खरंच का जमत नाही आपल्याला ?



   ठाणे स्टेशन हे तसे नेहमी गर्दीचे ठिकाण मग ती कुठलीही वेळ असो. ट्रान्स हार्बर लाईन येथे मिळत असल्यामुळे प्लॅटफॉर्म नं. १० आणि तिथून पलीकडे जाणारा ब्रिज हा नेहमी गर्दिचाच. त्यादिवशी ही नेहमीचीच सकाळ, सगळ्यांची कामावर जायची घाई. तसेही मुंबई मध्ये वेळेवर पोचायचे असो व नसो सगळे जण घाईतच असतात. मीही वाशी लोकल ने उतरल्यावर प्लॅटफॉर्म १० पार करून जाण्यासाठी सगळ्यांना धक्के बुक्के देत, काहींचे घेत जिना घाईघाईने चढू लागलो अर्थात मीही त्या गर्दिचाच एक भाग होतो आणि ध्येय काय तर लवकरात लवकर जिना पार करून पलीकडची CST लोकल पकडायची.
  जवळपास अर्धा जिना चढलो असेन मी आणि अचानक एक आवाजाने माझे लक्ष वेधून घेतलं. जरा सुरुवातीला दुर्लक्ष केलं मी कारण आजकाल कोणाला कोणाकडे पाहायला एवढा वेळ असतो असेच म्हणतो आपण नाही का? पण सहजच मान वळवून मागे पाहिले आणि लक्षात आलं कि खालून एक पांगळा भिकारी येणाऱ्या जाणार्यांकडे मदतीसाठी याचना करत होता. पण कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. त्याच्या त्या केविलवाण्या नजरेकडे पाहून काय वाटले कोणास ठाऊक त्याला मदत करायचे मनात ठरवले आणि तेवढ्या गर्दीतून सगळ्यांच्या शिव्या खात उलट माघारी फिरून खालच्या पायरीवर जिथे तो बसला होता तिथे आलो.
त्याची ती नजर मोठ्या आशेने माझ्याकडे पाहत होती. क्षणभर विचार केला कशासाठी हा सगळ्यांना हाक मारतोय पैशासाठी?? नाही तसं तर काही वाटत नव्हते.  मला समजून चुकले ही पांगळा आहे आणि याला वर जाता येत नाही आणि त्यासाठीच हा सगळ्यांकडे मदत मागतोय. त्याला मी काही विचारायच्या आतच तो बोलला “गाडी... गाडी... वर नेऊन द्या की ... “मी बाजूला एक कटाक्ष टाकला तर तिथे एक फळीला चार चाके लावलेली एक छोटी गाडी होती. बहुधा हा त्याच्यावरून हाताच्या साहाय्याने ये जा करत असावा. 
"चला  ... मी नेतो तुम्हाला...
"नगं  ... फक्त गाडी वर नेऊन द्या.  मी येनं स्वतः:" तो बोलला.
मी थोडा आश्यर्चचकित झालो. अरे नुसती गाडी वर नेण्यासाठी हा मदत मागतोय आणि हा वर येणार कसा? हा तर पांगळा.! पण विचार केला की एवढा बोलतोय तर आधी गाडी तर वर नेऊन ठेवूया. मग बघूया पाहिजे तर याला आणायला परत येऊया खाली.
त्याही परिस्थितीत  जेवढी आवश्यक आहे तेवढ्याच मदतीची अपेक्ष ठेवून त्याने आपला स्वाभिमान जपून ठेवला होता याचे मला कौतुक वाटले.
   मग थोडी गर्दी  ओसरल्यावर त्याची ती गाडी उचलून मी पटापट जिने वर चढून जाऊ लागलो. हे सर्व चालू असताना काही कुत्सित नजर माझ्याकडे पाहत  असल्याचं मला जाणवलं.   कदाचित विचार करत असतील काय करतोय हा त्या घाणेरड्या भिकाऱ्याकडे काय माहीत. चाललंय मोठा समाजसेवा करायला!! पण मी सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती गाडी वर नेऊन ठेवली. विचार केला की आता याला वर आणण्यासाठी मदत करूया आणि वळून जिना उतरणार इतक्यात पाहतो तर काय तो पांगळा भिकारी निव्वळ आपल्या हाताच्या जोरावर जिने चढत होता. ज्या गतीने तो ते जिने चढत होता (चढत कसला फ़रफ़टतच येत होता.) त्याची ती गती पाहून मी थक्क झालो. त्याचे हे नेहमीचेच असणार हे मला जाणवलं.   
वर आल्यावर एक हात वर करून थोडा हसरा चेहरा करून त्याने माझे आभार मानले. त्याची ही आभार प्रदर्शनाची खुबी मला मात्र भावली. मी ही थोडा घाईत असल्यामुळे पटकन तिथून निघून माझ्या कामाला निघालो.
   पण चालत चालत सहज एक विचार मनात आला, काय मागितले होतं  त्याने ? पैसा? नाही. मग! फक्त एक क्षुल्लक मदत . पण तीही करायला कोणाकडे वेळ नव्हता. तोही एक माणूसच आहे फक्त परिस्थितीने गांजलेला हे आपण विसरून जातो आणि आपल्या तर तो खिजगणतीतही नसतो.
खरेच आपण आपल्या विश्वात एवढे गुरफटून जातो की कोणी आपल्याकडे सहायता मागितली तरी ती करणे आपल्याला जमत नाही मग ती क्षुल्लक का असेना. खास करून खालच्या स्तरातील व्यक्तीने. खरंच का जमत नाही आपल्याला?
पण कधीतरी दुसऱ्याला निस्वार्थी भावनेने मदत करून पाहायला काय हरकत आहे. बघा किती समाधान लाभेल ते. स्वामी  सुद्धा सांगून गेलेत "साहाय्य करा . सोबत मिळेल.”
काही का असेना पण त्यादिवशी एक चांगले काम केल्याचे समाधान मात्र माझ्या चेहऱ्यावर झळकत होतं.


Note:- This article has been published in 30/09/2016 lokprabha magazine.
http://epaper.lokprabha.com/m/944652/lokprabha#issue/54/1 

No comments: