निसर्गरम्य सुधागड




पावसाळा सुरु झाला रे . . कुठे नेतोस का नाही आम्हाला मयुर .. ट्रेकिंग ला जाशील तेव्हा मला बोलावं हं नक्की! राजगड ला जाऊन आल्यापासून श्रीकांत ट्रेकिंग साठी खूप हौशी झाला होता. त्यात सचिनच हि सारखं चालू होतचं पावसाळा सुरु झाला मयुर अजून कुठे गेलो नाही आपण; काय करतोस काय? चल. आणि आमचा हेमंत काय नेहमी एका पायावर तयार. शेवटी सगळ्यांच्या सुट्ट्याचं  नियोजन करून एक दिवस शेवटी गुरुवारचा जायचा ठरवला. मी सुधागड ला जाऊया असे सुचवलं आणि सगळे जण तयार झाले.
प्रथम सकाळी पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायचे आणि मग सुधागड च्या वाटेला लागायचं अस नियोजन ठरलं .
मी, हेमंत, सचिन आणि श्रीकांत ; मजेत सांगायचं तर एक मार्गदर्शक, एक फोटोग्राफर, एक चालक आणि एक व्यवस्थापक असे आम्ही चार जण गुरुवारी सकाळी सुधागडला जाण्यासाठी निघालो.
सकाळ पासूनच मस्त पाऊस चालू होता. पनवेल सोडल्यानंतर जुन्या पुणे महामार्गाला लागल्यावर छोट्या छोट्या धबधब्यांनी दर्शन द्यायला सुरुवात केली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडी आणि सतत चालू असणारा पाऊस मनाला सुखावून टाकत होता. पाली फाटा सुरु झाल्यावर गर्द झाडीचा परिसर सुरु झाला. पाली- खोपोली या मार्गावरून पावसाळ्यात सफर करायची मजा वेगळीच. याच परिसरात एक फाटा जातो तो उंबरखिंडी कडे जिथे महाराजांनी कारतलब खानाच्या ३५००० मुघल सैन्यचा पराभव केला होता तो ही आपल्या १००० मावळ्यांपैकी एकही न गमावता. त्याची रंजक माहिती सांगत आमची गाडी पुढे मार्गस्थ होत होती. थोड्याच वेळात आम्ही पालीला पोहोचलो. अतिशय मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असलेले रायगड जिल्ह्यातील हे गाव सह्याद्री मधील काही महत्वाच्या घाट वाटांच्या जवळ आहे. कोकणातून देशावर येण्यासाठी जे महत्वाचे मार्ग आहेत त्यापैकी एक हा पाली जवळून जातो. 
पाली चा बल्लाळेश्वर हा तर आमचा समस्त रायगड वासियांचे श्रद्धास्थान. त्यामुळे त्याच्या दर्शनाशिवाय मी पुढे जाणे शक्यच नाही. मंदिराच्या आवारात गेल्यावर पाठीमागच्या बाजूला उंच डोंगर आपल्याला दिसतो तो म्हणजे सुधागड चा जुळा भाऊ सरसगड. ज्याचा वापर त्यावेळेस टेहाळणीसाठी होत असे. त्याच्या कडे एक धावती नजर टाकून आम्ही मंदिरात प्रवेश केला. 
अष्टविनायकांमध्ये स्थान प्राप्त झालेला पालीचा बल्लळेश्वर सरगडाच्या पायथ्याशी एका प्रशस्त देवालयात विराजमान झालेला आहे. कुठलाही विशेष दिवस नसल्यामुळे मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. दर्शन अगदी उत्तम झालं. मंदिरातील स्वच्छता, सुबकता आणि जुने बांधकाम हे आपल्या नजरेला भावल्याशिवाय राहत नाही. तसेही कोकणातल्या देवस्थानांची हि विशेषतः च अगदी कुठेही तळकोकणापर्यंत कुठल्याही देवळात जा! खास करून गणपतीच्या; तिथे तुम्हाला स्वच्छता आणि सुबकता हि दिसणारच. त्यामुळे दर्शन घेतल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटलचं पाहिजे. 
आजूबाजूचा शांत आणि रम्य परिसर पाहून श्रीकांत खूप सुखावून गेला होता आणि पुढच्या वेळेला मी माझ्या कुटुंब समवेत कुठेही गर्दीच्या ठिकाणी न जाता इथेच येईन असा जणू काही त्याने पणचं केला. प्रसन्न मनाने विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यावर आम्ही सुधागडच्या वाटेला लागलो.
ऐतिहासिक आणि धार्मिक अशी दोन्ही पार्श्वभुमी असलेला असा हा सुधागड-पाली चा परिसर. सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. इथूनच जवळ ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा असे समजतात  पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या भोरपगड डोंगरावर केली असे मानतात. नंतर शिवकाळात महाराजांच्या पदस्पर्शाने याचे नामकरण सुधागड असे झाले. इ.स. १६४८ साली हा किल्ला राज्यात सामील झाला. तसेच गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर या गावातच संभाजी राजे  व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजी राजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परळी गावात हत्तीच्या पायी दिले. शंभू राजांच्या चरित्रात आपल्याला याचा उल्लेख मिळतो.
सुधागडच्या पायथ्याशी असणाऱ्या ठाकूरवाडी जवळ आम्ही आमची गाडी ठेवली आणि तिथून पायवाटेने गडावर जाण्यास सुरुवात केली.  तिथूनच आमच्या सोबत आम्हाला आमचा एक नवा सोबती सुद्धा मिळाला. शाळेपासूनच एका श्वानाने आम्हाला साथ द्यायला सुरुवात केली. तो पुढे पुढे आणि आम्ही त्याच्या मागे. जणू तो आमचा मार्गदर्शक होता. बरोबर अचूक पायवाटेने तो आम्हाला घेऊन जात होता. बहुधा हा त्याचा रोजचाच रस्ता होता.





जवळपास अर्धा- एक तासाची पायपीट केल्यावर आपण एका अरुंद अश्या चढ असलेल्या वाटे जवळ येतो तिथून वरती जाण्यासाठी एका मजबूत शिडीची सोय केलेली आहे. तिचा आधार घेत आम्ही वरती पोहोचलो. तिथून दिसणारे दृश्य तर अप्रतिमच! डोळ्याचे पारणे फेडणारे होते. खाली असणारी खोल दरी, तिथून खाली उतरणारे ढग आणि समोरच्या धबधब्यामुळे निर्माण झालेली वळण वळण घेत जाणारी नदी . अहाहा ! सारं कसं एखाद्या चित्रकलेच्या तासाला काढलेल्या चित्रा प्रमाणे; पण वास्तवात असणारं.





आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा या उंक्तीची खात्री आपल्याला इथे अनुभवायला मिळते. आषाढ महिन्यातील बरसणारा पाऊस, सर्वत्र  पसरलेली हिरवी चादर आणि धुक्याचे साम्राज्य. याचा आनंद घेत , एखाद दोन सेल्फी काढत आम्ही मस्त चालत होतो. तर या सगळ्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यात हेमंत मग्न होता. एवढ्या पावसात फक्त वॉटरप्रूफ कॅमेराच चालू शकतो आणि हेमंत त्याचा पुरेपूर फायदा घेत असल्याने सचिन ने तर त्याला "वॉटरप्रूफ फोटोग्राफर हेमंत कोरेगांवकर " हि पदवीच बहाल केली.




वरती पठारावर पोहोचल्यानंतर आम्ही भोराई देवीच्या मंदिरात ओलेत्यानेच प्रवेश केला.  काळ्याकुट्ट अंधारात मोबाइलला चा उजेड लावून आम्ही देवीचे दर्शन घेतले. गडांवरील देवळात दिवा लावण्याची मला भारी आवड. हीच खरी दैवतं ज्यांनी शिवकाळात मावळ्यांच्या हाताला बळं दिलं आपलं स्वराज्य राखण्यासाठीं अशी माझी ठाम धारणा. प्रत्येकाला माथा टेकवण्याची श्रद्धास्थान हे लागतचं त्यातूनच त्याला नव्या कार्याची ऊर्जा आणि उर्मी मिळते. म्हणूनच काय त्यावेळी गड-किल्ल्यांवर देवस्थानांची निर्मिती झाली असावी.पण जवळ आणलेल दिवा बत्तीचे साहित्य एवढ्या पावसात भिजून वाया गेलेलं होत. त्यामुळे मोकळ्या हातानेच देवीचे दर्शन घेतल. हि छोटीशी हुरहूर मात्र मनाला लागून राहिली.
तिथून निघाल्यानंतर पठारावरूनच एका बाजू,ला उभ्या कातळ कड्यावरची तटबंदी स्पष्ट दिसत होती. त्या वेळी कशी काय बांधली असेल याचे कौतुक करत आणि निसर्गाचा पाहत आम्ही बराच वेळ तिथे घालवला. समोरचा मोठा दिसणारा धबधबा आणि ते मोहक दृश्य पाहून तर "DSLR हवा होता यार !" असे उद्गार हेमंत च्या तोंडातून बाहेर पडले. मी मात्र सगळं नजरेत जेवढे सामावून घेता येईल तेवढे घेण्याचा पर्यटन करत सर्व अनुभवत घेत होतो.





सुधागड ला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहेपावसाळ्यात तर येथील दृश्य केवळ नयनरम्य म्हणावे असे असतेगडाची समुद्रसपाटीपासून उंची ६१९ मीटर आहे.. गडावर टकमक टोक आहेया टोकावर उभे राहिल्यावर समोर उभा असणारा धनगडकोरीगड तैलबैला दिसतो. गडावर अनेक तलाव आहेतपंत सचिवांचा वाडातसेच भोरेश्वराचे मंदिर आहेपाच्छापूर दरवाजा, दिंडी दरवाजाधान्य कोठारेभांडय़ाचे टाकेहवालदार तळेहत्तीमाळ अशी बरीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेतपावसाळ्यात हे सर्व पाहणे जरा अवघडच होऊन जातं.




गडाच्या सभोवताली अनेक औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचा वावर आहे. एकूणच दुर्गप्रेमी आणि वनवाटांवर प्रेम असणाऱ्यांसाठी सुधागड हे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. इथे मुलांसाठी साहस शिबिरं तर घेतली आहेतच, पण त्याचबरोबर अनेक संस्था दुर्गसंवर्धनाचे काम नेटाने करत असतात.


मंदिरा  बाहेरील वीरगळ 

भोराई देवी मंदिर 

थोड्याच वेळात आम्ही परतीच्या वाटेल निघालो. 
या सर्व निसर्गाचा आनंद घेत असताना या सगळ्यात आमचा अति उत्साही श्रीकांत मात्र दोनदा निसरड्या जागेवरून आपटला. "काय होऊन राहिलं बे " अशी आपली टिपिकल विदर्भ शैलीत झाडत उभा राहिला. मग तिथल्याच झऱ्यावर कपडे साफ करत त्याची मजा घेत आम्ही निघालो. सर्व ठिकाणी असणारा श्वान मित्र परतीच्या वाटेवरही आमच्या सोबतच होता. अगदी खाली शाळे जवळ येई पर्यंत. जाणून काही या सर्व प्रवासात तो आमचा एक सोबतीचा झाला होता. जवळ खाण्याचे काही सामान नसल्याने गावातील जवळच्या दुकानातून बिस्कीट पूडा घेऊन त्याला दिला आणि तो खात खात मस्त शेपूट हलवत आम्हाला जणू काही धन्यवादच देत होता. त्याला टाटा -बाय -बाय करत आणि सुधागडच्या निसर्गरम्य परिसराला आठवणींच्या रूपाने साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.






छायाचित्र सौजन्य: हेमंत कोरगांवकर