टोसिलिझूमॅब

 

टोसिलिझूमॅब





कोरोना आता गेल्यातच जमा आहे. आपलं आयुष्य हे पुर्ववत चालु झालंय. पण दुसरी आलेली लाट हि भयानक होती. परिस्थितीचा बोजवारा उडवणारी; तर पहिली लाट त्याहून भयानक कारण आपल्याला कोविड विषाणुची कोरोना आजारासंबंधीची असलेली त्रोटक माहिती आणि मुख्य म्हणजे त्याची भीती.

सर्वत्र फक्त कोरोनाच्या दहशतीचं वातावरण. आपल्याच माणसाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन. साध्या लक्षणांनी सुद्धा मनात संशय जागा घ्यायचा. आपल्याच सगे-सोयऱ्यांबद्दल सुद्धा कमालीची अनास्था पसरलेली. याला संसर्ग तर झाला नसेल? त्याच्यामुळे आपल्याला संसर्ग झालाच तर करायचं काय? औषधोपचार काय? प्रत्यक्ष्य  डॉक्टरांचे सुद्धा पेशंटवर प्रयोगच चालू असायचे आणि त्यातुन मग एकेक निष्कर्ष निघत असत. तेही सर्वांच्या बाबतीत लागू होतीलच असे नाही. परंतु वैद्यकीय क्षेत्राने हार मानली नाहीस्वतःच्या जीवाची बाजी लावत अनेक डॉकटर, नर्सेस आणि इतर वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी त्यांनी कमालीचे प्रयत्न केले. ज्यांच्या इच्छाशक्तीने त्यांच्या प्रयत्नांना साथ दिली ते त्यातुन वाचले. या सर्वांना खरंच एक मनापासून सलाम.

ज्यांच्या-ज्यांच्यावर वेळ आली होती ती फार भयानक होती. वाहत्या गंगेत हात धुवायचे तसला प्रकारही झाला. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. पण जागोजागी  माणुसकीचं दर्शन देखील झालं. अनेकांनी निस्वार्थी भावनेने मदत देखील केली. या आलेल्या  पहिल्या लाटेत काही सावरले तर काहींचं आयुष्य पार रसातळाला गेलं. पहिल्या लाटेने माझ्या कुटुंबाला सुद्धा यात ओढलं आणि देऊन गेली ती एक न विसरता येणाऱ्या संघर्षमय प्रवासाची आठवण.

मी त्यावेळेला पुण्याला नोकरी करत होतो, पुण्याला जाऊन नुकतंच एक वर्ष झालं होतं. भाड्याने एक फ्लॅट घेऊन मित्रांसोबत रूम शेअर करत होतो. अजून बऱ्यापैकी स्थिरस्थावरही झालो नव्हतो. कोरोनाच्या बातम्या कानावर पडत होत्या. महाराष्ट्र्र सरकारने सर्वात पहिलं कलम १४४ लागू केलं आणि बाहेर पडण्यावर निर्बंध आले. जवळपास सर्व कॉर्पोरेट ऑफिसेसनी त्यांच्या नोकरदार वर्गाला 'वर्क फ्रॉम होम ' देण्यास सुरुवात केली. परंतु मी मात्र अजूनही ऑफिसला जातच होतो. आम्ही वर्क फ्रॉम होम साठी भांडत होतो. परंतु आम्हाला अद्याप दिलं नव्हतं. कोरोना वेगाने पसरत होत. एकेक बातम्या कानावर येत होत्या. माझ्या रूम मेट्सला देखील वर्क फ्रॉम होम मिळालं आणि तो पटकन कधी कल्टी मारून घरी पळाला मला कळलं देखील नाही. आपणही थेट गावाला निघून जावं असं वाटत होत. पण ऑफिसचं काम सोडून असं जाऊ शकत नव्हतो. उद्या कामावरून काढून टाकलं तर यांना निमित्तच मिळेल. प्रायव्हेटवाल्यांचा काय भरोसा ? आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. हा विचार करून मी ऑफिसला जातच होतो.

रविवार २२ मार्च २०२० ला  भारत सरकारने जनता कर्फ्यू लावला आणि मग माझ्या कंपनीची वर्क फ्रॉम होम देण्यासाठी धावाधाव झाली. थोडा उशीरच झाला. लॅपटॉप मिळाल्यानंतर एक दिवस माझ्या हातात होता. परंतु नेमकी त्या दिवशी एसटी मिळाली नाही आणि  दुसऱ्या दिवशी पाहू असं म्हणत असतानाच २४ च्या रात्री पंतप्रधान मोदीजींनी घोषणा केली आणि २५ मार्च पासून पहिला लॉकडाऊन लागला. मी पुण्यातच अडकलो. कोरोना वाढत चालला आणि त्याबरोबर टाळेबंदी देखील. मी एकटाच पुण्याला राहत होतो. त्रास तसा काही नव्हता परंतु घरच्यांना एकच काळजी लागून राहिली होती आणि मला घरच्यांची. कारण आई-बाबा गावाला जरी राहत असले तरी गावाला कोणी  नियम पाळत नाही हे मला माहित होते. टाळेबंदीत सुद्धा आमच्या घरी गावातील लोक येत-जातच होते. बाबांना  कितीही निक्षुन सांगितलं तरी ते ऐकायला  नव्हते.

" हो ! त्यामुळे काय माणुसकी तोडायची का? येणाऱ्या माणसांना नाही कसं बोलणार ? माणसं तोडायची का ! माहिती आहे मोठा शहरातला आहेस तो ?"

" अहो ! माणुसकी थोडीच तोडायची आहे. सध्याचा काळ फक्त सांभाळायचा आहे . आणि जर उद्या तुम्हाला काही झालं तरी यातलं कोणीही पुढे  येणार नाही. का! संसर्ग कसा कुठून होईल ते काय सांगता येतं का?"

"होऊ दे !काय होईल ते. असं! कसं! कोणाला सांगणार घरी येऊ नका म्हणून; आम्ही आहोत ठिक. तु तुझी काळजी घे. "

"मी ठीक आहे. मी तर एक महिन्यात फ्लॅटचा उंबरठा पण ओलांडला नाही. "

मला समजलं होत. सांगून काही फायदा नाही. तसंही गावचं वातावरण फार वेगळं असतं. देवाजवळ एकच प्रार्थना केली. सर्वांना नीट राहू दे.

 

2.

 

एकेक दिवस फक्त खिडकीत पाहून आणि फोनवर  बोलून जात होता. या दरम्यान मी माझा एक शाळेतला मित्र आशु त्याच्याबरोबर अधून -मधून फोनवर बोलत असे. तो हि फोटोग्राफीच्या निमित्ताने नाशिकला गेला होता आणि तिकडेच अडकला होता. आम्ही दोघेही समदु:खी. त्यामुळे बहुतेक वेळेला घरी कधी जायला मिळेल हाच मुख्य विषय आमच्या बोलण्याचा असायचा. नाईलाज म्हणून त्याच्या मैत्रिणीकडे तो राहत होता. गैरसोय अजिबात नव्हती. तिच्या घरचे तिच्या मिस्टरांसकट  अगदी उत्तम काळजी घेत होते. परंतु एवढे दिवस  नाईलाज म्हणून का होईना दुसऱ्याच्या घरी राहणे त्याला जरा खटकत होते. आता काय करणार ! वेळच तशी आली होती. त्यात तो विवाहित असल्याने त्याला जरा जास्तच ओढ लागली होती. स्वाभाविक आहे.

बघता बघता तीन महिने झाले आणि टाळेबंदीत थोडे निर्बध शिथिल झाले. अत्यावश्यक सेवे सोबत इतर गोष्टींना आणि अडकलेल्या व्यक्तींना घरी जाण्यासाठी पास काढून जाण्याची सरकारकडून  परवानगी मिळाली. त्यातही सावळा गोंधळच होता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मी पास काढला पण शेवटपर्यंत त्याचे काही उत्तरच मिळाले नाही. शेवटी  एका ओळखीच्या ड्रायव्हर काकांकडून त्यांना पास काढण्यासाठी आणि  गाडी भाड्यासाठी पैसे दिले. त्यांच्या ओळखीतल्या एकाने लगेच पास काढून दिला. काय बोलणार ! गरजवंताला अक्कल नसते तसंच काहीसं माझं झालं होतं. पास मिळाला आणि ड्रायव्हर मला गावी सोडण्यासाठी तयार झाला. कधी एकदा घर गाठतोय असं झालं होतं. गरजेपुरता सामान घेऊन बाकी सर्व सामान तसंच ठेवून मी घरी निघालो. काही दिवसांनी सर्व सुरळीत होईल मग तेव्हा काय ते बाकीच्या सामानाचा निर्णय घेऊ असं ठरवलं. रूम मालकाला या सर्व गोष्टींची कल्पना देऊन मी निघालो.

"आज मी घरी चाललोय. " असा मी आशूला मेसेज केला.

"ग्रेट. मीही आज निघालोय. " मी थंब्स चा इमोजी दिला. निर्बंध शिथिल केल्यावर त्यानेही पटकन घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. चला ! आपल्या बरोबर आपला मित्रही तिथून आपल्या घरी जायला निघालं हे ऐकून बरे वाटले.

जुनचा महिना. सकाळपासूनच पावसाची शक्यता वाटत होती. माझी गाडी ताम्हिणी घाटातून मुळशी मार्गे खाली कोकणात जात होती. पावसाळ्याचे दिवस. वातावरण तसं आल्हाददायक वाटायला हवं होतं . परंतु कोरोनाने सध्या मानसिकताच अशी झाली होती कि त्या वातावरणाचा फारसा प्रभाव जाणवला नाही.

संपुर्ण रस्ता मोकळा होता. वाटेतल्या पोलीस चौक्याही रिकाम्याच होत्या. तुरळक एखादी अत्यावश्यक सेवेची गाडी वगळता रस्त्यावर  फारशी वाहने नव्हती.

घरी फोन करून आधी विचारलं होतं. स्वतः'च्याच गावात जायला परवानगी घ्यावी लागत होती. पुण्या -मुंबईहून येणाऱ्या लोकांना स्वतःच्याच गावातला असला तरी गाववाले अजिबात घेत नव्हते. परिस्थिती भयाणच होती.

साधारण साडे तीन तासातच मी कोलाडला पोहोचलो. तिथे रितसर आरोग्य केंद्रात जाऊन सर्व माहिती रजिस्टर केली. त्याने हातावर "होम क्वारंटाईन" चा शिक्का मारला. एव्हाना काळोख पडला होता. मी थेट घर गाठले आणि ड्रायव्हर लगेचच सुसाट गाडी मारत परतीच्या मार्गाला निघून गेला.

मी बेल मारली. तोंडावर मास्क होता. दरवाजा उघडल्यावर मी हातानेच खुणावून आईला लांब राहायला सांगितलं आणि वरच्या खोलीत सर्व सामान नेऊन ठेवलं. आता तिथेच सक्त १५ दिवस विलगीकरणात रहायचं ठरवलं. नव्हे तर पूर्ण एक महिनाच काढूया. बाहेरून आलोय. आसिम्प्टम्याटिक कॅरियर असलो तर! उगाच आपल्यामुळे घरच्यांना रिस्क नको.

फ्रेश झाल्यावर माझं जेवणाचं ताट मी जिन्याच्या खाली ठेवून द्यायला सांगितलं. बाबा ठेवून गेले कि मग मी खाली उतरून ते घ्यायचो. अश्या सर्व गोष्टी मी तंतोतंत पाळत होतो.

घरी येऊन पाच दिवस झाले नाहीत तोच एक धक्का बसला. माझ्या शाळेतल्या व्हाट्सऍप ग्रुप वर बातमी येऊन धडकली कि, आशुने आत्महत्या केली. मेसेज धडाधड येऊ लागले. "शीट ! मी घरी आल्यावर माझ्या कामाच्या नादात त्याच्याशी बोललोच नव्हतो. " मला खरंच वाटेना.  शेवटी त्याच्या जवळच्या मित्रांकडुनच बातमी खरी असल्याचं कळलं. मी मट्कन खाली बसलो. डोळे पाणावले. त्याच्याशी  खुपदा बोललो होतो परंतु त्यातून कधीही त्याने त्याला डिप्रेशन आहे असं जाणवूनच दिलं नाही. एवढा हॅण्डसम, टँलेन्टेड मुलगा असं का केलं त्याने ? हा प्रश्न माझ्यासामोर निरुत्तरितच राहिला. नंतरही वर्तमानपत्रातून बऱ्याच चांगल्या-चांगल्या मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचायला मिळत होत्या. कोरोना प्रमाणे त्यावेळेला तीही एक लाटचं येऊन गेली होती आणि त्यात माझ्या मित्राला कायमचा घेऊन गेली होती.

 

 

 

 

3.

 

१० दिवस व्यवस्थित गेले. माझं ऑफिसचं कामही सुदैवाने व्यवस्थित चालू होतं. त्यात माझे सोमवारचे उपवास मी नुकतेच चालू केले होते आणि अचानक एका सोमवारी माझी तब्येत बिघडली. मध्यरात्री उलट्या सुरु झाल्या. दिवसभर उपवास असल्याने असेल कदाचित परंतु माझ्यासकट आई-बाबा  दोघेही घाबरलेसध्याचं वातावरणच तसं असल्याने त्यांना भीती वाटणं स्वाभाविक होतं. रात्री वाजता लिंबू पाणी घेतल्यानंतर बरं  वाटलं. आई मला आता वरती एकट्याने  झोपून द्यायला तयारच नव्हती. परंतु दुसऱ्या दिवशी मला बरं वाटतंय हे पाहून तिला हायसं वाटलं. १५ दिवस झाले होते. मी घराचा उंबरठा देखील ओलांडला नव्हता. एक दिवशी काम करत असताना कोणीतरी वावटळ उठवली. ‘बाहेरून येऊन लपुन बसलेल्या लोकांना तपासायला येणार आणि  त्यांना गावातून बाहेर काढणार.’ माझे बाबा घाबरले.

"अहो ! घाबरता कशाला. मी काय लपुन -छपुन थोडाच आलोय. रीतसर सर्व परवानगी घेऊन, "होम क्वारंटाईन" चा शिक्का घेऊन आलोय. येऊ दे कोण येतंय ते." मला लोकांच्या मानसिकतेची खरंच कीव आली. कोणी आलं नाही. उगाच पोकळ धमक्या.

विलगीकरणाचे सर्व नियम १५ दिवस नव्हे तर पूर्ण एक महिना मी तंतोतंत पाळले होते. उद्या कोणी आपल्याकडे बोट दाखवू नये या उद्देशाने. सर्वजण घरी सुखरूप होते हे पाहून बरं  वाटलं. आमच्या घरी अजूनही कोणी ना कोणी येत जात होतेच. बाबा काही कोणाला बोलत नसतं. मी मात्र  एक दोघांना नम्रपूर्वक सांगून परत पाठवले होते. यावरून बाबांच्यात आणि माझ्यात खटकेही उडाले होते. 'तुला माणुसकी नाही म्हणून ' पण माझ्या मनात वेगळीच भीती होती हे असंच चालू राहिलं तर पहिला फटका माझ्या वडिलांनाच बसेल.

मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला.

"प्रत्येकाची प्रतिकार शक्ती  वेगळी असते. एखाद्याला होऊन गेलाही असेल. तो काय इतरांना सांगणार आहे. इथे कोणी कोणाला सांगत नाही. तो कदाचित त्याच्या प्रतिकार शक्तीवर निभावूनपण नेईल. परंतु जर त्याच्यामुळे तुम्हाला झालं तर काय? आणि कायमचं थोडीच असं रहायचंय. थोडे दिवस फक्त सांभाळून राहायचं. "

"होऊ दे ! काय व्हायचं ते. काय माणुसकी सोडायची का ?" त्यांचं पालुपद कायम होतं.

गावाला कोण आजारी पडलं तरी कोण कोणाला सांगत नव्हतं. का! तर वेगळं टाकतील, वेगळ्या नजरेने पाहतील म्हणून. हि काय लपवण्यासारखी गोष्ट आहे. उलट उघडपणे सर्वांना सांगितलं पाहिजे. तर त्यातून दुसऱ्याला संसर्ग होण्यापासून वाचवता येईल. पण इथे कोणाला सांगून फायदा नव्हता. यांची मानसिकताच वेगळी होती. सरकारने सतत जनजागृती करून देखील लोकं काही नियम पाळायला तयार दिसत नव्हती. आणि हेच न्यूज चॅनेल मधून आजूबाजूच्या महाराष्ट्रातील इतर गावांमधून देखील ऐकायला मिळत होतंकोण्या एका गावातील जावयाला लोकांनी संसर्ग होईल म्हणून गावाच्या बाहेर त्याला हात-पाय बांधून ठेवला होता. हे एका न्युज चॅनेलने दाखवलं होतंखरंच ! काय म्हणावं या मानसिकतेला. यात आपण काळजी घेऊन वागणं हेच खरं होतं. पण कितीही काळजी घेतली तरी कोविडचा संसर्ग हा वेगाने पसरतच होता.

मध्यंतरी गावात एकाचे अचानक मैत झाले होते. गावात कुजबुज चालू होती.

"दारू पिऊन मेला असेल. लय दारू प्यायचा. "

"करोनाने तर मेला नसेल ना !" त्यावर दुसरा बोलला.

"आर ! आपल्या गावात कुठला आलाय करोना. काय पन बोलतो. उगाच घाबरवू नको ." तिसरा बोलला.

"अरे ! असेल पण !. सांगू शकत नाय . नाक्यावर त्या भाजीवाल्याला झालाय असं ऐकलंय. पुण्याला नेलंय त्याला. आणि हा तिथंच जायचा भाजी आणायला. "

"काय सांगतो !" 

"हा मग ! हा जर दवाखान्यात गेला असता तर माहित झालं असतं ना याला झालाय ते आणि लोकांना एकदा माहित झाल्यावर याच्या मैताला तरी कोण गेलं असतं का! घरच्यांना माहित असंल पण आपल्याला सांगितलं नसंल. " आणखीन एक जण बोलला.

अश्या बऱ्याच चर्चा चालू होत्या. तरीही कोणी काळजी घ्यायला काही तयार नव्हतं. रोजच्यासारखंच बघत होते.  मला मात्र एक अनामिक भीती वाटत होती आणि शेवटी जे होऊ नये असं वाटत होतं तेच झालं.

 

4.

ऑगस्ट महिना. मला पुण्यावरून घरी येऊन एव्हाना दोन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले होते. एक दिवस बाबांचं सर्व अंग दुखायला लागलं. पूर्वीच्या अपघातामुळे अधुन -मधून त्यानं त्रास व्हायचा. आताही तसंच वाटलं. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी एका ऑर्थोपेडिक कडे नेलं. एकच डॉक्टर उपलब्ध होता. तो देखील लांबूनच पेशंट पाहत होता. एक्सरे वगैरे काढून गोळ्या-औषधे लिहून दहा हजाराचं बिल केलं. पण त्यांनी एकदाही सांगितलं नाही कि  कोरोनाची टेस्ट करा त्यामुळे आम्ही निर्धास्त झालो. दिवस बरे गेले परंतु सहाव्या दिवशी वडिलांनी संध्याकाळपासून वांती सुरु झाली. घरगुती उपाय करून पाहिलं पण काही फरक नाही पडला. तापही अंगात होता. ते अंगावर ढकलायचा प्रयत्न करत होते. लक्षणं पाहता मला हे ठीक दिसत नव्हतं. खात्रीशीर उपाय होण्यासाठी माणगावला जाऊन कोविडची टेस्ट करून घेतली. सोबत माझी देखील केली. रिपोर्ट समजायला अवधी होता. मी बाबाना घेऊन तोपर्यंत घरीआलो. रात्रीचे आठ वाजले होते आणि मला रुग्णालयातून फोन आला आणि सांगितलं कि बाबा पॉसिटीव्ह आहेत. त्यांना कोविड सेंटर मध्ये दाखल करावं लागेल. माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ते जर बाबांना  समजलं तर ते सारखा विचार करत बसतील कि आता गावातील लोक त्यांना काय बोलतील. कारण गावातील पहिलीच केस. अजून कोणी ऐकण्यात नाही. मग आपल्या घरातील लोकांना गाववाले त्रास देतील. अश्या गोष्टी अगोदरच त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. आईला मी हळूच सांगितलं. तीही घाबरली आणि मला दादाला फोन लावून त्याला सांगायला सांगितलं. मी बाबाना समजून देता दादाला फोन लावून सांगितलं. त्यालाही धक्का बसला. पहिल्या लाटेतला कोरोना कोणाला समजण्यासारखा होता. आत्ता सारखा सराईत झाला नव्हता. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह. डोंबिवली मध्ये कडक निर्बंध होते. त्यामुळे तो इकडे येऊ शकत नव्हता. मी बघतो काय ते. तू फक्त गरज लागली तर लगेच ये असं त्याला सांगितलं. मी गावाला एकटाच होतो. काय तो निर्णय मलाच घायचा होता. इकडे बाबांना सतत उलट्या होत होत्या. रुग्णालयातील देसाई यांचा नंबर घेऊन ठेवला होता. कोविड संबंधित सर्व तेच पाहत होते. तेव्हा कुठल्याही पॉजिटीव्ह रुग्णाला घरी ठेवायची परवानगी नव्हतीआज रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने उद्या पाठवतो असं त्यांनी मला फोनवर सांगितलं. पण मला मात्र वेगळीच भीती होती. दुसऱ्या दिवशी जर रुग्णवाहिका गावात आली तर पूर्ण गावात बातमी पसरेल. नको -नको ते लोक बोलतील त्याचा किती त्रास होईलच. परंतु रात्रीत तब्येत आणखीन बिघडली तर काय करणार ? मी त्यांना फोन करून विनंती केली, बाबांना खूप त्रास होतोय  काहीही करा पण आजच रुग्णवाहिका पाठवात्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन होकार दिला पण त्यांचाही नाईलाज होता. एकच रुग्णवाहिका आसपासच्या गावातून पेशंटला आणण्यासाठी होती. " कितीही उशीर झाला रात्री तरी पाठवा " असं मी त्यांना सांगितल्यावर शेवटी रात्री दोन वाजता रुग्णवाहिका गावात आली. निरव शांतता होती. गाव सर्व झोपलं होतं. रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर पूर्ण सफेद पीपीई किट घालून रस्त्यावरच मटकन बसला होता. दिवसभरच्या सतत पेशंटना आणण्याच्या दगदगीत तो दमला होता. नुकताच जेवून पुन्हा आमच्यासाठी घराबाहेर पडला होता. मी सर्वप्रथम  त्याचे आणि देसाई यांचे आभार मानले. घराजवळ त्याने जास्त आवाज करता रुग्णवाहिका लावली. अंधारात रुग्णवाहिकेचा लाल-निळा प्रकाश ते वातावरण अधिकच भीतीदायक करत होता.

"मी सोबत येऊ का?"

" पेशंट शिवाय न्यायची परवानगी कोणाला नाही. तुम्ही त्यांच्याजवळ  मोबाईल द्या. होईल सगळं नीट. काळजी नका करु. "

आईचे डोळे पाणावले होते. आत्तापर्यंत बाबा समजून गेले होते कि ते कोविड संदिग्ध आहेत. त्यांना धीर देऊन गाडीत बसवलंसफेद पीपीई किट घातलेला तो एखाद्या यमदूता सारखा भासत होता. बघता बघता गाडी बाबांना घेऊन गेली. फारसा गाजावाजा होता एक गोष्ट पार पडली होती. एवढ्या रात्री सुद्धा बाजूच्या घरातून  एक म्हातारी दाराच्या फटीतून टोकावून बघत होतीमी दरवाजा बंद केला आणि परमेश्वराला हात जोडून आम्ही झोपी जायचा असफल प्रयत्न केला.

 

5.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांना फोन केला. त्यांचा आवाज आता बदलला होता. एकदम हळू आवाजात बोलत होते. घसा धरलाय. गोळ्या दिल्यात. आता ठीक आहे असं सांगितलं आणि आम्ही निर्धास्त झालो. पण दिसतं तसं नसतं. हेच खरं !. लगेच संध्याकाळी त्यांचा फोन आला कि "मला माणगाव हॉस्पिटल मधून काढून लोणेरे कोविड सेंटरला नेत आहेत. "

मला काळजी वाटली मी लगेच देसाई यांना फोन केला.

"साहेब माझं काम रुग्णाला ऍडमिट करेपर्यंतचं आहे. तुम्ही पुढे इथल्या डॉक्टरला विचारा. ते सांगतील."

"बरोबर आहे पण आम्ही इकडे घरी आहोत. आम्ही तुमच्याशिवाय कोणाशी संपर्क साधणार."

"काळजी करू नका. जे पेशंट पंधरा दिवसात ठीक होणारे असतात. त्यांनाच आम्ही तिकडे बाटुला पाठवतो. "

"माझे बाबा वयस्कर आहेतत्यामुळे त्यांना इकडे हॉस्पिटलचं मधेच ठेवलं असतं तर बरं झालं असतं. "

"दुसऱ्या पेशंटला जागा पाहिजे ना. ते व्यवस्थित असतील. तिकडे चांगली सोय आहे. नका काळजी करू. " असं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला.

पण माझं काही समाधान झालं नाही. शेवटी माझ्या हातात त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. सार्वजनिक वाहतूक बंद होती आणि एवढ्या लांब जाण्यासाठी  माझ्याकडे कुठलं वाहन नव्हतं. त्यामुळे माझा नाईलाज झाला. नंतर दादाला फोन करून बाबांना कोविड सेंटरला नेण्यात आल्याचं सांगितलं.

सरकारी आरोग्यव्यवस्थेवर विश्वास ठेवून मी होतो. बाबांना फोन करून विचारलं. "जेवणाची सोय आहे इकडे. कॉलेजलाच सेंटर बनवलंय. ठीक आहे. परंतु त्यांचा आवाज अजून खालावत चाललेला. दम लागल्याचं दिसत होतं. "

माझ्या मामे भावाने आणि मावस भावाने तिथपर्यंत जाऊन त्यांना गरम पाणी पिण्याची सोय उपलब्ध करून दिली. आतमध्ये प्रवेश नसल्याने त्याने लांबूनच बाबांना पाहिलं त्यामुळे ते ठिकच वाटले होते. त्याच्या बोलण्यानुसार मी निर्धास्त झालो होतो.

संध्याकाळी दिवा लावत असताना बाबांचा फोन आला आणि एकदम निर्वाणीचं बोलले.

"देव पाण्यात ठेव. काय खरं दिसत नाही. काय सुचत नाही मला. " एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला.

माझे चक्र फिरले. आई देखील खूप घाबरली. एव्हाना रात्र झाल्याने मी लगेच दादाला सकाळी लवकरात लवकर गाडी घेऊन बोलावलं. तो तयार झाला. मी सतत बाबांना फोन करत होतो परंतु आता फक्त रिंग येत होती आणि थोड्या वेळाने तीही येईनाशी झाली. बहुतेक फोन बंद पडला होता. आमची काळजी आणखीनच वाढली.

सकाळी दादा घरी आला आणि लगेच मी त्याच्या सोबत बाटूला जाण्यासाठी निघालो. तिथे पोचेपर्यंत दहा वाजले होते. सर्वत्र निरामय शांतता. संपूर्ण कॉलेजचं कोविड सेंटर केलं होतं. कोणी विचारायला देखील आजूबाजूला नव्हतं. तपास करत -करत एका बिल्डिंग जवळ येऊन पोहोचलो. एक पोलीस होता. त्याला माझ्या बाबांचं नाव सांगितलं आणि त्यांच्याशी काही संपर्क होत नाहीये. आम्हाला त्यांना भेटायचं आहे. असं सांगितलं.

माझी ड्युटी नवीनच लागलीय. दोन दिवस झालेत. पण काल  पर्वा दोन नवीन पेशंट आलेत. डॉक्टरांना माहित असेल असं बोलून त्याने जोरजोरात  माझ्या बाबांच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली. ते ऐकून बरेचसे पेशंट रूमच्या बाहेर आले. पण माझे बाबा काही दिसले नाहीत. आम्हाला तो पोलीस काही आत जाऊ देत नव्हता. मी हवालदिल झालो होतो. बरीच शहानिशा केल्यावर एक म्हातारा बोलला. आहे - आहे. इथे एक पेशंट आहे. मग त्याने जाऊन माझ्या बाबांना आणलं.

त्यांची अवस्था पाहून माझी पायाखालची जमीनच सरकली.

एका बनियान पॅन्टवर ते कसेबसे चालत आले. त्यांना कसलीच शुद्ध नव्हती. प्रचंड दम लागत होता. रात्री पासून जेवणही केलं नव्हतं. त्यांची दोन मुले आम्ही सामोरे उभे होतो पण कसेबसे डोळे उघडत बघायची त्यांची ताकद पण नव्हती. कसेबसे ते बोलले कि रात्री पासून त्यांना जेवण पण मिळालं नाही. इतरांकडून नंतर कळलं कि डॉकटर फक्त इथे टेबलावर - गोळ्या ठेवून जातात आणि जेवण हि  टेबलावरच ठेवून जातात. पेशंट ने स्वतः घ्यायचं.

"शी ! कसली हि व्यवस्थाअशाने एखादा मरेल. एखादा कशाला या व्यवस्थेने माझ्या बाबांवर देखील तीच पाळी आली होती. "

"इथे डॉकटर कोण आहे ?"  मी विचारलंआतून एक नवशिक्या डॉक्टर आला.

" हा पेशंट इथे आला आहे हे देखील तुम्हाला माहित नाही. त्याचं हेल्थ स्टेटस पाहून त्याला योग्य ते उपचार देणं तुमचं कर्तव्य नाही का ?"

"नाही ते ठीकच आहेत. " तो बोलला.

माझ्या बाबांची हि अवस्था पाहून पण त्याला असं कसं म्हणावंसं वाटलं. आता मात्र माझा संताप झाला होता. आम्ही दोघांनाही त्याला फैलावर घेतला. मी सांगितलं तेव्हा त्याने मिटर लावून चेक केल्यावर कळलं कि, ऑक्सिजन लेवल कमी झालीय.

त्याला आपला निष्काळजीपणा  कळला होता. माणगाव मधल्या आमच्या एका मित्राने सुद्धा त्याला फोन लावून त्याची खरडपट्टी काढली. त्याला आपली नोकरी जाते का काय अशी भीती वाटून तो बोलला.

मला आता माझ्या बाबांच्या पुढे कोणाचीच पर्वा नव्हती. ताबडतोब त्याला ऍम्ब्युलन्स बोलावून माणगावला हॉस्पिटलला न्यायला सांगितलं. आम्ही सांगितलं तेव्हा त्याने ऍम्ब्युलन्स बोलावून पुन्हा माणगाव हॉस्पिटलला नेलं आणि तिथे ऍडमिट केलं. त्यांना ऑक्सिजन लावला. तेव्हा त्यांना कुठे थोडं बरं वाटलं आणि माझ्या जिवंत थोडा जीव आला. परंतु परिस्थिती काही एवढ्याने सुधारणार नव्हती. तिथल्या डॉक्टरांना आम्ही भेटलो. डॉक्टर शेट म्हणून तिथे मुख्य होते. त्यांना बाबांच्या परिस्थिती बद्दल सांगितलं आणि वयस्कर असून त्यांना इथून का हलवलं त्याचा त्यांना जाब विचारला तर त्यांनी आम्हालाच उलट उत्तर दिलं.

" हे बघा. आम्ही एवढेच उपचार देऊ शकतो. एका पेशंटसाठी आम्ही एवढा वेळ देऊ शकत नाही. आणि तसंही तुमच्या बाबांचं वय झालंय. तुम्ही समजा इथून प्रायव्हेटला नेलंत तर तुमची तेवढी ऐपत आहे का खर्च करण्याची. त्यातून काय साध्य होणार आहे. माझे आजोबा ८० पेक्षा जास्त वयाचे आहेत. आता आम्ही ठरवलंय त्यांना काही खर्च करायचा नाही. "

हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली.

"हे काय बोलताय. तुम्हाला नसेल तुमचा माणूस प्रिय. पण मला माझे बाबा हवे आहेत. हे काय बोलणं झालं. इथे ९० वर्षांची माणसं कोरोनातून बरी झालीत. माझे बाबा तर ७० चेच आहेत. तुम्हाला नसेल उपचार करणं जमत तर तसं सांगा. आम्ही नेऊ त्यांना प्रायव्हेटला. "

"योर विश. कधी नेणार ते सांगा मी कागद तयार करून ठेवतो. आम्ही मात्र हा ऑक्सिजन लावण्याशिवाय आणखी काही करू शकत नाही. " असं बोलून डॉक्टर निघून गेले.

लोक सरकारी गोष्टींना का नाव ठेवतात त्याचं हे जिवंत उदाहरण मला मिळालं होतं. मी लगेच माझ्या शाळेतल्या डॉक्टर मित्र अभिजितला फोन करून सर्व परिस्थिती सांगितली. तो त्यावेळेला नेरुळ हॉस्पिटलला प्रॅक्टिस करत होता. त्याने मला लगेच सांगितलं.

"तु उगाच एवढा वेळ वाया घालवलास. अगोदरच प्रायव्हेटला हलवायला पाहिजे होतास. ऑक्सिजन लेव्हल ७० च्या खाली आहे. घाई कर. कार्डियाक ऍम्ब्युलन्स बोलावं आणि पहिलं प्रायव्हेटला जिथे भेटेल तिथे हलव. मला माहित आहे आता बेड मिळायला सुद्धा मुश्किल आहे. पण प्रयत्न कर. "

स्पीकरवर ठेवलेला फोन दादाने आणि मी ऐकला. अजूनही त्याने इतर गोष्टी सांगुन माझ्या शंकांचं निरसन केलं.

इथे अगोदरच उपचाराला उशीर झालाय आता थांबण्यात काही अर्थ नव्हता.

 "काय करायचं ?" दादाने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

"काय करायचं म्हणजे. खाजगी रुग्णालयात नेऊया. "

"किती खर्च येईल माहित आहे तुला. सध्याची परिस्थिती पाहता. "

"कितीही येऊ दे. आहेत माझ्याकडे - बाकी मागून घेईन कोणाकडून तरी. पण प्रयत्न तर करायला पाहिजे ना. "

मग आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलची कोविडसाठी असलेली एकेक रुग्णालयात फोन करून चौकशी केली. बेड फुल होते. डोंबिवली मधील काही हॉस्पिटलची नावं  होती. मग शेवटी आम्ही मागच्या वर्षी माझ्या आईचं जिथे ऑपरेशन केलं होतं. त्या डॉक्टरांना फोन करून परिस्थिती सांगितली आणि त्यांच्या ओळखीने कुठे बेड उपलब्ध आहे का ते विचारलं. मग त्यांनी आम्हाला साई हॉस्पिटल मधील एकाचा नंबर दिला. आम्ही चौकशी केल्यावरबेड आहे पण अगोदर आल्या -आल्या एक लाख रुपये जमा करावे लागतील. कबूल असेल तर बेड रिजर्व्ह ठेवतो. नाहीतर नंतर पेशंटचे नातेवाईक  प्रॉब्लेम करतात म्हणून आधीच सांगतोय.’ आम्ही कबूल झालो. चला ! बेड तर मिळाला होता. पण आता कार्डियाक रुग्णवाहिका कुठे मिळणार. दुपारचे वाजले होते. मी भाऊला सांगून कुठे रुग्णवाहिका मिळते ते पाहिलं. सर्व नंबर्स वर कॉल करून चौकशी केल्यावर कळलं कि रायगड मध्ये एकच सध्या एकच कार्डियाक ऍम्ब्युलन्स आहे आणि ती अलिबागला आहे. इतर सध्या आहेत पण त्याही वेळेवर येतीलच याची शाश्वती नाही. आपली आरोग्यव्यवस्था किती कमकुवत आहे याचा प्रत्यय मला येत होता. शेवटी चार वाजता महाडवरून एक रुग्णवाहिका बोलावली.

सहा वाजले ती अजून आली  नव्हती. आता सर्वांनी आणखीन वाट पाहता दादाला आईला घेऊन पुढे जायचं ठरलं आणि मी बाबांसोबत येईन. आई गावच्या घरी एकटीच होती. तिला फोन करून तयारीत रहायला सांगून धीर दिला आणि दादा पुढे निघून गेला.

संध्याकाळचे सात वाजले होते. मी आणि माझा मामे भाऊ आम्ही दोघेच ऍम्ब्युलन्सची वाट पाहत होतो. आज १० ऑगस्ट नेमका सोमवार होता. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता. आता मात्र काहीतरी पोटात ढकलण्याची आवश्यकता होती. माणगावला सांगून वहिनींकडून गव्हाचा चुरमा बनवून घेतला. परंतु खाण्याची इच्छाच होईना. शरीरधर्म म्हणून कसाबसा आत ढकलला आणि  पाणी प्यायलो. आता आठ वाजले होते. अजूनही रुग्णवाहिका आली नव्हतीमी एटीएम मधून जाऊन पैसे काढले. आता पाऊस चालू झाला होता. सोबत छत्री वगैरे काही नव्हती. तसाच हॉस्पिटल मध्ये मी आणि भाऊ वाट पाहत होतो. भाऊ शेवटपर्यंत माझ्या सोबत होता. शेवटी पावणे नऊच्या सुमारास रुग्णवाहिका आली आणि ताबडतोब मी वरती हॉस्पिटल मध्ये गेलो . लांबूनच पाहिलं. बाबा तसेच बेड वर होते. त्यांना पाणी मागण्यासाठी देखील स्ट्रगल करावा लागत होता. इतर पेशंटची देखील थोड्या बहुत प्रमाणात तीच अवस्थासर्वत्र किट घातलेले डॉक्टर नर्सेस. धावाधाव. हेच वातावरण होतं. मी तयार केलेला केस पेपर घेतला आणि बाबांना घेऊन खाली ऍम्ब्युलन्स मध्ये आलो. त्यांना अजूनही प्रचंड प्रमाणात दम लागत होता. समोर कोण आहे हेही त्यांना उमजून येत नव्हतं. त्यात ऍम्ब्युलन्स कार्डियाक नव्हती. आता जो काय भरोसा होता तो फक्त ऑक्सिजन सिलेंडर वरतीच होता.

त्यांना रुग्णवाहिकेत बसवलं. समोरच्या मेडिकल मधून हँडग्लोव्हस घेऊन हातात चढवले. पाऊस चालूच होता. आम्हाला रुग्णवाहिकेत बसवल्यावरच भाऊ घरी निघून गेला. समोरची ती कळकट मळकट रुग्णवाहिका बघून डोक्यात एक प्लॅस्टिकची पिशवी चढवली. जाणो किती कोरोनाचे रुग्ण तिने वाहून नेले असतील. सॅनिटाईझ देखील केलेली वाटत नव्हती. माझ्याकडे दुसरा पर्याय तरी काय होता. बिनधास्त बाबांच्या सोबत बसलो. दहा वाजता आम्ही निघालो. दादाला फोन करून निघाल्याचं सांगितलं. आता आणखीन एक कसोटी होती ती म्हणजे मुंबई-गोवा हायवे. दहा वर्षाहून जास्त कालावधीत जगातला रखडलेला हा एकमेव हायवे असावा. त्यात पावसाळी दिवस. रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली. रस्त्यावर खड्डे नसून खड्ड्यात रस्ता होता. अशी अवस्था होती. दोन तासापूर्वी निघालेला दादा सुद्धा अजूनही निम्म्या वाटेवरच होता. सतत हलणाऱ्या रुग्णवाहिकेमुळे मला ऑक्सिजन मास्क धरून रहावं लागत होतं. रुग्णवाहिकेचा चालक सुसाट तसाच खड्ड्यातून उडवत चालला होता. लवकर पोहोचू तेवढं गरजेचं होतं. त्यामुळे त्याला हळु चालव सांगणार तरी कसं ? खड्ड्यांचा त्रास सहन होऊन शेवटी त्यांना जरा खड्डे चुकवा  असं सांगितलं तर " साहेब. एखाद खड्डा असेल तर चुकविन ना . काय करणार. नाईलाज आहे. माझी तर कमरेची हालत काय सांगू दिवसभर या रस्त्यावर येजा करून झालीय ते. " हे मी समजू शकत होतो. आता यामुळे एक तास प्रवास जास्त वाढणार होता. सतत बाबांची सीट हलत होती. त्यांच्या जीवाची सुद्धा घालमेल चालली होती. त्यात आधीच पूर्वी ऍक्सीडेन्ट झाल्याने हातात रॉड वगैरे तर होतेच त्यामुळे त्यांना गचके बसत होते ते असह्य होत होते. एक हाताने ऑक्सिजन मास्क धरून दुसऱ्या हाताने मी त्यांची कंबर घट्ट धरून ठेवली होती. जेणे करून त्यांना कमी गचके बसतील. तास -दोन तास माझी हि कसरत चालली होती. माझ्या कमरेला आता वाकून चांगलीच रग लागली होती. डिस्क मध्ये वेदना सुरु झाल्या आणि शेवटी राहवून जरा रस्ता सुरळीत आहे असं पाहिलं आणि दोन मिनिट तसाच रुग्ण वाहिकेत पाठीवर खाली आडवा झालो. खाली काय आहे? किती घाण आहे? का काय सांडलंय ? याचं भानच नव्हतं मला. जेमतेम मिनिट झाली नसतील तर लगेच मोठा खड्ड्याने उडालो आणि पटकन उठून बाबांना पकडलं आणि त्यांचा सरकलेला मास्क एका सेकंदात पुन्हा जागेवर बसवला. पुन्हा तसाच त्यांना पकडून बसलोआपल्याला दुसऱ्या कुठे तरी हॉस्पिटल मध्ये नेत आहेत याची त्यांना  थोडीफार जाणीव झाली होती. त्यांना सतत काहीं ना काही सांगून धीर देण्याचा प्रयत्न करत होतो. सतत स्वामींचा धावा चालू होता. एकदाचं पनवेल आलं आणि रस्ता थोडा चांगला लागला. साधारण वाजता आम्ही डोंबिवलीला साई हॉस्पिटलला पोहोचलो. रुग्णवाहिकेतून खाली उतरलो. आईला सोडून दादा तिथे अगोदरच येऊन पोहोचला होता. हातातले ग्लोव्हस काढले. डोक्यातील पिशवी देखील काढली. घरी गेल्यावर टाकू या विचाराने तशीच खिशात कोंबली. माझ्या अवताराकडे पाहून तिथला एक कर्मचारी ओरडला.

"कोरोना पेशंट सोबत आलात ना! आत येऊ नका. आत कोणालाच परवानगी नाही. आणि इथे तिथे काय टाकू नका. "

"पेमेंट करायचं आहे. " असं बोलल्यावर त्याने आम्हाला आत घेतलं.

" सॅनिटायझर लावा. इतर कुठे स्पर्श करू नका. "

डिजिटलायझेशन मुळे हे एक बरं झालंय. तातडीच्या वेळेस देखील कॅश जवळ बाळगावी लागत नाही. आत गेल्या गेल्या कार्ड स्वाईप केलं आणि एक लाख रुपये भरल्यावरच त्यांनी बाबांना प्रवेश दिला. त्यांना ऍडमिट केलं आणि मला हायसं वाटलं. तीन वाजले डोंबिवलीच्या घरी पोहोचलो. आई जागीच होतीआईला सर्व ठीक आहे असं सांगितलं. तिलाही खड्ड्यांमुळे खूप त्रास झाला होता. माझ्या मात्र पाठीला चांगलीच रग लागली होती. कधी अंधरूणावर पडतोय असं वाटत होतं. एक पेन किलर घेतली आणि अंथरुणावर पडलो. पुढच्या विचाराने मन थोडं धास्तावलं. लग्नासाठी ठेवलेली एफडी जरी मोडली तरी जेमतेम पर्यंत पैसे जमा होतील. १०-१२ लाखावर खर्च गेला तर! बापरे ! काय करू मी. माझा एक मित्र आणि मैत्रीण परदेशात राहतात. त्यांना फक्त एक मेसेज टाकून ठेवला गरज लागली तर मदत करा. त्यांनी लगेच होकार कळवला. पण मी मात्र देवापुढे प्रार्थनाच करत होतो. कोणापुढे हात पसरायची पाळी येवो. पण आपल्या बापासाठी हात पसरायची वेळ आली तरी मी मागे पुढे पाहणार नव्हतो.

 

6.

बाबांना खाजगी रुग्णालयात ऍडमिट केल्यावर वाटलं आता सर्व व्यवस्थित होईलपण नियतीने अजून एक लढाई पुढे वाढून ठेवली होती हे तेव्हा कुठे  माहित होतं. हॉस्पिटल मध्ये कोणालाही प्रवेश नव्हता त्यामुळे फोनवरूनच डॉकटर ठरलेल्या वेळेत व्हिडीओ कॉल करून अपडेट देत असत. त्यांना ऍडमिट करायला उशीर झाला असल्याने प्रकृती थोडी चिंताजनक आहे. आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलय. असं सांगितलं. व्हिडिओ कॉल करून जेव्हा सर्वत्र नळ्या लावलेल्या दिसल्या तेव्हा तर आईचा बांधच फुटला. दोन दिवसांनी सरकारी हॉस्पिटल मधून मला फोन आला. कोणी बाई बोलत होत्या.  'पेशंट कसा आहे. नाही आम्हाला सरकारकडून प्रत्येक पेशंट मागे पैसे मिळतात माहित हवी. ' असं बोलल्यावर माझा पटकन राग आला.

" अरे वा! तुम्हाला तुमच्या पैशाची काळजी आहे पेशंटची नाही. तिथेच जर वेळेवर लक्ष दिलं असतं आणि उपचार झाले असते तर आज माझ्या वडिलांवर हि वेळ आलीच नसती. पण तुम्हाला काय करायचंय. पेशंट जगो नाही तर मरो ! तुम्ही एक आकडा टाकाल, पैसे घ्याल आणि मोकळे व्हाल. " इतकं बोलल्यावर त्यांनी फोन ठेवून दिला. परत काही मला फोन आला नाही.

गणपतीचे दिवस होते. यंदा गणपती ऑगस्ट मध्येच आले होते. हॉस्पिटलचं बिल तीन दिवसातच लाखाच्या पुढे गेलं. फोनवर काही माहिती मिळाल्याने आम्ही हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरांना भेटलो. वडिलांना न्युमोनिया झालाय असं सांगितलं. सिटी स्कॅनचा रिपोर्ट दाखवला त्यात इन्फेक्शन खूप पसरलेलं दिसत होतं. हा कोविडचा न्युमोनिया आहे. तो चेस्ट वर लवकर आघात करतो असं डॉक्टरांनी सांगितलं. आमचे प्रयत्न चालू आहेत पण अजून सुधारणा नाही असं त्यांनी सांगितलं. आमची चिंता वाढत होती. दुसऱ्या दिवशी लगेच मला हॉस्पिटल मधून फोन आला आणि एक इंजेक्शनची गरज आहे ते तुम्ही आणा. असं हॉस्पिटल स्टाफ मधून सांगण्यात आलं. आम्ही पुन्हा जाऊन डॉक्टरांना भेटलो.

"आम्हाला हे बाहेरून का आणायला सांगताय. हॉस्पिटल मेडिकलला असेल ना. " आमच्या प्रश्नावर डॉक्टर गणेश यांनी आम्हाला सर्व प्रश्नांची ऊत्तरे द्यायला सुरुवात केली. अतिशय शांत स्वरूपात आम्हाला समजावून सांगत होते.

"तेच तुम्हाला सांगायचंय. हे जे इंजेक्शन आहे ते खास कोविड झाल्यावर न्युमोनिया जेव्हा होतो त्या वेळेला आम्ही प्रेफर करतो. शिवाय आता याचा शॉर्टेज खूप आहे. आम्हालाच ते मिळत नाही त्यामुळे तुमच्याकडून प्रयत्न करा जर मिळालं तर वेल अँड गुड. खरं! तर हे न्युमोनियाचं औषध नाहीये पण वर्क अराउंड म्हणून वापरतोय आणि एक दोघांना त्याचा फायदा झालाय.  पण आणखीन एक गोष्ट त्यांचं वय पाहता ते थोडं रिस्की आहे पण आपल्याकडे आता या शिवाय दुसरा उपाय देखील नाही. शिवाय या इंजेक्शनचा लगेच फायदा होईल असंही. नाही. काहींना होतो तर काहींना नाही.  प्रत्येक पेशन्ट हा वेगळा रिऍक्ट करतो. जेवढं लवकर होईल तेवढं बघा. एकेक दिवस महत्वाचा आहे. "

असं सांगितल्यावर आमची चिंता थोडी वाढली. त्यांनी आम्हाला प्रेस्क्रिप्शन लिहून हॉस्पिटलचा स्टॅम्प मारला आणि दिलं. मी नाव पाहिलं.

'टोसिलिझुमाब'

" नाव तर एकदम डेंजरच आहे. ठीक आहे मिळेल कुठेतरी एवढं काय" असं म्हणत मी आणि दादा हॉस्पिटल मधून निघालो आणि शोधण्यासाठी बाहेर पडलो.

संध्याकाळचे चार वाजले. अख्खी डोंबिवली पालथी घातली. पण ते कुठेच मिळेना. हे एवढं साधं मेडिसिन नाहीये याची आता खात्री पटली. डोंबिवली मधल्याच एका हॉस्पिटल मेडिलकलला विचारलं तर त्याने सांगितलं,’ कालच एकाने एक लाखाला  नेलं. तुम्हाला पाहिजे तर मी एक उल्हासनगरचा माणूस आहे त्याचा नंबर देतो कदाचित त्याच्याकडे मिळेल. ' आम्ही त्याचा नंबर घेऊन ठेवला.

आत्तापर्यंत सर्व नातेवाईकांपासून मित्रपरिवारा पर्यंत खबर पोचवली होती. कोणाच्या ओळखीने इंजेक्शन मिळालं तर सांगा. पण हे काही साधं मेडिसिन नाही त्यात ते प्रेस्क्रिप्शन शिवाय देत नाही. आधार कार्ड कॉपी वगैरे नंबर लावावा लागतो. अशी अनेक उत्तर मिळत होती.

नितेश आणि रितेश हे माझ्या आयुष्यातले सर्वात जिवलग मित्र. सख्ख्या भावापेक्षाही मदत करावी तशी नेहमी माझ्या मदतीला ते उभे राहिले. रितेश मुंबई मध्ये राहणार तर नितेश रायगडचा. दोघेही इंजेक्शन शोधण्यासाठी कामाला लागलेव्हाट्सऍप वरून भराभर मेसेज फिरू लागले. दोन दिवस शोधण्यातच निघून गेले पण प्रयत्न व्यर्थ. सर्वांकडून एकच कॉन्टॅक्ट मिळत होता, घाटकोपरच्या डीलरचा. ट्रेन बंद होत्या मी डोंबिवली वरून जाऊ शकत नव्हतो म्हणून रितेश ला सांगितलं तो लगेच संध्याकाळी घाटकोपरला जाऊन आला पण त्याच्याही हातात निराशाच आली. लोकं अक्षरशः लाईनला त्या इंजेक्शन साठी उभी होती पण उपब्धच नाही तर मिळणार कुठून. तोही  दिवस वायाच गेला. दुसरा दिवस मावळत आला होता. ज्या उल्हासनगरवाल्या माणसाचा नंबर आम्ही मेडिकल मधून घेतला होता त्याला दादाने फोन लावला.

"देखो साब! इंजेक्शन तो मेरे पास है, पर एक लाख रूपये लगेंगे"

एव्हाना इंजेक्शनची मूळ किंमत ३०-४० हजाराच्या आसपास आहे इतकं आम्हाला कळलं होतं. एक लाख बोलल्यावर मी ऐकतच बसलो तब्ब्ल तीनपटच किंमत मागतोय हा. काही कमी करणार का हे त्याला आम्ही विचारलं.

"देखो साब ! अभी तो बहुत शॉर्टेज है, लोग मुझे लाख देने के लिए भी तैयार है।  आदमी के जान से ज्यादा पैसा थोड़ी बड़ा है। "

आम्ही फोन ठेवून दिला. माझ्यासारख्या सामान्य माणसाला एक लाख म्हणजे खुप होते. १०-१५ हजार जास्त देणं हे समजू शकत होतो पण तब्ब्ल एक लाख ! सरळ सरळ लुट आहे हि. पण करणार काय ? ज्याच्याकडे पैसे आहेत आणि ज्याला गरज आहे तो घेतोच आहे. शेवटी विचार केला जरी मॅनेज करून पैसे गोळा केले तरी हा उल्हासनगरवाला  अनोळखी माणुस. जे प्रत्यक्ष डीलर कडे पण मिळत नाही ते खरंच यांच्याकडे असेल का ? याने फसवलं तर ? असे प्रश्न मनात येत होते.

 

7.

माझा नंबर किती ग्रुपमधून कुठे कुठे गेला होता कोण जाणे. लोकांचे मदतीसाठी मेसेज येत होते. कोणी कुठला पत्ता देत होता तर कोणी कुठला. सर्वांमध्ये कॉमन कॉन्टॅक्टस जास्त होते. कितीतरी व्हाट्सऍप वरून येणाऱ्या मेसेजवरून  कॉन्टॅक्ट मिळाला कि तिकडे जाऊन शोध घेत होतो पण हाती निराशा प्रत्यक्षात तसं काहीच नसायचं. आता मानसिक त्रास आणि उगाच दगदग व्हायला लागली. शेवटी मी नितेशला सांगितलं जिकडे जिकडे माझा नंबर दिला आहेस त्यांना मेसेज पाठव कि, " कृपया खात्री असेल तरच मेसेज करा अन्यथा त्यात वेळ वाया जात आहे. निदान दुसरीकडे शोध घेता येईल. तुम्ही मदत करता आहेत त्याबद्दल आभारी आहोत. "  नितेश ने मेसेज सेंड केला आणि व्हाट्सऍपवरचे किरकोळ एखाद दुसरा वगळता येणारे मेसेज बंद झाले. नंतर आमच्या एका एम. आर. नातेवाइकांकडून समजले कि, गोव्याला इंजेक्शन उपलब्ध आहे. त्यांच्याकडून नंबर घेऊन मी त्यांच्याशी संपर्क साधला.

"हो. आमच्याकडे गोव्याच्या डीलर कडे आहे. पण तुम्हाला गाडीचा साधारण २० हजार खर्च करावा लागेल. आणि तो दिवसानंतर येणार आहे. "

त्यांनी इतकं खात्रीशीर सांगितल्यावर मी कबूल झालो. माझ्या मावस बहिणीचे मिस्टर त्या वेळी नेमके गोव्यात होते. त्याना मी परिस्थितीची जाणीव दिली. त्यांनी लगेच स्वतःच्या हातातलं काम टाकून त्या डीलर पर्यंत जाऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने देईन असं सांगितलं पण लगेच दोन तासात त्याला तिथलाच गिऱ्हाईक मिळाला आणि त्याने ते देऊन टाकलं. मी त्या व्यक्तींना पुन्हा फोन लावून विचारलं.

" हो बरोबर आहे. मी तुम्हाला बोललो होतो मिळेल म्हणून पण त्याच काय झालं. तिथल्या डीलरचा आत्ताच मला फोन आला होता. त्याने सांगितलय कि, गोवा सरकारने बाहेर औषधे पाठवायला सध्या बंदी केली आहे म्हणून तिथल्याच पेशंटला ते त्याने तात्काळ देऊन टाकलं. "

काय खरं! काय खोटं ! देवालाच माहित. पुन्हा हाती एक निराशा. घरी सुद्धा दादा वहिनी त्यांच्या ओळखीतून कुठे मिळतंय का ते पाहत होते. सतत २४ तास फोन चालू होते. पण व्यर्थ! शिवाय न्यूज मधून आणि सोशल मीडियातून हे समजलं होतं  कि या इंजेक्शनचा शॉर्टेज पूर्ण भारतभरच आहे. हैदराबाद, तेलंगणा इकडे सुद्धा लोक त्यासाठी झटत आहे.

'टोसिलिझुमाब' प्रकरण साधं नाहीये. चांगलाच फेस आणला होता. इथे एकेक दिवस महत्वाचा होता. तीन दिवस असेच वाया गेले होते. तिकडे वडिलांची प्रकृती चिंताजनकच होती. या टोसिलिझुमाबचा शोध घेतला. समजलं.

हे ऍक्टरमा ड्रग परदेशी कंपनीचं आहे आणि ते भारतात फक्त सिप्ला कंपनीचं बनवते. माझा मित्र आशिष आयर्लंडला होता. त्यालाही मी फोन करून परिस्थितीची जाणीव करून दिली. तिकडे मिळत असेल तर बघ! मी इम्पोर्ट करायला तयार आहे. तू प्लिज बघ ! अशी त्याला कळकळीची विनंती केली.

"इकडे जरी भेटलं ना मयुर  तरी  इंडियामध्ये येईपर्यंत खूप वेळ जाणार . मी नाही म्हणत नाही. प्रयत्न करतो त्यापेक्षा आपण मुंबई मध्ये मिळतंय का ते पाहू म्हणून त्याने त्त्याचा मेहुणा मुंबईच्या हॉस्पिटल मध्ये डॉकटर होता. त्याच्याकडे संपर्क साधला. तेव्हा त्याला इथल्या परिस्थितीची गंभीर जाणीव झाली आणि हे इंजेक्शन मिळणं म्हणजे 'गुलबकावलीच फुल' मिळण्याइतकं कठीण आहे हे समजलं.

माझा परमेश्वर अतुट विश्वास होता. तरी धीर खचत होता कारण एकेक दिवस महत्वाचा होता आणि एक आशेचा किरण उगवला. शेवटी नितेशचं नेहमी सारखा मदतीला आला. त्याचा फोन आला आणि त्याने सहज म्हणून त्याच्या पेणच्या दादाच्या ओळखीने डोंबिवलीच्या एका संघ शाखेच्या कार्यकर्त्यांचा नंबर दिला. मी त्या ताईंना फोन लावला. त्यांना गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली आणि त्यांनी त्याच्या एका स्नेहींचा नंबर दिला. मी त्या सरांना फोन लावला. सर्व परिस्थिती सांगितली. सर्व केलेले प्रयत्न सांगितले. त्यांनी एकाच वाक्यात मला आधार दिला आणि विश्वास दिला.

" तुम्ही ताईकडून आलात ना ! डोन्ट वरी ! मी तुमचं काम करणार १०० %. माझे पूर्ण प्रयत्न करणार. मला फक्त थोडा वेळ द्या. "

"ठीक आहे. " मी फोन ठेवला.

संकटं येतात ती एकटी येत नाहीत सोबत आणखीन कोणाला घेऊन येतात असं म्हणतात त्यात काही खोट नाही. माझं लक्ष पूर्ण इकडे लागलं असताना पुण्यातील माझ्या रूम मालकाने- पुरंदरे यांनी रूम खाली करायला सांगितली. माझं सर्व सामान तसंच तिथे होतं. मी त्यांना विनंती करून तुम्हाला हवं तर माझं सामान एका कोपऱ्यात ठेवा  सध्या येणं मला शक्य नाही. शिवाय येण्यासाठी वाहन हि नाही. सर्व ठिकाणी निर्बंध आहेत. असं नम्रपणे सांगितलं तरी तो ऐकायलाच तयार नाही. खूप विनवणी केली दोघं उभयतांनां पण ते ऐकायलाच तयार नव्हते.  "मला इंटेरीयर करायचं आहे. तुम्ही ताबडतोब खाली करा नाहीतर तुमचं सामान मी फेकून देईन." अश्या उर्मट भाषेत पुरंदरे आणि त्यांच्या मिसेस ने मला फोनवर सांगितलं. माझे बाबा इथे सिरीयस आहेत. मला येणं शक्य नाही हे सांगून सुद्धा याला स्वतःच्या इंटेरियर ची पडलीय. मी मनात बोललो. सरकारने भाडेकरूंना सध्या काढू नका अशी सक्त ताकीद असूनसुद्धा हा माणूस असा वागतो. बरं ! याने जर मी पुण्यातून निघताना याच्याशी बोललो होतो तेव्हा एका शब्दानेही काही सांगितलं नाही नाहीतर तेव्हाच रूम खाली केली असती. बरे तेव्हा अगदी चांगलेपणाने नाही तुम्ही मुलं राहा काही प्रॉब्लेम नाही असं म्हणाला होता आणि एका लगेच पलटला 'मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं खाली करायला. आणि जर तुम्ही दहा दिवसात खाली केली नाही तर मी तुमचं डिपॉजिट कट करेन अश्शी वर धमकी दिली. "

माझं तर संताप झाला होता. किती माणसं स्वार्थ साधू . फक्त स्वतःच भलं बघणारी. वरती आवही असा आणतात कि आम्ही किती चांगले. पण या सोफिस्टिकेटेड चेहऱ्यामागे फक्त स्वार्थी माणसाचा खरा चेहरा असतो. जो वर वर आम्ही चांगले आहोत असं दाखवतो आणि वेळ अली ती दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणीही खायला मागे -पुढे पाहत नाही.  आत्ताची परिस्थिती काय आहे. इथे लोकांना जगण्याची चिंता लागू राहिली आहे. एकमेकांच्या मदतीसाठी लोक झटत आहेत आणि याला इंटेरियची पडलीय हि खरच इतकी महत्वाची गोष्ट आहे. पैसेवाले काय करतील याचा भरोसा नाही. सतत होणाऱ्या फोन ने मी वैतागलो होतो. माझी अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. शेवटी रूम मेट जो आत्ता मुंबईला होता त्यालाच काय ते बघायचं सांगून मी यातून लक्ष काढलं. पण तो हि मुंबईत असल्याने आणि निर्बंध लागू असल्याने पुण्यात जाऊ शकत नव्हता. शेवटी "हम करो सो कायदा " म्हणत रूम  मालकाने त्याला हवं ते केलंच. माझं सामान कुठे गेलं ते नंतर माझ्या हाताला लागलं नाहीच. एक दोन वस्तू मित्राच्या घरी होत्या. अर्धे आणखी कुठे; तर अर्धे तर गायबच होतं. माझी काहीही चूक नसताना. सरळ मार्गाने वागून सुद्धा शेवटी डिपॉजिट कट झालं. त्यातही नुकसान आणि भरीस भर म्हणून माझ्यावर त्याने नको नको ते आरोप केले. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. माझे वडील इकडे हॉस्पिटल मध्ये सिरीयस होते माझं सर्व लक्ष इकडे होतं. माझी कोणाशी भांडायची मानसिकता देखील नव्हती. काही चूक नसताना सर्व ऐकून घेतलं. लोक परिस्थितीचा कसा फायदा उचलतात त्याचं उत्तम उदाहरण होतो मी.

 

8.

आजचा चवथा दिवस होता. यांच्याकडून तरी काही सकारात्मक घडू दे असं परमेश्वराला सांगत होतो. मन आशा-निराशेच्या काठावर हिंदोळ्या घेत होतं. सरांच्या रूपाने आशेचा किरण दिसत होता तर अख्ख्या भारतात शॉर्टेज आहे तर यांना तरी ते कसं मिळेल म्हणून निराशा वाटत होती. त्यांच्या फोनची मी आतुरतेने वाट पाहत होतो. सारखं त्रास देणं बरोबर नाही म्हणून त्या दिवशी न करता दुसऱ्या दिवशी मी फोन लावला.

" तुमचं काम नक्की होणार. विश्वास ठेवा. सिप्ला कंपनीतूनच इंजेक्शन मिळेल आणि ते सुद्धा एम. आर. पी. मध्येच. " मनाला थोडी उभारी मिळाली. सर आमच्यासाठी झटत होते. त्यांच्याशी फोन वर झालेल्या संभाषणातून हे दिसत होतं. सतत फोन कॉल, चौकशी, एक सरांच्या रूपात निर्माण झालेली आशा असं करता कसरत तरी पाच दिवस गेले आणि १५ तारखेला आम्हाला संध्याकाळी सरांचा फोन आला.

"कंपनीची गाडी गुजरात वरून निघणार आहे. तर तुम्हाला सुरतला जावं लागेल. "

" हो सर आमची तयारी आहे. "

"काय आहे ना ! कंपनीकडून प्रोडक्शन आहे. पण अंतर्गत खूप गोष्टी असतात. माझे प्रयत्न चालूच आहेत. तुम्हाला फक्त पैसे लगेच ट्रान्सफर करावे लागतील"

"समजलो सर . मी विचारणार पण नाही. माझा तुमच्यावर विश्वास आहे. "

दादाला सांगून गाडीने गुजरातला जायची तयारी केली.

१६ ऑगस्टची सकाळ उजाडली. आम्ही सरांच्या फोनची वाट पाहत होतो. निघण्यासाठी तयारीहि झाली होती. तेवढ्यात सरांचा फोन आला.

"गुड न्यूज. तुम्हाला गुजरातला जायची गरज नाही. इकडच्याच प्रोडक्शन मधून आपल्याला ओळखीने औषध मिळत आहे. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे ते फक्त एकच उपब्ध आहे. म्हणजे जरी तुम्हाला पुन्हा त्याची गरज लागली तरी ते मिळणार नाही किंवा मलाहि ते देता येणार नाही. माझ्या खास आग्रहास्तव ते एक तुमच्यासाठी उपलबद्ध केलं आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता लगेच पैसे ट्रान्सफर करा. तुम्हाला बिल देखील मिळेल "

" धन्यवाद सर. पण कुठे जायचं आणायला?"

" तुम्हाला ते नवी मुंबईतच मिळेल. थोड्याच वेळात पत्ता कळवतो. फक्त एक काम करायचं. ज्यावेळेला ते तुम्ही डॉक्टरांना द्याल तेव्हा त्यांना इंजेक्शन देतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगा आणि मला पाठवा. म्हणजे माझी खात्री होईल. सध्या खूप काळा बाजार चालू आहे. "

" हो. सर . " मी समजलो.

पुढच्या अर्ध्या तासातच सरांचा मेसेज आला. इंजेक्शनची एम.आर. पी. होती तीस हजार रुपये. मी लगेच ट्रान्सफर केले. आणि दिलेल्या पत्त्यावर लगेच गाडी घेऊन निघालो. रस्ता मोकळाच होता. पाऊण तासातच दादाने गाडी ठरलेल्या ठिकाणी पोहोचवली आणि बिलासह ते इंजेक्शन मिळालं.

खूप मोठा चौकोनी आकाराचा थर्मोकोलचा बॉक्स होता. या इंजेक्शनला थंड ठेवावं लागतं आणि पॅकिंग फोडल्या -फोडल्या लगेच द्यावं लागतं असं आम्हाला त्यांनी सांगितलं. मला वाटलं होतं एखादं छोटंसं खिशात मावेल इतकं ते इंजेक्शन असेल पण हा तर महारथीच आहे. जेव्हा तो बॉक्स घेऊन मी गाडीत बसलो तेव्हा समजलो. हे टोसिलिझुमाब किती मोठं प्रकरण आहे ते. साधं सुध ! नाहीये ते. बॉक्स मांडीवर घेऊन मी पाठीमागे बसलो. आता त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला न्यायचं होतं. ते मिळत मिळता दिवस उलटून गेले होते. वेळ खूप महत्वाचा होता. लगेच आम्ही हॉस्पिटलला फोन करून आम्ही इंजेक्शन घेऊन येतोय असं कळवलं. निघता -निघता गाडीतूनचआशिष पासून सर्वांना मेसेज केला कि "कृपया कोणी आता मेसेज करू नये. सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रयत्नाने इंजेक्शन मिळालं  आहे . ते आत्ता हॉस्पिटल मध्ये आम्ही डॉक्टरांकडे सुपूर्द करत आहोत. तुम्हा सर्वांचे खूप आभार. "

त्यावर बऱ्याच जणांचे मेसेज आले. कसं मिळालं ? कुठे मिळालं ? वगैरे वगैरे..

या वर मी सर्वांना विनम्रपणे सांगितलं कि, सध्या हे पेशंट पर्यंत पोहोचणं पहिलं कर्तव्य आहे आणि ज्यांच्याकडून हे मिळालं त्यांना हे विचारणं म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं आहे त्यामुळे मी नाही विचारलं ."

आणि सर्व मेसेज बेस्ट लकचा मेसेज येऊन थांबले.

अर्ध्या -पाऊण तासातच आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. डॉकटर गणेश यांची भेट घेतली. त्यांच्या हातात इंजेक्शनचा सफेद बॉक्स ठेवला.

" अहो ! अहो !! कमाल केलीत तुम्ही !. माझ्याकडे शद्ब नाहीयेत. हे इंजेक्शन आणलंत तुम्ही. हे मिळणं म्हणजे किती कठीण आहे तुम्हाला कल्पना आहे. माझ्या इतर पेशंटला सुद्धा गरज आहे. आणखीन असल्यास सांगा. त्यांच्या डोळ्यातलं आनंद मलाही दिसत होता आणि आमच्या त्यांना. "

" सध्या तरी एकच मिळालं आहे. आणखीन माझ्याकडे माहिती  आल्यास नक्की सांगेन. इतरांना माझ्याकडून मदत झाली तर आनंदच आहे. "

मी डॉक्टरांना व्हिडिओ हवा आहे अशी विनंती केली. ज्यांच्याकडून आम्हाला हे मिळालं आहे त्यांना आम्हाला दाखवायचा आहे. डॉकटर गणेश खूप चांगले होते. त्यांनी आमची विनंती मान्य केली. कोरोना रुग्णांचा वॉर्ड वेगळा होता. रिसेप्शन शिवाय इतर कुठेही बाहेरच्यांना जायला परवानगी नव्हती.

" हो. नक्कीच. रुग्णांचा विश्वास तर महत्वाचा आहे आमच्यासाठी. हे इंजेक्शन आत्ता लगेच देणार. बरं ! एक गोष्ट सांगतो. तसं खरं तर आपल्याला हे इंजेक्शन मिळेपर्यंत उशीर झालाय. प्रयत्न फक्त आपल्या हातात आहेत. "

हॉस्पिटल मध्ये समोरच असलेल्या साईंच्या मूर्तीकडे मी दोन क्षण पाहिलं. माझ्या नजरेतील भाव कळले असतील बहुतेक.

घरी आलो समाधानाने. आईला सांगितलं. आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. डोळे पाणावले होते. "पोरा ! केलंस " हेच पुटपुटली.

पुढच्या तासाभरातच हॉस्पिटल मधुन माझ्या फोन वर इंजेक्शन दिल्याचा व्हिडिओ आला. माझे बाबा अजून आयसीयू मध्येच होते. सर्वत्र नळ्या लावल्या होत्या. तो व्हिडिओ पाहवत नव्हता. हे इंजेक्शन देण्याची पद्धत देखील वेगळीच होती का ते माहित नाही. बहुतेक मानेतून दिलं गेलं होतं असं दिसलं. काय ते डॉक्टरांनाच माहित. मी तो लगेचच सरांना पाठवला. त्यांची देखील खातरजमा झाली. अर्धी लढाई तर जिंकली होती.

सरांचे खूप आभार मानले. त्यांना आणि ताईंना भेटून आभार व्यक्त करायची इच्छा दर्शवली. परंतु सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांनी विनम्रपणे नकार दिला.

 

9.

इंजेक्शन देऊन दिवस होऊन गेले परंतु काही प्रगती दिसेना. विचारल्यावर डॉकटर म्हणाले, " एखाद्याला पटकन फरक पडतो, एखाद्याला  नाही तर कोणाला रिऍक्शन सुद्धा येते. केस टु केस डिपेंड आहे ते . "

आमच्या चिंतेत पुन्हा भर पडली. २२ ऑगस्ट ला घरात गणपती बसला. व्हिडिओ कॉल करून त्यांना धीर येण्यासाठी घरातील गणपती दाखवला. व्हेंटिलेटर अजून होता. फक्त बघता येत होतं. सलाईन लावलेले हात तसेच त्यांनी थोडे उचलून परत खाली ठेवले. अवस्था पाहवत नव्हती. आता आमच्याकडे वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. दिवस जात होते. १६ दिवस हॉस्पिटल मध्ये झाले होते. बिल वाढतंच होतं. आणि शेवटी तो दिवस उजाडला..

सकाळी हॉस्पिटल मधून फोन आला.

"तुमच्या पेशंटची तब्येत सुधारली  आता.आयसीयू मधून नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट केलंय. आजची ऑक्सिजन लेव्हल पाहून कदाचित उद्या त्यांचा मास्क सुद्धा काढतील. " आणि माझा जीव भांड्यात पडला. बाप्पा पावला.

१९ दिवस हॉस्पिटल मध्ये काढल्यावर बाबाना शेवटी डिस्चार्ज मिळाला. हात-पायाचं मांस लटकलं होतं. फक्त हाडं दिसत होती. दम अजूनही बोलताना लागत होता. इथून आता ते घरच्या वातावरणात जास्त सुधारतील म्हणून त्यांना डिस्चार्ज दिला पण त्याची हालत अजून नाजूकच आहे. स्टॅन्ड बायला ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था बघून ठेवा असं सांगितलं. त्याची हि मी चौकशी करून ठेवली.

बाबा घरी आले आणि आईने सुटकेचा निश्वास टाकला. " पोरा करून दाखवलंस "

" आई. नितेशमुळे त्या सरांचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्या सरांमुळे हे शक्य झालं. कोण कुठले ते! आपली त्यांच्याशी ओळख हि नाही. पण केवळ एका ताईंच्या नावावर त्यांनी आपल्याला निस्वार्थ भावनेने त्यांचा काहीही एक रुपयाचा फायदा नसताना मदत केली. कोण आजकाल करतं एवढं ! . त्यांच्या रूपाने देवच भेटला."

" खरं रे बाबा. नितेश भावासारखा आजही तुझ्या पाठीशी राहिला. मैत्री अशीच राहू दे "

इतर सर्वच जण जे आपल्यासाठी झटत होते. त्या सर्वांचे आभार मी  वैयक्तिकरित्या सर्वांना मेसेज टाकून व्यक्त केले.

फॉलोअपला गेल्यावर डॉक्टर बोलले, " आम्ही आमच्या इतर पेशंटना तुमच्या बद्दल सांगतो कि हे बघा आमच्याकडे एक पेशंट होते जे इच्छाशक्ती होती म्हणून यातून वाचले. धीर धरा. " समाधान वाटलं.

शेवटी घर ते घरच! हळू हळू बाबांची  सुधारली. हळूहळू ते स्वतःच्या पायावर उभे राहून चालू लागले.

नंतरही इतर जणांना इंजेक्शनची गरज होती म्हणून मी सरांशी संपर्क साधला. पण त्यांचाही नाईलाज होता. ' तुम्हाला मी तेव्हाच सांगितलं होतं.तुमच नशीब बलवत्तर म्हणून तुम्हाला ते एक तरी मिळालं. आणि माझ्याकडून जशी तुम्हाला मदत झाली तशी इतर कोणाला मदत होत असेल तर मला आनंदच आहे नाही का ? आणखीन काही दिवस तरी असेच जातील. एखाद महिन्यात होईल सर्व सप्लाय नीट. "

मी निरुत्तर होतो.

खर्च खूप झाला. मी पुन्हा शून्यावर आलो होतो. पण बाबा घरी आले सुखरूप आणि कोणापुढे हात पसरायची गरज देखील लागली नाही याचंच मानसिक समाधान खूप होतं. पण वाईटसुद्धा एका गोष्टीचं वाटलं कि ते इंजेक्शन इतरांनाही त्या वेळेला मिळालं असतं माझ्या ओळखीतून तर मला जास्त झाला असता. असो नियतीपुढे सर्व हतबल असतात. या विषाणूने अनेक कुटुंबातील प्रमुख व्यक्ती हिरावून नेले. अनेक संसार उध्वस्त झाले. माणुसकीचं दर्शनही तेवढचं पाहायला मिळालं. जे जे या परिस्थितीतून वाचू शकले नाहीत त्या सर्वांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

एक -दोन महिन्यांनी हा शॉर्टेजचा प्रॉब्लेम निकालात निघाला. ज्यांना गरज होती त्यांना ते मिळालं आणि नंतरच्या  वेळेला टोसिलिझुमाबची जागा घेतली ती रेमडेसिविरनेदुसऱ्या लाटेत मी आणि आई सोडून आमच्या घरातील इतर ४जणांना कोविडचा संसर्ग झाला पण ते थोडक्यात निभावलं. मला आजही एका गोष्टीच आश्चर्य वाटत ते म्हणजे बाबांसोबत मी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत सोबत होतो अगदी ऍम्ब्युलन्स मध्ये सुद्धा कुठल्या परिस्थितीत सोबत होतो पण मला अजिबात संसर्ग झाला नाही. मी बचावलो. खरंच तो कोविड होता का ? सर्व त्या ब्रम्हांडनायकाची कृपा. त्याचा वरदहस्त सर्वांना लाभो हीच इच्छा. आणि हि वेळ पुन्हा कोणावर येवो हीच इच्छा.

आभार:- मला मदत करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात सर्व सदहृदयांचं मनापासून आभार. देव त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करो.

टिप :- हा माझा स्वानुभव आहे. यातील प्रत्येक शब्द खरा आहे कुठलीहीअतिशयोक्ती न करता. स्वतःच मन हलकं व्हावं म्हणून लिहिलेला. तसेच स्वार्थी लोकांनी भरलेली दुनिया असली तरी दुसऱ्याला मदत करणंही हि लोक आहेत म्हणून हे जग टिकून आहे हे देखील सांगावे म्हणून लिहिण्याचा हा खटाटोप.

-- © मयुर s