कास पठार आणि वजराई धबधबा


वजराई धबधब्याच्या दिशेने..




पावसाळा सुरू झाला, की सह्याद्री मध्ये रानफुलांचा उत्सव सुरु होतो. हा उत्सव पाहण्याकरिता डोंगरभटक्यांची पावले मग आपोआपच सह्याद्रीकडे वळू लागतात. श्रावण महिन्याच्या अखेरीस तर हा उत्सव अधिकच पाहण्यासारखा असतो. कासच्या रूपाने महाराष्ट्राला हि एक फुलांचे पठार लाभले आहे. जांभा खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा, सीतेची आसवे अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! "मयुर २१ तारीख कुठे जाऊ नकोस. आपल्याला कास ला जायचंय". असा अमित चा मेसेज आला आणि मागचा-पुढचा विचार न करता "डन " असा रिप्लाय देऊन टाकला. मला तर कास भेटीपेक्षा वजराई धबधब्याचीच जास्त आस होती. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेल्या या कास पठाराची हि निसर्ग नवलाई पाहण्याचा योग हा या वर्षी आलाच. या वर्षी पाऊस जरा जास्तच झाल्याने किती प्रकारची फुले पाहायला मिळतील हि जरा शंकाच होती. पण शेवटी हे तर सर्व निसर्गाच्याच हातात; त्यामुळे रंगीबेरंगी फुलांची उधळण पाहायला मिळणे हा तर एक नशिबाचाच भाग असं समजून शनिवारी पहाटेच मी,अमित, स्वयम आणि पूनम निघालो. सकाळ-सकाळ खूप भूक लागली होती त्यामुळे वाटेतच एका छानश्या हॉटेलमध्ये "थालीपीठावर" यथेच्छ ताव मारून आम्ही पुढे निघालो. सातारा शहरातून जाणाऱ्या कासच्या रस्त्यावर आम्ही पोहोचलो. आदल्या दिवशीच पाऊस पडून गेला होता आणि आज वातावरण थोडं ढगाळ होतं. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सोनकीच्या फुलांनी आधीच आपली सलामी दिली होती जशी काय तुमचं कास वर स्वागत करण्यासाठी ती आधीच उत्सुक असावीत. शेवटी आम्ही कास ला थोड्याच वेळात पोहोचलोच. गाडी पार्क करून कासच्या पठारावर आम्ही फुलांचा हा सोहळा अनुभवण्यासाठी निघालो. कास व्यवस्थापन समितीने येथून पठारावर जाण्यासाठी प्रति व्यक्ती दहा रुपये शुल्क आकारून बसची व्यवस्था केली आहे.






 महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे. कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे.  पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. याच पठारावरील कास तलाव हा सातारा शहराला पाणीपुरवठा करतो.कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे.  हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्कोने  जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत त्याचा समावेश केला. कास हे नाव कासा या झाडाच्या इथल्या अस्तित्वामुळे पडले असल्याची दंतकथा सांगितली जाते. कास या वृक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे याची पाने पिकल्यानंतर रक्तवर्णी दिसतात. याच गावालगत समुद्रसपाटीपासून १२१३ मीटर उंचीवरील कास पठाराचे एक हजार ९७२ हेक्टर राखीव वनक्षेत्र म्हणून वनखात्याने जाहीर केले आहे. हे पठार सातारा वन विभागातील मेढा व सातारा वनक्षेत्राच्या हद्दीत येते. कास गावात ग्रामदैवत असलेल्या कासाई देवीचे मंदिर सुद्धा आहे.
वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे कासवरील फुलांचे अस्तित्व धोक्यात येउ लागले होते. त्यामुळे वनविभागाने पठारावर दुतर्फा जाळी लावून त्यांना सरंक्षित केले आहे रानफुले पाहण्यासाठी येणाऱ्या शेकडो पर्यटकांच्या सोयीसाठी कास पठारावर आता पर्यटकांसाठी जांभ्या दगडात पायवाटा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याला एक वेगळचं रूप प्राप्त झालं आहे.  या वर्षी सात ते आठच प्रकारची फुले आली आहेत अशी तेथील वनविभागाच्या एका कार्यकर्त्याने माहिती दिली. निळ्या ,गुलाबी,जांभळ्या,पांढऱ्या ,पिवळ्या अशा वेगवेगळ्या रंगाची फुलांची उधळण पाहण्यात एक वेगळीच मजा येत होती. काही  विरळ तर काही ठिकाणी गर्द असे  गुलाबी फुलांचे गालिचे पहावयास मिळत होते. ढगाळ वातावरणातून मधूनच येणारी एखादी पावसाची सर आल्हाददायक वाटत होती. फोटोग्राफर्स साठी मनसोक्त फोटो काढायचे हक्काचं ठिकाण तर कासच.  त्यात आजकाल प्री -वेडिंग चे फॅड असल्याने निसर्गप्रेमींपेक्षा जास्त गर्दी त्यांचीच दिसत होती. कास पठारावर काही फुले दरवर्षी येतात तर काही फुले दर सात वर्षांनी येतात. तर दर नऊ वर्षानी फुलणारी टोपली कार्वी हे तर कास पठाराचे वेगळे वैशिष्ट आहे. हा दैवदुर्लभ योग पाहणारा तसा भाग्यवंतच म्हणावा लागेल.





कास पठारावरील फुलांचा आनंद घेतल्यानंतर दुसऱ्या गेट ने आम्ही बाहेर पडलो आणि कास तलावाकडे कूच केली. कास तलावाकडे जाताना गाडी पाठीमागेच ठेवून आम्ही मस्त चालत -चालत, थोडं फोटोसेशन करत आणि निसर्गाच्या  आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत कास तलावाजवळ पोहोचलो. थोडा वेळ कास तलावात पाण्यात पाय टाकून बसलो आणि माझी पवना तलावाच्या कॅम्पिंगची आठवण जागी झाली.

आता कुठे जायचं ? असा प्रश्न अमितने विचारल्यावर मी सांगितलं आता आपण  वजराई धबधबा पाहायला जाऊया.  वाटेत तिथल्याच एका ग्रामस्थाला विचारलं असता त्याने सांगितलं कि, तुम्ही जर सरळ गेलात तर धबधबा दिसेल पण एका बाजूनेच दिसेल. हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये कोसळतो हीच त्याची खासियत आहे आणि तो जर पाहायचा असेल तर इथून एक जंगलातून रस्ता जातो तिकडे पाहायला मिळेल. पण आता त्याचा रस्ता  नवख्या माणसाला कसा सापडणार बराच सल्लामसलत केल्यावर एक ठराविक मानधन ठरवल्यावर तो आम्हाला दाखवायला तयार झाला.
"अरे !! पण तो पाहून आपण परत येऊया का? तीन वाजले आहेत आता. " -- अमित
"येऊ. रे! परत काय वेळ येणार नाही अशी. चल तू . " असं बोलून मी अमित ला तयार केला. पण आमचा ड्राइवर मात्र कच्च्या रस्त्यावर गाडी घालायला तयार नव्हता. आपल्याला फक्त थोड्या अंतरापर्यंतच गाडी घेऊन जायचंय आणि मग आम्ही तिथून पायी जाऊ असं सांगितल्यावर थोडं  नाखुशीनेच तो तयार झाला.
गाडी बाजूला लावून निसर्गाच्या एका अनामिक ओढीने आम्ही धबधब्याकडे कूच केली. अमित थोडा साशंकच होता कि यावर विश्वास कसा ठेवायचा. पण मी मात्र बिनधास्त होतो. नाव-गाव विचारत, चालत-चालत त्यांच्याबरोबर मी बोलायला सुरुवात केली.
"तुमचं नाव काय हो?"
"माझं नाव धोंडिबा काळे. म्या हिथलाच हाय पलीकडच्या गावातला. दर शनिवार-रविवार लोक येत्यात इकडं . कोणतरी येतंय आणि मग धबधबा दावायच्या निमित्ताने आम्हाला जरा मिळतंय काय बाय उत्पन्न."
पुन्हा एकदा आडवाटेवरच्या गावातील लोकांचा रोजच्या जगण्यातील संघर्ष समोर येत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही जंगलातून चालत होतो. पूनम चालेल कि नाही असं वाटत असताना ती मात्र एकदम बिनधास्त अवघड वाटेवरून पण चालत होती.
"अरे!! मयुर  मैने और स्वयम ने ट्रेकिंग किया है पहले.. तुम टेंशन मत लो .. चलो आगे".


भांबवलीच्या जंगलात बरेच वन्यजीव आहेत, मुख्यत्वे करून रानगवे, रानडुक्कर, भेकरे, ससे, वानर, इ. आणि क्वचित वाघ, अस्वलेदेखील दिसतात असे बोलतात. अनेक प्रकारचे पक्षी, मुख्यत्वे करून मोर-लांडोर यांचे दर्शन होते. फुलपाखरांच्या असंख्य जाती दृष्टीस पडतात. या जंगलात विविध प्रकारची औषधी झाडे असून प्रामुख्याने हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकेकाई, पिसा, मरुडशेंग, अश्वगंध, बेडकीचा वेल (डायबिटीससाठी) आणि इतर वनौषधी झाडेझुडपे आढळतात.
जंगलातून चालत असताना पावसाच्या हलक्या सरी चालूच होत्या. त्या दाट जंगलातून वाट काढत एका निमुळत्या उतारावर आम्ही जाऊन पोहोचलो आणि समोर जे काही दृश्य पहिले ते खरंच अवर्णनीय होतं.केलेल्या पायपिटीचं सार्थक झालं होतं. एवढा मोठा तीन टप्प्यांमध्ये  कोसळणारा धबधबा मी प्रथमच पाहत होतो. असं वाटतं  होतं  कि, पांढऱ्याशुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याने हिरवी शाल पांघरली आहे आणि वरती त्याने ढगांचा मुकुट चढवला आहे. आम्ही जिथे उभे होतो तिथून खाली फक्त खोल दरी होती. जरा जरी पुढे गेलो आणि तोल गेला कि डायरेक्ट स्वर्गच. वजराई धबधब्याची उंची हि तब्बल ५६० मी. (१८४० फूट) इतकी आहे. तो तीन टप्प्यांत कोसळतो आणि हा मेघालयातील नोहाकालीकाई नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात उंचीवरून कोसळणारा धबधबा मानला जातो.
धबधबा पाहून तिथून आम्ही परतीला निघालो. परतताना माझ्या पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला, ओझरती नजर टाकली तर काही दिसलं नाही म्हणून दुर्लक्ष केलं तर परत पायाला चुरचुरल्याचा जाणवलं. नीट  पाहिलं तर दिसलं  कि पायाला काळपट काहीतरी चिकटलंय म्हणून मी हात लावला तर ते हालचाल करायला लागलं. "अरे!! हा तर जळू.." असं मी जोरात बोललो.
"थांबा..  थांबा..  मी काढतो. काही घाबरू नका त्याचं  काही नसतं  एवढं." असं  बोलून धोंडिबानी त्याला आपल्या हाताने काढलं  आणि टाकळ्याचा  पाला लावला. पण त्याचा काही फारसा फायदा झाला नाही. पुढे चालत आलो तर पुन्हा त्याच ठिकाणी ४-५ चिकटले होते. आता मात्र ते माझी पाठ सोडायला तयारच नव्हते. कोयनेच्या जंगलात जळू त्रास देतात असं ऐकलं  होतं . पण आज ते प्रत्यक्षात मी अनुभवत होतो. नंतर पाहतो तर अमित चप्पल ठोकायला लागला होता.   त्यांचा पाय पूर्ण रक्ताने लाल झाला होता. थोडं SAVLON लावून आम्ही जास्त वेळ न काढता गाडीत बसलो. पायातल्या सॅंडल आम्ही घरात परत जाई पर्यंत घालायच्याच नाही असं ठरवलं न जाणो त्यात एखादा चिकटून बसला असेल आणि परत त्रास देईल. अमित चं रक्त थांबतच नव्हतं . मग त्याला  मी कॉटन लावून धरून ठेवायला सांगितलं आणि थोड्यावेळाने ते आपोआप थांबेल. घाबरू नको. असा सल्ला दिला. तो पण मनातल्या मनात म्हणत असेल, "आयला उगाच लागलो मयूरच्या नादी. कुठे पण नेतो हा .. ".
नंतर घरी पोहोचल्यावर लक्षात आला कि पूनम चा पाय देखील रक्ताने लाल झाला होता. जळूने स्वयम सोडुं सगळ्यांना शिकार बनवलं होतं . मग माझ्या डॉक्टर मित्राचा अभिजित वायचळ चा फोनवरून सल्ला घेतला आणि precaution म्हणून तिघांनी एक TT  चे इंजेकशन घेतलं. परंतु भांबवलीच्या धबधब्याचे जे सुख अनुभवलं होतं त्याच्यापुढे झालेला त्रास हा अगदीच नगण्य होता.
भांबवली वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. कास पुष्पपठारापासून अवघ्या पाच किमी अंतरावर निसर्गाचा हा चमत्कार आहे. या धबधब्यापर्यंत गाडीने जाता येत नाही. त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य अबाधित राहिले आहे.नीरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, वीणेच्या झंकारासारखा वाऱ्याच्या झुळकेने केलेला आवाज, पाण्याचा खळखळाट असं हे सुंदर, मनमोहक ठिकाण.भांबवली वजराई धबधबा बघितला कि स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखे वाटते. लांबच लांब पसरलेले हिरवेगार ओथंबून खाली आलेले काळे ढग, खळाळणारे निर्झर आणि मधूनच डोकावणारे छोटे धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

भांबवली वजराई धबधबा पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर आवर्जून भेट द्यायला हवी. भांबवली वजराई धबधबा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो हे मात्र नक्की. 








मी काही वनस्पती अभ्यासक नाही परंतु छंद म्हणून कासपठारावर आढळलेल्या काही फुलांची जुजबी माहिती खाली देत आहे.

11. Common name:- Marsh DewFlower
मराठी नाव:- अबोलीमा
Botonical Name:- Murdannia lanuginose
प्रजाती:- डे फ्लॉवर फॅमिली
हंगाम:- ऑक्टोबर ते नोव्हेंबर
आढळण्याची ठिकाणं :-  भारत द्विलकल्प (Peninsular India)




22. Common name:- Hairy Smithia or Micky mouse
मराठी नाव:- कावला
Botonical Name:- Smithia hirsuta
प्रजाती:-  Pea family
हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर





 3.Common name:- Large Dewflower
मराठी नाव:- नीलिमा
Botonical Name:- Murdannia simplex
प्रजाती:-  डे फ्लॉवर फॅमिली
हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर






 4. Common name:- Rock Dipcadi
मराठी नाव:- दिपकाडी
Botonical Name:- Dipcadi saxorum
प्रजाती:-  Asparagus family
हंगाम:- सप्टेंबर ते ऑक्टोबर
आढळण्याची ठिकाणं :-  बोरिवली मधील कान्हेरी च्या परिसरात मुख्यत्वे आढळतात






 5. Common name:- Grass leaved
मराठी नाव:- खुरपापणी किंवा सीतेची आसवे
Botonical Name:- Utricularia graminifolia
प्रजाती:-  Bladderwort family
हंगाम:- सप्टेंबर ते नोव्हेंबर

आढळण्याची ठिकाणं :-  सह्याद्री- पश्चिम घाट












Chinchwad Morya Gosavi Samadhi Mandir

चिंचवडचे मोरया गोसावी

संजीवन समाधी मंदिर



"गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

असे का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते, याची फार कमी लोकांना कदाचित माहिती असेल. चला आज गणेशोत्सवानिमित्त मी तुम्हाला याची गोष्ट सांगतो. गणपती बाप्पासोबत "मोरया" हा शब्द जुळून आला यामागे ६०० वर्ष जुनी कथा आहे.
महाराष्ट्रातील पुणे शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जातेपुण्यातील चिंचवड येथील मोरया गोसावी हे प्रसिद्ध देवस्थान आहे. हे देवस्थान नेमके कधी अस्तित्वात आले हे स्पष्ट करतील अशी कागदपत्रे उपलब्ध नाहीत. परंतु या पीठाचे मूळ पुरुष हे मोरया गोसावी होते. त्यांनी मार्गशीर्ष वद्य षष्टी शके १४८३ (इ. स. १५६१)ला संजीवन  समाधी घेतली. त्याच समाधीच्या ठिकाणी आजचे प्रसिद्ध मोरया गोसावी गणपती देवस्थान उभे आहे.
सन १३७५ मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे परम भक्त होते. असे म्हणतात कि, मोरया गोसावी हे मूळचे मोरगाव येथे वास्तव्यास होते. त्यांनी थेऊर येथे चिंतामणीची घोर तपश्चर्या केली होती. तेव्हा त्यांना चिंतामणी प्रसन्न झाल्याने अष्ट सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. थेऊरहुन ते पुन्हा मोरगाव येथे आले. त्यांनी गोरगरीबांच्या संकट निवारणाचे कार्य हाती घेतले. पण जनसेवेमुळे ध्यानधारणेला वेळ मिळेनासा झाला म्हणून ते चिंचवडनजीकच्या किवजाई जंगलात आले. ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून साधारण ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात नियमित दर्शनासाठी जात होते. चतुर्थीला मोरयाची पूजा करून पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत असत असा त्यांचा नित्यक्रम चालू होता.
वयाच्या ११७  वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले. परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. साधारण शके १४११ (इ. स. १४८९) ची गोष्ट,  नेहमीप्रमाणे ते मोरगावला वारीसाठी गेले असता मयूरेश्वराने मोरयांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला कि, ‘‘मोरया आता तू वृद्ध झालास. वारीला येतानाचे तुझे हाल पाहवत नाही रे. पुढे तू वारीला येऊ नकोस. मी चिंचवडला येतो. उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन.’’
दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले असताना त्यांच्या ओंजळीत शेंदरी रंगाचा तांदळा आला. त्यांनी ती मूर्ती देऊळवाडय़ात आणून प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर यांची समाधीही येथे बांधण्यात आली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते.
मोरया गोसावी हे देवस्थान पवना नदीकाठी आहे. चिंतामणी महाराजांनी श्रीमोरया गोसावींच्या समाधीच्या डोक्यावर येईल अशी जागा पाहून गुहेच्या वर सिद्धीबुद्धीसह गणपतीची मूर्ती स्थापन केली. हेच आजचे मोरया गोसावी गणपती देवस्थान होय. हे मंदिर २७ ऑक्टोबर १६५८ ते १३ जून १६५९ या काळात पूर्ण झाले. या मंदिराचे बांधकाम हे दगडी आहे. मोरया गोसावी यांच्या समाधीच्या समोरच श्रीचिंतामणी महाराजांची समाधी खोल गुंफेत आहे. त्या जागेवरही  एक द्विभुज गणेश मूर्ती आहे. चिंतामणी महाराज म्हणजे मोरया गोसावीचे  सुपुत्र.  मोरया गोसावींनी थेऊर येथे ४२ दिवस अनुष्ठान केले होते.  प्रसन्न होऊन चिंतामणीने त्यांना मुलगा होण्याचे वचन  दिले. जन्मतःच  छातीवर शेंदरी रंगाचा पंजा आणि खेचरी मुद्रा होती. तेच हे चिंतामणी महाराज. 
चिंतामणी महाराजांचीही महती हि देखील फार मोठी. एकदा अतिथी म्हणून तुकाराम महाराज आणि समर्थ समर्थ रामदास स्वामी आले. भोजनासाठी पाचारण केले असताना दोघांनीही आपल्या इष्ट देवतेला आवाहन केले आणि चिंतामणी महाराजांना सांगितले कि, "चिंतामणी देवा मोरयासी आणा".चिंतामणी महाराजांनी देवघरात जाऊन मंगलमूर्तीची आराधना केली. "मोरया माझी लज्जा रक्षी , दास रामाचा वाट पाहे सदना " असे सांगितले.  चमत्कार असा झाला कि, चिंतामणी महाराजांच्या जागी शुंडादंड विराजित मंगलमूर्ती दिसू लागले. ते अद्वैत अवस्थेला पोहोचलेले पाहताच दोघेही नतमस्तक झाले. तुकाराम महाराज म्हणाले, "तुम्ही तर प्रत्यक्ष देवच आहात. " तेव्हापासून  महाराजांचे शाळीग्राम आडनाव मागे पडून त्यांना "देव " हि उपाधी मिळाली आणि पुढील पिढ्यांमध्ये हे आडनाव रूढ झाले.
चिंतामणी महाराजांच्या देवळातून बघितले तर मोरया गोसावींच्या समाधीवरील गणपतीचे दर्शन व्हावे अशी उत्तम रचना केलेली आहे. देवस्थानाशेजारील पवना नदीवर सुबक घाटही आता बांधला आहे. मोरया गोसावी देवस्थानाला छत्रपती महाराजांच्या काळापासून पेशवेकाळापर्यंत अनेक सनदा प्राप्त झाल्या होत्या. मोरया गोसावी यांच्या सात पिढय़ांतील सत्पुरुषांच्या सात समाध्या याच मंदिर परिसरात आपल्याला पाहायला मिळतात. याच परिसरात श्रीकोठेश्वर नावाची जुनी उत्तराभिमुख मूर्ती देखील  आहे. तसेच शेजारी शमीचे झाड व प्रशस्त सभा मंडप बांधला आहे. उत्सवातील सर्व कार्यक्रम देऊळवाडय़ात होतात. देऊळवाडय़ातील मूर्ती वर्षांतून एकदा मोरगावला नेण्याची प्रथा आहे.
गाणपत्य संप्रदायाचा प्रसार मोरया गोसावींनी केला. ते मोरेश्वराचे अवतार  मानले जातात. मोरया गोसावींनी गणेश संप्रदायचा प्रसार केला आणि अखेर चिंचवड या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. गणपतीसोबत मोरया गोसावी यांचे नाव अशाप्रकारे जोडले गेले की,  लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात. अशा या महान गणेश भक्ताच्या चरणी वंदन - जय मोरेश्वर जय गजानन.

॥माझ्या मोरयाचा धर्म जागो।  
याचे चरणी लक्ष लागो।
याची सेवा मज घडो।  
याचे ध्यान हृदयी राहो |
माझ्या मोरोबाचा (मोरयाचा) धर्म जागो॥
-श्री गणेशभक्त योगी मोरया गोसावी










रणभूमी कावल्या - बावल्या खिंड


रणभूमी कावल्या - बावल्या  खिंड

(एका असामान्य लढ्याची साक्षीदार)




रणभूमी कावल्या - बावल्या  खिंड



दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या महादरवाजातून आणि टकमक टोकावरून उत्तरेच्या बाजूला नजर टाकली असता समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आकाशाला गवसणी घालणारे एक काळ्या भिन्न पाषाणाचे शिखर दिसते जे कोकणदिवा म्हणून प्रचलित आहे. पूर्वीच्या काळी दिशा दाखवण्यासाठी या शिखरावर दिवा लावला जात असे. म्हणूनच कदाचित त्याला कोकणदिवा असे नाव पडले असावे कदाचित!. याच कोकणदिवावरून राजधानी रायगडचा परिसर हा फार अप्रतिम दिसतो.
सह्य़ाद्रीच्या रांगांतुन रायगडाकडे उतरायला सर्वात जवळची वाट म्हणजे कावळे घाट. एका बाजूला कावळे गाव आणि दुसऱ्या बाजूला बावळे गाव यांच्या दोहोंमधली हि खिंड मराठयांच्या इतिहासात लढलेल्या एका रणसंग्रामाची साक्षीदार आहे.

कोकणदिव्यावरून दिसणारा रायगड आणि सभोवतालचा परिसर 




इतिहासाची पाने उलगडताना खिंड हा शब्द ऐकलं कि सर्वांच्या डोळ्यासमोर राहते ती  नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड ,प्रतापराव गुजर व त्यांच्या सहा रणमर्दानी लढवलेली नेसरीची खिंड आणि शिवरायांनी कारतलब खानाचा पराभव केलेली उंबरखिंड.  पण अश्या अजून कितीतरी खिंडी अजूनही पडद्याआडच आहेत. ज्याप्रमाणे या खिंडीने मराठ्यांचा पराक्रम पहिला तसाच पराक्रम या कावल्या-बावल्या खिंडीने गोंदाजी जगताप आणि सर्कले नाईक यांचा पाहीला. २५ मार्च १६८९ या दिवशी गोंदाजी जगताप आणि सर्कले नाईक यांनी शहाबुद्दीनखानाच तीनशे सैन्य याच रणक्षेत्री कापून काढले परिणामी राजाराम महाराजाना रायगडाहुन सुरक्षित जिंजीला जाता आले. रायगड जिल्ह्यात सांदोशी गावाच्या डोईवर उभी असलेली गोदाजी जगताप व जिवा सर्कले नाईक यांच्या पराक्रमाने पावन झालेली ही खिंड आजही तशी दुर्लक्षितच आहे
गेली कित्येक वर्ष दुर्गप्रेमींच्या सहवासाला मुकलेलेली हि खिंड आता नव्याने उजेडात आली आहे आणि दुर्गवीर सारख्या काही संस्था अश्याच अप्रचलित असलेल्या ऐतिहासिक जागा उजेडात आणण्याचे काम करत आहेत जेणे करून नव्या पिढीला हा न माहित असलेला इतिहास माहित व्हावा.
शौर्यदिनाच्या निमित्ताने या ऐतिहासिक खिंडीला भेट देण्याचा योग मला दुर्गवीरांच्या साथीने मिळाला. पुण्याहून रात्रीचाच प्रवास करत आम्ही चौघेजण निघालो. जाताना ताम्हिणी घाटाचा रस्ता पकडला. रस्त्याची दयनीय अवस्था पाहून उगाच या वाटेने आलो असं वाटायला लागलं होत. तीन तासाच्या प्रवासाला चक्क तास लागले आणि गम्मत म्हणजे जिथून रायगड जिल्ह्याची हद्द सुरु होते त्या नावाच्या पाटीखालून बरोबर चांगला रस्ता चालू होतो. प्रादेशिक वादामुळे रस्ते तसेच राहतात आणि प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होतात.
घाटरस्ता पार केल्यावर आम्ही रायगडला जाणारा रस्ता पकडला. रात्रीचा साधारण वाजला असेल. मुंबईहून आलेले दोघेजण आम्हाला जॉईन झाले होते आणि ते आमच्या पुढे व्हिलरवर चालत होते. अचानक ! ते दुसरी वाट सोडून उजव्या बाजूला गेले. "अरे!! ते वाट चुकले बघ.  फोन लाव त्यांना.. "
कॉल केल्यावर ते रिटर्न तआमच्या समोरच्याच रस्त्यावरून येताना दिसले. "अरेच्च्या!! हा काय प्रकार आहे. आम्ही तर तुम्हाला उजवीकडे जाताना पाहिलं मग तुम्ही समोरून कसे आलात. आम्हाला वाटलं रास्ता चुकलात म्हणून फोन केला. "चकवा तर नाही लागला ना.. " सचिन बोलले.
ट्रेकिंग ला जाताना बहुतांशी ट्रेकर्स ना असे अनुभव येतच असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे निघालो. रायगडच्या रस्त्यावरूनच डाव्या बाजूने एक रस्ता सांदोशी गावाकडे जातो. तोच पकडून आम्ही  थोड्याच वेळात गावातील मंदिरात पोहोचलो जिथे आमची राहण्याची व्यवस्था  केली होती. पहाटे उठल्यावर नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर सगळ्या नव्या-जुन्या दुर्गवीरांची ओळख झाल्यावर आम्ही खिंडीचा रस्ता  पकडला.
कावळे घाटाचा रस्ता हा अतिशय दाट  वनराईअसलेल्या जंगलातून जातो. या खिंडीत जाण्यासाठी दुसराही एक मार्ग आहे तो म्हणजे पुण्याजवळील पानशेतपासुन सुमारे तीस कि.मी.वर घोळ नावाचे एक गाव आहे. या गावापासून घोळ-गारजाईवाडी-कावले खिंड अशी भटकंती आपल्याला करता येते. आमच्या बरोबर ३८ वर्ष ट्रेकिंग चा अनुभव असलेले साधारण ५८ वर्षाचे एक गृहस्थ देखील होते. त्यांच्याशी गप्पा मारत थोडी दमछाक करत आणि विश्रांती घेत साधारण दीड तासाच्या चढाईनंतर आम्ही त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचलो जिथे रणसंग्राम घडला होता.


त्यावेळच्या अस्तित्वाच्या खुणा आजही आपल्याला पाहायला इथे मिळतात. इथे काही वीरगळी सापडल्या होत्या . त्या आता सध्या खाली नेऊन ठेवल्या आहेत. इथे खिंडीत एका दगडाला शेंदूर फासुन त्याची देव म्हणुन स्थापना केली आहे. या खिंडीत वरील बाजुने घसरून येणारी माती अडवण्यासाठी दोनही बाजुला दगडी भिंत घातलेली आहे ती आपल्याला आजही पाहायला मिळते. याच्याच माथ्यावर कोकणदिवा हा घाटाचा सरंक्षक उभा आहे. शिवकाळात या भागाचे फार मोठे महत्व होते. सह्याद्रीच्या या खो-यात असलेल्या डोंगररांगांतून रायगडावर सहजपणे पोहोचणे शक्य होऊ नये  म्हणून इथे चौक्या पहाऱ्या बसवलेल्या असायच्या. शिवकाळात घाटावरून येणारा मार्ग हा या दोन गावांच्या खिंडीतुन येई. त्यामुळे रायगडच्या रक्षणासाठी चौकी तयार करून जवळच्या सांदोशी गावातील जीवा सर्कले नाईक यांना चौकीचा नाईक (सोबत असणाऱ्या सैनिकांचे नाईक ) म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. काहींच्या मते सर्कले हे घराणे मूळचे दंड राजपुरी म्हणजे आत्ताचे मुरुड-रायगड येथील रामजी कोळ्याचे आरमार सांभाळत होते. रामजी कोळ्याने दिलेल्या सरखेल  या पदवीचा अपभ्रंश होऊन सर्कले  हे आडनाव रूढ झाले. या खिंडीच्या पराक्रमाची गाथा अशी कि,
तुळापूरी शंभूराजांच्या झालेल्या निधनानंतर औरंगजेबाने रायगडाचा फास आवळण्यास सुरुवात केली. त्याने सर्व सूत्रे झुल्फिरखानास दिली. शके १६११ शुक्ल संवत्सरे, चैत्र शुद्ध १५ औरंगजेबाच्या हुकुमानुसार झुल्फिरखानाने रायगडास वेढा दिला. ह्याच वेळी संपूर्ण राज घराणे येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले होते. ही सुवर्ण संधी ठरवून औरंगजेबाने शहाबुद्धीन खानाला झुल्फिरखानाच्या मदतीस धाडले. माणकोजी पांढरे सारखे गद्दार हे आधीच मुघलांना जाऊन मिळाल्याने त्यांना खिंडीतून रायगडाला येण्याचा मार्ग माहित झाला.

शहाबुद्दीनखानाने २५ मार्च १६८९ या दिवशी हजारोंच्या सैन्याने या खिंडीतुन रायगड गाठण्याचा प्रयत्न केला़. याची माहिती जिवाजी नाईक सर्कले गोदाजी जगताप ह्या दोन सरदारांना झाली आणि स्वराज्याची राजधानी रायगडच्या रक्षणार्थ कावल्या- बावल्या  खिंडीत दोघेही फक्त आपल्या मावळ्यांसह  उभे ठाकले.  प्रत्येकाने आपापल्या हल्ल्याच्या जागा हेरून ठेवल्या होत्या.  शत्रू सैन्य टप्प्यात येताच मराठ्यांच्या गोफणी आग ओकू लागल्या. रणसंग्राम पेटला. पहिली फळी -दुसरी फळी  गारद झाली.  हाती असलेली समशेर घेऊन सारे वीर शत्रू वर तुटून पडले. भेटेल त्याल कापत मराठे वीर पुढे सरकू लागले. अंगावर तर रक्ताचा अभिषेकच होत होता. पण त्याची पर्वा होती कोणाला!. ध्येय फक्त एकच !  स्वराज्याचे रक्षण आणि राजाराम राजांना सुखरूप ठेवणे . काही मराठे खिंडीत कमी आले. कणभर मराठे मणभर मोघलांना पुरून उरले. मराठ्यांचा तो आवेश पाहून मोघली सैन्य माघार घेऊन पळाले. पराक्रमाची शर्थे झाली. मोघलांच्या वाढीव तुकड्या झुल्फिरखानाच्या फौजेला मिळण्यात असमर्थ झाल्या. खिंडीत जगताप आणि सर्कले घराण्यातील माणसांनी बाजीप्रभुसारखा पराक्रम केला. याच चार हातानी मोघलांचे ३०० सैन्य कापून काढले आणि त्यातच शेवटी हे दहाही वीर धारातीर्थी पडले. तत्कालीन प्रथेनुसार या दहा वीरांच्या विरगळ त्यांची आठवण म्हणुन उभ्या राहिल्या़. या विरगळ काही सतीशीळा आजही सांदोशी गावात आपल्याला पहायला मिळतात.
मोघलांचा हा डाव गोदाजी जगताप जिवाजी सर्कले नाईक आणि त्यांच्या नऊ योध्यांनी हाणून पाडला म्हणूनच राजाराम महाराजांना वाघ दरवाजाने सुखरूप निसटता आले आणि मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध आणखी काही वर्ष चालू राहिले.
गोदाजी जगताप जिवाजी सर्कले नाईक यांनी पराक्रमाची शर्थ केली नसती तर आज महाराष्ट्राचा इतिहास काही वेगळा वाचायला मिळाला असता. अश्या या घनघोर युद्ध्याच्या इतिहासाची साक्षीदार आहे हि कावल्या - बावल्या खिंड.
एकदा तरी इतिहासाचा मागोवा घ्यायला आणि आपल्या शूरवीरांच्या रक्ताने पावन झालेल्या या ठिकाणी एकदातरी भेट द्यायला हवी.

इतिहास संदर्भ:-  किल्ले रायगड कथापंचविसी. तो रायगड, दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि आंतरजालावरून साभार.












water tank in kokan diwa