ऊसाचा गणपती
(गणेशोत्सव विशेष)
शीर्षकावरून काहीतरी
वेगळं वाटतंय ना! पु.लं.च्या रूपाने तुम्हा-आम्हाला "गुळाचा गणपती" माहिती
आहे. मृत्तिकेचा गणपती, नारळातील गणपती, कागदाचा आणि कितीतरी विविध रूपातील गणेश रूपे
आपण पाहिले असतील. पण उसाचा गणपती कधी ऐकलाय किंवा पाहिलंय का? कदाचित नाही असंच सर्वजण म्हणतील. पण तो आहे आणि
तो उसाच्या रूपात पुजला जातो दर वर्षीच्या गणेश चतुर्थीला भारतातील एका विशिष्ट भागात.
मलाही हे माहित नव्हतं. निमित्त झालं ते माझा डोंबिवलीचा मित्र सुजित कुंबळे याच्या रूपाने. तसा मूळचा तो कर्नाटकमधील
मंगलोरी भागातला पण लहानाचा मोठा डोंबिवलीतच. त्याला बाप्पाची खूप आवड. त्याने दरवर्षी
गणपती आणायला सुरुवात केली आणि एक वर्ष त्याने गणेश चतुर्थीला व्हाट्सपला ठेवलेला फोटो
पाहिला. कुतूहल म्हणून मी त्याला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं कि आमच्या गावाकडे
गणपती या रूपात पूजतात. टाळेबंदीत गावाला राहून तिकडचे रीतिरिवाज माहिती झाल्यावर त्याने
त्याप्रमाणे गणपती पूजनाला सुरुवात केली. दरवर्षी जाऊ करता करता राहून जायचं. या वर्षी
देखील त्याचं स्टेट्स पाहिलं. पुन्हा माझं कुतूहल जागृत झालं आणि मी त्याला या रूपातल्या
बाप्पाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली. " ये ना भाई ! आत्ता येतो का लगेच ?" असं म्हणत त्याने मला पुढच्या ४ सेकंदात लगेच कॉल करून घरी ये असं आवर्जून आमंत्रण
पाठवलं. मग मला राहवलं नाही आणि लगेच ज्युपिटरवरून डोंबिवलीतील खड्डे चुकवत कसरत करत
-करत त्याच्याकडच्या आगळ्या रूपातल्या बाप्पाला पाहायला निघालो.
घरी पोहोचलो. "भाई कसा
आहेस?" म्हणून त्याने
हसत-हसत स्वागत
केलं " गेल्या -गेल्या पहिलं
बाप्पाचं दर्शन घेतलं.
छान सुटसुटीत; मोजकीच
आरास आणि मांडणी
केली होती. मग
त्याला याची सविस्तर
माहिती विचारली.
तुळूनाडू भागातील हि खूप जुनी परंपरा
आहे. खास करून
कर्नाटक मधील उडुपी
पासून ते केरळ मधील कासरगोड
इथपर्यंत हि परंपरा
जपली जाते. दरवर्षी
गणेश चतुर्थीला एक
स्वच्छ लाकडी पाट
घ्यायचा, त्यावरती एक वस्त्र अंथरायचे.
केळीचे पान ठेवायचे आणि
त्याच्या मधोमध एक
वाटीभर तांदळाची रास
ठेवून श्रीफळ ठेवायचा
आणि बाजूला पानाचा
विडा. मग तोडून
आणलेल्या उसाच्या काड्यांचे दोन
भाग करायचे आणि
मग काही उभे
, काही आडवे अश्या एकावर
एक उसाच्या काड्या
ठेवून त्याचा मधोमध
ठेवलेल्या नारळा भोवती
पिरॅमिड सारखा आकार
बनवायचा. थरांची मर्यादा
नाही. ३-४ थरांपासून १०-१२ कितीही रचू
शकता. काहीजण नारळासोबत
गणपतीचा फोटो देखील ठेवतात.
मग थर रचून झाल्यावर त्याच्या वर
मधोमध पिंगारा ठेवला
जातो. आता हा पिंगारा म्हणजे काय
तर सुपारीचे फुल.
तुलु भाषेत त्याला
पिंगारा असे म्हणतात
इंग्रजीमध्ये betel nut flower तर आपल्याकडे
त्याला शिंपटे (फुलोरे)
किंवा पेंडकी म्हणतात. ते मधोमध
ठेवलं कि त्याचा
पांढरा शुभ्र झुपका
मस्त गणपतीच्या सोंडेसारखा
प्रतीकात्मक भासतो. कदाचित
त्यामुळेच तो ठेवत
असावेत. नंतर त्यावर
एखादा हार आणि फुले वाहतात
आणि बाजूला गणपतीसाठी
एक पंधरा शुभ्र
पंचा किंवा धोतर ठेवला
जातो. हि
झाली मुख्य साधी
सुटसुटित मांडणी. बाकी कलश
स्थापन आणि आरास
वगैरे आपल्या आवडीनुसार
जसं आपण करतो
तसंच. नंतर सर्व
शेवटी गणपतीला नैवेद्य
दाखवून हि पूजा पार पडली
जाते. त्यांच्या गावाकडे
काही जण बाहेर
तुळशी वृंदावनाजवळच बाजूने
शेतातून तोडून आणलेला
अख्खा ऊस तसाच्या तसा चारही
बाजूने रचतात आणि
मग हि अशी पूजा नंतर
मांडतात अशी पद्धत आहे.
मग विसर्जन म्हणून
दुसऱ्या दिवशी प्रसाद
म्हणून त्या ऊसाचा
रस करून प्यायचा
आणि वाहिलेली फुले
निर्माल्य म्हणून. झाली पूर्ण
पूजा.
मला याची एक
अध्यात्मिक बाजू दिसली
जी त्याने त्याच्या
दृष्टिकोनातून सांगितली. नीट याकडे
पाहिलं तर मधोमध
ठेवलेला नारळ हा आत्मा आणि
बाजूने उभारलेला पिरॅमिड
हे आपलं शरीर.
विसर्जन होईपर्यंत ऊस,
फुले हे हळूहळू
दुसऱ्या दिवशी सुकत
जातं परंतु नारळ तसाच
राहतो. तसंच आपला
आत्मा अमर आहे आणि शरीर
नश्वर. त्याचा हा
दृष्टिकोन मला आवडला.
आता सध्या नवीन
पिढी मूर्ती रूपात
बाप्पा आणून पूजन
करते परंतु काही
गावात जुनी जाणती
माणसे अजूनही परंपरा
पाळतात. असंही त्याने
मला सांगितलं. नंतर
बाप्पाचा प्रसाद म्हणून
मी खीर खाल्ली
आणि थोडा वेळ
जुन्या आमच्या लॉजिटेक
पार्कच्या आठवणी ना
उजाळा दिला. मी
त्याला या प्रथेमागची
कथा विचारली.
या प्रथेमागची अशी मान्यता आहे कि बाप्पाला गोड खायला आवडते आणि ऊस हा त्याचा आवडता आहे. आपल्या कोकणाप्रमाणेच तुळूनाडू भागात देखील परमेश्वराचं निसर्गरूपात पूजन केले जाते त्यामुळे बाप्पाला इथे ऊस, नारळ, सुपारी इथे जे पिकतं त्या निसर्गाच्या प्रतीकात्मक रूपात पुजलं जातं.
तुळशी वृंदावनाजवळील मांडणी |
खीर खाऊन तृप्त झालो. नवीन गोष्टींचं मला नेहमीच कुतूहल असतं. गणपतीच्या या आगळ्या -वेगळ्या रूपाच्या दर्शनाने मला समाधान वाटलं. हा गजानन किती किती रूपात आहे नाही.
गणेशाची ३२ आकर्षक
रूपे आहेत. तसाच
बाप्पा निसर्गातल्या चरा
-चरात भरून आहे
म्हणूनच तो कित्येकांच्या
घरी नारळातून, कधी
टोमॅटोतून, कधी वांग्यातून,
तरी कधी बटाट्यातून
तर कधी एखाद्या
फुलातून अश्या विविध
रूपातून तो आपल्या
भक्तांना नेहमी दर्शन
देत असतो आणि
पुढेही देत राहील.
--- © मयुर सानप Sep2023
2 comments:
मस्त लिहीलास भाई
नवीन माहिती मिळाली,
अप्रतिम विषयाची मांडणी👌👌
Post a Comment