शिंपी (Common Tailorbird )

 शिंपी (Common Tailorbird )






टाळेबंदीत ना कुठे बाहेर, ना कुठे फिरायला जायचे वांदे झाले होते. खिडकीत बसल्या-बसल्या आपली कामं करताना पक्ष्यांचे सुंदर आवाज ऐकायला यायचे आणि टाळेबंदीत जर जास्तच निरनिराळे दिसायचे. मग आपसूकच त्यांना निहाळण्यात वेळ जायला लागला आणि एक नवा छंद जोपासला गेला. 

जगातला अनेक कठीण टास्क पैकी एक कुठला असेल तर तो म्हणजे पक्ष्यांचे फोटो मिळवणं आणि त्यात without लेन्स वाला कॅमेरा असेल तर आणखीच कठीण. त्यांची तासंतास वाट पाहणं. एक जागी तिष्ठत बसणं आणि कधी पटकन आलाच, तर एक सेकंदात भुर्रकन उडून जाणार. तेवढ्यातच वेळ साधावी लागते.  म्हणूनच मला बर्ड फोटोग्राफर्सचं नेहमीच कौतुक वाटतं. फोटो काढायची आवड जशी सर्वांना तशीच मलाही; म्हटलं प्रयत्न करून पाहूया आणि ३-४ जणांचे मिळवण्यात यश आलंच आणि मागच्या जून मध्ये पहिला फोटो मिळाला तो शिंपी पक्ष्याचा वरती लाईटच्या तारेवर बसून झोका घेतानाचा. 

चुहिट ss चुहिट ss असा आपल्या आवाजाने आजुबाजूचा परिसर दणाणून सोडला होता. पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहत टुणटुण झाडावरून इकडे तिकडे उड्या मारत होता. तिथूनच सुरुवात झाली माझी पक्षी निरीक्षणाची. चिमणीपेक्षाहि लहान आकाराचा पक्षी. पण त्याचा आवाज केवढा! छोटा पॅकेट बडा धमाका हे याच्या कडे पाहिल्यावर लक्षात येतं.  आता पाहूया त्याची माहिती. 


नाव:- शिंपी 

हिंदी :- दर्जी 

इंग्रजी:- काॅमन टेलरबर्ड (Common Tailorbird )

Kingdom: Animalia

Phylum: Chordata

Class: Aves

Order: Passeriformes

Family: Cisticolidae

Genus: Orthotomus

Species: O. sutorius


शिंपी पक्षी हा छोटा पक्षी सिल्व्हिइडी पक्षिकुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑर्थोटोमस स्युटोरियस आहे. हिंदीत त्याला दर्जी म्हणतात. हा पक्षी साधारण १३ सें. मी. आकाराचा आणि उत्तम घरटे विणणारा पक्षी म्हणून ओळखला जातो.

शिंपी पक्षी हिमालयाच्या १५०० मी. उंचीपर्यंतच्या परिसरापर्यंत आणि दक्षिणेकडील डोंगराळ प्रदेशात १,२२० मी. उंचीपर्यंत तो आढळतो. तसेच तो पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार या ठिकाणीही आढळतो. आकार आणि रंगाच्या थोड्या फरकाने याच्या किमान पाच उपजाती या भागात आहेत. झुडपांच्या जंगलात, कुंपणांच्या झुडपांत, घराभोवतालच्या बागेत त्याचा वावर असतो. दाट जंगले व रखरखीत प्रदेश येथे मात्र तो आढळत नाही. 

शिंपी पक्षी अतिशय सक्रिय आहे.याचा विणीचा हंगाम अर्थात प्रजोत्पादनाचा काळ हा एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत असतो. प्रजोत्पादनाच्या काळात नराच्या शेपटीतील मधली पिसे जास्त लांब होतात (सु. ५ सेंमी.इतकी ) त्याचे घरटे झुडपांमध्ये किंवा वेलींवर जमिनीपासून ९० ते १२० सेंमी. उंचीवर असते. पाने शिवण्यासाठी ताे चाेचीचा सुईप्रमाणे आणि काेळ्याच्या जाळ्यांचा किंवा वनस्पतीच्या तंतूचा दाेऱ्याप्रमाणे उपयाेग करताे. एक किंवा दाेन पाने शिवून ताे त्याची आधी पुंगळी बनविताे. ती खालच्या बाजूने शिवून बंद करताे. या पिशवीत कापूस किंवा इतर मऊ पदार्थ घालून ताे घरटे तयार करताे. वड, पिंपळ यांच्या पानांपासून ताे घरटे तयार करताे. अगदी कुशल कारागीरासारखी. अंड्याचे व त्यावर बसणाऱ्या पक्ष्याचे वजन सहन करण्याइतके त्याचे घरटे मजबूत असते. म्हणूनच त्याला पक्ष्यांमधील अतिशय कुशल वास्तुकार म्हणतात. नर व मादी दोघे मिळून घरटे तयार करतात. तांबूस अथवा निळसर पांढऱ्या रंगाची ३-४ अंडी मादी घालते. त्यांच्यावर तांबूस तपकिरी ठिपके असतात. नर मादी बहुतांश दिसायला सारखेच असतात फक्त नराची शेपटी लांब असते. आता मी हा जो फोटो काढलाय, वर्णनावरून तरी तो नरच वाटतोय. 

लहान कीटक, त्यांची अंडी आणि अळ्या तसेच विविध फुलातील मध आणि किटक हे शिंपी पक्ष्याचे मुख्य अन्न आहे. आंब्याच्या झाडासाठी हा अनुकूल आहे.  आंब्याला मोहोर आल्यावर त्यावर जे कीटक लागतात ते हा टिपून खातो आणि एकप्रकारे आंब्याला लागलेला मोहोर हा सुरक्षित राहतो असे दिसून आले आहे. 

या पक्ष्याला त्याच्या घर बांधिणीवरून त्याला "शिंपी" हे नाव दिले गेले हे तर कळले असेलच परंतु ते खऱ्या अर्थाने अजरामर केले ते जोसेफ रुडयार्ड किपलिंग या इंग्रजी लेखक, कवी आणि कादंबरीकाराने. त्यांचा जन्म हा भारतात झाला होता. रुडयार्ड किपलिंगच्या जंगल बुक कथांपैकी एक "रिक्की-टिक्की-तवी" मध्ये दोन दर्जेदार पात्र म्हणून दर्जी (शिंपी पक्षी ") आणि त्याची पत्नी यांचा समावेश आहे. यातून शिंपी पक्षी हा अजरामर झाला. जंगल बुक हि तीच कादंबरी आहे ज्यातील मोगली बघता -बघता मी, आपण सर्वजण मोठे झालो. 


माहिती सौजन्य:- विकिपीडिया आणि आंतरजालावरून साभार.

करडा धोबी (Grey wagtail)

 करडा धोबी (Grey wagtail)



टाळेबंदीतली सकाळ. रोज खिडकीवरच्या टकटक आवाजाने जाग यायची. कोण आहे म्हणून एकदा कुतूहलाने खिडकी उघडली आणि एक पक्षी भुरकन उडून गेला. मागे नवीन वर्षाच्या सुरुवातीला अलिबाग ला असताना सुतार पक्षीने असाच अनुभव दिला होता. पण आवाजावरून तरी तो असेल असं वाटलं नव्हतं. कुतूहल चाळवलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा खिडकीवर टकटक झाली. हळूच खिडकी उघडली आणि त्याला चाहूल लागताच समोरच्या दोरीवर जाऊन बसला. करड्या आणि पिवळसर रंगाचा हा पक्षी मी पहिल्यांदाच पाहत होतो. मस्त आपली शेपटी वर खाली उडवत होता आणि थोड्याच वेळात दोरीवून खाली सुर मारून उडाला. हा आता त्याला रोजच पाहण्याचा छंद जडला आणि कसरत सुरू झाली त्याला कॅमेरात टिपण्याची. १४ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी एक छान फोटो मिळालाच. सतत शेपटी वर खाली करणारा हा होता (Grey wagtail)करडा धोबी. हे पक्षी सतत शेपूट वर- खाली हलवीत असल्यामुळे या प्रजातीला मोटॅसिल्ला हे नाव पडले आहे. पण हा त्या खिडकीवर रोज सकाळी का टकटक करायचा याचं कोड तेव्हा उलगडलं जेव्हा तो आपली निशाणी सोडून गेला..😀

पॅसेरीफॉर्मिस गणाच्या मोटॅसिल्लिडी कुलातील मोटॅसिल्ला प्रजातीमधील पक्ष्यांना सामान्यपणे धोबी म्हणतात. भारतात या पक्ष्याच्या ३-४ जाती आढळतात. भारतात आढळणाऱ्या जातींपैकी एक–शबल (चित्रविचित्र रंगाचा) धोबी–येथील कायमची रहिवासी असून बाकीच्या हिवाळी पाहुणे म्हणून इकडे येतात. शबल धोब्याचे शास्त्रीय नाव मोटॅसिल्ला मदरासपटेन्सिस असे आहे. हिमालयाच्या ६१० मी. उंचीपासून खाली सगळीकडे तो आढळतो पण आसाममध्ये तो सापडत नाही. हिवाळ्यात भारतात येणाऱ्या मोटॅसिल्ला प्रजातींमध्ये करडा धोबी (मो. सिनेरिया), पांढरा धोबी (मो. अल्बा) आणि पिवळा धोबी (मो. फ्लावा) या मुख्य जाती आहेत. (१) करडा धोबी पक्ष्याची वरची बाजू करडी व खालची पिवळी. (२) पांढरा धोबी पक्ष्याची वरची बाजू करडी; चेहरा, हनुवटी व गळा पांढरा; छातीवर काळा पट्टा; पंख काळे पांढरे. (३) पिवळा धोबी पक्ष्याचे कपाळ पिवळे, भुवया पिवळ्या. उन्हाळ्याच्या आरंभी नराचे सगळे डोके पिवळे होते. 
हा पक्षी सतत आपली शेपूट वर-खाली हलवत असतो. एखादा धोपटणे आपटावे तसे, त्यावरूनच याला धोबी हे नाव पडले. मला सध्या तरी फक्त करड्या रंगाचा धोबी पाहायला मिळाला. त्यामुळे त्याचीच माहिती फक्त या पोस्ट मध्ये टाकतो आहे. 
आता पाहूया त्याची माहिती.





नाव:             करड्या डोक्याचा धोबी किंवा भाटुकली  

इंग्लिश:        Dark-headed Wagtail or Grey-headed Wagtail; 

हिंदी:            नील-सिर पीलाकिया). 

शास्त्रीय नाव: (Motacilla cinerea)

Kingdom:    Animalia

Phylum:       Chordata

Class:           Aves

Order:         Passeriformes

Family:       Motacillidae

Genus:        Motacilla

Species:       M. cinerea 


ग्रे वॅगटेल हे द्विपद नाव दिले ते मार्मडुके टन्सटॉल या ब्रिटिश पक्षीशास्त्रज्ञाने. त्याने हे १७७१ मध्ये ऑर्निथोलॉजीया ब्रिटानिका या पुस्तकात मध्ये सादर केले. किंबहुना द्विपद नामकरणा वर काम करणारा तो पहिलाच ब्रिटिश पक्षीशास्त्रज्ञ होता. मोटासिला हे वॅगटेलचे लॅटिन नाव आहे.

करडा धोबी हि पिवळ्या धोब्याची एक उपप्रजात आहे. वरचा पाठीकडचा भाग हा करड्या रंगाचा तर खालचा भाग हा पिवळसर असतो. तर शेपटीची किनार पांढरी असते. डोक्याचा रंग करडा व भुवईचा रंग पांढरा असतो. पिवळा धोबी पाकिस्तान आणि भारतात गंगेचे मैदान ते दक्षिणेकडे कच्छ्, कन्याकुमारी, श्रीलंका आणि पूर्वेकडे बांगला देश ते ब्रम्हदेश व अंदमान आणि निकोबार बेटे या भागात आढळून येतो.नद्या, ओढे, तलाव वगैरेंच्या काठी हा नेहमी असतो.

करडा धोबीचा विणीचा हंगाम अर्थात प्रजोत्पादनाचा काळ हा एप्रील ते जुलै या महिन्यांमधे असतो. प्रजजन काळात नर हा हवेत लहान उड्डाणे करून प्रदर्शन करत असतो आणि एका विशिष्ट् आवाजासह तो हळू हळू खाली उतरतो. याचे घरटे नदीच्या काठावर खडक आणि झाडांची मुळे यामधे असते. मादी साधारण ३-४ अंडी घालते. ती पांढरी असून त्यात करड्या, तपकिरी किंवा हिरव्या रंगाची छटा असते. त्यांवर तपकिरी ठिपके किंवा रेषा असतात.. लहान किडे हा या धोब्याचा मुख्य आहार असतो. या किड्यांच्या शोधात हा धोबी आपली शेपटी मस्त वर खाली करत नाचवत असतो.

या टाळेबंदीत खूप पक्षी दिसू लागलेत आणि आपसूकच त्यांची माहिती घेण्याची जिज्ञासाही जागी झाली आहे. आता पाहूया पुढचा कोणता पक्षी दर्शन देतो ते.


माहिती सौजन्य:- विकिपीडिया आणि आंतरजालावरून साभार.