कनकेश्वर
अलिबाग तालुक्यातील श्री
क्षेत्र कनकेश्वर हि तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ऋषीमुनी व शिवभक्त येथे
आराधना, साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य करीत असत. असें म्हणतात कि निसर्गाच्या
सान्निध्यात परमेश्वराचे अस्तित्व असते आणि जो त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न
करतो त्याला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. निर्बिड जंगलाचा परिसर असलेले
हे मंदिर अलिबागच्या ईशान्येस १२ कि.मी. वर एका निसर्गरम्य अशा डोंगरावर वसलेले
आहे. समुद्र सपाटी पासून उंची सुमारे ५००० फुट. अनेक दिवस नित्याच्या पाठी लागून शेवटी तो तयार
झाला. माझा जन्म हा सोमवारचा असल्याने लहानपणा पासूनच मला पशुपतीनाथां
विषयी फार प्रेम.. मग कुठेही शिवालय दिसले तरी मी त्याचे दर्शन घेतल्याशिवाय रहात
नाही.
कनकेश्वराच्या दर्शनाला
जाणार म्हणून सकाळी लवकरच थंडीतूनच निघालो.
हळूहळू वडखळ, ईस्पात असें करत कधी कनकेश्वराच्या पायथ्याशी पोहोचलो कळलेच
नाही. या स्थळाचे नाव कनकेश्वर पडण्याचे कारण म्हणजे शिवाने कनकासुर नामक राक्षसाचा वाढ केला होता अशी आख्यायिका
सांगितली जाते. शिवालयात पोहोचण्यासाठी सुमारे ७०० पायऱ्या वर चढून जावे लागते. या
पायऱ्या १७४४ साली सरदार “ रघुजी आंग्रे” यांचे दिवाण “ गोविंद रंगदास” यांनी
बांधल्या. वर जाणाऱ्या पायऱ्या जमिनीलगत
समांतर असल्याने आबालवृद्ध अगदी सहज दर्शनासाठी जाऊ शकतात.
सुरुवातीलाच एका मार्बल
मध्ये मंदिराची माहिती आणि विशेष सूचना कोरलेली आहे. अशी पायऱ्यांची माहिती देणारा
मार्गदर्शक आपल्याला आपल्याला बहुतेक टप्प्यांवर दिसतो.
कुठलाही विशेष दिवस
नसल्यामुळे भक्तांची फारशी वर्दळ नव्हती; श्रावणी सोमवारी विशेषतः फार गर्दी असते.
गप्पा मारत ..थोडेसे फोटोसेशन J करत नागोबाच्या टप्प्याला आम्ही पहिली विश्रांती घेतली.
काही अंतर चढल्यावर
कनकेश्वराची पाउल खूण असलेली “देवाची पायरी” आपल्याला प्रथम दर्शन देते. थोड्याच
वेळात आपण गायमांडी या दुसऱ्या विश्रांतीस्थानापर्यंत पोहोचतो. तिथून कठिण
चढ समाप्त होतो.
गायमांडीचा टप्पा म्हणजे एका खडकाच्या खळग्यात गायीची पावले असून मुर्ती आहे. तसेच बाजूला ५ शिवलिंगे आहेत. एका गुराख्याच्या गायीच्या स्मरणार्थ बांधलेली हि जागा आहे असे येथील स्थानिकांकडून समजते. तिथून जवळच पिण्याच्या पाण्याची ही सोय केलेली आहे. तेथील थंडगार पाणी पिऊन आपला आत्मा शांत होतो; त्याची चव जणू काही अमृतासमानच! पुढे निर्बिड जंगलातून जाताना वाटेत पालेश्वराचे मंदिर लागते. याची विशेषतः म्हणजे याला फक्त पालाच वाहतात. येथून थोड्याच अंतरावर आपल्याला कनकेश्वराचे मंदिर दिसते. बाजूला असणाऱ्या प्रशस्त विहिरीला सभोवती जाळी मारून बंदिस्त केलेली आहे. कदाचित स्वच्छता/सुरक्षेच्या कारणास्तव केली गेली असावी. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच वानरसेना आमच्या स्वागताला तयार होतीच. आपण त्यांच्या वाटेला गेलो नाही तर तसा त्यांचा काही त्रास नाही.. हां पण; जर तुमच्या हातात प्रसाद किंवा खाण्याचे कही समान वगरे असेल तर जरा सावधच! कारण माझ्या हातातला प्रसाद चक्क दोनदा गायब झाल्यावर याचा मला चांगला अनुभव आला होता. मग काय... रिकाम्या हातानेच कनकेश्वराच्या दर्शनासाठी आत प्रवेश केला. त्यापूर्वी प्रवेश द्वारावरच्या भिंतीवर कोरलेले २ द्वारपाल आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. जसे अगदी जय-विजयचं.
गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाला
मनोभावे नमस्कार केला, एक मिठी मारली आणि मनात खूप भाव-भावनाचे तरंग उसंबळून आले.
नाथांच्या “धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला ” या ओळी
नकळतच ओठातून बाहेर आल्या.
मुख्य मंदिराला लागूनच “राम
सिद्धीविनायक” देवस्थान आहे. त्याची संपूर्ण माहिती तेथील एका फलकावर लावलेली आहे.
श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य लंबोदरानंद स्वामी यांनी या मंदिराची स्थापना १८७६
साली केली आहे. मंदिराच्या परिसरात आपल्याला ब्रम्हकुंड, संत मनामाता समाधी मंदिर
इ. चे दर्शन होते. येथील निरव शांतता पाहूनच त्यावेळी संतांनी या स्थानाची तपासाठी
निवड केली असावी. कनकेश्वर परिसरातील थंडगार हवा व दाट वनराई याची कोणाला मोहिनी
पडली नाही तर नवलंच!
येथील व्याघ्रेश्वर या
देव्स्थानावरून कर्नाळा,माणिकगड,सागरगड व खांदेरी-उंदेरी हे दिसतात.
पात्रुदेवीच्या मंदिरापासून खाली गेल्यावर समुद्र व मुंबई दिसते. देवस्थानाविषयी
जी थोडी फार माहिती मिळाली ती अशी की, पुजा व अर्चा उत्सवाची व्यवस्था आंग्रे यांच्याकडून होत
असें. मंदिरासभोवतालाचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील वनस्पतीचे उत्पन्न हे
देवासाठी वापरले जात असें. सरकारी दप्तरी हा डोंगर देवाच्या नावे नोंदवलेला आहे.
रघुजी आंग्रेनी सवाई माधवराव पेशव्यांकडून १७७६ साली पायथ्याशी असलेले सोगाव हे
गाव सर्व हक्कांसह देवस्थानाला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे
त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारी जत्रा.
थोडा वेळ विश्रांती
घेतल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. पाऊले थोडीशी जडचं झाली होती निरोप
घेताना. “शिव हर शंकर नमामि शंकर” चा जयघोष मनात चालू ठेवत आणि एकदा तरी श्रावण
महिन्यात तुझ्या दर्शनाला परत येईन अशी खुणगाठ मनाशी बांधत तिथून तिथून मार्गस्थ
झालो...
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''शंभो'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''