समर्थांची शिवथरघळ

समर्थांची शिवथरघळ






कसे जाल:- महाडवरून बिरवाडी मार्गे किंवा पुण्याहून वरंध घाटातून भोरमार्गे बारसगावपर्यंत येऊन मग आतमध्ये गेले कि शिवथरघळीच्या मार्गाला आपण लागतो. वरंध घाटातून माझेरी सुन्याभाऊची खिंड ह्या मार्गे पायी चालत देखील घळीत येत येते. तसेच राजगड गोप्याघाटाची खिंड, रायगड उतरून पोटाल्याच्या डोंगराकडून बिरवाडी मार्गे देखील घळीत येता येते.



शिवथरघळ एक अविस्मरणीय अनुभव




    शिवथरघळची भेट अशीच अचानक न ठरवता झाली. दरवर्षी मामाकडे (माणगावला) जातो . या वर्षीहि गणपतीला मामाकडे गेलो असताना, भाऊ आणि मी दोघांनी शिवथरघळला भेट द्यायचे ठरवले, मग काय ! रेनकोट चढून Bike वर दोघेही स्वर झालो. निघताना फारसा पाऊस नव्हता. पण लोणेरे सोडल्यानंतर मात्र पावसाने आपला रंग बदलला आणि धो-धो सारी कोसळायला सुरुवात झाली. Bike वर असल्याने पावसाच्या सरी काट्याप्रमाणे चेहऱ्याला टोचत होत्या, पण त्यात सुद्धा मजा वाटत होती.

हळू हळू करत आम्ही महाड सोडले आणि काही अंतरावर गेल्यावर मुख्य महामार्गावरून left turn मारून शिवथर च्या मार्गाला लागलो. एव्हाना महाड शहरापासून बरेच अंतर कापले होते, आजूबाजूला हिरव्यागार निसर्गाचे अप्रतिम दर्शन होत होते. थोड्यावेळाने ढालकाठी गावाजवळ पोहोचलो आणि समोर एका अप्रतिम धबधब्याचे दर्शन झाले. इतका सुंदर आणि सुरक्षित धबधबा मी आजवर पहिला नव्हता. पण तिथे जास्त वेळ घालवून चालणार नव्हता, लगेच आम्ही पुढे मार्गस्थ झालो. वाटेत दिसणारया ,सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा,त्यांच्या अंगा खांद्यावर खेळणारे असंख्य छोटे –मोठे धबधबे, सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू सर्व काही अवर्णनीय होते.

     


    हे सर्व सौंदर्य हावरया सारखे नजरेत जितके सामावेल तितके सामावून घेत होतो. अजून बरेच अंतर होते, आता तर गावेही दिसेनाशी झाली होती. पावसाचा जोर वाढतच होता. बाजूने वाहणारी नदी रस्त्याला स्पर्श करू पाहत होती.

आणखी तासभर जर असाच पाऊस पडला तर रस्ता बंद होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे कुठे हि वेळ न घालवता थेट शिवथरघळ गाठायचे ठरवले. थोड्याच वेळात आम्ही पवित्र ठिकाणी अर्थातच शिवथरघळला पोहोचलो. वरती पोहोचण्यासाठी पायऱ्यांची उत्तम आणि सुरक्षित व्यवस्था आहे.









समोर तो महाकाय, अजस्त्र धबधबा बघानारयाच्या मनात धडकीच भरवतो. कारण ऐन पावसाळ्यात येथील धबधबा रौद्र रूप धारण करतो. याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. त्याचे आवाजाने आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातो. त्या पाण्याचा प्रवाह एवढा आहे कि घळीपर्यंत जाताना तो आपल्याला जाणवतो. त्याच्यामुळे एक लहानशी नदीच तयार झाली होती. त्याला लागूनच समर्थांची घळ आहे. दासबोधाचे लिखाण समर्थांनी येथेच केले. 










समर्थांच्या जीवनात घळींना फार महत्व आहे. आपल्या जीवनातला बराचसा काळ समर्थांनी ह्या घळींमध्ये व्यतीत केला आहे. समर्थ संप्रदायामध्ये या घळींना विशेष महत्व आहे.


मनुष्य सरपटत, रांगत किंवा उभा राहून आतमध्ये जाऊ शकेल असे जमिनीतील किंवा डोंगरातील एक नैसर्गिक विवर म्हणजे घळ. घळ म्हणजे नैसर्गिक गुहा किंवा गुंफा.

     


      समर्थांच्या साधारण ८ घळी मला माहिती आहेत.

हेळवाकची घळ, तारळे(तोंडोशी) घळ, मोरघळ, सज्जनगडची रामघळ, चाफळची रामघळ, चंद्रगिरीची घळ, जरंडेश्वराची घळ आणि दासबोधाची गंगोत्री शिवथरघळ.

त्यातील शिवथरघळ दर्शनाचे भाग्य मला आज लाभले होते.


दासबोधाचे लिखाण समर्थांनी येथेच केले. समर्थांनी सांगावे, कल्याण स्वामींनी लिहावे. असा हा गुरुशिष्य संवादरूपाने ७७५१ ओव्या, २०० समास व २० दशके असलेला ग्रंथराज दासबोध हया घळीतच सिद्ध झाला. दासबोध हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ. येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य, ४०-५० फुट उंचीवरून कोसळणारा तो महाकाय धबधबा,घनदाट जंगल, निर्मनुष्य वस्ती, आजूबाजूला सह्याद्रीचे उंचच उंच कडे. अश्या वातावरणात समर्थांनी दासबोधासारखा महान जीवनग्रंथ लिहिला. पावसाळ्यात तर घळीचे सौंदर्य फारच खुलून दिसते.

समर्थांच्या शब्दातच आपण शिवथरघळीचे वर्णन पाहू —

गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनी चालली बळे |

धबाबा लोटल्या धारा | धबाबा तोय आदळे ||१||

गर्जती मेघ तो सिंधू |ध्वनी कल्लोळ उठला |

कडयासी आदळे धारा |वात आवर्त होतसे ||२||

समर्थांनी या घळीला सुंदरमठ हे नाव दिले होते.
सुंदर मुर्ती सुंदर गुण | सुंदर कीर्ती सुंदर लक्षण

सुंदरमठी देवे आपण | वास केला ||

सुंदर पाहोन वास केला |दास सन्निध ठेवला |

अवघा प्रांतची पावन केला |कृपा कटाक्षे ||

दरे कपारी दाते धुकटे |पाहो जाता भयची वाटे |

ऐसे स्थळी वैभव दाटे | देणे रघुनाथाचे ||


आत घळी मध्ये श्री दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अश्या प्रकारची मूर्तीची स्थापना केली आहे.


रामदास स्वामी घळ सोडून गेल्यानंतर तिचे महत्व कमी होत गेले आणि ती जणू काळाच्या पडद्याआड गेली होती. कागदोपत्री इ.स.१७४१ साली दिवाकर गोसाविचे नातू दिवाकर ह्याने घळीत राहून ज्ञानेश्वर माऊलीच्या अमृतानुभवाची प्रत केली होती असा उल्लेख सापडतो. त्यानंतर १९३० साली शं. श्री. देव ह्यांनी हि घळ शोधून काढली असे समजते.

९ जानेवारी १९५० ला समर्थ सेवा मंडळ स्थापन झाल्यानंतर श्री दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अश्या प्रकारची मूर्तीची स्थापना प.पु. श्रीधर स्वामींच्या हस्ते करण्याचे ठरले.त्याप्रमाणे माघ शुद्ध अष्टमी शके १८८१ (१९६०) या दिवशी मूर्ती स्थापन झाली व माघ शुद्ध नवमीला दासबोध त्रिशत सांवत्सारिक जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. एवढी साधारण माहिती मला शिवथरघळ बददल होती.

बाजूला भक्तांसाठी राहण्याची सोय आहे तसेच वर्ष भर चालणाऱ्या कार्यक्रमांची याधी हॉल भर लावलेली होती.

     
  

    या पवित्र स्थानाचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी मद्यपीनि प्रवेश करू नये अशी पाटीच प्रवेशद्वारावर लावलेली आहे. संपूर्ण परिसराचे एकदा मन भरून दर्शन घेतले, आज मन तृप्त झाले होते, एवढ्या वर्षांची कमान आज पूर्ण झाली होती. समर्थना एकदा त्रिवार वंदन करून त्या पवित्र स्थानाचा निरोप घेतला.



|| जय जय रघुवीर समर्थ ||





© Mayur H.Sanap 2011





6 comments:

Ritesh said...

Mast lihele aahes... ani ho, Please avoid copying pasting from saamana, lokmat. .. karan tu la mast blog lihita yetat as u hav best command on
marathi..

MAyur said...

thnx ritesh.. but that was really good post hence i have included in my blog.. that's it.

MAHESH said...

शिवथर प्रांतातील शिवथर घळीचे सत्य स्वीकारण्याचे आवाहन.


हीच खरी घळ ह्याचे ठोस पुरावे,
1) छत्रपती शिवाजी महाराजांचे रामनगर पेठ वसवण्या संदर्भातील पत्र की श्री येऊन राहिल्याउपवरी येथील व्यापाऱ्यांकडून बारा वर्षे दिवाण माफ यावरून समर्थ वास्तव्याच्या कालावधीचा अंदाज करावा.
पत्ता कोड नलवडा मौजे पारमाची ताा शिवथर
दूसरे पत्र समर्थशिष्य योगीराज श्री कल्याण स्वामी यांनी दिवाकर गोसावी यांना पाठवलेल्या पत्रातील उल्लेख की श्री ..... च्या दरशनास पारमाचीस सिवथर प्रांती नवलवाडीयाचा कोड तेथे जाभलीच्या चउथरीयावर श्री संतोषरूप बैसले होते.
जर शिवथर प्रांतात समर्थांच्या दर्शनाची जागेचा उल्लेख आहे.
हे नलवडा वा नवलवाडी चा कोड म्हणजेच सध्याचे रामदास पठार.आणि शिवथर हा तेव्हाचा तालुका चे ठिकाण होते. हया येथील मंदिराच्या जागेचे आज ही सरकार दरबारी सातबारा वरील नाव मठाचा माळ असा आहे. हया ठिकाणाहून संशोधित शिवथरघळ अवघ्या सहाशे मीटर वर आहे म्हणजेच पायी पंधरा ते वीस मिनीट. ही दोन्ही पत्र विश्वासनीय आहेत व आज ही ती समर्थ वाग्देवताच्या बाड मध्ये पहायला मिळतात.
2) घळीची भौगोलिक स्थान आणि रचनेचा उल्लेख समर्थ शिष्य गिरिधर स्वामी यांच्या समर्थ प्रताप मध्ये आहे तो खालील प्रमाणे
समर्थे पर्वती केले येक गुप्तसदन।
प्रसंगे ठेवावया देवार्चन।
सूर्यप्रकाश उदक सन्निध उर्ध्वगमन।
मार्ग सोपान करूनी जावे॥
समर्थ प्रताप गिरीधरस्वामींनी समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाला पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या रामगंगा धबधबा समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते.
आज ही सरकार दरबारी घळीचे सातबारा वरील नाव मठाचा माळ असा आहे. तर बाजूच्या धबधबाचे नाव भटाचा माळ आहे.
3) आनंदवनभुवनी म्हणजे समर्थांनी केलेल्या शिवथर प्रांतातील वास्तव्यातिल स्वानुभव,हया जागेचा महिमा आणि या जागेतच पुढे काहि घडणार आहे असा उल्लेख केला आहे. तसेच हया वनभुवनाला सर्व प्रथम मान दया अशी आज्ञा केली आहे. त्यातील काही ओवी देत आहे.

गुप्त उदंड भुवने म्हणजे शिवथरघळ

सकळ देवांची साक्ष | गुप्त उदंड भुवने |सौख्य जे पावणे जाणें | आनंदवनभुवनी ||१५||

रामगंगा म्हणजे बाजूच्या धबधब्याचे वर्णन

स्वर्गीची लोटली तेथे |रामगंगा महानदी |तीर्थासी तुळणा नाही | आनंदवनभुवनी ||१३ ||

गुप्तगंगा चा उल्लेख

ग्रंथी जे वर्णिली मागे .| गुप्तगंगा महानदी |जळांत रोकडे प्राणी | आनंदवनभुवनी ||१४

अकरा हया अंकाची प्रचिती

आक्रा आक्रा बहु आक्रा |काये आक्रा कळेचीना |गुप्त ते गुप्त जाणावे |आनंदवनभुवनी ||१७ ||

दासबोध नव्याने लिहिल्याचा उल्लेख

लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||३८ ||

गणपतीला केलेली प्रार्थना त्याबद्दल

जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|विघ्न्घ्ना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||८ ||

देवालये दीपमाळा |रंगमाळा बहुविधा |पूजिला देव देवांचा | आनंदवन भुवनी || ४०||

नवीन दासबोध लिहिल्याचा उल्लेख.

वेद शास्त्र धर्म चर्चा |पुराणे महात्में किती |कवित्वे नूतने जीर्णे | आनंदवनभुवनी ||५० ||

त्या ठिकाणचे महत्व:

वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ ||

मानसी प्रचीत आली | शब्दी विश्वास वाटला |कामना पुरती सर्वै | आनंदवनभुवनी ||५३ ||

येथूनी वाचती सर्वै | ते ते सर्वत्र देखती | सामर्थ्य काय बोलावे | आनंदवनभुवनी ||५४ ||

उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ ||

पुढे हया ठिकाणी खरे काही घडणार आहे त्याची कल्पना समर्थांना ठाऊक होती.आणि काय होईल ते पहावे हया ठिकाणी अस सावध करत आहेत.

बोलणे वाउगे होते |चालणे पाहिजे बरे |पुढे घडेल ते खरे | आनंदवनभुवनी ||५६ ||

स्मरले लिहिले आहे | बोलता चालता हरी |काये होईल पहावे | आनंदवनभुवनी ||५७ ||

महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी | विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ ||

सर्वसद्या कला विद्या | न भूतो न भविष्यती |वैराग्य जाहाले सर्वै |आनंदवन भुवनी ||५९ ||

अशा सिद्ध स्थानास सर्वात प्रथम मान दया अशी समर्थांच्या आज्ञाचे स्मरण राहू दया

'इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम॥'

MAyur said...

महेश तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. फार माहितीपूर्ण . परंतु मी जेव्हा आता प्रचलित असलेल्या शिवथरघळ ला भेट दिली होती त्यावेळेला दुसरी (आता समजली जाणारी मूळ ) अस्तित्वात आहे हे महित नव्हते. परंतु जानेवारी २०१५ ला शैलेश पालकरांच्या शोधपूर्ण लेख वाचण्यात आला आणि मूळ असणाऱ्या घळीची सत्यता पातळी. परंतु मी स्वतः अजून त्या स्थानाला भेट दिली नसल्याने तिच्याविषयी अजून लिहिले नाही. ज्या वेळेला भेटीचा योग्य येईल तेव्हा आवर्जून माझ्या ब्लॉग वॉर उल्लेख करेन

MAHESH said...

धन्यवाद मयूरजी, तुम्ही त्या स्थळास भेट देण्याची इच्छा दर्शवली व सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तुम्हाला जर ऐतहासीक संदर्भ हवे असल्यास खालील लिंक वर पहावे http://realshivtharghal.blogspot.in/ वा kadamahesh@gmail.com वर email करा.

MAyur said...

या उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद.