चला रे! कोर्लईला. अशी एक साद दिली आणि
आम्ही तयार झालो. मी,हेमंत आणि सचिन. मागच्या
वेळेला येऊ न शकलेला सचिन या वेळेला मात्र शिफ्ट चे नियोजन करून आला. खरं तर गड किल्ल्यांची आवड असलेल्या भटक्यांना फक्त
एक साद घालायचा अवकाश कि लगेच बॅग पॅक करून तयारच.
अलिबाग ला जायचं तर बाईक ने जाऊया म्हणजे
मनसोक्त भटकंती करता येईल असे मी सुचवल्यावर हेमंत आधी हो-नाही.. अरे मी एवढ्या लांब
कधी बाईक ने गेलो नाही वगैरे करता करता शेवटी तयार झाला. निघायच्या आधीची पूर्वतयारी
म्हणून पद्धतशीर एक कॉन्फरेन्स कॉल घेऊन सगळी प्लांनिंग केली. कितीही केलं तरी शेवटी
आम्ही IT वाले मग कुठल्याही गोष्टीची तयारी आमची कॉन्फरेन्स कॉल शिवाय पूर्ण कशी होणार?
नाही का?
गुरुवारी पहाटेच तुम्ही निघा, मी तुम्हाला
पनवेलला भेटतो. असं आमचं ठरलं होतं पण आयत्या
वेळेला माझा जरा प्रॉब्लेम झाल्याने मग पनवेलला न भेटता मी तुम्हाला वडखळला भेटतो असे
ठरले आणि तिथून मला सोबत घेऊन आम्ही तिघे
पुढच्या प्रवासाला निघालो.
whatsapp वर पाठवलेल्या विनोदाचा खरा अनुभव हेमंतला पेण -वडखळ रस्त्याच्या प्रवासावरून चांगलाच आला होता. वडखळ सोडल्यावर पुढे तर पावसामुळे सगळी रस्त्यांची पार दुरावस्था झाली होती. जिथे तिथे फक्त खड्डेच- खड्डे आमचे स्वागत करत होते अधून मधून कुठे तरी चांगला रस्ता आला कि दोघे हि जण आपली गाडी रेमटवत होते. "अरे काय हि तुमच्या रस्त्याची अवस्था?' असे म्हणून हेमंत ने मला हिणवले.
"अरे तुझे पण गाव कोकणातलेच ना. मग तुला माहित नाही कोकणातले रस्ते कसे असतात ते. माहिती आहे मोठा मुंबईवाला, जसे काय मुंबई मध्ये खड्डेच नाही असे सांगतो मला. आणि इथे कोकणात काही घाटावरच्या सारखा मंद पाऊस पडत नाही. इथे पूल वाहून जातात तर हा रस्ता काय चीज आहे." मी पण त्याला चांगला प्रतिसाद दिला.
असा आमचा चेष्टा मस्करी करत प्रवास चालू होता. बरं! सर्वात मोठी काळजी तर आम्हाला सचिनची कुठल्या "बाबा आदमजादच्या " जमान्यातील बाईक घेऊन आला होता काय माहिती या असल्या रस्त्यावरून चालवताना खड्डयातून गेली कि खणकन आवाज द्यायची shock absorber नावाचा काही प्रकार अस्तित्वात असतो हे तिच्याकडे पाहून कळतंच नव्हतं. सारखा "घडगड- घडगड " आवाज करत होती आणि त्यातुनच तिला तो एखाद्या रायडर सारखी तुफान रेमटवत होता. सारखं- सारखं थोडे पुढे गेल्यावर "सचिन .. आहेस ना रे बाबा" असं म्हणून आम्ही त्याच्यासाठी मागे पाहायचो आणि तो पण पाठीमागून हात दाखवत मी सलामत आहे तुमच्या पाठीमागून येतोच आहे अशी खूण दाखवायचा.
सर्वप्रथम चौलच्या दत्त मंदिरात जायचे आणि मग पुढे कोर्लईला असे आधीच ठरल्याने आम्ही त्या दिशेला निघालो. वाटेत भेटणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा, टुमदार दिसणारे बंगले आणि ढगाळ वातावरण फार प्रसन्न करत होतं. चौल चे दत्त मंदिर हे फार प्राचीन अगदी उंच टेकडीवर वसलेलं त्यामुळे पावसाळ्यातील इथले सौंदर्य तर अप्रतिमच. पूर्वी तर इथे जायला नीट रस्ताही नव्हता आता मात्र छान डांबरी रस्ता अगदी आपल्याला पूर्ण पायथ्याशी घेऊन जातो आणि मग फक्त काही पायऱ्या चढून आपल्याला लगेच दत्त महाराजांच्या सुंदर मूर्तीचे दर्शन होतं. आताचे मंदिर नीट व्यवस्थित बांधलेले आहे. साधारण एका वेळेला १०-१५ जण व्यवस्थित दर्शन घेऊन शकतात इतकी मुख्य गाभार्याच्या समोर जागा आहे. वरून आपल्याला संपूर्ण चौल आणि रेवदंड्यात पसरलेल्या नारळी-पोफळीच्या बागांचे आणि
लांबवर रेवदंड्याच्या खाडीचे सुंदर दृश्य दिसते. दत्त जयंतीला तर इथे फार मोठी यात्रा भरते. पेण,अलिबाग अगदी लांबून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. थोडा वेळ विसावून आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. थोडी विचारपूस केल्यावर तिथल्याच एका मुलाने आम्हाला एक शॉर्टकट सुचवला जो तुम्हाला रेवदंडा किल्ल्यापर्यंत घेऊन जाईल असे त्याने सांगितले मग आता आलोय तर रेवदंडा किल्लाही पाहूया अशी हेमंत ने गळ घातली.
" अरे तिथे आता किल्ला नाहीये . फक्त तटबंदी पाहण्यासारखी आहे. त्याला रेवदंड्याची तटबंदी म्हणतात" माझ्यातल्या इतिहासकाराने माहिती पुरवली.
"ठीक आहे ना. जे काही आहे ते पाहूया" . आम्ही सचिन कडे पाहिलं.
"अरे माझी तर इथे वस्तीला राहायची पण तयारी आहे. " सचिन तर इथले पावसाळ्यातील सौंदर्य पाहून वेडाच झाला होता.
त्या मुलाने सुचवल्याप्रमाणे थोड्याच वेळात आम्ही रेवदंड्याच्या किल्ल्याजवळ पोहोचलो. किल्ला म्हणून आता त्याचे अस्तित्व फारसे काही दिसत नाही आता तिथे त्याचे फक्त भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात.
कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी १५ व्या शतकात खाडीच्या मुखावर हा किल्ला बांधला. १६८३ मध्ये संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी रेवदंडा किल्ल्यावर हल्ला केला परंतु किल्ला काही जिंकता आला नाही. संभाजी महाराजांचे चरित्र वाचताना आपल्याला या लढाईचा उल्लेख केलेला मिळतो.
रेवदंड्याच्या प्रवेशद्वारावर आपल्याला
पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह पाहायला मिळते. किल्ल्यावर सातखणी मनोर्याचे सात पैकी
चार मजले बाकी आहेत. काही तोफा आपल्याला मनोऱ्याच्या पायथ्याशी पाहायला मिळतात. इथले
मुख्य आकर्षण म्हणजे "रेवदंड्याची तटबंदी." तिचा परीघ साधारण ४-५ कि.मी.
चा आहे. या किल्ल्याचं आणखी एक विशेष म्हणजे
तटबंदीच्या खाली असलेला भुयारी मार्ग. परंतु ते आता वापरात नाहीत.
तेथूनच पुढे किनाऱ्यावरून आपल्याला कोर्लई
चे दर्शन होते. सुट्टीचा दिवस नसल्याने आमच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. त्यामुळे
सगळीकडे निरव शांतता होती. सचिन बापडा तर फारच खुश होता. समुद्रकिनाऱ्यावरची अशी छान
शांतता तो अगदी मस्त अनुभवत होता, तो तर तिथून निघायलाच तर नव्हता. पण अजून पुढचा पल्ला
गाठायचा आहे असे सांगून त्याला तिथून काढता पाय घ्यायला लावला.
साधारण ७-८ कि.मी. अंतर पार केल्यावर
आम्ही कोर्लई गावात पोहोचलो. किल्ल्यावर जायचा
मार्ग हा कोर्लई गावातूनच जातो. गावातून बाहेर
पडल्यानंतर किल्ल्याकडे जाणारा चिंचोळा रास्ता सुरु होतो. डाव्या बाजूला पसरलेला अथांग समुद्र, उजवीकडे कोर्लईचा
डोंगर आणि समोर दिसणारा द्विपगृह (Light house) आणि त्यातून होणार आपला प्रवास अहाहा!! हा अनुभव तर अवर्णनीयच !! द्विपगृहाजवळ जवळ पोहोचल्यावर आम्हाला वरती किल्ल्यावर
जायचे आहे असे सांगितल्यावर तेथील सरकारी कर्मचाऱ्याने गेट उघडून आम्हाला आत प्रवेश
दिला कारण लाईट हाऊसच्या मागे असलेल्या पायऱ्या चढूनच आपण पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून
किल्ल्यात प्रवेश करतो. तशी एक दुसरी वाटहि आहे ती दुसऱ्या मार्गाने आतून गावातून वरती
थेट बालेकिल्ल्याजवळ नेते.
किल्ल्याची रुंदी जरी कमी असली तरी हा
दक्षिणोत्तर चांगलाच पसरलेला आहे. मुख्य द्वारातून प्रवेश केल्यावर डावीकडे आणि उजवीकडे
दोन्ही ठिकाणी प्रवेश द्वारे आपल्याला दिसतात.
डावीकडे गेल्यावर तटबंदीच्या बाजूला काही तोफा ठेवलेल्या आपल्याला दिसतात. तसेच
खाली एक निमुळता रास्ता जातो तो आपल्याला थेट समुद्र किनाऱ्यालगत घेऊन जातो. आम्हीही तिकडे निघालो. वरूनच उजवीकडे पाहिल्यावर
समोरून येणारी कुंडलिका नदी आणि समुद्र यांचा संगम दिसतो जणू काही ती समुद्राला आलिंगनच
देत आहे असा भास आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही.
हा किल्ला समुद्रकिनारी वसला असल्याने
आपल्याला वरून विहंगम दृश्याचे दर्शन होते. समुद्र किनारा स्वच्छ असून निळ्याशार रंगाचे
पाणी पाहायला मिळते. तीनही बाजूने वेढलेला समुद्र, फक्त एका बाजूने असणारी जमीन आणि
वरून दिसणारे कुंडलिका नदीचं मिलन. हे कोर्लई चे वैशिष्टय. असा किल्ला इतरत्र पाहणे दुर्मिळच आणि पावसाळी तर
हा अगदी सौंदर्याने न्हाउनच निघालेला असतो. त्यामुळे हा अनुभव अवर्णनीयच!!
पुन्हा पाठीमागे येऊन ऊजव्या बाजूच्या
प्रवेशद्वारातून आत शिरलो. तिथेही समोर २ तोफा दिसत होत्या. डावीकडे पाहिल्यावर आपल्याला
रेवदंड्याची आजही भक्कम असलेली तटबंदी पाहायला मिळते. आणखी एका प्रवेश द्वारातून पुढे
गेल्यावर माथ्यावर काही तोफा पाहायला मिळतात. गडावर बऱ्याच ठिकाणी तटबंदीजवळ आपल्याला
तोफा पाहायला मिळतात. त्यांना पाहून समोरून येणाऱ्या शत्रूवर या किती अंतरापर्यंत मारा
करत असतील याचा उगाच अंदाज घ्यायचा प्रयत्न मी करत होतो. किल्ल्यावर असणारी स्वच्छता आणि समोर असलेल्या चर्चचे
झालेले डागडुगीचे काम प्रकर्षाने दिसून येत होते. उजव्या हाताला पांढऱ्या देवचाफ्याच्या
झाडाखाली शंकराची पिंड आहे. आणि तिथेच थोड्याच बाजूला पाण्याची टाकी आहे. डाव्या बाजूला
(पूर्वेला) कुंडलिका खाडीच्या दिशेला एक प्रवेशद्वार आहे. येथून खाली ऊतरण्यासाठी पायऱ्या
आहेत हीच ती वाट जी आपल्याला गावात घेऊन जाते. किल्ल्यावर असणारा चर्च, तेथील प्रवेश द्वाराच्या माथ्यावर असलेले शिलालेख आणि
तेथील असणारे बुरुज असा हा पोर्तुग्रीज थाटणीचा किल्ला आपल्याला त्याचे वेगळेपण दाखवून
देतो.
अरे मयूर. रोनाल्डो ला जर इथे आणला तर
तो किती खुश होईल ना!! आपल्या पूर्वजांची केलेली
कामगिरी पाहून. असा एक मिश्किल टोमणा हेमंत ने मारला. आम्हीही त्याला हसून दाद दिली.
आमच्या तिघांशिवाय किल्ल्यावर कोणीही
नव्हते त्यामुळे बराच वेळा आम्ही तिघेही त्या "रत्नाकराकडे" मंत्रमुग्ध होऊन
पाहत होतो. गर्दी नाही कसला गोंधळ नाही. सगळे कसे मनाला शांत आणि प्रसन्न करणारे वातावरण.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मिळणारे हे काही निवांत क्षण, निसर्गाच्या सान्निध्यातले
आम्ही मुक्त मनाने अनुभवत होतो. थोडी विश्रांती, थोड्या गप्पा, थोडे फोटोसेशन केल्यावर
तिथून आम्ही निघालो खरं पण जरा पाऊले जड होऊनचं.
खाली गेल्यावर आम्ही चौकशी केली असता
कळलं कि इथे कोणाला रात्री वस्तीला राहता येत नाही. बाजूलाच द्विपगृह असल्याने तशी
परवानगीही नाही. तिथल्याच बोअरवेल चे पाणी तोंडावर मारून तिघेही परतीच्या प्रवासासाठी
ताजेतवाने झालो. जाता -जाता पुन्हा कोर्लईचे दर्शन आणि समोर दिसणाऱ्या अथांग समुद्राचे
ते नयनरम्य दृश्य डोळ्यांमध्ये साठवत आणि एक नवा उत्साह घेत परतीचा प्रवास सुरु केला.
Note:- This article has been published in 10th feb 2017 lokprabha magazine.
http://epaper.lokprabha.com/m/1091440/lokprabha/10-02-2017#issue/64/1