्ल्याची तट बंदी असून दुसर्या बाजूची भिंतही दगडाने बांधलेली आहे. पूर्वीच्या काळी या खंदकात पाणी सोडलेले असावे आणि  यावरील पुल काढता - घालता येत असे . सुर्यास्त ते सुर्योदय खंदकावरील पुल काढून घेतला जात असे. असे वाचनात आले होते. आज मात्र खंदकावर बांधलेल्या पुलावरून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ला हा लश्कराच्या ताब्यात आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी .०० ते संध्याकाळी .०० या वेळेतच पाहता येते. असं तिथल्या सैनिकाने आम्हाला सांगितलं. जास्त पाहण्याची परवानगी नसल्याने किल्ल्याच्या प्रवेशव्दाराशी ठेवलेल्या तोफा पाहून आम्ही पुढे मार्गस्थ झालो.

धर्मवीरगड हा पेडगाव मध्ये अहमदनगर जिल्ह्यात दौंड जवळ आहे.. आम्ही अहमदनगर - श्रीगोंदा -पेडगाव या मार्गे दुपारी बाराच्या सुमारास पेडगावच्या भुईकोट किल्ल्याजवळ पोहोचलो. समोरच "धर्मवीर गड" या नावाची पाटी लावलेली दिसली.

या किल्ल्याचा इतिहास असा कि, पेडगावचा भूईकोट किल्ला देवगिरीच्या यादवांच्या काळात अस्तित्वात होता कारण किल्ल्यातील शिवमंदिरे हि त्याचीच साक्ष आहेत.  यादवांकडून किल्ला निजामशाहाच्या ताब्यात आणि मग  निजामशाहीचा पाडाव झाल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांचा सरदार बहादूरशहा कोकलताश हा औरंगजेबाचा दुध भाऊ होता. दक्षिणेचा सुभेदार असतांना त्याचा तळ पेडगावला होता. त्याने पेडगावच्या किल्ल्याची डागडूजी करुन या किल्ल्याचे नाव बहादूरगड ठेवले. बहादूरगड हे नाव प्रचलित असले तरी ते अधिकृत नव्हते. किल्ल्याचे कागदोपत्री नाव पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला असे आहे. ब्रिटिश गॅझेट मध्येही अशीच नोंद आहे. २५ मे  २००८ ला शिवभक्तांनी या गडाचे  "धर्मवीर गड नामकरण करून शंभू राजांच्या या स्मृतीस्थानाला योग्य ते न्याय मिळवून देण्याचं कार्य केलं आहे.




इसवीसन १६७४ मध्ये बहादुरगडावर २०० अस्सल अरबी घोडे आणि कोटींचा खजिना आल्याची खबर छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली. रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर झालेला खर्च भरून काढण्याची हि नामी संधी आहे हे त्यांनी ओळखलं. त्यांनी गमिनी काव्याचा वापर करुन गडावर हल्ला करण्याची योजना आखली. या मोहिमेच्या प्रमुखाने सैन्याचे दोन भाग केले. सैन्याची एक तुकडी भल्या सकाळी बहादूरगडावर चालून गेली. बहदूरखानाने पेडगावातले मोगल सैन्य गोळा केले आणि मराठ्यांवर चालून गेला. थोडावेळ लढाई झाल्यावर मराठ्यांनी अचानक माघार घेतली आणि मराठ्यांचे सैन्य पळायला लागले. मराठे पळत आहेत हे पाहून मुघल सैन्याला चेव आला आणि त्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. मराठ्यांनी मोगल सैन्याला पेडगाव पासून जवळजवळ २५ कोस लांब नेले. अशा प्रकारे किल्ल्यातल्या मोगल सैन्याचे मराठ्यांनी दोन भाग केले. मोगल सैन्य लांब गेल्याची खात्री झाल्यावर मराठ्यांच्या सैन्याच्या दुसर्या मोठ्या तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ल्यातील घोडे खजिना आणि इतर सामान घेउन रायगडावर निघून गेले. जाताना किल्ल्यातील तंबू जाळून टाकले. बहादूर खान पाठलाग करून परत आला आणि त्याला मराठ्यांनी खजिना लुटल्याची बातमी कळली आणि मराठे वेड पांघरून कसे पेडगाव ला गेले हे त्याला चांगलंच समजलं. पण हात चोळत बसण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.

 



 


गावातील प्रवेशद्वाराच्या अगोदरच डाव्या बाजूला हनुमानाची फ़ुटी मुर्ती एका देवळीत ठेवलेली आहे. मुर्तीच्या पायाखाली पनवती आहे हे तिचे विशेष आहे. प्रवेशदवारातून गाडी थेट भैरवनाथाच्या मंदिरात पार्क करून आम्ही पुढे चालतच निघालो. समोरच गाभुळल्या चिंचा होत्या. गुरु आणि नितेश ने जाऊन त्याच्यावर ताव मारला. भैरवनाथाचे मंदिर हे मंदिर गावकर्यांच्या ताब्यात आहे. रंगरंगोटी केलेली दिसत होती त्यावरून त्याचा जीर्णोद्धार झाल्याचे दिसून येत होते. परंतु या रंगरंगोटी ने देवळाची मूळची शोभा कमी होते हे मात्र खरे.

 मूळ मंदिर यादवकालिन असून दगडात बांधलेले आहे. मंदिराची ओसरी, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. ओसरी खांब अर्ध खांभांवर तोललेली आहे. ओसरीत डाव्या बाजूच्या भिंतीला टेकून हनुमानाची फ़ूटी मुर्ती आणि गणपतीची दोन फ़ुटी मुर्ती आहे. सभामंडप पूर्ण खांब आणि अर्धखांबांवर तोललेला आहे. गर्भगृहात एक पिंड आहे. आणि मंदिरा समोरील एका दिपमाळे खाली अनेक जुन्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यात उमा महेश्वर, विष्णू, सर्पशिळा सतीचा हात, समाधीचे दगड, कोरीव दगड, दोन स्त्रीयांचे मुख कोरलेले एक दगड इत्यादी पाहायला मिळतात.

गजलक्ष्मी 

 

 



दिपमाळे समोरील पायऱ्या उतरुन खाली उतरल्यावर गजलक्ष्मीची फ़ुटी मुर्ती देखील आहे. परंतु एवढ्या सुंदर मूर्तीला तेल वैगैरे फासून तिचा पार शनिदेव बनवून टाकला आहे. प्रथम दर्शनी पाहणाऱ्याला तसेच वाटावे. तिथल्याच एका गावकऱ्यांशी बातचीत करून आम्ही पुढे निघालो. त्यानेच आम्हाला सांगितलं कि, शिवदुर्ग संस्था आनि पेडगाव ग्रामस्थांनी मिळून किल्ल्याची व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे आणि गडावर दोन गडपाल नेमलेले आहेत ते गडाची साफ़सफ़ाई, सुशोभीकरणाची आणि आलेल्या पर्यटकांना माहिती देण्याचे कामे करतात. आम्ही पुढे मल्लिकार्जुन मंदिराकडे निघालो. किल्ल्यातील रस्ते आणि पायवाटा दगड लावून आखीव - रेखीव बनवलेल्या आहेत. पुढे जाऊन उजवीकडे वळल्यावर मल्लिकार्जुन हे भग्नावस्थेतील मंदिर आहे. मंदिरासमोर एक वीरगळ पाहायला मिळते आणि पुढे दारूच्या कोठाराची एक भग्न इमारत देखील. त्याच्याच पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिर आहेहे मंदिर त्रिदल प्रकारातले असून त्याला एक मुख्य गर्भगृह उजव्या आणि डाव्या बाजूला दोन छोटी गर्भगृहे आहेत. सभामंडप चार मुख्य खांबावर चार अर्ध खांबावर तोललेले आहे. गर्भगृहात शंकरची पिंड आहे. गर्भगृहाच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीला टेकून एक गणेशाची फुटी मूर्ती ठेवलेली आहे, तर उजव्या बाजूला एक जैन तिर्थंकरांची मुर्ती आहेत हे पाहून जरा आश्चर्य होतं. तसेच भिंतीला गणपतीची मोठी मूर्ती साधारण पंचवीस फुटी देखील टेकून ठेवलेली आहे. इतर मूर्ती झिजलेल्या आहेत फारश्या ओळखता येत नाहीत. मंदिराच्या बाहेर छान फुलझाडे लावलेली आहेत. तिथे थोडं फोटोसेशन करून आम्ही पुढे निघालो.


 मल्लिकार्जुन मंदिर 


रामेश्वर मंदिर


तिथून पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिरा जवळ एक वीटांनी बांधलेला फ़ूटी पोकळ मनोरा आहे. अशाप्रकारचे दोन मनोरे किल्ल्यात आहेत. त्यांना उच्छवास म्हणतात. पुढे हत्ती मोट आहे. या मोटे खाली एक हौद आहे. हत्ती / घोडे/ बैलाच्या सहाय्याने पाणी वर खेचून घेतले जात असावे आणि या हौदात सोडून किल्ल्यात इतरत्र खेळवले जात असावे हे प्रतीत होते. किल्ल्याला लागूनच भीमा नदी वाहते.  हे पाहून आम्ही पुढे लक्ष्मी नारायण मंदिराकडे निघालो. मंदिर आणि परिसर अप्रतिमच आहे. आतमध्ये आम्ही थोडा वेळ बसलो. खूप थंडगार आणि प्रसन्नता जाणवत होती. उजवीकडच्या प्रवेशद्वारातून भीमा नदीचे सुंदर दृश्य दिसत होते. मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार पश्चिमेकडे असून उत्तर आणि दक्षिण दिशेलाही प्रवेशव्दार आहेत. मंदिरावर सुबक नक्षीकाम आहे. बाह्यभिंतींवर सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. सभामंडप हा १२ खांबावर तोललेले आहे. छतावरही चे कोरीव काम आहे. मंदिराच्या गाभार्याच्या दरवाजावर व्याल, गंधर्व, वेलबुट्टी यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गाभार्यात लक्ष्मी नारायणाची मुर्ती नसून एक वीरगख ठेवलेली आहे. लक्ष्मी नारायण मंदिरासमोर बालेश्वर मंदिर आहे. ते ही छान आहे. मंदिराचा सभमंडप कोसळलेला आहे. पण खांब उभे आहेत. खांबांवर मुर्ती आणि इतर कोरीवकाम आहे. गाभार्याच्या दरवाजावर व्याल, गंधर्व, वेलबुट्टी यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गाभार्यात पिंड आहे. हि सर्व मंदिर पाहून आपल्याला हंपीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तसेच काहीसं मला वाटतं होतं. 

लक्ष्मी नारायण  मंदिर 

 

 

बालेश्वर मंदिर
पाताळेश्वर मंदिर

बालेश्वर मंदिराच्या पुढेच पाताळेश्वर मंदिर आहे. नावाप्रमाणेच पिंड ही जमिनीच्या पातळीच्या खाली आहे तर नंदी जमिनीवर आहे. साधारण ११० एकरावर हा किल्ला पसरलेला आहे आणि अनेक अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.पाताळेश्वर मंदिराच्या पुढे गेल्यावर एक फुटी चौकोनी प्रवेशद्वार दिसते याला पाण दरवाजा या नावाने ओळखतात . या दरवाजाच्या बाजूला दोन बुरुज आहेत . या ठिकाणी दोन तटबंद्या आहेत . एक नदी जवळची आणि दुसरी दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी बांधलेली . कदाचित नदीवर जाण्यासाठी हा बांधला असावा असे वाटते. इकडील सर्व भाग पाहून झाल्यावर आता मुख्य ठिकाणी; सदरेवर जिथे इतिहासात एक अमूल्य क्षण नोंदवला गेला होता तो पाहण्यासाठी लगबगीने निघालो.





शौर्य स्तंभ


"राजदरबार शंभूराजे शौर्य स्तंभ" या नावाची पाटी लिहिलेली दिसली आणि समजून आले कि,

 हीच ती जागा; जिथे शंभुराजांना आणि कवी कलशांना कैद करून ठेवले होते आणि त्यांच्यावर अतोनात हाल केले गेले होते.

हीच ती जागा जिथे शंभू राजांचे शौर्य आणि धाडस पाहून पातशहा औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरला होता आणि जमिनीवर वाकला होता आपल्या  अल्लाचे आभार मानण्यासाठी.

हीच ती जागा जिथे हे दृश्य पाहून कवी कलशांना स्फुरलेले अजरामर काव्य इतिहासात अजरामर झालं. शंभू राजांचा इतिहास आठवला कि आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि डोळेही पाणावतात.

वैऱ्याने डाव साधला. सह्याद्रीचा शंभू राजा कैद झाला. मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना संगमेश्वर जवळ कैद केले. दिनांक १५ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी त्या दोघांना बहादूरगडावर आणण्यात आले. स्वतः औरंगजेबाने अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. शंभूराजांच्या कैदेची खबर मिळताच औरंगजेब जितका आनंदी तितकाच कमालीचा घाबरला देखील होता त्याला विश्वासच बसत नव्हता. चांभारगोंद , अकलूज, पंढरपूर , दौंड या आजूबाजूच्या इलाख्यात एक तातडीचा हुकूम जारी केला होता कि, कोणाच्याही पागेत, दारात घरात एखादाही घोडा दिसता कामा नये. कोणी मरगठ्ठ्याचा बच्चा रात्री वा दिवसा घोड्यावर स्वार झालेला जर दिसला तर त्याचा एक हात पाय कलम करण्यात यावा असा आदेशच  दिला होता. याच गडावर आणताना शंभूराजांची उंटावरुन धिंड काढण्यात आली होती. रायगडाच्या नरेशाला, करोडो होनांच्या धन्याला आणि त्याच्या मुख्य प्रधानाला मानहानीला सामोरे जावे लागले होते. याच बहादूरगडाच्या प्रवेशद्वाराजवळ रायप्पाचं इमानी रक्त उसळले होते आणि शंभू राजांना सोडवण्याच्या प्रयत्नात  त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली होती.

संपूर्ण साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत शंभू राजे आणि कवी कलश उभे होते. तो देखावा पाहून पातशहा भलताच खुश झाला तो आपल्या सिंहासनावरून उठून खाली आला. त्याने जमिनीवर डोके टेकून अल्लाचे आभार मानले. भर दरबारात पातशहा फक्त एकदाच खाली उतरला होता जेव्हा शिवाजीमहाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून छत्रपती झाल्याची खबर समजली होती आणि त्यानंतर ती वेळ आत्ता आली होती. जमिनीवर झुकलेल्या पातशाहाला कवी कलशांनी पहिले. त्यांची छाती अभिमानाने फुलून आली आणि त्यावर त्यांनी आपल्या भाषेत अजरामर काव्य रचले.

यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग

लहू लसत सिंदूरसम खुब खेल्यो रनरंग ।।

जो रवि छवि लछत ही खद्योत होत बदरंग

त्यो तुव तेज निहारी ते तखत त्यज्यो अवरंग ।।

 

याचा अर्थ: रावणाच्या सभेत ज्या प्रमाणे हनुमंताला बांधून आणले, त्या प्रमाणे संभाजी राजास औरंगजेबापुढे उपस्थित केले गेले. हनुमंताच्या अंगाला शेदूर शोभून दिसावा असे घनघोर युद्ध करून रक्ताने अंग माखले आहे. हे राजन तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे हे तेज पाहून औरंग्याने आपल्या सिहासनाचा त्याग करून गुडघे टेकून नतमस्तक झाला आहे.

त्यांना नाना प्रकारे खजिना किल्ले ताब्यात देण्यास सांगितले त्यांनी त्यास नकार दिला, त्यानंतर मात्र राजांना स्वराज्य हवाली करण्यास सांगितले. याच गडावर त्यांचे अतोनात हाल केले.  तरीही त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर त्यांना भीमा-इंद्रायणीच्या संगमावर नेण्यात आले आणि तेथेच ते स्वराज्य धर्मासाठी धर्मवीर झाले.

शंभूराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गडावर एक दगडी स्मृती स्तंभ उभारण्यात आला आहे. पुण्यातील शिवदुर्ग संस्थेतर्फे आणि गावकऱ्यांच्या साहाय्याने तिथे सुंदर बाग केलेली आहे. साफसफाई आणि स्मृतिस्तंभाची पूजा-अर्चा याचे देखभाल ठेवली जाते. तिथल्या गडपालाने हि उत्स्फूर्तपणे आम्हाला इतिहास सांगितला. पुण्यातील शिवदुर्ग संस्थेने हाती घेतलेल्या या कार्याचं खरंच कौतुक आहे. आम्हीही आमच्यातर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत देऊ केली. खरं तर हे आपलंच आहे. आपणच राखलं पाहिजे. या भावनेने जो कोणी या कार्यात सहभागी आहे त्याला आपणच नक्कीच प्रोत्साहन आणि मदत हि केलीच पाहिजे. असा विचार जर प्रत्येकाने केला तर सरकारवर अवलंबून राहता आपली हि भग्नावस्थेतील स्मुर्तीस्थळे पुन्हा एकदा नवसंजीवनी घेऊन उभी राहतील आणि सांगतील. या माझ्यापाशी मी तुम्हाला सांगतो माझ्यापाशी घडलेला इतिहास कारण मीच त्याचा साक्षी आहे आणि जो वर चंद्र-सूर्य आहेत तोवर हे राजा तुझ्या पराक्रमाचे पोवाडे आम्ही असेच गात राहू. सदैव!!

 

।। स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज आणि शेवटपर्यंत त्यांची साथ न सोडणाऱ्या परम मित्र कवी कलश यांना मानाचा मुजरा ।।



2 comments:

Unknown said...

खूप छान आणि सुंदर लिखाण.... 👌👌

MAyur said...

धन्यवाद.