पाण्याच्या टाक्यांचा किल्ला सांकशी

पाण्याच्या टाक्यांचा किल्ला सांकशी


सांकशी किल्ल्यावरून दिसणारी दरी 
रायगड जिल्हा म्हणजे किल्ल्यांचे आगार. याच किल्ल्यांच्या आगारात थोडासा अडगळीत आणि दुर्लक्षित असलेला किल्ला म्हणजे पेण चा सांकशी किल्ला. पेण म्हणजे गणेश मूर्तिकारांचे माहेरघर. पण याच तालुक्यात सांकशी सारखा एक वैशिट्यपूर्ण किल्ला आहे हे अगदी स्थानिक लोकांना सुद्धा फार कमी माहित असेल. कधीकाळी इतिहासात वैभवाच्या शिखरावर असणारा हा किल्ला आज मात्र दुर्लक्षित आहे. पूर्वी पेण चा उल्लेख तालुका सांकसे, सजा अवचितगड प्रांत कल्याण असाच ऐतिहासिक कागद पत्रांतून आढळतो. ब्रिटिश काळापर्यंत उपविभागातील गावांचे मुख्यालय सांकशी इथे होते आणि त्यानंतर ते पेण ला स्थलांतरित झाले. काळाच्या ओघात पेणचा विकास झाला आणि सांकशी मात्र मागे राहिले ते कायमचे. पेण शहराच्या ईशान्येस पनवेल पासून साधारण १८ कि.मी. अंतरावर मुंबई -गोवा महामार्गापासून बळवली गावातून निढवली गावाच्या हद्दीत हा किल्ला आहे. सोपा मार्ग म्हणजे महामार्गावरून तरणखोप ला उतरायचं आणि गावाच्या पाठीमागून सरळ रस्ता आपल्याला घेऊन जातो तो थेट किल्ल्याच्या पायथ्याशी बद्रुद्दीन दर्ग्याजवळ. असे म्हणतात कि याच्या पायथ्याशी पूर्वी काळ्या पाषाणाचे एक मंदिर होते परंतु परकीय आक्रमणात ते लोप पावले आणि आता मात्र त्याचे काही अवशेष हे पायथ्याशी असलेल्या मशिदीच्या जोत्याला वापरलेले दिसून येतात. सांकशी खालावला पण दर्गा मात्र दिमाखात उभा आहे. परकीय आक्रमणाचे हे एक उत्तम उदाहरण.
विशेष म्हणजे पेण मध्ये बालपण जाऊनसुद्धा सांकशी पाहायचा योग्य कधी आला नव्हता. पण तो या वेळेला आला तो माझ्या परम मित्र नितेश मुळे. "मयुर; चल!! तुला सांकशी चा किल्ला दाखवतो" किल्ला छोटा आहे पण थोडासा एका टप्प्यावर कठीण आहे तुला थ्रिल येईल.". असे बोलल्यावर मी तर लगेच एका पायावर तयार झालो. मग  मी , गोपाळ आणि नितेश आम्ही तिघेच रविवारी सकाळी निघालो. बद्रुद्दीन दर्ग्याजवळ बाईक ठेवून आम्ही चढायला सुरुवात केली.
सांकशीचा इतिहास असा कि, सांक राजाने हा किल्ला बांधला आणि त्याच्या नावावरून याचे नाव सांकशी असे पडले. त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजे आजचे हमरापूर.  हमरापूर गावात काही प्राचीन अवशेष आढळल्याचे स्थानिक सांगतात. सांक आणि कर्नाळा किल्ल्याचा राजा यांच्यात युद्ध झाले त्यात सांक  राजा मारला गेला आणि म्हणून त्याच्या मुलीने वज्राईने गडावरून उडी मारून आत्महत्या केली तिची आठवण म्हणून गडावर एका टाक्याच्या बाजूला तिचे शिल्प कोरले आहे.. हीच वज्राई-जगमाता म्हणूनहि  ओळखली जाते१६ व्या शतकात सांकशी , कर्नाळा , आणि उत्तर कोकण यावर गुजरातचा सुलतानाचा अंमल होता. निजामाने नंतर हा  किल्ला जिंकून घेतला. परंतु तदनंतर पोर्तुगीजांच्या मदतीने गुजरातच्या सुलतानाने पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा निजाम आक्रमण करेल या भीतीने त्याने हे दोन्ही किल्ले वसईचा पोर्तुगीज कॅप्टन डी मेंझेस याला दिलेयाने पुन्हा आक्रमण करणाऱ्या निजामास निकराची झुंज देऊन पराभूत केले या लढाईत पोर्तुग्रीज सैनिक ट्रान्सकोझी याने केलेल्या पराक्रमाची इतिहासात नोंद आहे. परंतु निजमाकडून पुढे काही त्रास होऊ नये यासाठी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे म्हणून त्याला खंडणी देऊन कर्नाळा आणि सांकशी विकत घेतले. पुढे सांकशी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. नंतर इंग्रजांच्या काळात सांकशी हे प्रमुख चे  ठाणे झाले परंतु कारभाराची व्यवस्थित घडी बसल्यावर सांकशीचे ठाणे पेण ला हलवले आणि सांकशीला उतरती कळा लागली.
गडावरील पाण्याच्या टाक्यांमधून पाईपलाईन खाली दर्ग्याजवळ आणली  आहे तिला लागूनच वाट गडावर जाते. ओबडधोबड वाटेवरून चालायला  सुरुवात केल्यावर वरती  पहिले पाण्याचे टाके दिसले. पायऱ्यांच्या उजवीकडे कातळात खोदलेले एक दोन खांबी टाके दिसत होते. तिकडे जायला रस्ताचच नव्हता. तिथे जायचे तर कातळात  खोदलेल्या खोबण्यांना धरून सावकाश एकेक पावलाचा अंदाज घेऊन जावे लागणार होते. सुरुवातीला माझा  धीरच झाला नाही. नितेश मात्र पक्का ट्रेकर झाला होता. पटापट पार करून गेला मग त्याने धीर देत सांगितलं "अरे त्या खोबण्यांमध्ये हात टाक बरोबर आणि पावलाचा अंदाज घे.. त्यासाठीच बनवलया आहेत त्या ..मग येशील बरोबर " सुरुवातीला घाबरत सुरुवात केल्यावर मग धीर चेपला आणि मग सहज पार करून मी पाण्याच्या टाकी जवळ पोहोचलो. हा चढाईचा कस लागल्यावर आता मला  कळलं होतं कि, ""मयुर.. तुला थ्रिल येईल " असं नितेश मला का बोलला होता. 



पायऱ्या चालून आल्यावर आपल्याला ३ टाक्या लागतात आणि डाव्या बाजूला साधारण १० फूट खोलीचे जगमाता नावाचे चौथे टाके आहे. नंतर वर जाण्यासाठी एका छोट्याशा खिंडीपाशी येऊन पोहोचलो तेथून जाण्यासाठी पायऱ्या नष्ट  झाल्या होता. त्यामुळे सांभाळून वर जावे लागणार होते. हा कातळटप्पा चालून वर गेल्यावर  समोरच्या बाजूने एक तर दुसरी वळसा घालून वर जाणारी अश्या २ वाटा आम्हाला दिसल्या. उजवीकडे गाजिश नामक पाचवे टाके असून याच पातळीवर उत्तरेकडे आणखी २ मोठी खांब टाकी आहेत.  इथल्याच एका बाजूच्या टाक्यात शिरण्यासाठी साधारण ३ x ३ फूट आकाराचा दरवाजा दिसत होता. त्याच्या खांबांवर तर पण-फुलांची नक्षी कोरलेली आहे. लेण्यांवर असलेल्या कीर्तिमुखा सारखे त्या कोरल्या होत्या. 


प्रवेशद्वारावर शिल्प कोरलेलं  टाकं 

वर जाण्यासाठी असलेल्या प्रवेश द्वाराजवळच मारुतीची मूर्ती आणि शरभाचे शिल्पं ठेवलेल दिसून आलं. या छोट्याश्या किल्ल्यावर देखील शरभाचं शिल्प आढळून आलं हे विशेष.
वरती गडावरील आल्यावर राजवाड्याचे अवशेष , बालेकिल्ला आणि त्याला लागूनच पुन्हा काही पाण्याची टाकी आणि धान्यकोठार हे सर्व पाहून नंतर आम्ही पठारावर पोहोचलो. वरती पठारावर असलेल्या फार मोठ्या कातळावर त्याचा योग्य वापर करून म्हणा किंवा नैसर्गिकरित्या अनेक छोटे-छोटे रांजणखळगे तयार झाले आहेत. आणि त्याला लागून पाण्याच्या टाक्या हि खोदलेल्या आहेत. कदाचित त्यावेळेला टेहळणीसाठी जो कोणी इथे असेल त्याला पाणी पिण्यासाठी फार लांब जायला लागू नये  म्हणून असेल किंवा त्याचा वापर करून तात्पुरते एखादे छत देखील उभारता येत असेल असा विचार त्यावेळेला कदाचित केला असेल. तिथेच बाजूला एका कातळामध्ये कोरलेली बाणासारखी कसली तरी मार्गदर्शक आकृतीही आम्हाला पाहायला मिळाली. त्यावेळचा कसला तरी गूढ संकेत असावा बहुतेक!


पठारावरील रांजणखळगे (Potholes)
कातळामध्ये कोरलेला गूढ सांकेतिक संदेश
थोडा वेळ विश्रांती घेऊन तिथून आम्ही निघालो. त्याच्याच उजव्या बाजूला दिसणाऱ्या डोंगराचा बाहेर आलेला भाग दिसत होता. तिथे एक नैसर्गिक गुहा दिसत होती. तिथे जाण्यासाठी मात्र एखादा कसलेला गिर्यारोहक एखाद्या साधन सामुग्रीनेच जाऊ शकतो. पण तिथे फक्त एक दोर टाकून मी आणि गुरु आम्ही टाकी साफ करायला खाली उतरलो होतो असा अगदी लीलया हा माझा मित्र नितेश मला सांगत होता. त्याच्या हिमतीला एक सलाम ठोकून बालेकिल्ल्याच्या खाली असणाऱ्या टाक्याजवळ आम्ही आलो. इथल्या टाक्याची  रचना पाहून मी थक्क झालो. त्याच्या रचनेवरून त्याला पूर्वी एक दरवाजा असावा अशी व्यवस्था दिसत होती. शिवाय कातळामधून एक असा चर खोदलेला होता कि पावसाचे पाणी वाहत बरोबर त्या टाकीमध्ये उतरेल जणू काही एखाद्या पाईपने सोडावे असं. आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातील पाणी हे चक्क पिवळं आहे. एक तर या टाक्यात उत्तरायला एकदम निमुळती दगडांचा आधार, जरा पाऊल चुकलं  तर खाली दरी स्वागतासाठी तयार .. परंतु दुर्गसंवर्धनचे काम हाती घेतल्याने गडावरील लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी नितेश खाली उतरला आणि आम्ही त्याला मदत म्हणून साखळी करून पाणी काढायला मदत केली.
पिवळं पाणी असणारे पाण्याचं टाकं 
सांकशीचे वैशिट्यच मुळात हेच कि ठिकठिकाणी कातळात पाण्याच्या भरपूर टाक्या खोदल्या आहेत. या किल्ल्यावर इतकी पाण्याची टाकी आहेत कि हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा. किल्ला जरी लहान असला तरी यावरून मिऱ्या डोंगर, कर्नाळा, माणिकगड नागफणीचा कडा व इतर ठिकाणे दिसतात. पश्चिमीकडे उगमापासून समुद्रापर्यंत नागमोडी वळणाने जाणारी नदीही फार छान दिसते. पावसाळ्यात तर येथील सौंदर्य नक्कीच खुलून येत असणार. सर्व न्याहाळून झाल्यावर गड उतरायला सुरुवात केली सूर्य माथ्यावर येई पर्यंत आम्ही गडाखाली पोहोचलो होतो. निघता निघता बाजूला असणाऱ्या दर्ग्याकडे पाहून मनात विचार आला कि, मूर्तिकला आणि शिल्पकले साठी  प्रसिद्ध असणाऱ्या पेण मध्ये असणारा हा सांकशी मात्र दुर्लक्षित राहिला त्याला गरज आहे ती संवर्धनाची आणि ती जबाबदारी उचलली आहे माझा मित्र नितेश याने. राजा शिवछत्रपती या परिवाराच्या माध्यमातून या गडावर साफसफाई केलेली आहे आणि मार्गदर्शक फलकहि लावले आहेत तदनंतर आत्तापर्यंत तिथलाच स्थानिक असल्याने आपल्या कामातून वेळ काढून जमेल तसा वेळ काढून तो गडावर संवर्धनाचे काम करतो. त्यामुळे आत्ता  किल्ला आणि पाण्याच्या टाक्या थोड्या सुस्थितीत आहेत.
गरज आहे ती असाच एक नितेश प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी निर्माण होण्याची म्हणजे महाराष्ट्राचे वैभव असलेले गड -किल्ले कधी आचके तोडणार नाहीत आणि दुर्लक्षितही  राहणार नाही.





आईच्या हातचा खाऊ

"आईच्या हातचा खाऊ"

नुकतीच दुरदर्शन वर एका सूपची जाहिरात बघितली. एक छोटी मुलगी आपल्या मम्मीला विचारते,
"आज मेन्यु मे क्या है?" एकदम छान आणि प्रेमळ हसणारी मम्मी Apron बांधुन मुलांना सुप देत
म्हणते, "छोटी छोटी भुक बाय !!बाय!!"
आणि मग पोटावरून हात फिरवत "अं सो यमीss" असं म्हणणाऱ्या त्या मुलीला
आपली मम्मी एकदम मास्टर शेफच"!!! वाटत असणार.

पण मनात विचार आला की आपली आई काही अशी अगदी नीटनेटकी आणि साडीला एकही साधी चुणी
नसणारी नव्हती. ती तर बिचारी सतत कष्ट करत असल्यामुळे दमलेली दिसायची.
आणि मग आठवला तो लहानपणीचा माझा खाद्यप्रवास......
मला आठवतं;लहानपणी भुक लागली की सांगायचो "आई! काहीतरी नवीन खायला बनवं ना! आणि तो
शिरा नको हो! काहितरी मस्त चटकदार बनवं.." आई बिचारी हो म्हणायची.
मग ते खमंग आणि ताज्या भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी आई लगेच वनगेच्या गिरणीवरून दळण
घेउन यायची का तर तिथे चांगलं मिळतं म्हणुन किंवा मला पाठवायची with special instructions
देऊन की, "त्यांना सांग भाजणीचं दळण आहे चांगलं काढुन दे."
छान भरपुर कोथिंबीर आणि कांदा घातलेल्या थालीपिठावर एक घरगुती साजुक तुपाची धार आणि सोबत
ओल्या नारळाची चटणी. अहाहा!! केवळ स्वर्गसुख.
मे महिन्याच्या आधी आईची लगबग असायची ती सगळे साठवणीचे पदार्थ बनवायची. १०/१० च्या
चाळीत राहुन सुद्धा त्यातुनच आई सगळं बरोबर मॅनेज करायची. खरी मॅनेजमेंट गुरू.
मग त्यात उडीद/तांदळाचे पापड, मिरगुंड, कुरड्या, फेण्या, भरलेली मिरची, मुरांबा, कोकमाचे सरबत असे
बरेच काही बनवायची. स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या काचेच्या बरणीमधील सुंदर लाल रंगाचे कोकम
साखर मीठ घालुन उन्हात ठेवले जायचं. मग हळुहळु त्यांचा रंग खुलत जाई. तापलेल्या तेलाच्या कढईत
२ इंचाचे मिरगुंड जेव्हा फुलून एका मोठ्या चपाती एवढा आकार घेत असे तेव्हा ते पाहताना मजा
यायची. अशी सगळी पारंपारिक पदार्थांची रेलचेल..तोंडाला चटकं लावणारी.

मग रोज रात्री पंगतीत जेवणाबरोबर यी पदार्थांची मेजवानी. कधी वालाची डाळ, कढी आणि ओली मिरची
तर कधी भाकरी आणि माठाची भाजी. पावसाळ्याचा मौसम असेल तर मिळणारी शेवळाची भाजी वगैरे
वगैरे. प्रत्येक भाजी खाल्लीच पाहिजे असा आईचा आग्रह असायचा का तर प्रत्येकातुन मिळणारी
जीवनसत्वं हि महत्वाची.
आत्ता सारखे नूडल, सुप्स असे कुठे खायला मिळायचे तेव्हा? पण रोज नव्या पदार्थाचा हट्ट. मग कधी
मायाळुच्या पानांची भजी (किती जणांना माहित असेल जरा शंकाच आहे); मुगाच्या पीठाचा पोळा;
कोथिंबिरीच्या किंवा कोबीच्या वड्या तर कधी कुरमुऱ्यांचा लाडू असे काही ना काही खायला मिळायचं.
आई खुप सारे मसाले चटण्या घरी करायची. खलबत्यात कुटून कुटून ते करायची. खलबत्त्याचा होणार
आवाज ऐकून मोठी गम्मत वाटायची. ती आईच्या हातची लसणीची तिखट आणि भरपूर तेल घातलेली
चटणी आणि गोल शुभ्र भाकरी आठवली की अगदी आत्ताही जागच्या जागी भूक लागते आणि तोंडाला
पाणी सुटते.
आता आईचे वय झाले. आधीसारखे खुप कष्ट तिला जमत नाहीत. पण तरी ही त्यातूनच आमच्यासाठी
कसकसली पीठ, भूक लाडू- तहान लाडू, वडे बनवणे चालूच असते तिचे. का तर! नोकरी निमित्त बाहेर
गेलेली पोरं आठवडा-महिनाकाठी घरी येणारं म्हणुन.
त्यादिवशी तिने साध्या केलेल्या खिचडी भातावर एक साजुक तुपाची धार टाकुन किती जेवलो याचा
अंदाजच आला नाही.
अचानक आठवले, आपली खाद्ययात्रा एवढी समुद्ध करणा-या आईला आपण कधीच म्हणालो नाही की
"मम्मी तुम तो वर्ल्ड की बेस्ट मम्मी हो। i love you मम्मी।". असं आत्ताच्या मुलांसारखं express
करायला कधी जमलचं नाही. तेच काम आताच्या आई 5 रुपयाच्या मॅगी देऊन करतात बहुतेक.
खरचं आपण ८०-९० दशकाच्या मुलांनी जे पाहिलं अनुभवलं ती आत्ताची शहरातील मुले उपभोगतील का
यात थोडी शंकाच आहे. आपण पाहिलेली हि आपली समृद्ध खाद्य परंपरा जर जोपासली नाही तर
पुढच्या पिढीला त्याला मुकणार आहे हे नक्की.

Note:-  This article has been published in 29th june 2018 lokprabha. link as below.

http://epaper.lokprabha.com/m5/1705832/Lokprabha/29-06-2018#issue/56/1