स्वराज्याचे तोरण (प्रचंडगड ) ते बनेश्वर दर्शन
सह्य़ाद्रीचा दुर्गम मुलूख आणि त्यावरील या अभेद्य दुर्गाच्या मदतीने छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्य वर्षी पहिलाच घेतलेला हा किल्ला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले असे संबोधले जाते. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव "तोरणा" पडले. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले आणि याच किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. याची आणखी एक विशेषता म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.
पाबे घाटातील प्रसन्न सकाळ |
हा किल्ला
पाहायला मात्र तब्बल २४ वर्षाचा कालावधी जावा लागला. पुण्याला आल्यावर पहिला घाट
घातला तो तोरण्याचाच. सचिन, हेमंत आणि आशुतोष
मात्र आयत्यावेळी लटकले तरीही नेहमीप्रमाणे नितेश आणि मी आम्ही दोघे शिलेदार तयार
झालो. सकाळी पहाटेच उठून तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी आम्ही मार्गस्थ झालो.
पुण्यातील वातावरण नेहमीच प्रसन्न असतं. त्यात सकाळ ही अगदी प्रसन्न करणारी होती.
मुंबई सारखी बजबज इथे नाही. सकाळी हवेत गारठा जाणवत होता त्यात जाताना खडकवासला
मार्गे गेल्याने चांगलेच गारठलो होतो. सूर्योदयाला नुकतीच सुरुवात होत होती. त्यात
२ दिवस अगोदर पाऊस पडून गेल्यामुळे पाबे घाटातील सकाळ ही फार मनाला प्रसन्न करणारी
वाटत होती. घाटातून तोरणा किल्ल्याचे दुरून दर्शन होत होते. तोरणा हा अगदी आकाशाला
भिडलेला भासत होता. रस्ता थोडा खराब असल्याने आम्हाला वेल्हे गावाजवळ पोहोचायला
थोडा जास्त वेळ लागला. सकाळी-सकाळी कडकडून भूक लागली होती. वेल्हे गावातच
"हॉटेल साई" नुकतेच उघडलेले वाटत होते.
"मावशी
नाश्ता काही तयार आहे का ?" मी विचारले.
"हाय ना!
पोहे हाईत आणि थोडा वेळ थांबलात तर गरम गरम वडे काढते त्ये पण देते" .
बस! ना सकाळ सकाळ
गरम गरम पोहे आणि बटाटा वडा अजून काय पाहिजे.. मस्त पैकी दोन्हीवर आम्ही ताव
मारला.
"मावशी
पाण्याची चव छान आहे हो ?"
"हाय ना..
मग .. हिरीचं पाणी हाय.." मावशी ने
खुशीने उत्तर दिले.
हॉटेलच्या बाहेर
पडल्यावर एक मोती आमच्याकडे आशेने पाहत होता. मग आम्ही त्याला काही बिस्किटे खायला
दिली. आमच्या पाठी पाठी तो ही आला. तो बिचारा त्या बिस्किटाच्या आशेने आमच्या
बरोबर पूर्ण तोरणा चढेल हे आम्हाला कुठे तेव्हा माहित होत. तसेही तोरणा किल्ल्यावर
जाणाऱ्या प्रत्येक ट्रेकर ला दरवेळी कुठला नं कुठला एक श्वान सोबत देतोच हा
बहुतेकांचा अनुभव आता आम्हालाही आला होता.
तोरण्याला आता
वरच्या एका टप्प्यापर्यंत गाडी जाते. दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी टप्प्याच्या
शेवटलाच वाहनतळाची सोय ही आहे. तिथेच आपल्या गाड्या लावायच्या आणि तोरणाला वरती
जाण्यासाठी मार्गस्थ व्हायचं. तोरणा जातीची झाडे ही फार विपुल प्रमाणात गडावर
आहेत. त्याच्यातून मार्ग काढत जात असताना अगदी चहाच्या मळ्यातून जातोय असाच भास
होत होता.
पुणे जिल्ह्यातला
दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. तोरणा
सुरुवातीपासूनच आपली दमछाक करतो. वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या
रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर
तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या
नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व
रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे
खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व
खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून खडकवासला- पाबे घाट या रस्त्याने तोरण्यापर्यंतचे
अंतर साधारण ६० किमी आहे परंतु हा मार्ग तेवढासा सुस्थितीत नाही. नसरापूर वरून
गेल्यास साधारण ८० कि.मी आहे आणि हा जलद मार्ग आहे.
हा किल्ला कधी
आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. परंतु येथील लेण्यांच्या आणि
मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान
बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत
गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही
इमारती बांधल्या. राजांनी आग्ऱ्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात
५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजानंतर हा किल्ला
मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे
इ.स. १७०४मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व
याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी
कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा
कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये
तोरणा महाराजांकडेच राहिला होता. असा हा याचा इतिहास.
वेल्हे गावातून
चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आहे. तशीच
पायवाट, बाजूला खोल दरी आणि दिसणारे गुंजवणे धरण. अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने
लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे सहज चढउतार करता येते आणि आपला जाण्याचा
मार्ग सुकर होतो. थोडीशी विश्रांती घेत-घेत निसर्गाचा आस्वाद घेत आमचा ट्रेक चालला
होता. वरती गेल्यावर एका टप्प्यावर काही वानरांची टोळी खाली येऊ पाहत होती पण
त्यांना पाहताच आमचा मोती इमानाला जगला नि गुरुगुरल्यामुळे वरच्या-वर त्यांनी
कलटी मारली. तो हि सारखा धापा टाकत होता.
याला नक्कीच तहान लागली असणार म्हणून नितेशला सांगून मी त्याच्यासाठी पानाचा द्रोण
बनवला आणि त्यात बाटलीने पाणी ओतले तर चपाकss चपाकss करत त्याने पाणी संपवले आणि पुढच्या प्रवासाला तोही
ताजातवाना झाला. मात्र पुढच्याच एका अवघड टप्प्यावर तो थांबला. आम्ही वर गेल्यावर कुss कुss करायला लागला
जणू काही सांगत होता मला पण सोबत न्या. टाकून जाऊ नका. मग शेवटी नितेश परत खाली
उतरला आणि त्याला रेलिंग च्या बाजूने वर उचलून बाजूला ठेवला तसा टुणकन उडी मारून
वरती आला. नंतर मात्र त्याने शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली.
बिनी दरवाजा |
कोकण दरवाजा |
बुधला माची कडे जाणारा रस्ता |
हत्तीचा माळ |
पश्चिमेचा ला असणारा बिनी दरवाजा पार केल्यावर आम्ही कोठी दरवाजा कडून पुढे मेंगाई देवीच्या मंदिराकडे निघालो. गडावर आता फारच कमी अवशेष शिल्लक आहेत. बालेकिल्ला येथेच मेंगाई देवीचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर आहे. इथेच पहिले दिवाणघर होते जे आता अस्तित्वात दिसत नाही. कोकण दरवाजा, झुंजार माची, बुधला माची, पाण्याच्या टाक्या, गंगाजाई मंदिर , मरी आई मंदिर एवढीच थोडी फार ठिकाणे आता पाहायला मिळतात. त्यातल्या लकडखाना आणि अंबारखाना याची सुधारणा करून त्याचा वापर दुर्गप्रेमींनी साठी राहण्यासाठी केला आहे. गडावरील तटबंदी चे काम पुरातत्व खात्याकडून करण्यात आले आहे आणि अशी छोटी मोठी बरीच कामे चालू आहेत. अशी माहिती तिथे काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदाराने आम्हाला पुरवली. पश्चिमेला जाताना अजून एक पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळते ज्याच्या बाजूला लांब नजर टाकली तर कर्नाळा किल्ल्यासारखा एक सुळका दिसतो तोच बुधला माची कडे जाणारा मार्ग आहे. कोकण दरवाजाकडून आम्ही हत्तीचा माळ आणि बुद्धाला माचीच्या मार्गावर जाऊन पाहून आलो . इकडूनच राजगड ला जाण्याचा पायी मार्ग आहे. राजगड ते तोरणा हा साधारण ५-६ तासाचा ट्रेक बरेचसे ट्रेकर इकडूनच करतात. तोरणावरून सह्याद्रीच्या पर्वतरांगा जेवढ्या सुंदर दिसतात तेवढ्याच धडकी भरवतात. एका इंग्रजाने म्हटले होते कि, सिंहगड हि जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे. किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आहे त्यावरूनच याला प्रचंडगड नाव का ठेवलं याची प्रचिती येते. गडाची उंची समुद्र सपाटीपासून साधारण १३९५ मीटर आहे.
झुंजार माची |
आता आमचा शेवटचा
टप्पा उरला होता तो म्हणजे झुंजार माची. तिथल्या विस्तीर्ण पठारावर तर आलो पण आता
खाली जायला एकच मार्ग होता तोही धडकी भरेल असा. तटाला लोखंडी शिडी ९०. च्या कोनामध्ये
बसवून केलेला. आमच्या बाजूला असलेले गृहस्थ तर ते पाहूनच माघारी फिरले आणि आपल्या
सहकाऱ्यांची वाट पाहत बसले. आम्ही मात्र व्यवस्थित काळजी घेत खाली उतरलो. पण पुढे
गेल्यावर पुन्हा प्रश्न चिन्ह? कारण आता इथे आधारासाठी रेलिंग नव्हते कि कसली
शिडी! दगडाच्या कपारीचा आधार घेत खाली उतरावे लागणार होते आणि परतिचा हि मार्ग
तोच. आमच्या पुढे असणाऱ्या माणसाची मात्र आता हातभार फाटली "भाऊ जरा थांबा हा!
मला मदत करा .. जाऊ नका " त्याने नितेश ला सांगितले . मग नितेशने त्यांना
व्यवस्थित आधार देऊन खाली उतरवले. मग मी पण काळजी घेत नितेशच्या मदतीने खाली
उतरलो. हुश्श! उतरलो कारण चढाई पेक्षा उतरणंच खूप कठीण असते. खाली उतरल्यावर एक
निश्वास टाकत आम्ही झुंजार माचीकडे जाऊन बुरुजाच्या टोकावर फडकणारा भगवा पहिला.
अहाहा!! "जगातील सर्वात सुंदर देखावा
तो म्हणजे बुरुजावर फडकणारा भगवा". केलेल्या प्रयत्नाचे हे फळ. त्याच्याच
खाली असलेली चोरवाट पाहून परत त्याच मार्गाने वरती आलो. पठारावर आल्यावर एकदा मागे
नजर टाकली आणि नितेश बोलला कि , "खरंच झुंजार माची
आपल्या नावाला जागली. झुंज द्यायला लागली तिथे पोहोचण्यासाठी. ".
आता आमचा संपूर्ण
किल्ला पाहून झाला होता. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
परताना आम्हाला एक पुण्याचेच सद्गृहस्थ
भेटले. एकटेच फोटो काढत ट्रेकिंग ची मजा घेत जात होते. राजमाची नंतर आम्हाला आणखी
एक सोलो ट्रेकर भेटले होते. पुढे उतरताना वरती काम करणारे एक कामगार रिकामा
सिलेंडर घेऊन जात होते. विचारल्यावर समजले कि येताना परत त्यांना भरलेला सिलेंडर
घेऊन यायचा आहे. "आम्ही जातो पुढे तुम्ही या सावकाश आमचं काय रोजचाच हाय
हे" असे बोलून झपाझप ते खाली पण निघून गेले. "बापरे!! भरलेला सिलेंडर
डोक्यावर घेऊन गडावर या कठीण वाटेवरून जायचे म्हणजे किती मोठं दिव्य! आणि हे यांचे
रोजचं जीवन. सारंकाही असून सुद्धा लोक जेव्हा चांगल्या आयुष्याची तक्रार करतात
तेव्हा त्यांना म्हणावं पहा यांच्याकडे एकदा; किती सुखी आहेत तुम्ही हे कळेल.
थोड्याच वेळात
आम्ही सुद्धा गड पायउतार करून झालो. परतीच्या प्रवासात जाताना बनेश्वर च्या दर्शनाला जायचं हे आधीच
ठरल्यामुळे आम्ही वेल्हे-नसरापूर चा मार्ग पकडला. रस्त्याचे डांबरीकरण खूप चांगले
होते. नितेश सुसाट गाडी पळवाट होता. हे रस्ते पाहिल्यावर अगदी प्रकर्षाने कोकणातील
रस्ते आणि येथील रस्ते यांची तफावत जाणवत होती.
आपल्याकडील नेते का या गोष्टी मनावर घेत नाहीत हेच कळत नाही. वर्षानुवर्षे
तीच परिस्थिती.
थोड्याच वेळात
आम्ही बनेश्वरला पोहोचलो. बनेश्वर हे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले
महादेवाचे मंदिर आहे. पुणे शहरापासून नैऋत्य दिशेला ३६ किलोमीटर अंतरावर एका
निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. आजूबाजूला दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हे
ह्या जागेचे वैशिष्ट्य. शांत आणि निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले हे मंदिर अत्यंत
साधे आणि तरिही सुंदर आहे. जंगल म्हणजे बन आणि या बनामध्ये वसलेला ईश्वर म्हणजे
बनेश्वर.
येथील महादेवाचे
प्रसन्न चित्ताने दर्शन घेतलं. या मंदिराची काही माहिती मिळते का म्हणून मंदिरातील
बाहेर असलेले विश्वस्तांनाच विचारले तेव्हा या
मंदिराला "जलमंदिर " असेही म्हणतात असे त्यांनी सांगितले. तशी
याची काही आख्यायिका माहित नाही पण बनेश्वर हे हेमाडपंथी असून मंदिराची रचना
मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून, ह्या मंदिराची
स्थापना पेशवे बाजीराव ह्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे, ह्यांनी १७४९
मध्ये केली. या मंदिरांमध्ये तुम्हाला
महादेवाच्या पिंडीबरोबरच लक्ष्मी आणि विष्णू यांच्या मुर्तीही दिसतील. या मंदिराचे
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारे गुप्तलिंग. येथे गर्भगृहातील शाळीग्राम
उचलल्यानंतर असणाऱया मुख्य पिंडीखालीच पाच शिवलिंगे आहेत. त्यात जे पाणी आहे ते
दक्षिणेला बाहेर पडते आणि मंदिराची जी उभारणी झाली आहे ती "मृत्युंजय
मंत्रावर " झालेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच एक विशाल घंटा आहे.
चिमाजी अप्पा ह्यांनी एका युद्धात पोर्तुगीस सैन्यास पराभूत केल्याचे विजयचिन्ह
म्हणून ही घंटा ओळखली जाते. ह्या घंटेवर १६८३ हे साल असून एक क्रॉस आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर
आपणांस मुख्य मंदिर, दिपमाळ, दोन छोटे कुंड
दिसून येतात. समोर गणपती मंदिर आणि दक्षिणेला मारुती आहे. त्याची स्थापना रामदास
स्वामींनी केली असे सांगतात. समोर असणाऱ्या गणपती मंदिराच्या १० फुट खालून
पाण्याचे झरे आहेत आणि तेच पाणी समोरील कुंडात जमा होते. तसेच हे मंदिर राजगडच्या
मार्गावर असल्याने शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे इत्यादी माहिती
त्यांनी मला पुरवली.
मंदिराच्या मागील
बाजूस शिवगंगा आहे. तिथेच धबधबा असून हे तिथले एक प्रमुख आकर्षण आहे. या
मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या बनाचे रूपांतर सुंदर अशा बगिच्यात केलेले आहे.
या बनामध्ये विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात असे बोलले जाते. बनेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही परतीच
मार्ग पकडला.
तोरणा किल्ला
पाहण्याची इतक्या वर्षाची मनीषा आज पूर्ण झाली होती. किल्ल्यावर आज काही फारसे
नसले तरी निसर्गाची मजा लुटायला, तरुण वयात दमछाक
होण्यासाठी व मोकळ्या हवेची मजा घेण्यासाठी तोरणा किल्ला एकदा तरी जमेल तसा
पाहायला हवा आणि बनेश्वरच्या वातावरणात रममाण होण्यासाठी एकदा तरी या मार्गावरचा
प्रवास करायला हवा.
इतिहास संदर्भ: सौजन्य: ट्रेकक्षितीज.
इतिहास संदर्भ: सौजन्य: ट्रेकक्षितीज.
No comments:
Post a Comment