गोवा-टण (सप्तकोटेश्वर मंदिर ते सान्तइंस्तेव्हामचा किल्ला)



गोवा-टण  (सप्तकोटेश्वर मंदिर ते सान्तइंस्तेव्हामचा किल्ला)






गोवा म्हणजे निसर्गाने मानवाला बहाल केलेला सुंदर दागिनाच. वर्षभर पर्यटकांची प्रचंड गर्दी खेचणाऱ्या गोव्याने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. तेथील निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना नेहमीच साद घालतात. गोवा म्हणजे फक्त नयनरम्य समुद्रकिनारे एवढेच नसून येथील ठिकाणांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे.
अशा ठिकाणांपैकी एक आहे सान्तइंस्तेव्हामचा किल्ला जिथे संभाजीराजांनी मांडवी नदीमध्ये घोडे घातले होते आणि पोर्तुगीजांना सळो कि पळो करून सोडले होते आणि दुसरे म्हणजे गोव्यातील नार्वे गावामधील सप्तकोटेश्वर मंदिर. रमणीय आणि शांत परिसर, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शंकराचे  जुने मंदिर. एवढीच याची विशेषतः नाहीतर आपल्या शिवाजीराजांनी बांधलेले हे मंदिर हि त्याची खरी ओळख आहे.
खास यासाठीच गोव्याचा प्लॅन बनवला. फक्त ३ दिवसात गोवा!! काय जाऊन मजा करणार तुम्ही? एक दिवस तर जायला-यायलाच जाणार. ज्यांना माहित झालं होतं त्यांनी खोचक शब्दात मला सुनावलं. गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे, विदेशीपर्यटक, मद्य आणि मजा हे एवढचं समीकरण असतं बहुतेकांच असा सर्वसाधारण समज. पण मुळात माझा जाण्याचा हेतू इतिहासाची आवड म्हणून या दोन स्थळांना  भेट देण्याचा होता.
नवीनच रेल्वे मध्ये दाखल झालेलया तेजस एक्सप्रेसच बुकिंग करून आम्ही सकाळी निघालो. तेजस एक्सप्रेसचा प्रवास म्हणजे एकदम आरामदायी, वातानुकूलित; थोडक्यात फॉरेनमधल्या ट्रेनचा फील.  रेल्वे मधेच आम्हाला rodrigues नावाचा स्वीडनहुन आलेला एक विदेशी पर्यटक भेटला. उंचगोरा, धिप्पाड ४० च्या आसपास असलेला. तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत भारतदर्शनला आला होता. उत्तरेत कुतुबमिनार वगैरे पाहून झाल्यावर आता गोव्याला आरामासाठी निघाला होता. सहज बोलता-बोलता त्याचं भारताविषयी असलेलं प्रेम कळून आलं. इथली लोक, त्याचं राहणीमान, खाद्य संस्कृती याचं त्याला विशेष कौतुक होतं. २० वर्षाचा असताना जेव्हा भारतात आलो होतो तिथपासून आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी बदलेल्या पाहायला मिळाल्या आणि इथे हि इकॉनॉमी वाढलेली असल्याने फिरणं थोडं खर्चिक झालाय असं तो सांगत होता. त्याची बॅग कुठेतरी प्रवासात हरवली तेव्हा ४ दिवस एकाच अंतर्वस्त्रांसह कसा फिरलो तिथं पासून ते सगळ्या छोट्या- छोट्या गोष्टींपर्यंत सर्व अगदी मनमोकळेपणाने सांगत होता. मी हि कुतुहुलाने त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकत होतो. ४० व्या वर्षात हि गर्लफ्रेंडसोबत फिरताना आमच्याकडे लग्न हि गोष्ट बंधनकारक नाहीये. "तुम्ही कसं काय बुवा! आयुष्यभर बंधनात राहता" मला कौतुक वाटतं त्याचं "असं तो सांगत होता. – हीच तर आमची विशेषतः आहे. मी ही त्याला अगदी पुरब और पश्चिम मधल्या मनोजकुमारसारखं छातीठोक पणे भारताचं आणि महाराष्ट्रातल्या खाद्य संस्कृतीचं कौतुक सांगत होतो.
त्याला खरं तर साध्या एक्सप्रेसने प्रवास करायचा होता. ज्यामध्ये उघड्या असणाऱ्या दरवाजे- खिडक्या,त्यातून डोकं बाहेर काढून डोकावणं, मधूनच ओरडत येणारा चहावाला याचा त्याला आनंद घ्यायचा होता. पण तेजस एक्सप्रेसने त्याचा साफ भ्रमनिरास केला कारण जेव्हा बुक केलेली तेव्हा त्याला हे माहित नव्हतं कि भारतात अशी अद्ययावत रेल्वे असेल म्हणून. भारत हळूहळू कसा प्रगत होतोय याचं त्याला कौतुक होतं पण प्रगत झाल्यावर या जुन्या सुद्धा गोष्टी जपून ठेवल्या पाहिजेत हे हि तो सांगत होता. बऱ्याच गप्पा-टप्पा झाल्यावर निघता-निघता त्याची एक आठवण म्हणून त्याच्या सोबत एक झकास सेल्फी घेऊन त्याला निरोप दिला.
स्वच्छ, सुंदर , निळ्याशार पाण्याचे समुद्रकिनारे हि तर गोव्याची विशेषतः मग ते पाहिल्या शिवाय गोव्याचं पर्यटन सार्थकी कसं लागणार. म्हणून एक दिवस पूर्णपणे उत्तर गोव्यामधले कांदोळीपासून ते हरमल (Arambol ) पर्यंतचे सर्व समुद्रकिनारे आम्ही पहिले. त्यात विशेष वाटला तो vagator चा किनारा . छोटाश्या टेकडीवरून खाली उतरून जाणारा रस्ता आणि वरूनच दिसणारी नारळाची झाडे. मोठाले खडक आणि थोडासा चंद्रकोरी सारखा किनाऱ्याचा आकार अगदी फोटोसेशनसाठी उत्तम लोकेशन.



दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही सप्तकोटेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. मुख्य शहराकडून आम्ही नार्वे गावाकडे जाणारा रस्ता पकडला. मुख्य रस्ता सोडल्यावर रस्त्यावरची वाहनांची वर्दळ कमी होत गेली आणि शांत गावामधील रस्ता सुरु झाला.  दुतर्फा असणारी झाडांची गर्दी , मधूनच एखादी नारळी-पोफळीची बाग आणि त्यातून डोकावणारी टुमदार घरे हे लक्षवेधक तर होतंच पण प्रवासाचा आनंदही वाढवत होतं. गोव्यामधील हा सर्व निसर्ग पाहताना नकळत बा.. बोरकरांच्या  "माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्याकपारीमधोनी घाट फुटती दुधाचे " या कवितेच्या ४ ओळी ओठात पुटपुटल्या.



थोड्याच वेळात आम्ही सप्तकोटेश्वर मंदिराजवळ पोहोचलो . त्याच्या दर्शनाने मन प्रसन्न झालं आणि प्रवासाचा क्षीण क्षणार्धात दूर झाला.  कोंकण प्रांतातील ६ मोठ्या मंदिरांपैकी हे एक आहे.
काही साधूंनी दिवार बेटावर तपस्या करायला सुरुवात केली होती.  सप्तकोट म्हणजे ७ करोड वर्षानंतर भगवान शिवानी त्यांना दर्शन दिले आणि त्यांनी महादेवाजवळ याच गावात बसण्याचा वर मागितला आणि म्हणून याला नाव पडले सप्तकोटेश्वर अशी याची पुराणकथा आहे.




गोमंतक अर्थात गोवा हे एकेकाळी संपन्न अश्या कदंब राजवटीचा एक भाग होताश्रीसप्तकोटेश्वरलब्धवरप्रसाद" अशी बिरुदावली दिमाखात मिरवणाऱ्या १२ व्या शतकातील कदंबांचे हे तीर्थक्षेत्र.  १२व्या शतकात कदंब राजाने आपली पत्नी कमलादेवी साठी हे मंदिर बांधले अशी नोंद आहे१३५२ मध्ये बहामनी राजवट येऊन कदंबाचे हे राज्य जिंकल्यावर अनेक मंदिरांसोबत हे देखील उद्ध्वस्त झाले होते. १३६७ ला विजयनगरच्या राजाने हे राज्य जिंकल्यावर याचे पुनर्निर्माण केले. १५६० मध्ये पोर्तुगिजानी हल्ला करून उद्धवस्त केले आणि त्या जागी आपले चॅपल बनवले. हिंदू लोकांनी कसे तरी करून शिवलिंग वाचवले आणि त्यानंतर १६६८ मध्ये शिवाजीमहाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला ते आजतागायत व्यवस्थित उभे आहे. याचा इतिहास असा कि ,

गोव्याचा विजरई कोंदी द सांव्हिसेंन्त मृत्यू पावल्यावर राजांनी दुसऱ्यांदा गोव्यावर हल्ला करून पुन्हा गोवा घेण्याचा बेत केला होता त्या वेळेला राजांचा मुक्काम नार्वे गावी होता. त्या वेळेला राजे मोहिमेच्या गडबडीत आपले शिंवलिंग विसरले होते. मोरोपंतांनी चौकशी केल्यावर जवळच एक भग्न अवस्थेत शिवालय आहे असे कळले.  तेथील शिवलिंग पाहून त्यांना फार आनंद झाला पण देवालयावर छप्पर नव्हते. तेथील पुजार्याला विचारल्यावर मुसलमानी आणि पोर्तुगीज आक्रमणात हे कसे उध्वस्त झाले याची कथा राजांना कळली आणि त्यांचे मन विषण्ण झाले" माझा देव इथे भिजतो आहे आणि आम्ही हे पाहतो आहे"  . असे म्हणून त्यांनी मोरोपंतांना मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा सोडली.
मंदिराच्या डाव्या बाजूला हे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधले अशी एका दगडी पाटीवर नोंद केलेली आपल्याला पाहायला मिळते.



थोडावेळ तिथे विश्रांती घेऊन तिथे सध्या पौरोहित्य करणाऱ्या खांडेकर गुरुजी यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आम्ही जुवे बेटावर जाण्यासाठी मार्गस्थ झालो.
तिथून निघाल्यावरती आमचं नेटवर्क गेलं आणि GPS बंद झाला. आता आली पंचाईत! आजूबाजूला विचारावं तर कोणाला त्या किल्ल्याच नाव सांगितल्यावर नक्की सांगता येईना बरं इतिहासाबद्दल सांगावं तर ती ही फारशी कोणाला माहित नाही. शेवटी थोडं पुढे गेल्यावर एक मुलगा बाईकवर बसलेला दिसला . त्याच्याजवळ चौकशी केली. 
"इकडे २ किल्ले आहेत तुम्हाला नक्की कुठला पाहायचा आहे? संभाजी महाराजांनी मांडवी नदीमध्ये घोडे घातलेला तो पाहायचा का?" माझे डोळे एकदम चमकले. बस्स!!. नेमका मुद्दा पकडला त्याने. 
हा तोच !..तोच पाहायचा आहे.
"बरं मग एक काम करा इकडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूने हमरस्ता पकडा आणि सारमानस फेरी लागेल तिने नदी ओलांडून पलीकडे जा."
आम्ही पुढे निघालो परंतु एका रस्त्याला पुन्हा फाटे फुटत होते त्यामुळे नेमका अंदाज येत नव्हता. थोडे पुढे गेल्यावर नेटवर्क मिळालं आणि उरलेलं अंतर फक्त १५ कि.मी. आहे हे कळल्यावर आम्ही सुसाट निघालो आणि थांबलो ते थेट सारमानसची फेरी आली तेव्हा.  


सारमानस फेरीतून दिसणारे मांडवी नदीचे विशाल पात्र
Add caption

समोरच मांडवी नदीचं विशाल पात्र होतं आणि तिथून पलीकडे जाण्यासाठी दर पंधरा मिनिटांनी फेरीची सोय होती. हि सर्व सेवा सरकार विनामूल्य देतं हे तिथल्याच एका माणसाकडे चौकशी केली तेव्हा कळलं.  त्यानेच आम्हाला तिकडून परत न येता तिथूनच पुढे जुन्या गोव्यामधून तुम्ही बाहेर पडा जेणेंकरून तुमचा वेळ खूप वाचेल असा मौलिक सल्ला दिला. ज्यामुळेच आम्हाला वेळेत पोहोचणं शक्य झालं होत.




सान्तइंस्तेव्हाम (St.estevam) हा किल्ला पणजीपासून साधारण २३ कि.मी अंतरावर आहे. यालाच जुवे बेट असे सुद्धा ओळखले जाते. juva, Tolto & vantso हे तीन बेट एका कालव्याने जोडले गेले आणि ते St.estevam बेट म्हणून ओळखले जाते. संत. फ्रॅंसिस झेव्हिअर यांच्या नावावरून या किल्ल्याला हे नाव दिले गेले किंवा याला जुव्याचा किल्ला असेही ओळखतात. इथून नार्वे, दिवार आणि डिचोली (बिचोलिम ) येथील जवळच्या परिसरावर तसेच मांडवी नदीवरच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यास सोपे जाते असल्याने त्या युगात या किल्ल्याला विशेष महत्व होते.
याच्याशी संबंधित एक विशेष घटना ऐकिवात आहे कि, गोव्यावर नितांत प्रेम असणारा एक नावाडी जहाजावर जाण्याच्या आधी नियमितपणे इथे प्रार्थना करीत असे आणि त्याला या किल्ल्यावरून गोव्याचा परिसर पाहायला फार आवडत असे.

सान्तइंस्तेव्हाम किल्ल्यावरून  दिसणारा परिसर 
Add caption


१६ व्या शतकाच्या शेवटला या बेटावर धर्मांतर झाले. संभाजी महाराजांनी हल्ल्या केल्यानंतर या किल्ल्यावर जाळपोळ झाली होती त्यात मूळ चर्च उद्दवस्त झाले होते आताचे सध्याचे दिसणारे चर्च हे १७५९ साला पुन्हा: बांधलेले आहे.
किल्ला तसा छोटा आहे किल्ल्याची असणारी तटबंदी आणि चर्च सोडून फारसे काही पाहण्यासारखे नाही. वरून मांडवी नदी आणि आसपासचा परिसर मात्र फार छान दिसतो. पावसाळ्यात तर नक्कीच याचे सौंदर्य हे खुलून येत असणार. वरून चारही बाजूनी वाहणारी मांडवी नदी पाहून मला इतिहासाची आठवण झाली. शंभूराजांचा पराक्रम डोळ्यासमोर तरळू लागला.
व्हॉईसरॉय कौट दि आल्व्होरच्या ३००० पायदळाचा राजांनी अक्षरशः चुरा केला होता. भरलेली मांडवी नदी हि त्याची साक्ष होती.
२५ नोव्हेंबर १६८३ ला पोर्तुंजगीजानी गोवा जिंकला होता. त्याचा महोत्सव चालू होता. गोव्याच्या ईशान्येला फक्त २ मैलांच्या अंतरावर जुन्या गोव्याच्या उत्तरेस मांडवी नदीला २ फाटे फुटत होते. त्याच्या एका प्रवाहाच्या काठावर जुवे बेटावर पोर्तुगिजांचा सांत इंस्तेव्हाम किल्ला उभा होता. किल्ल्याची तटबंदी उंच आणि त्याचे बांधकामही मजबूत होते. आदल्या रात्रीपासूनच राजांची फौज आजूबाजूच्या झाडीत दबा धरून बसली होती.

रात्री दहा वाजता ओहोटी सुरु झाली मांडवीचे पात्र उघडे पडू लागले आणि शंभूराजांच्या सुसाट वेगाने घोडा फेकत पुढे धावले. पाठोपाठ मराठे नदी पार झाले. ऐन रात्री किल्ल्याला गराडा घातला आणि तटबंदीला शिड्या लावून मावळे वर गेले. खंडो बल्लाळांनी पराक्रमाची शर्थ केली आणि अर्ध्या तासातच किल्ला ताब्यात घेतला.
शंभू राजांच्या नेतृत्वाखालील मराठे 'हरहरमहादेव' च्या रण गर्जना करीत मागून येऊन फिरंग्यावर आदळले. त्याचा आवेश इतका जबरदस्त होता कि, त्याची सरळ अंगावर धावून येणारी घोडी पाहून फिरंग्यांनी धूम ठोकली आणि मांडवीच्या पात्रात पटापट उड्या घेऊ लागले. व्हॉईसरॉयचा पाठलाग करताना मांडवी नदीची भरती सुरु झाली होती.  आपल्या वस्त्रांची पर्वा न करता फिरंगी नदी ओलांडायचा आणि जीव वाचवायचा प्रयत्न करत होते.

व्हॉईसरॉयचे नशीब थोर म्हणून त्याला बसायला एक मचवा मिळाला आणि तो पात्र ओलांडून पुढे गेला. शत्रू हातातून निसटून चला आहे हे पाहून शंभूराजे चवताळले, वीरश्रीच्या भावनेने त्यांनी आपला घोडा भरल्या नदीत सोडला. पण पाण्याच्या लोंढ्याने घोड्याच्या नाकपुड्यात पाणी गेले आणि घोडा एका बाजूला कलंडला आणि राजेही खाली घसरले; पाण्यात बुडाले दुर्दैवाने त्यांचा एक पाय घोड्याच्या रिकिबी मध्ये अडकला .गर्दीतून खंडोबल्लाळने दृश्य पहिले. ते पाहताच खंडोजीच्या धमन्यांतून वाहणारे स्वामीभक्तांचे रक्त उसळले "राजे..राजे" असे किंचाळत त्याने पाखऱ्या नावाचा आपला घोडा ही पाण्यात फेकला. खंडोजीने पाण्यात उडी घेतली .राजे पट्टीचे पोहणारे होते पण पाय रिकिबीत अडकल्याने साराच नाईलाज होता. शंभूराजांनी सांगताच खंडोने रिकीब तोडली आणि पुढे झेप घेऊन दमछाक झालेल्या राजांना आपल्या बगलेचाच आधार देऊन वाचवले आणि राजांना जीवदान मिळाले तीच हि ऐतिहासिक जागा.
गोव्यावरच्या या जोरदार हल्ल्याने व्हॉईसरॉयने इतकी दहशत खाल्ली होती कि त्याने आपली राजधानी पणजीहुन मार्मा गोव्याला (आताचे मुरगाव) हलवायचा निर्णय घेतला होता.
अशी हि ऐतिहासिक जागा पाहण्याची इच्छा आज पूर्ण झाली होती. समाधानाने खाली उतरलो.
परतीच्या प्रवासासाठी आम्ही जुन्या गोव्याचा रस्ता पकडला आणि थोड्याच वेळात जुन्या गोव्यात दाखल झालो ते "बॉमगेसू चर्च" पाहण्यासाठी. "बॉमगेसूचर्च" (Basilica of Bom Jesus) हा जुन्या गोव्यातील सेंट फ्रान्सिसझेविअर यांचा असलेला प्रसिद्ध आणि ऐतिहासिक चर्च; ज्याला पाहण्यासाठी अनेक देश विदेशातील पर्यटक गोव्याला आल्यावर हमखास भेट देतात.हा तोच चर्च जिथे "व्हॉईसरॉय कौंट दि आल्व्होर गोव्यावर आलेले संभाजीराजांचे संकट दूर व्हावे म्हणून घाबरून सतत २२ दिवस सेंटझेविअरची करुणा भाकत होता.










चर्च आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहून आम्ही तिथून निघालो. 
मी आणि सचिन आम्ही दोघांनीही फक्त एका लिंबू पाण्यावर राहून दिवसभराचा हा साधारण १२० कि.मी. चा प्रवास पूर्ण केला होता. झपाटल्यासारखे या स्थळाला भेट देण्यासाठी आसुसले होतो. 
झपाटल्यासारखे या स्थळाला भेट देण्यासाठी आसुसले होतो. त्याचं सार्थक झालं होतं. याजसाठी केला होता अट्टहास !
रात्री निघताना तिथल्या गोवन करीचा आस्वाद घेऊन आम्ही गोव्याचा निरोप घेतला आणि एका सुंदर प्रवासाचा शेवट झाला.


इतिहास संदर्भ: "संभाजी " -- विश्वास पाटील



सान्तइंस्तेव्हाम किल्ल्याचे अवशेष:










Note:-  This article has been published in 6th july 2018 lokprabha magazine.
http://epaper.lokprabha.com/1714836/Lokprabha/06-07-2018#page/64

समर्थांची शिवथरघळ

समर्थांची शिवथरघळ






कसे जाल:- महाडवरून बिरवाडी मार्गे किंवा पुण्याहून वरंध घाटातून भोरमार्गे बारसगावपर्यंत येऊन मग आतमध्ये गेले कि शिवथरघळीच्या मार्गाला आपण लागतो. वरंध घाटातून माझेरी सुन्याभाऊची खिंड ह्या मार्गे पायी चालत देखील घळीत येत येते. तसेच राजगड गोप्याघाटाची खिंड, रायगड उतरून पोटाल्याच्या डोंगराकडून बिरवाडी मार्गे देखील घळीत येता येते.



शिवथरघळ एक अविस्मरणीय अनुभव




    शिवथरघळची भेट अशीच अचानक न ठरवता झाली. दरवर्षी मामाकडे (माणगावला) जातो . या वर्षीहि गणपतीला मामाकडे गेलो असताना, भाऊ आणि मी दोघांनी शिवथरघळला भेट द्यायचे ठरवले, मग काय ! रेनकोट चढून Bike वर दोघेही स्वर झालो. निघताना फारसा पाऊस नव्हता. पण लोणेरे सोडल्यानंतर मात्र पावसाने आपला रंग बदलला आणि धो-धो सारी कोसळायला सुरुवात झाली. Bike वर असल्याने पावसाच्या सरी काट्याप्रमाणे चेहऱ्याला टोचत होत्या, पण त्यात सुद्धा मजा वाटत होती.

हळू हळू करत आम्ही महाड सोडले आणि काही अंतरावर गेल्यावर मुख्य महामार्गावरून left turn मारून शिवथर च्या मार्गाला लागलो. एव्हाना महाड शहरापासून बरेच अंतर कापले होते, आजूबाजूला हिरव्यागार निसर्गाचे अप्रतिम दर्शन होत होते. थोड्यावेळाने ढालकाठी गावाजवळ पोहोचलो आणि समोर एका अप्रतिम धबधब्याचे दर्शन झाले. इतका सुंदर आणि सुरक्षित धबधबा मी आजवर पहिला नव्हता. पण तिथे जास्त वेळ घालवून चालणार नव्हता, लगेच आम्ही पुढे मार्गस्थ झालो. वाटेत दिसणारया ,सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा,त्यांच्या अंगा खांद्यावर खेळणारे असंख्य छोटे –मोठे धबधबे, सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू सर्व काही अवर्णनीय होते.

     


    हे सर्व सौंदर्य हावरया सारखे नजरेत जितके सामावेल तितके सामावून घेत होतो. अजून बरेच अंतर होते, आता तर गावेही दिसेनाशी झाली होती. पावसाचा जोर वाढतच होता. बाजूने वाहणारी नदी रस्त्याला स्पर्श करू पाहत होती.

आणखी तासभर जर असाच पाऊस पडला तर रस्ता बंद होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे कुठे हि वेळ न घालवता थेट शिवथरघळ गाठायचे ठरवले. थोड्याच वेळात आम्ही पवित्र ठिकाणी अर्थातच शिवथरघळला पोहोचलो. वरती पोहोचण्यासाठी पायऱ्यांची उत्तम आणि सुरक्षित व्यवस्था आहे.









समोर तो महाकाय, अजस्त्र धबधबा बघानारयाच्या मनात धडकीच भरवतो. कारण ऐन पावसाळ्यात येथील धबधबा रौद्र रूप धारण करतो. याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. त्याचे आवाजाने आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातो. त्या पाण्याचा प्रवाह एवढा आहे कि घळीपर्यंत जाताना तो आपल्याला जाणवतो. त्याच्यामुळे एक लहानशी नदीच तयार झाली होती. त्याला लागूनच समर्थांची घळ आहे. दासबोधाचे लिखाण समर्थांनी येथेच केले. 










समर्थांच्या जीवनात घळींना फार महत्व आहे. आपल्या जीवनातला बराचसा काळ समर्थांनी ह्या घळींमध्ये व्यतीत केला आहे. समर्थ संप्रदायामध्ये या घळींना विशेष महत्व आहे.


मनुष्य सरपटत, रांगत किंवा उभा राहून आतमध्ये जाऊ शकेल असे जमिनीतील किंवा डोंगरातील एक नैसर्गिक विवर म्हणजे घळ. घळ म्हणजे नैसर्गिक गुहा किंवा गुंफा.

     


      समर्थांच्या साधारण ८ घळी मला माहिती आहेत.

हेळवाकची घळ, तारळे(तोंडोशी) घळ, मोरघळ, सज्जनगडची रामघळ, चाफळची रामघळ, चंद्रगिरीची घळ, जरंडेश्वराची घळ आणि दासबोधाची गंगोत्री शिवथरघळ.

त्यातील शिवथरघळ दर्शनाचे भाग्य मला आज लाभले होते.


दासबोधाचे लिखाण समर्थांनी येथेच केले. समर्थांनी सांगावे, कल्याण स्वामींनी लिहावे. असा हा गुरुशिष्य संवादरूपाने ७७५१ ओव्या, २०० समास व २० दशके असलेला ग्रंथराज दासबोध हया घळीतच सिद्ध झाला. दासबोध हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ. येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य, ४०-५० फुट उंचीवरून कोसळणारा तो महाकाय धबधबा,घनदाट जंगल, निर्मनुष्य वस्ती, आजूबाजूला सह्याद्रीचे उंचच उंच कडे. अश्या वातावरणात समर्थांनी दासबोधासारखा महान जीवनग्रंथ लिहिला. पावसाळ्यात तर घळीचे सौंदर्य फारच खुलून दिसते.

समर्थांच्या शब्दातच आपण शिवथरघळीचे वर्णन पाहू —

गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनी चालली बळे |

धबाबा लोटल्या धारा | धबाबा तोय आदळे ||१||

गर्जती मेघ तो सिंधू |ध्वनी कल्लोळ उठला |

कडयासी आदळे धारा |वात आवर्त होतसे ||२||

समर्थांनी या घळीला सुंदरमठ हे नाव दिले होते.
सुंदर मुर्ती सुंदर गुण | सुंदर कीर्ती सुंदर लक्षण

सुंदरमठी देवे आपण | वास केला ||

सुंदर पाहोन वास केला |दास सन्निध ठेवला |

अवघा प्रांतची पावन केला |कृपा कटाक्षे ||

दरे कपारी दाते धुकटे |पाहो जाता भयची वाटे |

ऐसे स्थळी वैभव दाटे | देणे रघुनाथाचे ||


आत घळी मध्ये श्री दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अश्या प्रकारची मूर्तीची स्थापना केली आहे.


रामदास स्वामी घळ सोडून गेल्यानंतर तिचे महत्व कमी होत गेले आणि ती जणू काळाच्या पडद्याआड गेली होती. कागदोपत्री इ.स.१७४१ साली दिवाकर गोसाविचे नातू दिवाकर ह्याने घळीत राहून ज्ञानेश्वर माऊलीच्या अमृतानुभवाची प्रत केली होती असा उल्लेख सापडतो. त्यानंतर १९३० साली शं. श्री. देव ह्यांनी हि घळ शोधून काढली असे समजते.

९ जानेवारी १९५० ला समर्थ सेवा मंडळ स्थापन झाल्यानंतर श्री दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अश्या प्रकारची मूर्तीची स्थापना प.पु. श्रीधर स्वामींच्या हस्ते करण्याचे ठरले.त्याप्रमाणे माघ शुद्ध अष्टमी शके १८८१ (१९६०) या दिवशी मूर्ती स्थापन झाली व माघ शुद्ध नवमीला दासबोध त्रिशत सांवत्सारिक जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. एवढी साधारण माहिती मला शिवथरघळ बददल होती.

बाजूला भक्तांसाठी राहण्याची सोय आहे तसेच वर्ष भर चालणाऱ्या कार्यक्रमांची याधी हॉल भर लावलेली होती.

     
  

    या पवित्र स्थानाचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी मद्यपीनि प्रवेश करू नये अशी पाटीच प्रवेशद्वारावर लावलेली आहे. संपूर्ण परिसराचे एकदा मन भरून दर्शन घेतले, आज मन तृप्त झाले होते, एवढ्या वर्षांची कमान आज पूर्ण झाली होती. समर्थना एकदा त्रिवार वंदन करून त्या पवित्र स्थानाचा निरोप घेतला.



|| जय जय रघुवीर समर्थ ||





© Mayur H.Sanap 2011





निसर्गरम्य सुधागड




पावसाळा सुरु झाला रे . . कुठे नेतोस का नाही आम्हाला मयुर .. ट्रेकिंग ला जाशील तेव्हा मला बोलावं हं नक्की! राजगड ला जाऊन आल्यापासून श्रीकांत ट्रेकिंग साठी खूप हौशी झाला होता. त्यात सचिनच हि सारखं चालू होतचं पावसाळा सुरु झाला मयुर अजून कुठे गेलो नाही आपण; काय करतोस काय? चल. आणि आमचा हेमंत काय नेहमी एका पायावर तयार. शेवटी सगळ्यांच्या सुट्ट्याचं  नियोजन करून एक दिवस शेवटी गुरुवारचा जायचा ठरवला. मी सुधागड ला जाऊया असे सुचवलं आणि सगळे जण तयार झाले.
प्रथम सकाळी पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायचे आणि मग सुधागड च्या वाटेला लागायचं अस नियोजन ठरलं .
मी, हेमंत, सचिन आणि श्रीकांत ; मजेत सांगायचं तर एक मार्गदर्शक, एक फोटोग्राफर, एक चालक आणि एक व्यवस्थापक असे आम्ही चार जण गुरुवारी सकाळी सुधागडला जाण्यासाठी निघालो.
सकाळ पासूनच मस्त पाऊस चालू होता. पनवेल सोडल्यानंतर जुन्या पुणे महामार्गाला लागल्यावर छोट्या छोट्या धबधब्यांनी दर्शन द्यायला सुरुवात केली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडी आणि सतत चालू असणारा पाऊस मनाला सुखावून टाकत होता. पाली फाटा सुरु झाल्यावर गर्द झाडीचा परिसर सुरु झाला. पाली- खोपोली या मार्गावरून पावसाळ्यात सफर करायची मजा वेगळीच. याच परिसरात एक फाटा जातो तो उंबरखिंडी कडे जिथे महाराजांनी कारतलब खानाच्या ३५००० मुघल सैन्यचा पराभव केला होता तो ही आपल्या १००० मावळ्यांपैकी एकही न गमावता. त्याची रंजक माहिती सांगत आमची गाडी पुढे मार्गस्थ होत होती. थोड्याच वेळात आम्ही पालीला पोहोचलो. अतिशय मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असलेले रायगड जिल्ह्यातील हे गाव सह्याद्री मधील काही महत्वाच्या घाट वाटांच्या जवळ आहे. कोकणातून देशावर येण्यासाठी जे महत्वाचे मार्ग आहेत त्यापैकी एक हा पाली जवळून जातो. 
पाली चा बल्लाळेश्वर हा तर आमचा समस्त रायगड वासियांचे श्रद्धास्थान. त्यामुळे त्याच्या दर्शनाशिवाय मी पुढे जाणे शक्यच नाही. मंदिराच्या आवारात गेल्यावर पाठीमागच्या बाजूला उंच डोंगर आपल्याला दिसतो तो म्हणजे सुधागड चा जुळा भाऊ सरसगड. ज्याचा वापर त्यावेळेस टेहाळणीसाठी होत असे. त्याच्या कडे एक धावती नजर टाकून आम्ही मंदिरात प्रवेश केला. 
अष्टविनायकांमध्ये स्थान प्राप्त झालेला पालीचा बल्लळेश्वर सरगडाच्या पायथ्याशी एका प्रशस्त देवालयात विराजमान झालेला आहे. कुठलाही विशेष दिवस नसल्यामुळे मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. दर्शन अगदी उत्तम झालं. मंदिरातील स्वच्छता, सुबकता आणि जुने बांधकाम हे आपल्या नजरेला भावल्याशिवाय राहत नाही. तसेही कोकणातल्या देवस्थानांची हि विशेषतः च अगदी कुठेही तळकोकणापर्यंत कुठल्याही देवळात जा! खास करून गणपतीच्या; तिथे तुम्हाला स्वच्छता आणि सुबकता हि दिसणारच. त्यामुळे दर्शन घेतल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटलचं पाहिजे. 
आजूबाजूचा शांत आणि रम्य परिसर पाहून श्रीकांत खूप सुखावून गेला होता आणि पुढच्या वेळेला मी माझ्या कुटुंब समवेत कुठेही गर्दीच्या ठिकाणी न जाता इथेच येईन असा जणू काही त्याने पणचं केला. प्रसन्न मनाने विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यावर आम्ही सुधागडच्या वाटेला लागलो.
ऐतिहासिक आणि धार्मिक अशी दोन्ही पार्श्वभुमी असलेला असा हा सुधागड-पाली चा परिसर. सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. इथूनच जवळ ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा असे समजतात  पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या भोरपगड डोंगरावर केली असे मानतात. नंतर शिवकाळात महाराजांच्या पदस्पर्शाने याचे नामकरण सुधागड असे झाले. इ.स. १६४८ साली हा किल्ला राज्यात सामील झाला. तसेच गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर या गावातच संभाजी राजे  व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परळी गावात हत्तीच्या पायी दिले. शंभू राजांच्या चरित्रात आपल्याला याचा उल्लेख मिळतो.
सुधागडच्या पायथ्याशी असणाऱ्या ठाकूरवाडी जवळ आम्ही आमची गाडी ठेवली आणि तिथून पायवाटेने गडावर जाण्यास सुरुवात केली.  तिथूनच आमच्या सोबत आम्हाला आमचा एक नवा सोबती सुद्धा मिळाला. शाळेपासूनच एका श्वानाने आम्हाला साथ द्यायला सुरुवात केली. तो पुढे पुढे आणि आम्ही त्याच्या मागे. जणू तो आमचा मार्गदर्शक होता. बरोबर अचूक पायवाटेने तो आम्हाला घेऊन जात होता. बहुधा हा त्याचा रोजचाच रस्ता होता.





जवळपास अर्धा- एक तासाची पायपीट केल्यावर आपण एका अरुंद अश्या चढ असलेल्या वाटे जवळ येतो तिथून वरती जाण्यासाठी एका मजबूत शिडीची सोय केलेली आहे. तिचा आधार घेत आम्ही वरती पोहोचलो. तिथून दिसणारे दृश्य तर अप्रतिमच! डोळ्याचे पारणे फेडणारे होते. खाली असणारी खोल दरी, तिथून खाली उतरणारे ढग आणि समोरच्या धबधब्यामुळे निर्माण झालेली वळण वळण घेत जाणारी नदी . अहाहा ! सारं कसं एखाद्या चित्रकलेच्या तासाला काढलेल्या चित्रा प्रमाणे; पण वास्तवात असणारं.





आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा या उंक्तीची खात्री आपल्याला इथे अनुभवायला मिळते. आषाढ महिन्यातील बरसणारा पाऊस, सर्वत्र  पसरलेली हिरवी चादर आणि धुक्याचे साम्राज्य. याचा आनंद घेत , एखाद दोन सेल्फी काढत आम्ही मस्त चालत होतो. तर या सगळ्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यात हेमंत मग्न होता. एवढ्या पावसात फक्त वॉटरप्रूफ कॅमेराच चालू शकतो आणि हेमंत त्याचा पुरेपूर फायदा घेत असल्याने सचिन ने तर त्याला "वॉटरप्रूफ फोटोग्राफर हेमंत कोरेगांवकर " हि पदवीच बहाल केली.




वरती पठारावर पोहोचल्यानंतर आम्ही भोराई देवीच्या मंदिरात ओलेत्यानेच प्रवेश केला.  काळ्याकुट्ट अंधारात मोबाइलला चा उजेड लावून आम्ही देवीचे दर्शन घेतले. गडांवरील देवळात दिवा लावण्याची मला भारी आवड. हीच खरी दैवतं ज्यांनी शिवकाळात मावळ्यांच्या हाताला बळं दिलं आपलं स्वराज्य राखण्यासाठीं अशी माझी ठाम धारणा. प्रत्येकाला माथा टेकवण्याची श्रद्धास्थान हे लागतचं त्यातूनच त्याला नव्या कार्याची ऊर्जा आणि उर्मी मिळते. म्हणूनच काय त्यावेळी गड-किल्ल्यांवर देवस्थानांची निर्मिती झाली असावी.पण जवळ आणलेल दिवा बत्तीचे साहित्य एवढ्या पावसात भिजून वाया गेलेलं होत. त्यामुळे मोकळ्या हातानेच देवीचे दर्शन घेतल. हि छोटीशी हुरहूर मात्र मनाला लागून राहिली.
तिथून निघाल्यानंतर पठारावरूनच एका बाजू,ला उभ्या कातळ कड्यावरची तटबंदी स्पष्ट दिसत होती. त्या वेळी कशी काय बांधली असेल याचे कौतुक करत आणि निसर्गाचा पाहत आम्ही बराच वेळ तिथे घालवला. समोरचा मोठा दिसणारा धबधबा आणि ते मोहक दृश्य पाहून तर "DSLR हवा होता यार !" असे उद्गार हेमंत च्या तोंडातून बाहेर पडले. मी मात्र सगळं नजरेत जेवढे सामावून घेता येईल तेवढे घेण्याचा पर्यटन करत सर्व अनुभवत घेत होतो.





सुधागड ला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहेपावसाळ्यात तर येथील दृश्य केवळ नयनरम्य म्हणावे असे असतेगडाची समुद्रसपाटीपासून उंची ६१९ मीटर आहे.. गडावर टकमक टोक आहेया टोकावर उभे राहिल्यावर समोर उभा असणारा धनगडकोरीगड तैलबैला दिसतो. गडावर अनेक तलाव आहेतपंत सचिवांचा वाडातसेच भोरेश्वराचे मंदिर आहेपाच्छापूर दरवाजा, दिंडी दरवाजाधान्य कोठारेभांडय़ाचे टाकेहवालदार तळेहत्तीमाळ अशी बरीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेतपावसाळ्यात हे सर्व पाहणे जरा अवघडच होऊन जातं.




गडाच्या सभोवताली अनेक औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचा वावर आहे. एकूणच दुर्गप्रेमी आणि वनवाटांवर प्रेम असणाऱ्यांसाठी सुधागड हे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. इथे मुलांसाठी साहस शिबिरं तर घेतली आहेतच, पण त्याचबरोबर अनेक संस्था दुर्गसंवर्धनाचे काम नेटाने करत असतात.


मंदिरा  बाहेरील वीरगळ 

भोराई देवी मंदिर 

थोड्याच वेळात आम्ही परतीच्या वाटेल निघालो. 
या सर्व निसर्गाचा आनंद घेत असताना या सगळ्यात आमचा अति उत्साही श्रीकांत मात्र दोनदा निसरड्या जागेवरून आपटला. "काय होऊन राहिलं बे " अशी आपली टिपिकल विदर्भ शैलीत झाडत उभा राहिला. मग तिथल्याच झऱ्यावर कपडे साफ करत त्याची मजा घेत आम्ही निघालो. सर्व ठिकाणी असणारा श्वान मित्र परतीच्या वाटेवरही आमच्या सोबतच होता. अगदी खाली शाळे जवळ येई पर्यंत. जाणून काही या सर्व प्रवासात तो आमचा एक सोबतीचा झाला होता. जवळ खाण्याचे काही सामान नसल्याने गावातील जवळच्या दुकानातून बिस्कीट पूडा घेऊन त्याला दिला आणि तो खात खात मस्त शेपूट हलवत आम्हाला जणू काही धन्यवादच देत होता. त्याला टाटा -बाय -बाय करत आणि सुधागडच्या निसर्गरम्य परिसराला आठवणींच्या रूपाने साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.






छायाचित्र सौजन्य: हेमंत कोरगांवकर 

सफर कोर्लईची



सफर कोर्लईची






चला रे! कोर्लईला. अशी एक साद दिली आणि आम्ही तयार झालो. मी,हेमंत आणि सचिन.  मागच्या वेळेला येऊ न शकलेला सचिन या वेळेला मात्र शिफ्ट चे नियोजन करून आला.  खरं तर गड किल्ल्यांची आवड असलेल्या भटक्यांना फक्त एक साद घालायचा अवकाश कि लगेच बॅग पॅक करून तयारच.
अलिबाग ला जायचं तर बाईक ने जाऊया म्हणजे मनसोक्त भटकंती करता येईल असे मी सुचवल्यावर हेमंत आधी हो-नाही.. अरे मी एवढ्या लांब कधी बाईक ने गेलो नाही वगैरे करता करता शेवटी तयार झाला. निघायच्या आधीची पूर्वतयारी म्हणून पद्धतशीर एक कॉन्फरेन्स कॉल घेऊन सगळी प्लांनिंग केली. कितीही केलं तरी शेवटी आम्ही IT वाले मग कुठल्याही गोष्टीची तयारी आमची कॉन्फरेन्स कॉल शिवाय पूर्ण कशी होणार? नाही का?
गुरुवारी पहाटेच तुम्ही निघा, मी तुम्हाला पनवेलला भेटतो. असं आमचं ठरलं होतं पण आयत्या वेळेला माझा जरा प्रॉब्लेम झाल्याने मग पनवेलला न भेटता मी तुम्हाला वडखळला भेटतो असे ठरले आणि तिथून मला सोबत घेऊन आम्ही तिघे पुढच्या प्रवासाला निघालो.
whatsapp वर पाठवलेल्या विनोदाचा खरा अनुभव हेमंतला पेण -वडखळ रस्त्याच्या प्रवासावरून चांगलाच आला होता.  वडखळ सोडल्यावर पुढे तर पावसामुळे सगळी रस्त्यांची पार दुरावस्था झाली होती. जिथे तिथे फक्त खड्डेच- खड्डे  आमचे स्वागत करत होते अधून मधून कुठे तरी चांगला रस्ता आला कि दोघे हि जण आपली गाडी रेमटवत होते.  "अरे काय हि तुमच्या रस्त्याची अवस्था?' असे म्हणून हेमंत ने मला हिणवले.
"अरे तुझे पण गाव कोकणातलेच ना. मग तुला माहित नाही कोकणातले रस्ते कसे असतात ते.  माहिती आहे मोठा मुंबईवाला, जसे काय मुंबई मध्ये खड्डेच नाही असे सांगतो मला. आणि इथे कोकणात काही घाटावरच्या सारखा मंद पाऊस पडत नाही. इथे पूल वाहून जातात तर हा रस्ता काय चीज आहे."   मी पण त्याला चांगला प्रतिसाद दिला.
असा आमचा चेष्टा मस्करी करत प्रवास चालू होता.  बरं! सर्वात मोठी काळजी तर आम्हाला सचिनची कुठल्या  "बाबा आदमजादच्या " जमान्यातील बाईक घेऊन आला होता काय माहिती  या असल्या रस्त्यावरून चालवताना खड्डयातून गेली कि खणकन आवाज द्यायची shock absorber नावाचा काही प्रकार अस्तित्वात असतो हे तिच्याकडे पाहून कळतंच नव्हतं. सारखा "घडगड- घडगड " आवाज करत होती आणि त्यातुनच तिला तो एखाद्या रायडर सारखी तुफान रेमटवत होता.  सारखं- सारखं थोडे पुढे गेल्यावर "सचिन .. आहेस ना रे बाबा" असं म्हणून आम्ही त्याच्यासाठी मागे पाहायचो आणि तो पण पाठीमागून हात दाखवत मी सलामत आहे तुमच्या पाठीमागून येतोच आहे अशी खूण दाखवायचा.
सर्वप्रथम चौलच्या दत्त मंदिरात  जायचे आणि मग पुढे कोर्लईला  असे आधीच ठरल्याने आम्ही त्या दिशेला निघालो.  वाटेत भेटणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा, टुमदार दिसणारे बंगले आणि ढगाळ वातावरण फार प्रसन्न करत होतं. चौल चे दत्त मंदिर हे फार प्राचीन अगदी उंच टेकडीवर वसलेलं त्यामुळे पावसाळ्यातील इथले सौंदर्य तर अप्रतिमच.  पूर्वी तर इथे जायला नीट रस्ताही नव्हता आता मात्र छान डांबरी रस्ता अगदी आपल्याला पूर्ण पायथ्याशी घेऊन जातो आणि मग फक्त काही पायऱ्या चढून आपल्याला लगेच दत्त महाराजांच्या सुंदर मूर्तीचे दर्शन होतं.  आताचे मंदिर नीट व्यवस्थित  बांधलेले आहे. साधारण एका वेळेला १०-१५ जण व्यवस्थित दर्शन घेऊन शकतात इतकी मुख्य गाभार्याच्या समोर जागा आहे. वरून आपल्याला संपूर्ण चौल आणि रेवदंड्यात पसरलेल्या नारळी-पोफळीच्या बागांचे आणि लांबवर रेवदंड्याच्या खाडीचे सुंदर दृश्य दिसते. दत्त जयंतीला तर इथे फार मोठी यात्रा भरते. पेण,अलिबाग अगदी लांबून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात.  थोडा वेळ विसावून आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. थोडी विचारपूस केल्यावर तिथल्याच एका मुलाने आम्हाला एक शॉर्टकट सुचवला जो तुम्हाला रेवदंडा किल्ल्यापर्यंत घेऊन जाईल असे त्याने सांगितले मग आता आलोय तर रेवदंडा किल्लाही पाहूया अशी हेमंत ने गळ घातली.
" अरे तिथे आता किल्ला नाहीये . फक्त तटबंदी पाहण्यासारखी आहे. त्याला रेवदंड्याची तटबंदी म्हणतात" माझ्यातल्या इतिहासकाराने माहिती पुरवली.
"ठीक आहे ना. जे काही आहे ते पाहूया" . आम्ही सचिन कडे पाहिलं.
"अरे माझी तर इथे वस्तीला राहायची पण तयारी आहे. " सचिन तर इथले पावसाळ्यातील सौंदर्य पाहून वेडाच झाला होता. 
त्या मुलाने सुचवल्याप्रमाणे थोड्याच वेळात आम्ही रेवदंड्याच्या किल्ल्याजवळ पोहोचलो.  किल्ला म्हणून आता त्याचे अस्तित्व फारसे काही दिसत नाही आता तिथे त्याचे फक्त भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात.
कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या  रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी १५ व्या शतकात खाडीच्या मुखावर हा किल्ला बांधला. १६८३ मध्ये संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी रेवदंडा किल्ल्यावर हल्ला केला परंतु किल्ला काही जिंकता आला नाही. संभाजी महाराजांचे चरित्र वाचताना आपल्याला या लढाईचा उल्लेख केलेला मिळतो. 
रेवदंड्याच्या प्रवेशद्वारावर आपल्याला पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह पाहायला मिळते. किल्ल्यावर सातखणी मनोर्‍याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत. काही तोफा आपल्याला मनोऱ्याच्या पायथ्याशी पाहायला मिळतात. इथले मुख्य आकर्षण म्हणजे "रेवदंड्याची तटबंदी." तिचा परीघ साधारण ४-५ कि.मी. चा आहे. या किल्ल्याचं  आणखी एक विशेष म्हणजे तटबंदीच्या खाली असलेला भुयारी मार्ग. परंतु ते आता वापरात नाहीत.
तेथूनच पुढे किनाऱ्यावरून आपल्याला कोर्लई चे दर्शन होते. सुट्टीचा दिवस नसल्याने आमच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. त्यामुळे सगळीकडे निरव शांतता होती. सचिन बापडा तर फारच खुश होता. समुद्रकिनाऱ्यावरची अशी छान शांतता तो अगदी मस्त अनुभवत होता, तो तर तिथून निघायलाच तर नव्हता. पण अजून पुढचा पल्ला गाठायचा आहे असे सांगून त्याला तिथून काढता पाय घ्यायला लावला.
साधारण ७-८ कि.मी. अंतर पार केल्यावर आम्ही कोर्लई गावात पोहोचलो.  किल्ल्यावर जायचा मार्ग हा कोर्लई गावातूनच जातो.  गावातून बाहेर पडल्यानंतर किल्ल्याकडे जाणारा चिंचोळा रास्ता सुरु होतो.  डाव्या बाजूला पसरलेला अथांग समुद्र, उजवीकडे कोर्लईचा डोंगर आणि समोर दिसणारा द्विपगृह (Light house) आणि त्यातून होणार आपला प्रवास  अहाहा!! हा अनुभव तर अवर्णनीयच !!  द्विपगृहाजवळ जवळ पोहोचल्यावर आम्हाला वरती किल्ल्यावर जायचे आहे असे सांगितल्यावर तेथील सरकारी कर्मचाऱ्याने गेट उघडून आम्हाला आत प्रवेश दिला कारण लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायऱ्या चढूनच आपण पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. तशी एक दुसरी वाटहि आहे ती दुसऱ्या मार्गाने आतून गावातून वरती थेट बालेकिल्ल्याजवळ नेते.
किल्ल्याची रुंदी जरी कमी असली तरी हा दक्षिणोत्तर चांगलाच पसरलेला आहे. मुख्य द्वारातून प्रवेश केल्यावर डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही ठिकाणी प्रवेश द्वारे आपल्याला दिसतात.  डावीकडे गेल्यावर तटबंदीच्या बाजूला काही तोफा ठेवलेल्या आपल्याला दिसतात. तसेच खाली एक निमुळता रास्ता जातो तो आपल्याला थेट समुद्र किनाऱ्यालगत घेऊन जातो.  आम्हीही तिकडे निघालो. वरूनच उजवीकडे पाहिल्यावर समोरून येणारी कुंडलिका नदी आणि समुद्र यांचा संगम दिसतो जणू काही ती समुद्राला आलिंगनच देत आहे असा भास आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही.
हा किल्ला समुद्रकिनारी वसला असल्याने आपल्याला वरून विहंगम दृश्याचे दर्शन होते. समुद्र किनारा स्वच्छ असून निळ्याशार रंगाचे पाणी पाहायला मिळते. तीनही बाजूने वेढलेला समुद्र, फक्त एका बाजूने असणारी जमीन आणि वरून दिसणारे कुंडलिका नदीचं मिलन. हे कोर्लई चे वैशिष्टय.  असा किल्ला इतरत्र पाहणे दुर्मिळच आणि पावसाळी तर हा अगदी सौंदर्याने न्हाउनच निघालेला असतो. त्यामुळे हा अनुभव अवर्णनीयच!!
पुन्हा पाठीमागे येऊन ऊजव्या बाजूच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो. तिथेही समोर २ तोफा दिसत होत्या. डावीकडे पाहिल्यावर आपल्याला रेवदंड्याची आजही भक्कम असलेली तटबंदी पाहायला मिळते. आणखी एका प्रवेश द्वारातून पुढे गेल्यावर माथ्यावर काही तोफा पाहायला मिळतात. गडावर बऱ्याच ठिकाणी तटबंदीजवळ आपल्याला तोफा पाहायला मिळतात. त्यांना पाहून समोरून येणाऱ्या शत्रूवर या किती अंतरापर्यंत मारा करत असतील याचा उगाच अंदाज घ्यायचा प्रयत्न मी करत होतो.  किल्ल्यावर असणारी स्वच्छता आणि समोर असलेल्या चर्चचे झालेले डागडुगीचे काम प्रकर्षाने दिसून येत होते. उजव्या हाताला पांढऱ्या देवचाफ्याच्या झाडाखाली शंकराची पिंड आहे. आणि तिथेच थोड्याच बाजूला पाण्याची टाकी आहे. डाव्या बाजूला (पूर्वेला) कुंडलिका खाडीच्या दिशेला एक प्रवेशद्वार आहे. येथून खाली ऊतरण्यासाठी पायऱ्या आहेत हीच ती वाट जी आपल्याला गावात घेऊन जाते. किल्ल्यावर असणारा चर्च, तेथील  प्रवेश द्वाराच्या माथ्यावर असलेले शिलालेख आणि तेथील असणारे बुरुज असा हा पोर्तुग्रीज थाटणीचा किल्ला आपल्याला त्याचे वेगळेपण दाखवून देतो.
अरे मयूर. रोनाल्डो ला जर इथे आणला तर तो किती खुश होईल ना!! आपल्या पूर्वजांची केलेली कामगिरी पाहून. असा एक मिश्किल टोमणा हेमंत ने मारला. आम्हीही त्याला हसून दाद दिली.
आमच्या तिघांशिवाय किल्ल्यावर कोणीही नव्हते त्यामुळे बराच वेळा आम्ही तिघेही त्या "रत्नाकराकडे" मंत्रमुग्ध होऊन पाहत होतो. गर्दी नाही कसला गोंधळ नाही. सगळे कसे मनाला शांत आणि प्रसन्न करणारे वातावरण. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मिळणारे हे काही निवांत क्षण, निसर्गाच्या सान्निध्यातले आम्ही मुक्त मनाने अनुभवत होतो. थोडी विश्रांती, थोड्या गप्पा, थोडे फोटोसेशन केल्यावर तिथून आम्ही निघालो खरं पण जरा पाऊले जड होऊनचं.
खाली गेल्यावर आम्ही चौकशी केली असता कळलं कि इथे कोणाला रात्री वस्तीला राहता येत नाही. बाजूलाच द्विपगृह असल्याने तशी परवानगीही नाही. तिथल्याच बोअरवेल चे पाणी तोंडावर मारून तिघेही परतीच्या प्रवासासाठी ताजेतवाने झालो. जाता -जाता पुन्हा कोर्लईचे दर्शन आणि समोर दिसणाऱ्या अथांग समुद्राचे ते नयनरम्य दृश्य डोळ्यांमध्ये साठवत आणि एक नवा उत्साह घेत परतीचा प्रवास सुरु केला.



















Note:- This article has been published in 10th feb 2017 lokprabha magazine.
http://epaper.lokprabha.com/m/1091440/lokprabha/10-02-2017#issue/64/1