देहोत्सर्ग तीर्थ (गोलोकधाम)
त्रिवेणी संगम |
राधे .. राधे ..
© Mayur H. Sanap 2021
मी एक स्वच्छंदी. पर्यटनाची आवड असलेला. आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे त्याचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे या उक्तीचा मी. बहुरंगी बहुढंगी. राजांचा इतिहास, त्यांचे गडकिल्ले त्यांची विशेषतः , त्यातून निर्माण झालेली दुर्गभ्रमंती ची आवड आणि त्याला लिखित स्वरूपात मांडण्याचं काम केलं ते ब्लॉग च्या स्वरूपात. लिखाणाची आवड लहानपणापासूनच होती. त्यातच मग काही लेख लोकप्रभा मध्ये प्रकाशित झाले तेच या ब्लॉग वर सुद्धा आहेत. लोकप्रभा, प्रतिलिपी आणि किंडल करताना हा प्रवास आता कुठपर्यंत घेऊन जातोय पाहूया....
देहोत्सर्ग तीर्थ (गोलोकधाम)
त्रिवेणी संगम |
राधे .. राधे ..
© Mayur H. Sanap 2021
एक होता कार्व्हर
काही काही पुस्तके अशी असतात कि जी वाचण्याची आवड नसली तरी वाचायची असतात. असंच एक वीणा ताईंनी लिहिलेलं. ते सारखं डोळ्यासमोर असून सुद्धा वाचायचा मुहूर्त लागला नव्हता . शेवटी WFH मुळे तो मिळाला. १९८१ साली प्रथम प्रकाशित झालेलं हे पुस्तक. मागच्याच वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये त्याची ४५ वी आवृत्ती प्रकाशित झाली आणि मात्र राहवलं नाही या दिवाळीला ते वाचायचंच असा चंग बांधला. २-३ वेळा मॅजेस्टिक बुक डेपो ला फेऱ्या मारल्या आणि दिवाळीला ते मला मिळालं. ते आहे वीणा गव्हाणकर यांनी लिहिलेलं "एक होता कार्व्हर".
एका रात्रीत वाचून संपवलं आणि मनाला चुकचुक लागली कि अरेरे एवढं चांगलं पुस्तक अजून वाचायचं राहूनच गेलं होतं. ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक वाचलं त्यांना लिहिण्याचा मोह आवरला नाही मग मला तरी कसं रहावेल.
हि कथा आहे उभं आयुष्य आपल्या ध्येयासाठी वाहून घेणाऱ्या एका कर्मयोग्याची, अमेरिकेच्या निर्जिव दक्षिण प्रदेशाला अमरत्व देणाऱ्या एका महामानवाची, एका अमेरिकन कृषी तज्ज्ञाची, तपस्वी मुक्तात्म्याची आणि ज्ञानयोग्याची अर्थातच 'डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर' यांची. व्यक्तिचे मोठेपण त्याच्या बाह्यसौंदर्यापेक्षा त्याच्या गुणांवर व प्रतिभेवर आणि आत्मिक सौंदर्यावर जास्त सिद्ध होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर.
एका निग्रो वंशात जन्माला येऊन लहापणीच मातृत्वाला पोरके झालेल्या आणि सतत वर्णद्वेषाला सामोरे जाऊन, ज्यांचं नाव सुद्धा हे त्यांचं स्वतःच नव्हतं. असं असून सुद्धा आपल्या कर्तृत्वाची असीम झळाळी दाखवणाऱ्या कार्व्हर यांचा इतका विलक्षण जीवनप्रवास आहे हा! कि त्यांच्या चरित्रा बद्दल बोलायला शब्दच अपुरे पडतील.
ह्या माणसाने काय काय केलं नाही? स्वयंपाक केला, लाकडं फोडली, गटारं खणली, हमाली केली, लॉंड्री पण काढली आणि अजून बरंच काही. पण आपलं जीवनध्येय सोडलं नाही. स्वावलंबी आणि निस्वार्थी कसं असावं हे शिकावं तर ते त्यांच्याकडूनच.
"हे हात साधेसुधे नाहीत तर वेगळे, निर्मितीक्षम आहेत", "सारी भूमी देवाची आहे" ह्या आयुष्याच्या सुरुवातीला हर्मन यायगर या शेतीतज्ज्ञाकडून मिळालेल्या मूलमंत्रांनुसार ते आयुष्यभर वागले.
या सृष्टीवर उगवणारी प्रत्येक वनस्पती निसर्गानं कुठल्या तरी प्रयोजनाने बनवली आहे असं डॉ. कार्व्हर यांचं मत होतं. आपल्या जादूई हातांनी त्यांनी काळ्या मातीचं अक्षरशः सोनं केलं. तोतरेपण सारख्या शारीरिक व्यंगावर मात करून सुरांची जादू देखील त्यांच्या कंठाला लाभली होती. त्यांचे पूर्ण चरित्र वाचल्यावर ते कुठल्याही क्षेत्रात उतरले असते तरी त्यांनी त्याचे सोनेच केले असते याची आपल्याला खात्री पटते.
पुस्तक परिचय :
डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या चरित्राचा नेमकेच पण मोजकाच भाग आपल्यासमोर वीणा ताईंनी फार सुंदर रित्या मांडला आहे.
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर जो एक गुलाम स्त्री चा मुलगा होता.१८६० ते १८६२ गुलामांना पळवून विकायचा हा मोठा त्यावेळेला धंदा होता.अमेरिकेत गुलाम पळवून नेणाऱ्या आणि विकणाऱ्या बऱ्याच टोळ्या होत्या. अमेरिकेतील 'डायमंड ग्रोव्ह मधली घटना. एका रात्री या खेड्यातले बरेच निग्रो गुलाम पळवून नेले. कार्व्हर नावाच्या एका शेतकऱ्याने गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला परंतु एक घोडा देऊन सुद्धा त्यांना फक्त एक दोन महिन्यांचा मरणोन्मुख बाळ परत मिळाला. मोझेसबाबानी आणि त्यांच्या पत्नी सुझन बाई ने त्या बाळाला वाचवलं. तेच भावी आयुष्यातील डॉ. जॉर्ज कार्व्हर.
कार्व्हर दाम्पत्यनी त्याला सांभाळले. त्याचे नाव जॉर्ज ठेवले.त्यांचेच नाव पुढे त्याने कार्व्हर असे लावले.जॉर्जची अफाट अवलोकन आणि निरीक्षण शक्ती होती. निसर्गात त्याला विशेष रुची होती. कार्व्हर दांपत्याने अक्षर ओळख करून दिल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दहा वर्षाचा असताना आपले सुरक्षित जग सोडून एकट्यानेच तो बाहेर पडला. काही दिवस पडतील ती, मिळतील ती कामे तो करत राहिला. कुणाचं अंगण झाड,कुणाच्या चुलीसाठी सरपण फोडून दे,तर कुणाच्या कपड्याची धुलाई करावी लागे.ह्या सगळ्या परिस्थितीने त्याला खुप काही शिकवले.तडाखे सहन करणाराच ताठ उभा राहू शकतो याची जाणीव त्याला बालपणातच झाली. एकदा त्यांनी पाहिले कि काही गोऱ्या लोकांनी एका काळया निग्रो कैद्याला जिवंत शेकोटीत टाकले. त्या कैद्याच्या चेहाऱ्या वरचं कारुण्य, अगतिकता जॉर्जच्या हृदयाला पीळ पाडत होती.काळया कातडीचा अर्थ जॉर्जला पूर्णपणे कळला होता. तेव्हा त्याने ठरवलं कि, इतरांप्रमाणे राजमार्गाने जाऊन ज्ञान मिळवणं निग्रोंना शक्य नव्हतं. त्यात त्याला आता आड पाऊलवाट पकडायला हवी होती.
सिम्पसन कॉलेज मध्ये त्याला प्रवेश मिळाला.शिक्षण पूर्ण झल्यानंतर कृषी रसायशास्त्रातील पदवी घेतली.चित्रकला,संगीत या विषयात ते निपुण असून सुद्धा त्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास निवडला.ते म्हणत या शास्त्राचा उपयोग माझ्या बांधवांसाठी होणार आहे. त्यांनी वनस्पतींची सुमारे वीस हजार नमुने गोळा केले.शेती विषयक व्याख्याने देण्यासाठी ते गावोगावी फिरत. शेतकऱ्यांना वनस्पती वरील संभाव्य रोग व प्रतिबंधित उपाय सांगत असत.
कापसाच्या अमाप पिका मुळे अलाबामा येथील जमिनीचा कस गेला होता.सगळी कडे होती ती निकृष्ट जमीन. या भुकेच्या खाईतून आपल्या बांधवांना वर काढण्यासाठी बुकर वॉशिंग्टन यांनी कार्व्हर यांना बोलावून घेतले. प्रयोगशाळा नाही,वनस्पती नाही.काहीच नाही.अशा ठिकाणी त्यांना सुरवात केली. होती.टाकावू वस्तू मधून त्यांनी प्रयोगशाळा सुरू केली. जमिनीचा कस वाढण्यासाठी त्यांनी भुईमूग, रताळे ही पिके घेण्यास शेतकऱ्यांना उद्युक्त केले त्याच बरोबर राहिलेल्या मालाचे सुद्धा सर्व नियोजन त्यांनी बरोबर घालून दिले. शेंगदाण्याच्या पासून होणारे १०५ पदार्थ. रतळ्या पासून होणारे अनेक पदार्थ जे त्यांनी स्वतः शोधून काढले. २९ प्रकारच्या वनस्पींपासून पाचशे प्रकारचे रंग बनवण्याचा भीपराक्रम त्यांनी केला.अमेरिकन जनतेला अनेक रानफुले,रान गवत यांची ओळख करून दिली.कार्व्हर यांच्या तंत्र शुद्ध पद्धतीने लागवड केल्याने अमेरिकेत प्रचंड प्रमाणात शेती उत्पादन झाले.ते वाया जाऊ नये म्हणून अन्नधान्य टिकविण्याच्या सुलभ पद्धती त्यांनी शेतकऱ्यांना स्वतः जातीने शिकवल्या.पहिल्या महायुद्धाच्या काळात कार्व्हर यांच्या रताळ्याच्या उत्पन्ना मुळे लोकांची आणि सैनिकांची उपासमार टळली. हळूहळू त्यांची कीर्ती संपूर्ण जगात पोहोचली अगदी आईन्स्टाईन , हेन्री फोर्ड पासून ते महात्मा गांधींपर्यंत त्यांचा संपर्क झाला होता.
डॉ. कार्व्हर यांना अनेक मानसन्मान पदव्या मिळाल्या. त्यांच्या कार्याचा गौरव झाला.संपूर्ण आयुष्य खडतर प्रवास आणि अनेक अडचणी, अपमान होऊन सुद्धा ते आपल्या ध्येयापासून दूर झाले नाहीत. पुस्तकाच्या शेवटी फार सुंदर वाक्य आहे.
“He could have added fortune to fame But caring for neither,
He found happiness and honour in being helpful to the world.”
वीणा ताईंची लेखनशैली इतकी प्रभावी आहे कि आपण स्वतः कार्व्हर सोबत जगत आहोत असंच वाटत राहतं. प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शन करणारे असे हे वाचनीय आणि संग्रही असण्यासारखे पुस्तक आहे. एका अनाथ मुलाच्या प्रेरणादायी चरित्राचा अनुवाद करून ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी मराठी वाचकांवर जन्मभराचे उपकार केले आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यांच्यामुळेच आज कार्व्हर लोकांना थोडाफार कळला.
एक होता कार्व्हर: वीणा गव्हाणकर : राजहंस प्रकाशन : मूल्य २५० रुपये.