ब्ल्यू फॅमिली ऑफ केंटकी

ब्ल्यू फॅमिली ऑफ केंटकी
लहानपणापासून मला एक प्रश्‍न सतत छळत असायचा. भगवान श्रीकृष्णाचे शरीर निळे का? माझ्या आईवडिलांना विचारून उपयोग नव्हता. त्यांनी मला तत्काळ आजीकडे रिफर केले असते. त्यामुळे मी आजीलाच प्रश्‍न केला होता, ‘‘कृष्ण निळा का?’’ आजी पडली अतिशय भाविक. त्यामुळे तिने मला असा विचार केल्याबद्दलच तंबी दिली, ‘‘देवाबद्दल असा विचार येणेही पाप आहे. देवाचा महिमा अगाध आहे गं. निळ्या शरीराचे काय घेऊन बसली आहेस? देवामुळे होत्याचे नव्हते होते. देव संपूर्ण शरीरासकट अवतीर्ण होऊ शकतात. तुमच्या डोळ्यांदेखत ते शरीर संपूर्णत: अंतर्धान पावू शकते. निळा रंग म्हणजे देवाची माया गं माया.’’ या उत्तरापुढे कोण काय प्रतिप्रश्‍न करणार!
मेडिकलला गेल्यावर ऍनाटमी शिकताना माझ्या डोक्यात परत हा प्रश्‍न घोळत असायचा. भगवान श्रीकृष्णाच्या समस्त रेखाटनांत, चित्रांत त्याचे शरीर कायम निळे दाखवलेले असते. म्हणजे त्यात काहीतरी सत्य असणार. विचारल्यावर आमचे मेडिकलचे शिक्षक जुजबी उत्तर द्यायचे. ‘‘देव म्हणून जसे काहींना चार हात असतात तसा कृष्णाला निळा रंग दिला असणार किंवा काहीतरी हार्ट कंडिशन, ब्लड डिसॉर्डर असणार. पुराण काळात काही टेस्ट केल्या असतील की नाही हे कसं कळणार?’’ मग माझी मीच विचार करत राहायचे. निळेपणा म्हणजे शरीराच्या त्या भागात रक्तपुरवठा बरोबर नाही किंवा शरीरात अशुद्ध रक्ताचे प्रमाण जास्त,पण कशामुळे? काही जन्मजात हृदयरोगात शरीर निळे होऊ शकते, पण ती मुलं जास्त जगत नाहीत. भगवान कृष्णाला तर ऐहिक आयुष्य भरपूर होते. जर हृदयातून रक्तपुरवठा शरीराला अपुरा होत असता तर अपुर्‍या रक्तपुरवठ्यामुळे नाडी जलद होते, धाप लागते, रोगी जास्त चालू शकत नाही, शारीरिक कष्ट घेऊ शकत नाही, पण कृष्णचरित्रानुसार कृष्ण बालपणात कदंबाच्या झाडावरून उड्या मारायचा, यमुनेत खेळायचा, खेळता खेळता कालियाशी लढायचा. गोवर्धन पर्वत उचलायचा. थोडक्यात, धडधाकट होता. सुरेल मुरली वाजवायचा म्हणजे त्याची फुप्फुसाची क्षमताही व्यवस्थित होती. गोपींबरोबर रासलीला करायचा म्हणजे कुठल्याही शारीरिक श्रमानंतर तो अजिबात दमत नसे. कधी कधी हृदयरोगात मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊन विचारशक्तीवर परिणाम होऊ शकतो, पण तसेही काही नसणार. कारण त्याने प्रौढपणात कुरुक्षेत्रावर युद्धावर जाऊन अर्जुनाचा रथाचा सारथी बनून त्या बिकटसमयी गीतोपदेश केला म्हणजे त्याची विचारशक्ती कायम शाबूत व त्याच्या काबूत होती. मग नेमके कृष्णाला काय झाले होते, की त्याचा रंग निळा होता.
मला जे उत्तर आजवर मिळाले नव्हते ते अचानक आज इंटरनेटवरून मिळाले. माझी याहू मेल उघडल्यावर जे काही समाचार येतात त्यात एक सचित्र बातमी होती- Fugates of Kentucky : skin bluer than Lake Louise. प्रसिद्ध लेक लुईसपेक्षा निळ्या असलेल्या त्वचेच्या फ्युगेटस् नावाच्या केंटकी राज्यात राहणार्‍या या कुटुंबाचे एक चित्रही सोबत होते. तो लेख संपूर्ण वाचल्यावर मला अगदी पटले की, भगवान श्रीकृष्णालाही हाच रक्तदोष असणार.
शुद्ध रक्ताद्वारे आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीरातल्या प्रत्येक भागाला प्राणवायूचा पुरवठा करतात. शुद्ध रक्तपेशीमध्ये प्राणवायू वाहून नेण्यासाठी जो घटक असतो त्याचे नाव हिमोग्लोबिन. प्राणवायूचा पुरवठा झाल्यावर रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिनचे निळ्या रंगाच्या मेथहिमोग्लोबिनमध्ये रूपांतर होत असते. त्यामुळे अशुद्ध रक्त वाहून नेणार्‍या वाहिन्या निळ्या दिसतात. डायोरेझ नावाच्या घटकामुळे निळसर मेथहिमोग्लोबिनचे परत लाल हिमोग्लोबिनमधे रूपांतर होते, पण काही लोकांत डायोरेझ हा घटक जन्मत:च नसतो. त्यामुळे त्यांचे रक्त निळेच राहते या रक्तदोषाला म्हणतात, Methemoglobenemia.
हा शोध कसा लागला याची गोष्ट ही खूप आश्चर्यकारक आहे. १९६० साली युनिव्हर्सिटी ऑफ केंटकीच्या क्लिनिकमध्ये मिसेस फ्युगेट नावाची एक बाई ब्लड टेस्ट करायला आली. रुथ पेंडरग्रास नावाच्या नर्सने तिच्याकडे पाहिल्यावर तिला धक्काच बसला. कारण ती संपूर्ण निळी होती. तिच्या गडद निळ्या रंगामुळे रुथला वाटले, ही थोड्या वेळातच मरणार आहे. त्यामुळे रुथने घाबरून मॅडिसन कॅविन नावाच्या रक्ताच्या स्पेशालिस्टला फोन केला व धावाधाव सुरू केली, पण पेशंट जराही घाबरली नव्हती. उलट तिने रुथला व डॉ. कॅविनला तिचे सगळे कुटुंबच या रंगाचे आहे असे सांगितले. त्यांच्यात नेमका काय दोष आहे हे पाहण्यासाठी डॉ. केविन पेशंटबरोबर तिच्या गावी गेला. ऍपेलेचियन डोंगरात अत्यंत गरीब परिस्थितीत फ्युगेट कुटुंब राहत होते. सगळ्यांचा रंग एकजात निळा होता. डॉ. कॅविनने त्यांच्या अनेक तपासण्या केल्या. कोणाच्या हृदयात वा फुप्फुसात काहीही दोष नव्हता. फक्त त्यांच्या रक्तपेशीत हिमोग्लोबिनऐवजी मेथहिमोग्लोबिन होते. अंगाच्या वेगळ्या रंगामुळे त्यांना कुठे नोकरीधंदा मिळणे शक्य नव्हते. गावातले लोक त्यांची कुचेष्टा करत. त्यांना आपल्यात मिसळू देत नसत. त्यामुळे त्या कुटुंबाने आपापल्यातच लग्ने केली होती. साहजिकच हा रक्तदोष एका पिढीतून दुसर्‍या पिढीत जात राहिला व वाढत राहिला.
डॉ. कॅविनने तिथून परत आल्यावर Blue people of Kentucky खहूल्म्व्ब् नावाचे एक पुस्तक लिहिले. ते वाचून या कुटुंबावर एका हॉलीवूडच्या निर्मात्याला सिनेमाही काढायचा होता. पण फूगेट कुटुंबाने कॅमेर्‍यासमोर जायला नकार दिला. आपल्या रंगाची त्यांना खूप लाज वाटत होती. हे कुटुंब सहाशे वर्षांपूर्वी फ्रान्सहून अमेरिकेत येऊन केन्टकीच्या डोंगरातल्या ट्रबलसम क्रीक या खोर्‍यात स्थायिक झाले होते. त्या कुटुंबाची मूळ स्त्री निळी होती, पण मूळ पुरुषामध्येही अंशत: हा दोष होता. (Recessive genes) जर डॉ. कॅविन ब्लड स्पेशालिस्ट नसता तर हा रक्तदोष जगाला कळलाही नसता आणि जर माझ्या वाचनात आला नसता तर माझी इतक्या वर्षांची भगवान श्रीकृष्णाच्या नीलकांतीची जिज्ञासा तशीच अधुरी राहिली असती. आजच्या हिंदुस्थान प्रेमाच्या काळात पुराण काळातले हे गूढ उलगडायला वा झ्प करायला हा अत्युत्तम विषय आहे. कोणी आहे का तयार? भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद त्याच्या कायम पाठीशी असतील.
ओम श्रीकृष्णाय नम: ॥


-------courtesy by Saamana

No comments: