समर्थांची शिवथरघळ

समर्थांची शिवथरघळ






कसे जाल:- महाडवरून बिरवाडी मार्गे किंवा पुण्याहून वरंध घाटातून भोरमार्गे बारसगावपर्यंत येऊन मग आतमध्ये गेले कि शिवथरघळीच्या मार्गाला आपण लागतो. वरंध घाटातून माझेरी सुन्याभाऊची खिंड ह्या मार्गे पायी चालत देखील घळीत येत येते. तसेच राजगड गोप्याघाटाची खिंड, रायगड उतरून पोटाल्याच्या डोंगराकडून बिरवाडी मार्गे देखील घळीत येता येते.



शिवथरघळ एक अविस्मरणीय अनुभव




    शिवथरघळची भेट अशीच अचानक न ठरवता झाली. दरवर्षी मामाकडे (माणगावला) जातो . या वर्षीहि गणपतीला मामाकडे गेलो असताना, भाऊ आणि मी दोघांनी शिवथरघळला भेट द्यायचे ठरवले, मग काय ! रेनकोट चढून Bike वर दोघेही स्वर झालो. निघताना फारसा पाऊस नव्हता. पण लोणेरे सोडल्यानंतर मात्र पावसाने आपला रंग बदलला आणि धो-धो सारी कोसळायला सुरुवात झाली. Bike वर असल्याने पावसाच्या सरी काट्याप्रमाणे चेहऱ्याला टोचत होत्या, पण त्यात सुद्धा मजा वाटत होती.

हळू हळू करत आम्ही महाड सोडले आणि काही अंतरावर गेल्यावर मुख्य महामार्गावरून left turn मारून शिवथर च्या मार्गाला लागलो. एव्हाना महाड शहरापासून बरेच अंतर कापले होते, आजूबाजूला हिरव्यागार निसर्गाचे अप्रतिम दर्शन होत होते. थोड्यावेळाने ढालकाठी गावाजवळ पोहोचलो आणि समोर एका अप्रतिम धबधब्याचे दर्शन झाले. इतका सुंदर आणि सुरक्षित धबधबा मी आजवर पहिला नव्हता. पण तिथे जास्त वेळ घालवून चालणार नव्हता, लगेच आम्ही पुढे मार्गस्थ झालो. वाटेत दिसणारया ,सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा,त्यांच्या अंगा खांद्यावर खेळणारे असंख्य छोटे –मोठे धबधबे, सृष्टीने पांघरलेला हिरवा शालू सर्व काही अवर्णनीय होते.

     


    हे सर्व सौंदर्य हावरया सारखे नजरेत जितके सामावेल तितके सामावून घेत होतो. अजून बरेच अंतर होते, आता तर गावेही दिसेनाशी झाली होती. पावसाचा जोर वाढतच होता. बाजूने वाहणारी नदी रस्त्याला स्पर्श करू पाहत होती.

आणखी तासभर जर असाच पाऊस पडला तर रस्ता बंद होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे कुठे हि वेळ न घालवता थेट शिवथरघळ गाठायचे ठरवले. थोड्याच वेळात आम्ही पवित्र ठिकाणी अर्थातच शिवथरघळला पोहोचलो. वरती पोहोचण्यासाठी पायऱ्यांची उत्तम आणि सुरक्षित व्यवस्था आहे.









समोर तो महाकाय, अजस्त्र धबधबा बघानारयाच्या मनात धडकीच भरवतो. कारण ऐन पावसाळ्यात येथील धबधबा रौद्र रूप धारण करतो. याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. त्याचे आवाजाने आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातो. त्या पाण्याचा प्रवाह एवढा आहे कि घळीपर्यंत जाताना तो आपल्याला जाणवतो. त्याच्यामुळे एक लहानशी नदीच तयार झाली होती. त्याला लागूनच समर्थांची घळ आहे. दासबोधाचे लिखाण समर्थांनी येथेच केले. 










समर्थांच्या जीवनात घळींना फार महत्व आहे. आपल्या जीवनातला बराचसा काळ समर्थांनी ह्या घळींमध्ये व्यतीत केला आहे. समर्थ संप्रदायामध्ये या घळींना विशेष महत्व आहे.


मनुष्य सरपटत, रांगत किंवा उभा राहून आतमध्ये जाऊ शकेल असे जमिनीतील किंवा डोंगरातील एक नैसर्गिक विवर म्हणजे घळ. घळ म्हणजे नैसर्गिक गुहा किंवा गुंफा.

     


      समर्थांच्या साधारण ८ घळी मला माहिती आहेत.

हेळवाकची घळ, तारळे(तोंडोशी) घळ, मोरघळ, सज्जनगडची रामघळ, चाफळची रामघळ, चंद्रगिरीची घळ, जरंडेश्वराची घळ आणि दासबोधाची गंगोत्री शिवथरघळ.

त्यातील शिवथरघळ दर्शनाचे भाग्य मला आज लाभले होते.


दासबोधाचे लिखाण समर्थांनी येथेच केले. समर्थांनी सांगावे, कल्याण स्वामींनी लिहावे. असा हा गुरुशिष्य संवादरूपाने ७७५१ ओव्या, २०० समास व २० दशके असलेला ग्रंथराज दासबोध हया घळीतच सिद्ध झाला. दासबोध हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ. येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य, ४०-५० फुट उंचीवरून कोसळणारा तो महाकाय धबधबा,घनदाट जंगल, निर्मनुष्य वस्ती, आजूबाजूला सह्याद्रीचे उंचच उंच कडे. अश्या वातावरणात समर्थांनी दासबोधासारखा महान जीवनग्रंथ लिहिला. पावसाळ्यात तर घळीचे सौंदर्य फारच खुलून दिसते.

समर्थांच्या शब्दातच आपण शिवथरघळीचे वर्णन पाहू —

गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनी चालली बळे |

धबाबा लोटल्या धारा | धबाबा तोय आदळे ||१||

गर्जती मेघ तो सिंधू |ध्वनी कल्लोळ उठला |

कडयासी आदळे धारा |वात आवर्त होतसे ||२||

समर्थांनी या घळीला सुंदरमठ हे नाव दिले होते.
सुंदर मुर्ती सुंदर गुण | सुंदर कीर्ती सुंदर लक्षण

सुंदरमठी देवे आपण | वास केला ||

सुंदर पाहोन वास केला |दास सन्निध ठेवला |

अवघा प्रांतची पावन केला |कृपा कटाक्षे ||

दरे कपारी दाते धुकटे |पाहो जाता भयची वाटे |

ऐसे स्थळी वैभव दाटे | देणे रघुनाथाचे ||


आत घळी मध्ये श्री दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अश्या प्रकारची मूर्तीची स्थापना केली आहे.


रामदास स्वामी घळ सोडून गेल्यानंतर तिचे महत्व कमी होत गेले आणि ती जणू काळाच्या पडद्याआड गेली होती. कागदोपत्री इ.स.१७४१ साली दिवाकर गोसाविचे नातू दिवाकर ह्याने घळीत राहून ज्ञानेश्वर माऊलीच्या अमृतानुभवाची प्रत केली होती असा उल्लेख सापडतो. त्यानंतर १९३० साली शं. श्री. देव ह्यांनी हि घळ शोधून काढली असे समजते.

९ जानेवारी १९५० ला समर्थ सेवा मंडळ स्थापन झाल्यानंतर श्री दासबोध सांगत आहेत व कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अश्या प्रकारची मूर्तीची स्थापना प.पु. श्रीधर स्वामींच्या हस्ते करण्याचे ठरले.त्याप्रमाणे माघ शुद्ध अष्टमी शके १८८१ (१९६०) या दिवशी मूर्ती स्थापन झाली व माघ शुद्ध नवमीला दासबोध त्रिशत सांवत्सारिक जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. एवढी साधारण माहिती मला शिवथरघळ बददल होती.

बाजूला भक्तांसाठी राहण्याची सोय आहे तसेच वर्ष भर चालणाऱ्या कार्यक्रमांची याधी हॉल भर लावलेली होती.

     
  

    या पवित्र स्थानाचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी मद्यपीनि प्रवेश करू नये अशी पाटीच प्रवेशद्वारावर लावलेली आहे. संपूर्ण परिसराचे एकदा मन भरून दर्शन घेतले, आज मन तृप्त झाले होते, एवढ्या वर्षांची कमान आज पूर्ण झाली होती. समर्थना एकदा त्रिवार वंदन करून त्या पवित्र स्थानाचा निरोप घेतला.



|| जय जय रघुवीर समर्थ ||





© Mayur H.Sanap 2011