अजिंक्यतारा
आणि बारामोटेची विहीर
असा हा ऐतिहासिक
पार्श्वभूमी असलेला किल्ला पहायचा फार दिवसापासून मनाशी होतं आणि त्याचा प्लॅन ठरला
तो हि आदल्या रात्रीच. शनिवारी कामावर जायचं रद्ध झालं आणि उद्याचा दिवस कुठे सत्कारणी
लावावा हा विचार करत असतानाच डोळ्यासमोर एकदम उभा राहिला अजिंक्यतारा. आता रात्रीतच
कोणाला सांगणार सोबत चालतो का !म्हणून ? मग एकटेच जायचं ठरलं आणि तेवढ्यात अनिकेत चा मेसेज पहिला. सहज त्याला
फोन केला आणि बोललो. "अनिकेत चल! उद्या येतोस का? अजिंक्यताराला!"
"तुम्ही
कितीजण आहात ? आणि किती वाजता निघणार.. " -- अनिकेत
"कोणी
नाही फक्त तू आणि मी .. चल . नाही तरी तुला माझ्यासोबत यायचं होतं ना मग चल उद्या
"
"काय फक्त
दोघेंच " अनिकेत अवाक झाला. पण तोही बरेच दिवस कुठे बाहेर गेला नसल्याने लगेच
तयार झाला. तोही चक्क उद्याच्या शिफ्टला दांडी मारून. हि अशी दांडी वगैरे मारून ट्रेक
ला जायची मजा काही वेगळीच असते नाही का?..
मग पुण्यावरून
सकाळीच स्वारगेटला पोहोचलो आणि ST ने गाठला
थेट सातारा.
बस स्थानकातूनच
रिक्षा ने आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. गाडी रस्ता थेट गडाच्या महादरवाजापर्यंत
आपल्याला घेऊन जातो. तिथूनच पायथ्याशी असणाऱ्या सातारा शहराचा विस्तार आपल्याला दिसून
येतो. गडाचा महादरवाजा आजही उत्तम स्थितीत आहे. त्याच्या पाकळ्यांमुळे तो अगदी विशेष
भासतो. मुख्य दरवाजास पाच पदर आहेत आणि प्रत्येकावर काही देवता तर कमळ कोरलेले आहेत.
त्यातील सगळ्यात आतील कमानीवर गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. तसेच शरभाचे उत्तम शिल्पही
दरवाजावर आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या रेखीव रचना आणि कोरलेल्या शिल्पांमुळे दरवाजा
खूप सुंदर दिसतो. नेहमीप्रमाणे गडाच्या मुख्य
दरवाजावर नमस्कार करून आत प्रवेश केला. दरवाजाच्या आतील बाजू पहाऱ्यासाठी असलेल्या
देवड्या पाहायला मिळाल्या. थोडे वर चालून गेल्यावर दुसरा दरवाजाने गडावरती दाखल झालो. गडावरून चंदन-वंदन
आणि यवतेश्वरचे पठार दिसत होते. समोरच पडलेली इमारत, ध्वजस्तंभ, आणि मारुतीरायाचे सुंदर
मंदिर पाहायला मिळाले. मंदिरात काळ्या पाषाणात असलेली मारुतीरायाची सुंदर मूर्तीची
स्थापना केलेली आहे. मनोभावे शक्तीच्या या देवतेला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो.
गडावरच आकाशवाणी,
दूरदर्शन आणि पोलीस विभागाचे कार्यालय आहे. मारुतीच्या मंदिराबाहेर आल्याबरोबरच महाराणी ताराबाई यांचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी
साताऱ्यातील अजिंक्यतारयावर झाले आणि त्यांची एक छोटीशी ओळख म्ह्णून एक फलक लावला आहे.
परंतु त्यांची समाधी मात्र माहुली. ता. सातारा येथे कृष्णेच्या काठावर आहे.
महाराणी ताराबाई
(१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी
महाराजांचे सरसेनापती हंबीरराव बाजीमोहिते यांची ताराबाई ही कन्या. मराठ्यांच्या इतिहासातील
ही एक कर्तबगार राजस्त्री ! शिवाजीराजे आणि संभाजीराजेंच्या मागे कणखरपणे तिने राज्याची
धुरा सांभाळली. संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही
रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचं पान.
त्यांच्या कर्तृत्वाचे
आणि पराक्रमाचे कवी गोविंद यांनी पुढीप्रमाणे वर्णन केले आहे.
दिल्ली
झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई
रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी
भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची
वेळ आली। मुगल हो सांभाळ।।
तिथूनच
पुढे आम्ही बालेकिल्ल्यातील राजवाड्याच्या दिशेने निघालो. आजमितीला तो ढासळल्या स्थितीत
असला तरी त्याच्या दगडी
पायाचे बांधकाम पाहून त्याच्या त्यावेळच्या मजबुतीचा आपल्याला अंदाज येतो. याच्या शेजारीच महादेवाच्या मंदिराकडे जाणारी एक वाट आहे. तिकडे
आम्ही निघालो. बाजूलाच सुकलेले तळे होते आणि
नुकताच मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे दिसत होते. गडावर
कुठेही गेलो तरी तेथील
देवतेला दिवा-बत्ती करायचा
शिरस्ता मी इथेही पार
पडला. तिथून पुढे आम्ही मंगळाईच्या
बुरुजाकडे निघालो. तिकडे जाणारी वाट हि चाफा,
पळस, सावर अशी मोठाल्या
गर्द झाडांनी भरलेली आहे. नुकताच पावसाळा
संपून गेला असल्याने झाडी
बरीच वाढली होती. त्यामुळेच रस्त्याचा थोडासा अंदाज चुकला आणि रस्त्याचा मागमूस
येईनासा झाला.
"अरे
मयुर ! आपण वाट चुकलो
रे!! ". अनिकेत बोलला.
" टेंशन
नॉट .. घाबरायचं नाही.
अश्या वेळेला फक्त चालत राहायचं मार्ग
आपोआप सापडतो. "
पुढे
गेल्यावर मोठे तलाव लागले.
हिरवट रंगाचे तलावाचे पाणी , बाजूला असललेला उतरता रास्ता, काठावरच असलेले मोठे झाड आणि
बाजूला भरपूर झाडी. क्षणभर मला "गुलबकावली" गोष्टींमधल्या झाडाची आठवण झाली ज्यावर
अजस्त्र अजगर राहत असल्याचे
चित्र दाखवले होते. मनातल्या मनात मिश्किलपणे हसत खरंच एखादा
तर नाही ना! असे
म्हणत पुढे तटबंदीच्या बाजूने
निघालो.
थोड्याच वेळात समोर दिसला तो दक्षिण दरवाजा. बऱ्यापैकी नव्यानेच बसवलेला वाटत होता. हीच वाट पुढे मंगळादेवीकडे उतरते असे वाचण्यात आले होते. त्यामुळे इकडूनच जाऊया असे ठरवले. या दरवाज्यानेच खाली उतरलो. डाव्या बाजूला अजस्त्र शिळा;उभा कातळकडा, उजव्या बाजूला तीव्र उतार आणि मधून फक्त चिंचोळा मार्ग. वाट तशी भीतीदायक नाहीये परंतु काळजी घेतल्यास या मार्गावरून जाण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. तसेच आम्ही पुढे पुढे निघालो. अजिंक्यतारावर बऱ्यापैकी वनराई असल्याने या मार्गावर उन्हाचा काही त्रास जाणवला नाही. गोलाकार फिरत फिरत वाट पुढे सरकत होती. पायवाट बऱ्यापैकी मळलेली वाटत होती. बरेचसे दुर्गप्रेमी गडाला प्रदक्षिणा करण्यासाठी याच मार्गाचा बहुधा वापर करत असावेत. अनिकेत तर भलताच खुश झाला होता. बऱ्याच दिवसांनी ट्रेक ला आल्याने तो आनंदी होता. चालता- चालता एकमेकांशी गप्पा मारत आणि अजिंक्यताऱ्याचा इतिहास आठवत पुढे निघालो.
दक्षिण दरवाजा |
दक्षिण दरवाजातून उतरणारी वाट |
थोड्याच वेळात समोर दिसला तो दक्षिण दरवाजा. बऱ्यापैकी नव्यानेच बसवलेला वाटत होता. हीच वाट पुढे मंगळादेवीकडे उतरते असे वाचण्यात आले होते. त्यामुळे इकडूनच जाऊया असे ठरवले. या दरवाज्यानेच खाली उतरलो. डाव्या बाजूला अजस्त्र शिळा;उभा कातळकडा, उजव्या बाजूला तीव्र उतार आणि मधून फक्त चिंचोळा मार्ग. वाट तशी भीतीदायक नाहीये परंतु काळजी घेतल्यास या मार्गावरून जाण्याचा आनंद आपण घेऊ शकतो. तसेच आम्ही पुढे पुढे निघालो. अजिंक्यतारावर बऱ्यापैकी वनराई असल्याने या मार्गावर उन्हाचा काही त्रास जाणवला नाही. गोलाकार फिरत फिरत वाट पुढे सरकत होती. पायवाट बऱ्यापैकी मळलेली वाटत होती. बरेचसे दुर्गप्रेमी गडाला प्रदक्षिणा करण्यासाठी याच मार्गाचा बहुधा वापर करत असावेत. अनिकेत तर भलताच खुश झाला होता. बऱ्याच दिवसांनी ट्रेक ला आल्याने तो आनंदी होता. चालता- चालता एकमेकांशी गप्पा मारत आणि अजिंक्यताऱ्याचा इतिहास आठवत पुढे निघालो.
गड प्रदक्षिणा करतानाच्या मार्गातून दिसणारा बुरुज |
पन्हाळय़ाचा
शिलाहार राजा भोज दुसरा
याने ११९०च्या सुमारास हा गड बांधला.
नंतर आदिलशाही, निजामशाही आणि मग ७ जुलै १६७३
रोजी हा स्वराज्यात आला.
राजांच्या निधनानंतरची हि गोष्ट, राजाराम महाराजांनी त्यांची राजधानी नुकतीच पन्हाळगडावरून अजिंक्यताऱ्यावर हलविली होती. सन १६९९ मधील
डिसेंबरचा तो महिना. औरंगजेबाचे
एकेक मातब्बर सरदार तरबियातखान, रहुल्लाखान, मुनिमखान, मीर आतिश, मन्सूरखान,
खुदाबंदाखान आणि प्रत्यक्ष औरंगजेबाचा
मुलगा शहजादे मुहम्मद आजम गडाला वेढा
घालून बसले होते. . खुद्द
औरंगजेब करंज मुक्कामी राहून
या सर्वावर देखरेख करत होता. इकडे
स्वराज्यातील मूठभर मावळे किल्लेदार प्रयागजी प्रभूंच्या नेतृत्वाखाली दगडगोट्यांनी झुंज
देत होते. औरंगजेबाचा एक सरदार १३
डिसेंबर १६९९ रोजी एका
पत्रात कळवतो, ‘आमच्याकडे सैन्य आहे, तोफा आहेत,
आमचे मोर्चे गडापर्यंत पोहोचू पाहात आहेत, पण किल्ल्यातून होणाऱ्या
दगडांच्या वर्षांवापुढे आम्हाला पुढे सरकता येत
नाही. रात्री-अपरात्री मराठे बाहेर येऊन मुघल सैन्याला
हैराण करत होते. बरेच महिने होऊनही
किल्ला हातात येत नसल्याने शेवटी
शाहजद्याने शक्कल लढवून गडाच्या पोटाखाली २ सुरुंग लावून
दिले. पहिला स्फोट घडला आणि तटाची
भिंत कोसळून खुद्द प्रयागजी प्रभूसह अनेक मराठे त्यात
अडकले, जखमी झाले. या
स्फोटानंतर मुघलांची सेना लगेचच पुढे
सरकली, पण तेवढय़ात दुसऱ्या
सुरुंगाचाही स्फोट झाला आणि त्यावेळी
तटाबरोबर सारा कडाच खाली
आला. तब्बल दोन हजार मुघल
या दरडीखाली गाडले गेले.यातला एक
दगड तर खुद्द औरंगजेबाजवळ
येऊन पडला. होत्याचे नव्हते झाले. गड तर मिळाला
नाहीच, पण स्वत:चेच
हसे झाले. सातारा शहराच्या माची भागात पडलेला
हा भलामोठा दगड आजही या
घटनेची साक्ष देत उभा आहे
असे म्हणतात. नंतर किल्ल्यावरील सामग्री
संपताच मराठ्यांनी किल्ला सोडून दिला . नंतर २४ एप्रिल
१७०० ला औरंगजेबाच्या ताब्यात
आल्यावर त्याने याचे नाव ठेवले
किले आजमतारा’. परंतु नंतर महाराणी ताराबाईच्या
नेतृत्वाखाली मराठय़ांनी पुन्हा हा किल्ला जिंकून
घेतला आणि याच वेळी
आजमताऱ्याचे झाले ‘अजिंक्यतारा! पुढे महाराणी ताराबाईंकडून
छत्रपती संभाजीपुत्र शाहूंकडे गडाचा ताबा आला. या
गडावरच मार्च १७०८ मध्ये त्यांचा
राज्याभिषेक झाला आणि अजिंक्यताऱ्याला
पुन्हा एकदा मराठय़ांच्या राजधानीचा
मान मिळाला.
मेंगळाईदेवी मंदिर |
थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही बरोबर मंगळादेवीच्या मंदिराजवळ खाली उतरलो. आमची गडप्रदक्षिणा पूर्ण झाली होती. देवीचे मंदिर फार सुंदर बांधले आहे आणि मूर्तीही तितकीच सुंदर मनाला प्रसन्न करणारी.आहे. तिच्या दर्शनाने आमचा थकवा आपोपच दूर झाला आणि अनेक सुख-दु:खाचे सारे प्रसंग आपल्या हृदयी जपून ठेवणाऱ्या अजिंक्यताराला एक गोड निरोप दिला.
नंतर आम्ही मार्गस्थ व्हायचे ठरवले ते शेरी लिंब या गावी; बारामोटेची विहीर पाहण्यासाठी. तत्पूर्वी जेवणासाठी जवळच्याच हॉटेल मध्ये शिरलो असताना. सहजचं चौकशी केली. "ओ काका! बारामोटेच्या विहिरीला कसं जायचं?"
"बारामती
व्हय!.. इकडून एशटी पकडा आणि जावा. ""
"ओ काका बारामती नाही हो .. बाs राs मोटेचीs विहीरss
" मी बोललो. समोरच्या दोघं-तिघांनी नि प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पहिलं
.
"हे असलं
काय आम्हाला माहित नाय बघा".
इथे कोणाला
माहित नाही त्यापेक्षा सरळ आम्ही रिक्षावाल्याला विचारूया म्हणून जाण्यासाठी किती घेणार
असं विचारला असता त्याने अव्वा-च्या
सव्वा भाव सांगितले. मग शेवटी गोर--गरिबांची
एस.टी च मदतीला आली. बस स्थानकांतून नुकतीच तिकडे जाणारी बस लागली होती. "वाट
पाहीन पण एस.टी नेच जाईन" या एस.टी च्या ब्रीदवाक्याला जागून आम्ही लिंब या गावी
उतरलो.
राष्ट्रीय महामार्ग
क्र.४ ने सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण १२ कि.मी वर लिंब
फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर ३ कि.मी. वर लिंब गाव आहे. ह्या गावाच्या
दक्षिणेला २ कि.मी. अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटेची
विहीर आहे.
एस.टीतुन उतरल्यावर
समोरच एक आजीबाई बसल्या होत्या. उतरल्या-उतरल्या आम्ही काही बोलायच्या आतच त्यांनी
विचारलं, "इहिर बघाया आलाय व्हय!, असाच सरळ शेतातून जावा मग दिसलं तुम्हाला
".
आजींचे आभार
मानून आम्ही मिरचीच्या शेतातून पुढे निघालो. शेतातून जाणारा मार्ग हा शॉर्ट-कट आहे.
त्यामुळे थोड्याच वेळात आम्ही विहिरीजवळ आलो. असे काय आहे या विहिरीत याचे कुतूहल जे
जागे होते ते पाहिल्यावरच कळलं कि, हि विहीर सुंदर स्थापत्यशास्त्र चे उत्तम उदाहरण
आहे.
विहिरीचा व्यास
५० फूट आणि खोली ११० फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. जणू काही जमिनीखालील
महालात ही विहीर बांधली आहे. या विहिरीच्या मुख्य दरवाजावर उत्तम कलाकुसर केलेली आहे.
अष्टकोनी विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. तसेच आतील बाजूस शरभाची
दगडी मूर्ती आहे. कुठल्याही किल्ल्यावर महादरवाजावर उंचावर असलेले हे शिल्प खालून पारखून
पाहणे शक्य नसते. जर एखाद्या कोणाला शरभाचे शिल्प जवळून पहावयाचे असेल तर बारामोटेवर
असणारे हे शिल्प हि एक उत्तम संधी आहे. यावर कोरलेली शिल्पं हि राज्याची समृद्धी आणि
पराक्रमाचं प्रतीक ठरतात.
शरभाचे शिल्पं |
मोट बसवण्याची जागा |
विहिरीवर १५
मोटा बसवण्यासाठी जागा बसवलेल्या आहेत. बहुधा उरलेल्या ३ या पर्यायी म्हणून बसवल्या
असाव्यात. विहिरीला आत मध्ये जाण्यासाठी प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा हि आहेत. ह्या
चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते..
या विहिरीचा इतिहास असा कि हि विहीर ३०० वर्षे जुनी आहे इ.स.वी.सन. १७१९ ते १७२४ या
दरम्यान शाहू महाराजांची पत्नी वीरुबाई हिनं ही दगडी विहीर बांधल्याचं सांगितलं जातं.
विहीर निर्माण करते वेळी ३३०० आंब्याची कलमं लावून इथे आमराईची निर्मिती करण्यात आली
होती. या विहीरीचं सर्व बांधकाम हेमाडपंती आहे आणि याची खूण म्हणजे विहीर बांधताना
दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही.
राजमहालाच्या
पायऱ्या चढून वर गेल्यावर आम्हाला एक दगडी सिंहासन दिसलं. त्याच्याकडे पाहिल्यास असे
वाटतं कि जणू काही आपल्याला सांगतोय कि, पेशव्यांच्या, शाहुंच्या अनेक खासगी बैठका, न्याय-निवाडे
, निवांत क्षण याचा मी साक्षीदार आहे.
विहिरीच्या तोंडावरच दोन दगडी चाकं आम्हाला पाहायला मिळाली, तिथल्याच ग्रामस्थाला विचारला असता त्यांनी सांगितली कि, या विहिरीच्या बांधकासाठी लागणारे दगड आणण्यासाठी जो गाडा वापरला त्याची ती आहेत. विहिरीच्या वरच्या भागात एक झरोका आहे, अगदी राजस्थानमधील महालाच्या झरोक्या सारखा. तिथे उभा राहिला असता, वरून खाली विहिरीचा तळ आपण पाहू शकतो. नुकत्याच आलेल्या "बघतोस काय मुजरा कर" या मराठी चित्रपटात इथला काही भाग चित्रीत केला गेला आहे. शिवकालीन असलेली हि विहीर गावकऱ्यांसाठी आजही पाण्याचा उत्तम स्रोत ठरली आहे.
अशी हि ऐतिहासिक विहीर पाहून आम्ही परतीच्या वाटेल लागलो आणि पुन्हा त्याच थांब्यावर एस. टी ची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात मघाचच्याआजी पुन्हा आमच्या जवळ आल्या. "काय रे पोरांनो.. आलात इहिर बघून. कुठून आलात.? "
दगडी सिंहासन |
दगडी चाकं |
विहिरीच्या तोंडावरच दोन दगडी चाकं आम्हाला पाहायला मिळाली, तिथल्याच ग्रामस्थाला विचारला असता त्यांनी सांगितली कि, या विहिरीच्या बांधकासाठी लागणारे दगड आणण्यासाठी जो गाडा वापरला त्याची ती आहेत. विहिरीच्या वरच्या भागात एक झरोका आहे, अगदी राजस्थानमधील महालाच्या झरोक्या सारखा. तिथे उभा राहिला असता, वरून खाली विहिरीचा तळ आपण पाहू शकतो. नुकत्याच आलेल्या "बघतोस काय मुजरा कर" या मराठी चित्रपटात इथला काही भाग चित्रीत केला गेला आहे. शिवकालीन असलेली हि विहीर गावकऱ्यांसाठी आजही पाण्याचा उत्तम स्रोत ठरली आहे.
पाणी जाण्याचा मार्ग |
अशी हि ऐतिहासिक विहीर पाहून आम्ही परतीच्या वाटेल लागलो आणि पुन्हा त्याच थांब्यावर एस. टी ची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात मघाचच्याआजी पुन्हा आमच्या जवळ आल्या. "काय रे पोरांनो.. आलात इहिर बघून. कुठून आलात.? "
"आजी पुण्याहून
आलो आम्ही"
"कशाला
एवढ्या लांबना येतात.. असं काय हाय त्या इहिरीत कुणास ठावं "
मग इतर चौकशी
करत. कशी राजानं हि विहीर बांधली. नि आम्ही
शेती केली. तिथपासून ते स्वतःच्या लग्नापर्यंतच्या गमती जमती आजींच्या तोडून ऐकताना
आम्हाला फार मजा येत होती. तेवढ्यात आमची एस. टी आली. आणि जाता -जाता आजींच्या हातावर
खाऊ ठेवून त्यांना नमस्कार करून आम्ही निघालो. पण काही म्हणा या आजींमुळे आमचा प्रवासाचा
शेवट मात्र गोड झाला.
प्रत्येकाने
एकदा तरी एखादा दिवस साताऱ्यातल्या अजिंक्यताऱ्यांचा इतिहास जागवत आणि प्राचीन बारामोटेच्या
विहिरीसाठी घालवला तर पर्यटनाचा आनंद आणि इतिहासाची ओळख हे हेतू साध्य होतील. मग तुम्ही
कधी जाताय?
इतिहास संदर्भ: सौजन्य विकिपीडिया